एवढ्या मोठ्या प्रमाणावर लॉकर हलवल्यामुळे सगळे दागिने डब्यातून बाहेर पडून लॉकरमध्ये इतस्ततः पडले होते. आत हात घालून एक एक नग बाहेर काढून डब्यात भरले आणि ह्याची देही ह्याची डोळा ‘अजि मी ब्रह्म पाहिले’असे वाटून पाटल्या बांगड्या पाहून धन्य झाले.
माझ्या या आठवड्याच्या भविष्यात नुकसान योग होता बहुतेक. चांगले राजस्थानच्या ट्रिपला गेलो होतो. ट्रिप अगदी मजेत चालली होती. लेकाने नुकताच घेऊन दिलेल्या कॅमेर्याने शूटिंग करत होतो. ट्रिप मधली इतर जोडपी; त्यात विशेष करून नवरे आपल्या बायकोला प्रत्येक नक्षीकामाच्या ठिकाणी उभे करून फोटो काढत होते. कधी नवरा, बायकोचे तर कधी बायको, नवर्याचे.
आमच्याकडे जरा तसा रसिकतेचा आनंदच. मीच आपली ‘अहो जरा उभे रहा नं’ ‘तिकडे जरा तिरके बसा’ असं करून फोटो काढत होते. कधी कधी सांगावं लागायचं, ‘अहो मी जरा त्या नक्षीदार खिडकीत बसते. तुम्ही माझा फोटो काढा.’ तर कधी ‘मी त्या कारंज्या शेजारी उभी राहते तुम्ही फोटो काढा.’ असं आमचं रडत खडत, रमत गमत, जमलं तर जमलं, राहिलं तर राहिलं अशा तर्हेनं फोटो काढणं चाललं होतं. तरी उंटाचे, उंटावर बसलेले, उंटाच्या शेजारी उभे राहून, वाळवंटात वाळूत बसून, कसे न् काय फोटो काढण्याची हौस भागवून घेत होतो. चला दोघांनाही फोटोग्राफी चांगली जमायला लागली ह्याचा आनंद होता.
पण माझ्या नशीबात हा आनंद फार काळ काही टिकणार नव्हता. छान पैकी वाळूत फतकल मारून बसले होते. लवकरच समोर सुर्यास्त दिसणार होता. सर्वजण कॅमेरा सरसावून बसले होते. तेवढ्यात ग्रुप लिडरने ग्रुप फोटोची टूम काढली. झालं. भराभरा सगळे उठले. आमची स्वारी उठायचा प्रयत्न करतीय, पण उठता कुठे येतंय? एका हातात कॅमेरा, एका हातात पर्स; हा एवढा देह काही तरी टेकू घेतल्याशिवाय उभा राहणार थोडाच. त्यात पाय खाली रूतत जाऊ लागले. झालं. अस्मादिकांचा तोल गेला, आणि स्वारी हातातील कॅमेर्यासकट सपशेल वाळूत. वाळूच असल्याने लागले नाही फारसे, पण वाळूने करायचे ते काम केले. वाळूचे बारीक कण कॅमेर्याच्या लेन्समध्ये गेले. संपलं सगळं. वारंवार कॅमेरा ओपन करून पाहतो आहे पण होतोय कुठं क्लिक? झालं. ज्या गोष्टीची एवढ्या आतुरतेने वाट पहात होतो ती सुर्यास्ताची वेळ जवळ येऊन ठेपली. प्रत्येक जण वेगवेगळ्या तर्हेने फोटो काढत होते. माझी आपली कॅमेर्याशी झटापट चालली होती. पण लेन्स उघडायला काही तयार नव्हती. हे खरंच शांत म्हणून ठिक. फक्त हळूहळू माझ्या धांदरटपणाचा उद्धार करत होते, दुसरा कुठला नवरा असता तर नक्कीच चार लोकांत तमाशा केला असता. मला अगदी मेल्याहून मेलं झालं. समोर सूर्यास्त दिसत असून सुद्धा त्यात आनंद घेऊ शकत नव्हते. खरंच आपण कोणतीही चांगली गोष्ट वापरण्याच्या लायकीचे नाही. पण मी तरी काय करणार? मी मुद्दाम थोडीच पडले. शेवटी हा एक अॅक्सीडेंट आहे असे म्हणून मनाचे समाधान करत होते.
पुढच्या संपूर्ण ट्रिपमध्ये मी त्याला ‘मीस’ केलं! अनेक चांगल्या चांगल्या दृश्यांना मुकले. लोक पटापट दृश्ये टिपत होती व मी त्या सर्वांना मात्र मुकले.
कधी एकदा पुण्यात येऊन कॅमेरावाल्याला कॅमेरा दाखवते असं झालं. जवळच्याच एका स्टुडिओवाल्याकडे गेले, तर त्याने ठेवून जा. दोन दिवसांनी सांगतो असे सांगितले. दोन दिवसांनी गेले तर म्हणतो कसा, ‘मॅडम कॅमेरा फेकून द्या, नवीन घ्या!’
‘अरे वा रे वा: तुला काय जातंय नवीन घ्या म्हणायला. माझ्या लेकाने मला अमेरिकेहून आणून दिलाय कॅमेरा,’ पण हे सगळं स्वगत. त्याच्याकडून कॅमेरा घेतला अन् दुसर्या एका खात्रीशीर दुकानदाराकडे गेले. तो म्हणाला, ‘नो प्रॉब्लेम दोन दिवसांत दुरूस्त करतो. सातशे रुपये पडतील.’ करं बाबा दुरूस्त. त्याच्या दुरूस्त होणार ह्या म्हणण्यानेच मला खूपसे हायसे वाटले. बारा-पंधरा हजाराला बसणार्या फटक्याने सातशे रुपयांवर समाधान मानले.
ह्या मधल्या काळात असेच चारशे दोनशेचे फटके बसतच होते. जाऊ दे. आपल्या सध्याच्या भविष्यातच हे आहे असे म्हणून स्वतःचे समाधान करून घेत होते.
त्यातच संक्रांतीच्या हळदीकुंकवाला ह्यांच्या आत्यांकडचं बोलवणं आलं. सध्या चोरांच्या भितीने दागिने घालायची सोय राहिली नसल्याने गळ्यात एक ग्रॅमचं मंगळसूत्र, तर हातात बेंटेक्सच्या बांगड्या असं घालून हल्ली मिरवणं चालतं. त्यात ट्रिपमध्ये तर काहीच नको.
म्हटलं चला आज खरे दागिने घालून मिरवायचा योग दिसतोय. असं म्हणून लॉकर उघडला मंगळसूत्र घातलं. पाटल्या, बांगड्या घालायच्या म्हणून पाहते तो कुठेयत? बापरे ब्रम्हांड आठवलं. थोडा बुद्धीला जोर दिला, परवा बाकीचे दागिने लॉकरमध्ये टाकले. त्या बरोबर ह्या पण नाही ना टाकल्या? पण काही आठवायला होईना. टाकल्या का नाही टाकल्या. काहीच बोलले नाही. कपाट बंद केले. पुन्हा बेंटेक्सचेच दागिने घालून हळदीकुंकवाला गेले. पण झालं, मनस्वास्थ बिघडलं. जर पाटल्या बांगड्या बॅँकेत टाकल्या नसतील तर…. या ‘तर’ ने झोप उडवली.
आज रविवार, उद्या 26 जानेवारी, बँकेत जाणं परवा होईल. सर्व व्यवहार चालले होते पण मन थार्यावर नव्हतं.
मंगळवारी बँकेत जायला निघाले. मनात सर्व लक्ष्मीची स्तोत्र. हरवलेलं सापडवावं म्हणून मैत्रिणीने सांगितलेला श्लोक
कार्तविर्यार्जुनो नाम्ः राजा बाहुसहस्त्रवान।
तस्य स्मरण मात्रेण् गतंम् नष्टंच लभ्यते॥
हे देवा, जे हरवले आहे ते नष्ट न होता माझे मला परत लाभू दे. रिक्षा केली. बँकेत जायला निघाले. मनात नाही नाही ते विचार सुरू झाले. गावाहून आल्या आल्या माझ्याकडे काम करणार्या मुलीने सांगितले, ‘आई मी एक तारखेपासून काम सोडतीय.’ मनात विचारांचा कल्लोळ. हिनं असं तडकाफडकी काम का बरं सोडलं, दुसरं मन सांगतंय छे: छे: तसं काही नसेल. असं कसं शक्य आहे. आणि पाटल्या बांगड्या अशा सहजा सहजी तिच्या हाती बर्या लागतील. ते काही नाही, त्या नक्की बँकेतच आहेत. अशी दोन मनांशी भांडत बँकेत पोहोचले.
तर तिथे भली मोठी पाटी ‘बँकेचे लवकरच दुसर्या जागेत स्थलांतर होत आहे.’ तिथे त्या ऑफिसरने सांगितले लॉकर सिस्टिम नव्या जागेत जात असल्याने आठ दिवस लॉकर सेक्शन बंद आहे. बाप रे! म्हणजे पुढचे आठ दिवस टांगती तलवार. पुन्हा हातापायाला घाम फुटला, छातीत धडधड सुरू झाली. दुसरं मन पहिल्या मनाला समजावत होतं; काही काळजी करू नकोस, पाटल्या बांगड्या इतर दागिन्याबरोबर लॉकर मध्येच आहेत.
पुन्हा आठ दिवस वाट पहाणं. मनात पॉझिटिव्ह विचार ठेऊन पुढचे आठ दिवस ढकलत होते. पण रात्री कधीतरी मध्येच तो दागिन्यांचा डबा डोळ्यासमोर यायचा की ज्यात पाटल्या बांगड्या नसायच्या.
पुढचे आठ दिवस तसेच गेले. पुन्हा बँकेत गेले. त्या ऑफीसर बाईंसमोर जाऊन उभी राहिले. तिला विचारले, ‘झाली का तुमची प्रोसिजर पूर्ण? गेले का लॉकर नव्या जागेत?’ ती एवढी कामात होती की तिने मान वर न करताच सांगितले की, ‘लॉकर नव्या जागेत गेले.’ झालं अस्मादिकांची स्वारी निघाली नव्या ब्रँचकडे. मनात पुन्हा श्रीसूक्त, कार्तवीर्याची आळवणी चालूच.
तिथे गेले. त्या ब्रँचला अजून सगळा बांधकामाचा पसारा तसाच. त्यात ते लॉकर आणून टाकलेले. तिथला सिक्युरीटी गार्ड म्हणाला, ‘त्या तिकडच्या मॅडम ना घेऊन या, त्याशिवाय कसा लॉकर उघडणार?’ पुन्हा दोन चौक पलिकडे त्या मॅडमना बोलवायला गेले. काय करणार, अडला नारायण…. मला अगदी ह्याची डोळा त्या केव्हा एकदा पाटल्या, बांगड्या पाहीन असे झाले होते. पुन्हा जुन्या ब्रँचला गेले. त्या बाईंवर आता मात्र चांगलीच चिडले होते. ‘ओ मॅडम तुम्ही मघाशी जाताना मला इथे, रजिस्टरवर सही करून जा म्हणून सांगायला काय झाले?’ त्या बाई पण बिचार्या इकडून तिकडे, तिकडून इकडे करून जाम दमल्या होत्या. ‘मी एकटी बाई आता कुणाकुणाला काय काय उत्तर देऊ. चला करा सही जाऊया तिकडे.’
पुन्हा आमची वरात त्या दुसर्या ब्रँचला सही करून निघाली. नवीन ब्रँचला पोहोचले तर काय, माझ्या लॉकरसमोर एक मोठ्ठं लॉकरचं कपाट. त्या मॅडम म्हणाल्या, ‘ताई तुम्हाला नाही लॉकर उघडता येणार. कारण हे कपाट इथून हालवणे अशक्य आहे.’ मला समोर लॉकर दिसत होता, हातात किल्ली होती पण मला लॉकर उघडणे शक्य नव्हते. माझी असाह्यता पाहून त्या मॅडम म्हणाल्या, ‘ताई, तुम्हाला काय करायचंय? ठेवायचं आहे का काढायचं आहे?’ त्यावर मी काय बोलणार की मला फक्त बघायचं आहे! मी माझ्यावरच चिडले होते. तो राग त्या मॅडमवर काढत म्हटलं, ‘तुम्हाला काय करायचंय? मी ठेवीन नाहीतर काढीन.’ त्या तरी काय करणार बिचार्या.
‘जाऊ दे वहिनी, तुम्ही आता अजून आठ दिवसांनी या. तुम्ही नक्की लॉकर उघडू शकाल.’ मनातल्या मनात बँकेला, त्या मॅडमला आणि स्वतःला शिव्या घालत बाहेर पडले.
पुन्हा ते आठ दिवस, ती वाट पहाणे, मनाला समजावणे, हा महिना माझ्या आर्थिक नुकसानीचा माझ्या भविष्यात असला; तरी हे नुकसान मला परवडणार नव्हतं. पुन्हा मनाला दुसर्या मनाचा आधार देत कसा तरी एक आठवडा काढला.
आज रविवार आता फक्त एक दिवस उरला वाट पाहण्याचा असा मनाला दिलासा देत होते. तर कळले सोमवार, मंगळवार बँकांचा संप. झालं. आता माझा धीर सुटत चालला. आपल्या पुढे आता काय वाढून ठेवलंय त्या ईश्वरालाच माहिती.
दोन दिवस कसेबसे काढले आणि मंगळवारी नाही पण बुधवारी अकरा वाजता देवाच्या पाया पडून श्री सुक्त, कार्तवीर्याची उपासना करून पायात चपला घातल्या. सुनेला म्हटलं, ‘जय गणेश, मला बेस्ट ऑफ लक दे.’
ती म्हणाली, ‘कशासाठी?’
काय सांगू तिला कपाळ? म्हटलं, ‘आज माझं काम फत्ते होऊ दे.’ लढायला निघाल्याप्रमाणे मनाची तयारी केली.
बँकेत गेले. नवीन जागेत बँक गेल्याने दारात रांगोळ्या काढल्या होेत्या. दारातच पेढा देऊन, नवीन जागेत आल्याचे स्वागत होत होते. मी मनात ‘काही नको तुमचा पेढाबिडा मला. आधी लॉकर उघडू द्या.’ त्या सेक्शनला गेले त्या मॅडमची अजून सगळी मांडामांड व्हायचीच होती. मला पाहिल्यावर म्हणाल्या, ‘या काकू, आज तुमचं काम नक्की होणार.’ तिने पोत्यातून रजिस्टर काढून माझी सही घेतली. तिच्या किल्लीने लॉकर उघडला. मी माझी किल्ली लावली. आत हात घालून माझा दागिन्यांचा डबा काढला. तर काय सगळा रिकामा… मग लक्षात आले, लॉकर हलवल्यामुळे सगळे दागिने डब्यातून बाहेर पडून लॉकरमध्ये इतस्ततः पडले होते. आत हात घालून एक एक नग बाहेर काढून डब्यात भरले आणि ह्याची देही ह्याची डोळा ‘अजि मी ब्रह्म पाहिले’ असे वाटून पाटल्या बांगड्या पाहून धन्य झाले. साधी, क्षुल्लक, छे: छे:, केवढी मोठी गोष्ट होती ती. पण ती आहे हे बघायला तीन आठवडे मला वाट पहावी लागली. आणि ह्या महिन्यातले भविष्यातले आर्थिक नुकसान टळले. सर्व व्यवस्थित आत टाकून किल्ली फिरवली. पुन्हा रजिस्टर वर सही करणार तर मॅडम म्हणाल्या, ‘आजी झालं का तुमचं काम?’ ‘हो’ तिला काय सांगणार? हे माझं काम व्हायला मला ‘ताई ते आजी’ एवढा प्रवास करावा लागला…
-छाया जोशी