Close

मैत्रीण (Short Story: Maitrin)

रात्रीचे नऊ वाजत आले होते आणि सारा अजूनही घरी परतली नव्हती. रेवती अस्वस्थ होऊन व्हरांड्यात येरझारा घालत होती. संध्याकाळी सात वाजेपर्यंत घरी परतेन, असं कबूल करून सारा तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. पुढे त्या दोघी मिळून नाटकाच्या तालमीसाठी जाणार होत्या. आजी-आजोबांना दिवेलागणीनंतर घराबाहेर राहिलेलं आवडत नाही, हे साराला चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच तिला उशीर झाला की, रेवतीला खूप ताण यायचा. सारा ही त्यांची एकुलती एक मुलगी. साराभोवतीच सारं घर केंद्रित असल्यामुळे हे साहजिकच होतं.
‘आली का गं सारा?’ आजी थोड्या-थोड्या वेळाने विचारत होती. साराचे बाबा ऑफिसच्या कामासाठी टूरवर गेले होते आणि त्यामुळे रेवतीचं काळजीचं पारडं जड होऊ लागलं होतं.
तिने साराच्या मैत्रिणीकडे फोन लावला. तिचे आईवडीलही काळजीत होते. बरं दोघींचे मोबाईलही लागत नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. शेवटी रात्री दहाच्या नंतर सारा एकदाची आली. कुणा मुलाची बाइक अंगणात येऊन गेली आणि बाइक जाताक्षणीच साराची स्कूटी फाटकातून आत शिरली. व्हरांड्यात आई उभी असल्याचं तिने पाहिलं. तिने स्कूटी बंद करून फाटक बंद केलं आणि घराच्या दिशेने वळली तर आई व्हरांड्यात नव्हती. वातावरण चांगलंच तापलंय याची तिला जाणीव झाली.
सारा आल्याचं आजी-आजोबांना सांगून रेवती जेवण गरम करायला स्वयंपाकघरात निघून गेली. सारा हातपाय धुऊन टेबलापाशी आली. उशीर झाल्यामुळे आधीच तिला खूप अपराधी वाटत होतं. त्यामुळे रोजच्यासारखं आईच्या गळ्यात हात घालून लाडवायची तिची हिंमत झाली नव्हती. पण आपल्याला उशीर का झाला हेही विचारायची आईची इच्छा नाही, हे पाहून ती जरा निराशच झाली. मुकाट्याने जेवण आटोपून ती खोलीत आली. मागचं आवरताना आईचा राग साराच्या लक्षात येत होता. सारा दार लावून बिछान्यावर पडली. पण तिचं मन अस्वस्थ झालं होतं. नकळत तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हुंदके येऊ लागले… ‘आजी, आजोबा, आई… कुणीही विचारू नये की, उशीर का झाला?’ हुंदके आणि अश्रूंचा डाव रंगायला लागला. तिच्या मनात प्रश्‍नांवर प्रश्‍न घोंगावू लागले.
‘आई मला समजून का घेत नाही? घरी यायला एरव्ही जरा उशीर झाला की प्रश्‍नांच्या तोफेच्या तोंडी जावं लागतं नि आज मात्र एवढी मोठी घटना घडूनही हिने किंवा आजीने मला साधं कारणही विचारू नये? एवढा मोठा कोणता गुन्हा केला मी? मला
माझं स्वतंत्र अस्तित्वच नाही? माझंही स्वतंत्र विश्‍व आहे! हे आजीला नाही, पण आईलाही कळू नये?’ प्रत्येक प्रश्‍नासोबत तिचे हुंदके आणि अश्रू वाढतच होते. साराच्या मनात विचारांचं चक्र सुरू होतं… ‘भावी आयुष्याविषयी बोलताना आम्ही सारे मित्रमैत्रिणी कसे रंगून गेलेलो असतो. सगळ्यांच्या डोळ्यात भविष्याची रफ् स्केचेस तयार असतात. शोध सुरू असतो फक्त रंगांचा. जसजसे रंग हाती येतील, तसतसे ते भरण्याची… त्याला शेड्स देण्याची तयारीही सुरू असते. भरारी घेण्यासाठी असा सराव करून घरट्यात परतताच, आपले पंख छाटले जाण्याचा भास व्हावा… नि तोही आपल्या आईकडून! आपल्या मुलीने उडूच नये, असं वाटतं की काय तिला?’
दार बंद केलेल्या खोलीत एक वादळ घोंगावत होतं आणि दाराबाहेर दुसरं वादळ थैमान घालत होतं. रेवतीच्या भरलेल्या डोळ्यांत नि मिटलेल्या पापण्यांत एक चित्रपट सुरू झाला होता, तोही फ्लॅश बॅकमधला. सोळा-सतरा वर्षांपूर्वीचा. तिच्या बाहुलीच्या-साराच्या जन्माचा, नंतर तान्हुल्या साराचा. तिच्या कोवळ्या लोभसवाण्या स्पर्शाचे तरंग आजही तिच्या मनात तसेच टवटवीत होते. तिचं भुकेमुळे रडणं, दूध प्यायल्यानंतरची चेहर्‍यावरची तृप्ती, तिचं निरागस हास्य अजूनही मनाला भुरळ पाडत होतं. तिची खेळणी, बाहुल्या, खेळभांडी, बडबड गीतं, शाळेतली पुस्तकं, हट्ट… सगळं सगळं रेवतीच्या डोळ्यासमोर तरळत होतं. पण तिला सतत एक प्रश्‍न पोखरत होता… ‘सारा हे सर्व विसरली असेल की तिला थोडं फार… काही तरी आठवत असेल? पूर्वी तिच्या प्रश्‍नाचा, समस्येचा अंत माझ्याजवळ व्हायचा. कुठलाही निर्णय घेताना तिला माझा आधार हवा असायचा. बाहेर कुठे हिरमुसली तर ती माझ्या कुशीत येऊन रडायची. मी समजावल्यावर हसायची… फुलायची. कालपरवापर्यंत मला बघून फुलणारी फुलराणी… आज मला बघून कोमेजते?’ या नि असल्या असंख्य विचारांनी रेवतीचं डोकं बधिर झालं. इथेही हुंदके होते… पण त्यांना आवाज नव्हता. अश्रूही होते… पण तेही आतल्या आत पाझरणारे… चेहरा कोरडा होता. म्हणूनच तर साराचं मन अधिकच आक्रंदून उठलं होतं… विचारात पडलं होतं… ‘आपल्या आईचं मन इतकं निष्ठुर झालंय का? तिच्या भावना आपल्या बाबतीत इतक्या आटल्या आहेत का?’
दोघीही दोन वेगळ्या बेटावरून एकमेकींना बघत होत्या. पण ते फक्त बघणंच होतं, कारण समजून घ्यायला त्या दोन बेटांमधलं अंतर कमी व्हायची गरज होती. साराच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर, तिच्या वाढीची-मोठं होण्याची गंमत अनुभवताना, ती आता खरंच मोठी होत आहे, वयात येऊ लागलीय आणि त्यामुळे तिच्यात शारीरिक बदलांसोबतच मानसिक बदलही होऊ लागलेत…


आनंद, राग, प्रेम अशा सर्वच भावनांना धार आलीय… कालपरवापर्यंत तिच्या मनावर असलेला आईचा पगडा थोडा
सैल होऊन त्या जागी मित्रमैत्रिणींचा शिरकाव झालाय, याचा मात्र रेवतीला विसर पडला होता.
तिचा पदर सदैव मायेनेच भरलेला असणार, पण तिचं पिल्लू त्या पदराखालून हळूच मान बाहेर काढून भोवतालच्या विश्‍वाकडे कुतूहलाने बघतंय, त्या दृष्टीत वेगळे भाव दिसताहेत, हे रेवतीच्या लक्षातच येत नव्हतं. चांगले संस्कार करताना, शिस्त लावताना, तिच्या बदलत्या भावविश्‍वाची दखल घ्यायला हवी, हे तिच्या लक्षातच येत नव्हतं.
सारा ‘त्या’ अवस्थेत होती. तिच्या भावविश्‍वात आता मित्रमैत्रिणींना महत्त्वाचं स्थान मिळालं होतं. तिचा स्वतःवरचा विश्‍वास वाढीला लागला होता. आपण जे काही करतो आहोत, ते योग्यच आहे, असं तिला वाटू लागलं होतं. कोणताही निर्णय स्वबळावर घेण्याची इच्छा आपल्यात आहे, अशा सुप्त जाणिवेतून ती पावलं उचलू लागली होती. यातून तिच्यात थोडी बेफिकिरी, थोडी बेचैनी आली होती. आता तिचं मन मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रमू लागलं होतं. आईची बंधनं तिला जाचक वाटू लागली होती. तिचं वयच तसं होतं. सतत वादळाशी दोन हात करावंसं वाटणारं आणि परिणामांची पर्वा न करणारं! म्हणूनच तर आईला तिच्याविषयीची वाटणारी चिंता तिला त्रासदायक वाटत होती. दोन ध्रुवांवर
दोन भिन्न व्यक्ती, दोन भिन्न प्रवृत्तीने ग्रस्त होत्या.
इकडे रेवतीच्या मनात साराविषयीची चिंता दाटून आली. तिला वाटलं, ‘कसं होईल या पोरीचं? इतकी तळहातावरच्या फोडासारखी जपली, फुलासारखी वाढवली. पण मी काहीही सांगितलं, तरी हिला पटत का नाही? एक तर कसे विचित्र दिवस आले आहेत! दिवसाढवळ्याही स्त्रियांना-मुलींना बाहेर सुरक्षित वाटत नाही, मग रात्र तर काळी असते… वैर्‍याची असते! तारुण्याचं, सौंदर्याचं वरदान लाभलेल्या या मुलीला लवकर उजवलं पाहिजे. या आणि अशा अनेक विचारांत रेवती गुंतली असतानाच दरवाजाची बेल वाजली. साराचे बाबा टूरवरून परतले होते. घरात शांतता, वातावरण गंभीर आणि रेवतीचा चेहरा काळजीने थकलेला पाहून ते म्हणाले, “काम लवकर आटोपलं, म्हणून लवकर आलो. पण घरात काय झालंय? सारं कसं शांत शांत… आणि सारा कुठे दिसत नाही ती? आईबाबा कसे आहेत?” त्यांचा प्रश्‍नांचा मारा ऐकून रेवतीला गलबलून आलं, पण प्रवासातून आल्या आल्या त्यांना त्रास नको म्हणून ती काही बोलली नाही.
एवढ्यात सारा डोळे पुसत बाहेर आली आणि बाबांच्या गळ्यात पडून मुसमुसू लागली. लाडावलेली त्यांची ‘बिट्टू’ रडताना पाहून त्यांनी तिला थोपटलं. हळूहळू ती सांगू लागली…
“मी आणि रूपा नाटकाची तालीम संपताच आपापल्या स्कूटी घेऊन घरी यायला निघालो होतो. वाटेत एक माणूस खूप दारू पिऊन आमच्यासमोर आला. आम्ही त्याला टाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याने रूपाची स्कूटी घट्ट धरून ठेवली. आम्ही खूप घाबरलो होतो. तेवढ्यात आमच्याच नाटकात काम करणारा संतोष पाठीमागून आला. त्याने हा सर्व प्रकार पाहिला आणि रूपाच्या स्कूटीजवळ आपली बाइक उभी करून त्या दारुड्याचा हात बाजूला करू लागला. त्यावर तो दारुडा भडकला आणि त्याने संतोषच्या गालावर जोरात मारलं. संतोषनेही त्याला चांगलंच चोपलं. तेवढ्यात कुठून तरी पोलीस तिथे आले आणि त्यांनी त्या दारुड्यासह आम्हा तिघांनाही पोलीस ठाण्यात नेलं. आमच्याकडून तक्रार नोंदवून घेतल्यानंतरच आम्हाला सोडलं. आम्ही दोघी खूप घाबरलो होतो. म्हणून मग संतोषने आधी रूपाला आणि नंतर मला घरी आणून सोडलं.”
सारा मुलाबरोबर एवढ्या उशिराने घरी आलेली पाहून रेवतीच्या मनात शंका-कुशंकांनी वादळ उठवलं होतं. त्यामुळे रागाने तिने साराला काहीच विचारलं नाही. आणि या घटनेमुळे घाबरलेली सारा आईचा रागावलेला चेहरा पाहून स्वतःहूनही काहीच बोलली नाही. पण झाल्या प्रकाराने दोघींनाही खूप मनस्ताप झाला होता.
दुसर्‍या दिवशी दुपारी अचानक रेवतीची आई, म्हणजे साराची आवडती सरूआजी आली. तिची आणि सरूआज्जीची अगदी गट्टी होती. तसं पाहिलं तर, रेवतीही आपल्या आईची अतिशय लाडकी होती. लहानपणापासून रेवती अगदी लहानसहान गोष्टीही आईला सांगायची. त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये मायलेकींच्या प्रेमाइतकाच विश्‍वासही होता. त्यांच्यात मैत्रीच्या नात्याचे बंध निर्माण झाले होते. रेवती नि साराचंही नातं असंच होतं. मग त्यात असा दुरावा का बरं आला, हा प्रश्‍न सरूआजीला पडला होता. आल्यापासून ती पाहत होती, दोघींचेही चेहरे गंभीर व उदासवाणे झाले होते.
जसजसा वेळ जाऊ लागला, तसतशी दोघींचीही कळी थोडी थोडी खुलायला लागली, ती केवळ सरूआजीच्या गप्पांमुळेच. सरूआजी म्हणाली, “अगं रेवती, तुला माहीत आहे का? आम्ही सर्व एकच लेक असलेल्या पालकांनी एकत्र येऊन ‘सहसंवेदना’ नावाचा गट स्थापन केला आहे.” या गटाचे उद्देश, फायदे वगैरे गोष्टी सांगून झाल्यावर सरूआजी म्हणाली, “पण रेवा, खरं सांगू? तू आमच्या जवळ, अगदी एकाच गावात आहेस ना, त्यामुळे आम्हा दोघांना आणि तुलाही काहीच फरक पडत नाही. तू सारालाही आपल्याच गावात दे. सगळ्या सुखदुःखांना आपण जवळ असतो.”
“कुणास ठाऊक आई, मुली मोठ्या झाल्या की त्यांचं विश्‍वच बदलतं. त्यांची भावनिक आंदोलनं आणि त्यातून उद्भवणारे धाडस हे बरेचदा अनाकलनीय असतं. पण मुलीपेक्षा आईला पुढच्या परिणामांची काळजी वाटू लागते. आणि मुलीच्या बचावासाठी आईने तिच्यावर काही बंधनं घातली किंवा कठोर पावलं उचलली, तर ते तरुण रक्त अधिकच सळसळायला लागतं. वाटतं तिला सांगावं, अगं पोरी, हे सर्व तुझ्या भल्याकरताच आहे. पण हे शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडायच्या आधीच ते वादळ घराबाहेर पडलेलं असतं. कसं समजावावं या पोरीला समजत नाही.” रेवती बोलत होती.
“काही काळजी करू नकोस रेवती, तूही या वयातून गेली आहेस. तुझं बालपण आणि तारुण्यातलं वय, त्या वेळेची तुझी मानसिकता समजून घेता यावी, यासाठी मी अनेक मानसशास्त्राची पुस्तकं वाचली होती. मुलगी वयात येते ना, तेव्हा आईने तिच्या भावनांचा नीट अभ्यास करायचा असतो. आजच्या चंगळवादी युगात आईने मुलीला दिलेलं व्यवहारज्ञान हरवू लागलं आहे. आमच्या आईने कुठे अशी पुस्तकं वाचली होती? पण आम्ही झालोच ना शहाण्या आणि राहिलो ना व्यवस्थित, तसंच साराचंही होईल बघ.” सरूआजी रेवतीची समजूत घालू लागली. सारा मात्र आई आणि आजीच्या गप्पा ऐकायला थांबली नव्हती. ती मोबाईल घेऊन केव्हाच तिथून सटकली होती.
रेवती म्हणाली, “पण आई, दिवसभर नोकरी करणार्‍या बायकांना आपल्या मुलीशी संवाद साधायला कुठे वेळ असतो? जीवन जगण्याचं कौशल्य, व्यवहार, शहाणपणा आणि कडूगोड अनुभव ऐकायची वृत्ती आजकाल कुठे राहिली आहे मुलांमध्ये? आईचा उपदेश म्हणजे जुनाट विचार, बुरसटलेल्या कल्पना असं त्यांना वाटतं. मग या नव्या पिढीला तो कसा रुचणार?”
“अगं, हे वैचारिक अंतर प्रत्येक दोन पिढीमध्ये असणारच आहे. बाहेरचं जग अतिशय धोकादायक बनतंय. चित्रपट, दूरदर्शनमधून त्याचं घडणारं बीभत्स दर्शन मुलींना शहाणं करेल बघ. पण अशा संघर्षमय काळामध्ये आईच मुलीची मैत्रीण होऊ शकते. ती मुलीला पुढच्या धोक्याची जाणीव देऊ शकते. पण त्यासाठी आई आणि मुलीमध्ये सुसंवाद असायला हवा. तुझं आणि साराचं तर खूप जमतं नेहमी. या वेळी तू रागावून काही बोलली नाहीस ना तिच्याशी, म्हणून ती दुखावली गेलीय बघ. पण आता मी गेल्यावर तू तिच्याशी मोकळेपणाने बोल आणि तिला समजून घे.” असं म्हणून सरूआजी निघून गेली. रेवती मात्र आपल्याच विचारांमध्ये गुंतून पडली होती. कधी एकदा साराला जवळ घेते आणि तिला समजावून सांगते, असं तिला झालं होतं.
संध्याकाळ झाल्यावर रेवतीने दिवा लावला आणि डोळे मिटून देवासमोर बसली. रेवतीच्या मनात विचारांनी थैमान घातलं होतं… ‘आजचं जीवन इतकं गतिमान आहे. या बदलांना भावनिकदृष्ट्या सामोरं जाण्यासाठी अनुभवातून आलेल्या शहाणपणाची, मार्गदर्शनाची आणि भक्कम आधाराची गरज आहे. आणि तो आधार आई म्हणून मीच साराला देऊ शकते. अरे… मी माझ्या आईसारखाच विचार करू लागलेय. आईने मला दिलेल्या चांगल्या विचारांचं नि संस्कारांचं बीज मी सारामध्ये पेरायला हवं, त्याचं तिला नक्कीच फळ मिळेल.’ या विचारात असताना, अचानकच नेहमीप्रमाणे साराचे हात तिच्या गळ्यात पडले. रेवती सुखावली… हळवी झाली आणि आत्तापर्यंत थोपवून ठेवलेला अश्रूंचा बांध तुटला. रेवतीचे
अश्रू साराच्या हातावर ओघळत होते. सारा एकदम सावरली. आत्तापर्यंतचे सगळे विचार तिने बाजूला ठेवले.
“आई, तू म्हणतेस तेच बरोबर आहे. मुलींनी सातच्या आत घरात यायला हवं, हे मलाही पटतं. पण काय करणार गं, काल नाटकाच्या तालमीला जरा उशिराच सुरुवात झाली. तरी मी तुला उशीर होईल म्हणून कळवायला हवं होतं, पण तालमीत इतकी गुंग झाली की, मला भानच राहिलं नाही. माझं चुकलंच गं. यापुढे असं नाही होणार. मला माफ कर.” सारा मुसमुसू लागली.
“नाही गं सारा, माझंच चुकलं. मी तुला विश्‍वासात घेऊन उशीर होण्याचं कारण विचारायला हवं होतं. पण रात्री दहा वाजता आपली मुलगी कुणा मुलासोबत घरी येते, या कल्पनेने माझं डोकं सणकलं आणि राग आवरायचा म्हणून मी बोललेच नाही. बिट्टू, तू आमचं सर्वस्व आहेस आणि या वयात तर मायलेकी मैत्रिणीच्या नात्याने जास्तच जवळ येतात.” रेवती साराच्या पाठीवरून हात फिरवत होती.
निवांत संवादामुळे मायलेकी एकमेकींना उमगत गेल्या. त्या वयात साराच्या मनातली भावनिक आंदोलनं रेवतीला समजली. तिच्या चिंतेची आणि साराच्या बिनधास्त वागण्याची उकल होत गेली. दोघींनी एकमेकींच्या भावनांचा आदर केला आणि मोकळेपणाने, विश्‍वासाने त्यांच्यातला दुरावा दूर झाला, कारण त्यांच्या नात्यात आता पूर्वीसारखा मैत्रीचा गोडवा आला होता.

Share this article