दोन पोलिस फाटक उघडून आत येत होते. एका अभद्र शंकेने ती पुढे झाली. ते पोलिस तिला पाहताच शांत व गंभीर स्वरांत काही तरी सांगू लागले. ते ऐकताच तिच्या तोंडून एक जीवघेणी व दुःखाची किंकाळी बाहेर पडली व तिचा तोल गेला.
घरी चालून आलेले एक चांगले स्थळ सुजाताने साफ नाकारल्यामुळे घरातील सारीच मंडळी सुजातावर आगपाखड करीत होती पण सुजाता मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. मुलगा का नाकारला? ह्यावर तिचे एकच उत्तर- “मला जास्त प्रश्न विचारू नका. मला त्या मुलाशी लग्नच करायचे नाही. हे माझे मत व निर्णय ठाम आहे. माझ्याकरिता हा विषय इथेच संपला आहे.” सुजाताच्या त्या उत्तराने तिचे आई वडील व भाऊ भावजयदेखील खूप संतापले होते. पण सुजाता ही एकविसाव्या शतकातील उच्च शिक्षित व स्वतःच्या पायावर उभी असलेली तरुणी होती. त्यामुळे तिला मारझोड वा जोरजबरदस्ती करून, सांगेल त्या मुलाच्या गळ्यात चूपचाप वरमाला घालणारी ती एकोणविसाव्या शतकातील गरीब गाय नव्हती. त्यामुळे घरातील मंडळी चरफडणे आणि तिच्या नावाने बोटे मोडण्याव्यतिरीक्त दुसरे काहीच करू शकले नाही. घरात वादळी शांतता होती. ह्याची तिला देखील जाणीव होती, पण ती जणू काहीच घडले नाही अशा थाटात आपली रोजची कामे आटपून बँकेत जाण्याच्या तयारीला लागली होती.
बँकेत आपल्या जागेवर बसून ती रोजच्याप्रमाणे कामाला लागली. पाहता पाहता ती आपल्या कामात नेहमीप्रमाणे गर्क झाली. लंचटाईम झाल्याची ती सूचना होती. सुजाताने आपले पसरलेले सामान नीट केले व टिफीन बॉक्स घेऊन ती हॉलच्या दिशेने चालू लागली. आज तिला एकटीलाच लंच घ्यावा लागणार होता. कारण तिच्या मैत्रिणी संगीता व मेघना आज रजेवर होत्या. ती नेहमीच्या जागी बसली आणि त्याचवेळी तिच्या पर्समधील मोबाईल खणखणल्याचे तिच्या लक्षात आले.“हॅलो मॅडम! आपण सुजाता साठेच ना! मी मकरंद साने. मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे व एक विनंतीही करायची आहे. मॅडम तुम्ही एक तास सुटी घेऊन कॅफे वृंदावनमधे येऊ शकाल काय? मी तिथे तुमची वाट पाहीन. तेथेच आपणाला सार्या गोष्टींचा उलगडा करता येईल. माझी एवढी विनंती आपण मान्य कराल अशी मला खात्री आहे.”
“हे बघा मिस्टर मकरंद, जर तुम्ही परवाच्या माझ्या नकाराबद्दल विचारणा करणार असाल तर माझी भूमिका स्पष्ट व ठाम आहे. यापुढे त्या संदर्भात चर्चा करण्यात मला मुळीच रस नाही आणि राहिला प्रश्न एक तास सुटीचा तर ते आज शक्य नाही. कारण आज दोन मॅडम सुटीवर आहेत. त्यामुळेे मला जागा सोडता येणार नाही. या स्पष्टीकरणांमुळे तुमचा माझ्याशी बोलण्याचा विचार रद्द होईल, असे वाटते.”
“नाही नाही मॅडम! कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुम्हाला माझ्या लग्नाच्या नकाराबद्दल फोन केलेला नाही वा तुमचे मन वळविण्यासाठी मी तुम्हाला बोलावित नाही. माझे तुमच्याशी एक निराळेच पण अतिशय महत्त्वाचे काम आहे. आणि मुख्य म्हणजे ते तुमच्या जीवलग मैत्रिणीच्या संबंधी आहे.
तुम्ही बँक बंद झाल्यावर जरी कॅफेमध्ये आल्या तरी चालेल, पण नाही म्हणू नका. प्रश्न फार जिव्हाळ्याचा आणि गेैरसमजुतीचा आहे.”
“ठीक आहे मिस्टर मकरंद, पण आपली भेट जर उद्यापर्यंत लांबवली तर माझ्या दृष्टीने चांगले होईल. उद्या अनायसे रविवार आहे. तेव्हा तुमचा होकार-नकार मला सांगा.”
“ठीक आहे मॅडम. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी उद्या चार वाजता कॅफेवर येईन. प्रस्ताव स्विकारल्याबद्दल धन्यवाद.”
सुजाता नेहमीच्या वेळ्ेवरच घरी पोहोचली. घरात पाऊल टाकताच घरातील वादळ शमले नाही ह्याची जाणीव झाली होती. नेहमी हसतमुखाने सामोरी येणारी तिची वहिनी आज समोर आली नव्हती की तिच्या आगमनाची चाहूल लागताच नेहमीप्रमाणे तिची आई ‘सुजा आली वाटते’, असे म्हणून आपल्या डोळ्यावरचा चष्मा पोथीवर ठेवून नेहमीप्रमाणे बोलली नव्हती. सुजाताने देखील न दर्शविता सरळ आपली खोली गाठली होती. कपडे बदलून ती फे्रश झाली होती. आज चहाचा कप नेहमीप्रमाणे दिवाणखान्यातील अण्णांच्या कॉटशेजारच्या टिपॉयवर नव्हता तर तो चक्क तिच्या खोलीतल्या ड्रेसिंग टेबलावर होता. रोज ती अण्णाच्या समवेत चहा प्यायची व मग नणंदा- भावजया संध्याकाळचा बाहेरचा फेरफटका मारायच्या. येताना भाजी आणायच्या. हा पायंडा आज मोडणार हे दिसत होते. बाहेर एकटी वहिनीच गेली होती. सुजाताने एक दीर्घ श्वास सोडला व ती पलंगावर पडली. संध्याकाळी कोठे जाण्याचा तिचा मूड हवेत विरला होता. एक पुस्तक घेऊन ती त्यात मन रमविण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली.
रात्रीचे जेवण ठरल्याप्रमाणे पण नीरव शांततेत झाले. ती आपल्या खोलीत आली. तिने आपले शरीर गादीवर पसरविले व डोळे मिटले. घरातील वादळ केव्हा शमणार? हे तिला समजत नव्हते पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिच्या निर्णयामुळे हे सारे घडत आहे हे तिला जाणवत होते. आपला निर्णय घरच्या सार्यांनाच जिव्हारी लागला आहे ह्याची जाणीव तिला होती, पण तरीही आपल्या निर्णयावर ठाम होती. बंद डोळ्यासमोर तिला स्वरांजलीची मूर्ती दिसत होती. जिच्यासाठी तिने मकरंदसारख्या मुलाला लग्नाला नकार देऊन घरातील सार्यांची नामर्जी ओढवून घेतली होती; ती स्वरांजली तिच्या डोळ्यासमोर दिसत होती. तिने आपल्या नकाराचे कारण कोणालाच सांगितले नव्हते. त्यापूर्वी स्वरांजलीचे अस्तित्त्व त्या घरात अज्ञातच होते व तेच तिला अपेक्षित होते. स्वरांजलीच्या कितीतरी आठवणी तिच्या डोळ्यासमोर एकामागून येत जात होत्या. ती त्यातच रममाण झाली.
स्वरांजलीची आणि तिची ओळख उणेपुरे दोन वर्षाची. त्यावेळी त्या दोघी एकाच ब्रँचमध्ये कामाला होत्या. तिच्या आणि स्वराच्या ओळखीचा तो पहिला दिवस. लंच टाईममध्ये स्वराने आपणहून तिच्याशी ओळख करून घेतली होती. स्वराचे ते शांत व निरामय व्यक्तीमत्त्व तिला पाहताक्षणीच आवडले होते. आणि मग त्या जीवलग मैत्रिणी बनायला वेळ लागला नाही. स्वरांजलीच्या जीवनाचा तो दुःखद व मनाला खिन्न करणारा इतिहास जेव्हा तिने प्रत्यक्ष स्वरांजलीच्या तोंडून ऐकला, त्यावेळी तर ती अवाकच झाली. माणसाच्या जीवनात इतकी दुःखं असू शकतात व माणूस त्याही प्राप्त परिस्थितीत स्वतःला सावरून लोकांना सावरायला मदत करतो, हे तिला आजच समजले होते. स्वराविषयी वाटणारी प्रीतीची भावना स्नेहमयी व आदराने भरुन गेली.
बँकेत नोकरीला लागण्याआधी स्वरा एका त्रिकोणी कुटुंबाची सदस्या होती. आई वडील व एकुलती एक मुलगी. वडील एका खाजगी कंपनीत कामाला होते. गरीबी आणि अडचणीतसुद्धा ते कुटुंब सुखी व समाधानी होते. स्वरा पदवीधर झाली आणि तिचे लग्नाचे वारे वाहण्यास सुरू झाले. वडिलांनी चार मित्रांच्या सल्ल्याने एक स्थळ पक्के केले. स्वराचे दृष्टीने ते योग्य होते. साखरपुड्याची तारीखसुद्धा ठरली. शनिवारचा दिवस पक्का झाला होता. साखरपुड्यानंतर जवळचाच मुहुर्त पाहून लग्न साधेपणाने उरकावयाचे ह्यावर दोन्हीकडची मंडळी तयार होती. शनिवारी दुपारचे वेळी स्वराचे आई वडील काही खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. स्वरा घराची आवरा आवर करत होती. आपल्या नशिबात दैवाने कोणते ताट वाढून ठेवले आहे हे तिला समजलेसुद्धा नव्हते. नियतीने तिच्यापुढे एक वेगळाच डाव मांडला होता. संध्याकाळचे सात वाजले होते पण आई वडील घरी परतले नव्हते. घरातील सारी कामे आटोपली होती. दिवाणखान्यात ती आई वडिलांची वाट पाहत होती व वेळ जावा म्हणून टी. व्ही. बघत होती. बाहेर जीप थांबल्याचा आवाज ऐकू येताच तिने मागे वळून पाहिले. दोन पोलिस फाटक उघडून आत येत होते. एका अभद्र शंकेने ती पुढे झाली. ते पोलिस तिला पाहताच शांत व गंभीर स्वरांत काही तरी सांगू लागले. ते ऐकताच तिच्या तोंडून एक जीवघेणी व दुःखाची किंकाळी बाहेर पडली व तिचा तोल गेला. पण ती खाली आपटण्याच्या आधीच एका पोलिसाने प्रसंगावधान राखून तिला पडण्यापासून वाचविले व त्या दोघांनी तिला आधार देऊन खुर्चीवर बसविले. एका पोलिसाने किचनमधून पाण्याने भरलेला ग्लास आणला व तिला पाणी पाजले. दहा मिनिटांत ती स्वतःला व्यवस्थित करू शकली. पोलिसांनी तिला जी बातमी ऐकवली तिचा सार असा होता. तिचे आई वडील खरेदी आटपून घराकडे निघाले होते. रिक्षा स्टँडकडे जाताना मागून एक भरधाव ट्रक तिच्या आईला जागीच चिरडून न थांबता पुढे गेला. रक्ताची थारोळी आणि प्राणांतिक आरोळ्या ह्याने तो परिसर दणाणून गेला. आई जागेवरच ठार झाली होती व वडील ते भयानक दृश्य पाहून एक हृदयद्रावक किंकाळी फोडून खाली पडले होते व बेशुद्ध झाले होते. पोलिस व लोकांच्या मदतीने त्यांना सरकारी हॉस्पिटलमधे दाखल केले होते. गर्दीत त्यांना ओळखणारे एक सद्गृहस्थ होते. त्यांनी त्यांच्या घरचा पत्ता व नाव सांगितले. त्यामुळे तिला ती दुःखद वर्दी देण्यासाठी व हॉस्पिटलमधे घेऊन जाण्यासाठी तेथे आले होते.
पुढचे दोन दिवस तर स्वरांजलीचे दुःख व मानसिक यातना झेलण्यातच गेले. शेजारी पाजारी मदतीला धावले व आईचा अंत्यसंस्कार आटोपला. वडीलांना चोवीस तासांनी शुद्ध आली आणि ती सुद्धा एक भीषण वास्तव्य घेऊन. त्यांची डावी बाजू पूर्णपणे लकव्याने पांगळी झाली होती. चार लोकांच्या मदतीने स्वराने वडीलांना घरी आणले. अबोल व पूर्ण खचलेले वडील पाहून तिचा जीव कंठाशी आला होता. प्रारब्धात काय काय भोगावे लागणार ह्याची कल्पना नसलेली स्वरा स्वतःचे दुःख विसरली व प्राप्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी कणखरपणे उभी राहिली. वडीलांच्या मालकाने माणुसकीला जागून आजारपणात मदत म्हणून एक मोठी रक्कम स्वतः घरी आणून दिली होती. स्वराला धीराचे चार शब्द ऐकून त्यांनी आपले माणुसकीचे कर्तव्य पूर्ण केले होते. स्वराच्या आई वडिलांचा तो भयानक प्रकार ऐकून तिचा नियोजित पती व सासू सासरे तिला भेटावयास आले होते. स्वराने त्यांना आपण हे लग्न करू शकत नाही कारण वडिलांचा आजार तिला कर्तव्यापासून दूर जाऊन देणार नाही व ती जाणारही नाही असे सांगून त्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला होता. ते कुटुंब समजदार होते. सांत्वन करून ते निघून गेले.
त्यानंतरचे पुढचे दिवस स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी दिवसभर अविश्रांत मेहनत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यालयाच्या चकरा आणि रात्री देवाजवळ नोकरीसाठी विनवणी. तब्बल 1 महिन्याने तिच्या मेहनतीला फळ आले तिला एका बँकेत नोकरी मिळाली. त्या दिवशी ती देवाजवळ पोटभर रडली पण ते आनंदाचे व श्रम साफल्याचे अश्रू होते. वडीलांच्या सेवेसाठी तिने विश्वासातील वयस्कर बाई ठेवली व तिची नोकरी सुरू झाली. सुजाता व तिच्या मैत्रीची गाठ तेथेच बांधली गेली व दिवसागणिक पक्की होत गेलीआणि तशातच बँकेत मकरंद साने नवाचा हँडसम युवक सहाय्यक व्यवस्थापक म्हणून त्या शाखेला आला व तिची बदली दुसर्या शाखेत झाली. स्वराची ताटातूट तिला खूप वेदना देऊन गेली पण त्यांच्या मैत्रीत फरक पडला नाही. दर आठवड्याला भेटीगाठी व भरपूर गप्पा गोष्टी. गोष्टीत स्वरा मकरंदचा आवर्जून उल्लेख करायची. एवढा देखणा व हुशार व्यक्तीमत्त्वाचा मुलगा किती खेळकर व मनमिळावू स्वभावाचा आहे. ज्या मुलीला त्याच्याबरोबर लग्न करण्याची संधी मिळेल, ती जगातील सर्वात भाग्यवान मुलगी समजली पाहिजे. माझे आणि त्याचे तार तर दोन दिवसांत जुळले. सुजाता तिच्याकडे बारकाईने पाहत होती. मकरंदबद्दल तिच्या मनात असणारी श्रद्धा व अनुराग तिला स्पष्ट दिसत होता. बिचारी स्वरा जिने जन्मभर फक्त दुःख आणि संकटच भोगलेली आहे, तिला गोड व सुखकारक स्वप्न कशी असतात हे सुद्धा माहीत नाही, ती खूप भाबडी आहे. आपल्यात आणि मकरंदमध्ये किती अंतर आहे हे बिचारीच्या लक्षातच येत नाही आहे. ती त्याच्याकडे स्वप्नाळू नजरेनेच पाहते आहे. जर देवाने तिचे हे स्वप्न सत्यात उतरविले तर खरोखरच किती चांगले होईल. आजपासून ती रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ एकच प्रार्थना करणार आहेे की हे देवा स्वरांचे स्वप्न पूर्ण कर.
आणि एक दिवस ते विपरीत घडले. कामाच्या व्यापापुढे ती गेले चार दिवस स्वराला भेटली नव्हती की तिला फोन केला नव्हता. शनिवारच्या रात्री तिच्या वडीलांनी तिला सांगितले की उद्या रविवारी मकंरद साठे तिला बघायला येणार आहे. त्याला व त्याच्या घरच्या लोकांना तू पसंत आहेस असे दिसते. जर योग असेल तर बसल्या बैठकीत साखरपुडा देखील उरकवून टाकायचा असा त्यांचा बेत आहे. सुजाता तर ते ऐकून अवाकच झाली. स्वप्नात देखील तिने कल्पना केली नव्हती की एक दिवस अशी परिस्थिती येईल व आपणासमोर धर्मसंकट उभे राहिल. त्यावेळी ती काहीच बोलली नाही. पण सारी रात्र विचार करून तिने हाच निर्णय घेतला की सार्यांचा विरोध व नाराजी स्वतःवर ओढवून ती मकरंदला बैठकीत स्पष्ट नकार देईल व तो विषय तेथेच संपवेल. मग त्याच्यासाठी तिला घरची कितीही बोलणी व उणेदुणे ऐकायला लागले तरी बेहत्तर. ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. स्वराच्या सुखात आडवी येणारी, प्रत्येक गोष्ट ती प्रयत्नपूर्वक व जिद्दीने दूर करणार होती व त्यासाठी ती कटिबद्ध होती आणि आज त्याच मकरंदचा तिला फोन आला होता की तो तिला भेटावयास खूप उत्सुक आहे व त्याला तिच्याशी महत्त्वाच्या गोष्टी बोलावयाच्या आहेत. त्याला भेटीची कबुली दिली होती.
ती चार वाजता कॅफेमध्ये पोहचली. समोर मकरंद व स्वराला पाहून तिला खूपच आश्चर्य वाटले. मकरंदने तिला आपल्यासोबत स्वरा येणार आहे हे सांगितले नाही. ती स्वतःच्या आश्चर्यावर ताबा ठेवत खुर्चीवर बसली. स्वराचा चेहरा नेहमीप्रमाणे निरागस व भाबडा होता. ती काही बोलण्याच्या आधीच स्वरा तिचा हात पकडून तिला अतिशय भावूक स्वरात म्हणाली, “सुजा, तुझा जो गैरमसज झाला आहे तो दूर करण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येथे आलो आहोत. अग, तुझ्याबाबत मीच मकरंदला आग्रहपूर्वक सांगितले की तुझ्या जीवनाची खरी जोडीदारीण सुजाता हीच आहे. मकरंदला देखील तू खूप आवडत होती. त्याने आई वडिलांना सांगून तुला पाहण्याचा कार्यक्रम पक्का केला. अग वेडे तू समजत होतीस की मी मकरंदवर प्रेम करते. पण त्याला आपला पती म्हणून जीवनाचा जोडीदार निवडावा असे मला कधीच वाटले नाही. माझे त्याच्यावर एक चांगला मित्र व एक चांगला होतकरू तरूण म्हणून निखळ व पवित्र प्रेम आहे. लग्नाचे स्वप्न काय बघणार? जेव्हा मकरंदने तू त्याला भर बैठकीत स्पष्ट नकार दिला हे सांगितले, तेव्हा माझ्या लक्षात तुझा वेडेपणा व माझ्यावरचे निरागस व अभिमान वाटावा असे तुझे प्रेम समजले. माझ्या करीता तू एवढा मोठा त्याग करायला तयार झाली हे ऐकून तर मकरंदच्या मनात तुझ्याविषयी खूप आदर व स्नेह निर्माण झाला. तुझा गैरसमज दूर करण्याकरीता आम्ही तुला मुद्दाम येथे आले आहे. वेडाबाई. आता घरी जा सर्वांना तुझा होकार सांग. उद्या रीतसर मकरंदचे आई वडील तुझ्या वडिलांना भेटून पुढच्या रविवारी तुझा साखरपुडा करायचा हा निरोप घेऊन येतील. ते सार्या गोष्टीचा सविस्तर खुलासा करतील.”
रविवारच्या दिवशी सुजाताचे घर हास्यविनोद व आनंदात वाहत होते. स्वरा स्वतः पुढाकार घेऊन आपल्या जीवलग सखीला साखरपुड्यासाठी सजवत होती व त्या दोघीत थट्टमस्करी चालू होती. सुजाताचे आई वडील, भाऊ-भावजय तर सुजाताच्या या भाग्याचा मनापासून हेवा करीत होते. सारे वातावरण मंगलमय झाले होते.