रोशनीने पटापट आपल्या तीन मैत्रिणींना कॉल केले. सर्वजण सतर्क झाले. शहरातील सर्व डिस्को क्लब त्यांनी शोधून काढले. अखेर एका डिस्कोमध्ये किरण आणि तिच्या मैत्रिणी सापडल्या. रोशनीने इन्स्पेक्टर जोशींना फोन केला.
शारदाताई दुपारची कामं आवरीत होत्या. साडेबारा वाजले म्हणून त्यांनी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि टीव्ही लावला. त्यांची आवडती मालिका ‘सरस्वतीचंद्र’ सुरू झाली होती
तेवढ्यात त्यांची मोठी मुलगी किरण कॉलेजमधून घरी आली. ती या वर्षी बी.ए. करीत होती. “आई, ही माझी नवीन मैत्रीण डॉली. हिच्या पप्पांचा रेडीमेड गारमेंटचा मोठा बिझनेस आहे.” किरणने परिचय करून दिला.
“बस बेटा. किरण जा डॉलीसाठी चहा बिस्किटं घेऊन ये.” शारदाताई म्हणाल्या.
“नो आण्टी थँक्स. मी चहा पीत नाही.”
शारदाताईंना ही डॉली विशेष आवडली नाही. पैशांची घमेंड आणि विदेशी प्रभाव तिच्या स्वभावात स्पष्ट दिसत होता. अधूनमधून ती किरणसोबत घरी यायची. अन् दोघी किरणच्या बेडरूममध्ये जाऊन तासन्तास गप्पा मारत बसायच्या.
रोशनी ही शारदाताईंची छोटी मुलगी. बारावीला होती. ती अनाथ मुलांना मदत करायची. अनाथाश्रमात जाऊन त्या मुलांना डान्स शिकवायची तर कधी त्यांना गोष्टी सांगायची. मुलांना ही रोशनीदीदी खूप आवडायची.
कॉलेजमध्ये मुलांनी मुलींना रॅगिंगच्या नावाखाली त्रास दिला तर रोशनीचा ग्रुप त्या मुलांविरुद्ध आवाज उठवीत असे. एका कॉलेजमधील प्राध्यापकांनी खासगी शिकवणींचा क्लास सुरू केला होता. त्या प्राध्यापकांविरुद्ध रोशनीच्या ग्रुपने आवाज उठविला व तो क्लास बंद पाडला. या सर्व कार्यांमुळे रोशनी सर्वांना खूप आवडत होती. तर कित्येक समाजकंटकाच्या डोळ्यात ती कुसळाप्रमाणे खुपत होती.
रोशनीच्या आत्या लीलाताई विधवा होत्या. त्या अंगावर एकही दागिना घालत नव्हत्या. शिवाय नेहमी पांढरी साडी नेसायच्या. रोशनीला आत्याचे असे हे नीरस जगणे आवडत नव्हते.
एके दिवशी रोशनी आत्याला म्हणाली, “आत्या. हे बघ. मी तुझ्यासाठी काय आणले आहे.” आत्याने पाहिले गुलाबी साडी. “रोशनी तुला माहीत आहे ना, मी रंगीत साडी नेसत नाही. माझ्यासाठी पांढरी साडी…”
“आत्या पांढरी साडी नेसण्याचा अधिकार तुला कोणी दिला? का स्वतःचं जीवन असं नीरस बनवलं आहेस? मला सांग आत्या, एखाद्या माणसाची पत्नी वारली तर तो आयुष्यभर पांढरे कपडे घालील का? कधीच नाही. पुरुष तर पुनर्विवाह करतात. जीवनात रंग भरण्याचा प्रयत्न करतात. मला माहीत आहे, मामांचं खूप प्रेम होतं तुझ्यावर. पण याचा अर्थ असा नाही की, तू त्यांच्या मागे एखाद्या साध्वीप्रमाणे जगावं. तुझ्या अशा जगण्याने मामांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? तूही तुझ्या जीवनात नवीन रंग भर.”
आत्या-भाचीची ही चर्चा बराच वेळ सुरू होती. शेवटी आत्याला रोशनीपुढे झुकावंच लागलं. गुलाबी साडी नेसून आत्या हॉलमध्ये आली. बहिणीचं हे नवं रूप पाहून भावाच्या नयनात आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. कालचक्र चालूच होते. एके दिवशी किरणची मैत्रीण डॉली आली. तिच्या हातात लॅपटॉप होता. दोघी किरणच्या रूममध्ये जाऊन लॅपटॉपच्या स्क्रीनवर अश्लील चित्रं पाहात बसल्या. रोशनी त्यांना पाणी द्यायच्या निमित्तानं गेली. ती खूपच चतुर होती. दरवाजात उभे राहून तिने डॉलीच्या तोंडून “डिस्को, परवा… ” एवढेच शब्द ऐकले. तिनं पपांना सांगितले. पपांना खूप राग आला. ते किरणला मारायला जातच होते. पण तिने पपांना अडवलं. ती म्हणाली.
“पपा, थांबा. या सर्वांच्या मागे कोणाचा हात आहे, याचा शोध मी लावणार. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी आहे ना.” पपांना तिने धीर दिला. पण शारदाताईंना खूप काळजी वाटत होती.
“आई, मी मैत्रिणीसोबत डॉलीच्या वाढदिवसाला जातोय. परत यायला उशीर होईल.”
किरण आईला म्हणाली.
“नाही. तू कुठे जाणार नाहीस…” शारदाताईंनी तिला अडविण्याचा प्रयत्न केला.
“आई. मी जाणार म्हणजे जाणारच. जीवनात मला थोडी मौजमजा करू दे ना. तुझ्यासारखं आणि आत्यासारखं चार भिंतीच्या आत कैद्यासारखं जीवन मी जगू शकत नाही. इकडं जायचं नाही. तिकडं जायचं नाही…”
तिचा वाढलेला आवाज ऐकून तिचे पपा, हॉलमध्ये आले आणि “पपा मी चालले, बाय.” असं म्हणून ती निघूनही गेली. तिचे पपा हताश होऊन बसले. किरणचं आता काय होणार, पोरगी हाताबाहेर गेली म्हणून ते काळजी करू लागले.
रोशनीने पटापट आपल्या तीन मैत्रिणींना कॉल केले. सर्वजण सतर्क झाले. शहरातील सर्व डिस्को क्लब त्यांनी शोधून काढले. अखेर एका डिस्कोमध्ये किरण आणि तिच्या मैत्रिणी सापडल्या. रोशनीने इन्स्पेक्टर जोशींना फोन केला. रोशनी दारूबंदीसाठी मोर्चे काढत होती. तर किरण दारू पिऊन धुंदपणे नाचत होती. अचानक नाचता नाचता तिचा तोल गेला. ती खाली कोसळली. एका मित्राने तिला उचलून रूममध्ये नेलं. दरवाजा बंद करणार इतक्यात इन्स्पेक्टर जोशींनी त्याला पकडले व पोलीस स्टेशनला आणले. इकडे रोशनीने मैत्रिणींच्या मदतीने किरणला गाडीत टाकले व घरी आणले. किरणचा तो अवतार पाहून तिचे आईबाबा खूप रडले. रोशनीने डॉक्टरांना फोन केला.
डॉक्टर म्हणाले, “किरणच्या मद्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. रोशनीच्या सतर्कपणामुळेच पुढचा अनर्थ टळला.”
भाद्रपद महिना नुकताच संपला होता. आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले होते. शारदाताई दिवाळसणाच्या खरेदीत व्यस्त होत्या. तर लीलाताईंना दिवाळीची अमावस्येची रात्र अधिकच काळी वाटत होती. आत्याच्या जीवनातील अंधार दूर कसा करावा, तिच्या जीवनात पौर्णिमेचे मधुर चांदणे कसे आणावे या प्रयत्नात रोशनी होती.
रोशनीची मैत्रीण प्रीती, तिचे भाऊ डॉक्टर होते. ते विधुर होते. रोशनीने डॉ. विशालना घरी बोलावले. आत्याची आणि त्याची भेट घडवून आणली. दोघांचा परिचय झाला.
“आत्या, खूप गरम होतंय ना. चल आपण आइस्क्रीम खायला जाऊ.” रोशनी म्हणाली.
“रोशनी, बेटा माझं मन नाही लागत. तू वहिनीसोबत जा ना.” आत्याने टाळण्याचा प्रयत्न केला पण रोशनीच्या हट्टापुढे तिला झुकावंच लागलं.
दोघी आइस्क्रीम खायला जाऊन बसल्या तोच,
“काय हो, मी ह्या खुर्चीवर बसू शकतो का?”
तो आवाज डॉक्टर विशालचा होता.
“हो! हो! अंकल बसा ना.” रोशनी हर्षाने म्हणाली.
तेवढ्यात रोशनीचा फोन वाजला.
“आत्या… अंकल… मी येते हं. माझा महत्त्वाचा फोन कॉल आलाय.” रोशनी मुद्दाम तेथून निघून गेली.
“प्लीज. काहीतरी बोला ना. असा एकांत बरा नाही वाटत.” डॉक्टर विशालनी शांतता भंग केली.
“मला एकांताची सवय आहे.” असं प्रत्युत्तर रोशनीच्या आत्याने दिलं. दोघांनी आइस्क्रीम संपवलं.
किरण आता खूप सावरली होती. डिस्कोमध्ये घडलेली हकिकत रोशनीने तिला सांगितली.
“रोशनी मला माफ कर. एका मोठ्या संकटातून तू मला वाचवलंस. श्रीमंत लोकांच्या संगतीत राहून मी माझं अस्तित्वच मिटवायला निघाले होते. आईने आपल्या पदरात बांधलेले अनमोल संस्कार मी विसरले होते.” ती रडू लागली. त्या अश्रूत तिचा चेहरा न्हाऊन निघाला होता.
लीलाआत्याच्या राहणीमानात, विचारसरणीत आता खूप बदल झाला होता. एके दिवशी आत्या आणि रोशनीचे बाबा गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात
डॉ. विशाल तेथे आले. चहापाणी झाल्यावर ते म्हणाले, “आज मी एका महत्त्वाच्या कामासाठी तुमच्याकडे आलोय. तुमची परवानगी असेल तर…”
“डॉक्टरसाहेब बोला ना. कशाची परवानगी…”
“मी… मी… लीलाशी विवाह करण्याची परवानगी…”
दिवाळीचं आगमन झालं. लीलाताई, किरण आणि रोशनी अंगणात दीप लावीत होत्या. लीलाताईंनी एक दीप हाती धरला. त्या ज्योतीमध्ये डॉ. विशालचा चेहरा त्यांना दिसला. त्या थोड्याशा लाजल्या. त्यांच्या जीवनात खराखुरा प्रकाश आला होता. त्यांच्या ओठावर स्मितहास्य होते. ते पाहून किरण आणि रोशनी यांना पण खूप आनंद झाला. त्यांच्या जीवनात आज दीपावलीचे खरेखुरे दीप प्रकाशमान झाले होते.- लता वानखेडे
Link Copied