Close

कोंडी (Short Story: Kondi)

  • मधुसूदन फाटक

  • “गुन्हा हाय तो त्या सटवाईचा, रत्नाचा. वा रे वा, नाव रत्ना नि असताय अवलक्षणी कोळसा. तीन तीन बाळंतपणं झाली मेलीची, पण एक पोरगं न्हाय देऊ शकत, वंशाला?”

    भगवंत गडाम यांचे कुटुंब हे डोंगरपाडा या खेड्यात हलाखीने जीवन जगत होते. विधवा आई दुर्पदी, बायको रत्ना आणि पाठोपाठच्या तीन मुली अशा महिलाबहुल कुटुंबाचा भार वाहत होता. नाही म्हणायला रत्ना चार घरी मोलमजुरी करून त्याला हातभार लावत होती. दुर्पदी ही एक तोंडाळ बाई. तिचे हात थिजलेले असत. तोंडाचा पट्टा सतत चालू असे. तीन बाळंतपणे होऊनही मुलाला एकही मुलगा झाला नाही, म्हणून ती रत्नावर सतत डाफरत असे. भगवंत एकटा तावडीत सापडला की त्यालाही फैलावर घेई. मातृ प्रेमापाई कितीही ऐकून घेतलं तरी, केव्हातरी त्याचा तोल जाईच. मुलगा नाही म्हणून त्यांची वादावादी सतत चालू असे.
    “अगं, का किरकिर करत्येस आई सतत? मला मुली झाल्या, हो हो तीन झाल्या, यात मी काय गुन्हा केलाय?” भगवंताचा संयम सुटला होता.
    “मी कुठं म्हनलंय तुझा गुन्हा हाय म्हनून?” दुर्पदी काही त्याचा शब्द खाली पडू देत नव्हती. “गुन्हा हाय तो त्या
    सटवाईचा, रत्नाचा. वा रे वा, नाव रत्ना नि असताय अवलक्षणी कोळसा. तीन तीन बाळंतपणं झाली मेलीची, पण एक पोरगं न्हाय देऊ शकत, वंशाला?”
    “अगं पन आये.”
    “गप्प र्‍हाव खुळ्या. चांगली फैलावर घे तिला. म्हनावं म्होरल्या दिवालीला, वंशाचा दिवा न्हाय पेटला तर शिमग्याची होळी पेटेल. हां!”
    “आई, अगं काय बोलत्येस हे?” भगवंत हादरलाच. “भिंतीला बी कान असत्यात! शेजारला तो आलाय, स्त्री
    मुक्तीवाला. काय ते फॅड निघालाय ना गावात, त्याचा कार्यकर्ता. त्याच्या टकुरित हे विपरीत बोलणं गेलं ना, तर पोलीसपाटलाकरवी बेड्या चढवील.”
    “त्ये काय बी सांगू नगस मला.” दुर्पदीची समजूतच पटत नव्हती.
    “त्याला काय ढालगजी पडल्ये?… आमच्या घरातल्या भानगडीत लुडबुडायला? जा नि रत्नेला दमात घे. सांग तिला मी बोलल्ये त्या परमान म्होरल्या वरसात… जा…”
    “गप गं आई” भगवंता आईला आवरण्याचा प्रयत्न करायचा. “काय बी दमात नकोय घ्यायला. आज तुला ग्वाड बातमी देतोय. रत्ना गर्भार आहे… चौथ्या खेपेला. आता हे पण झालंय विपरीत. काय थयथयाट केला तिनं? कसंबसं राजी केलंय.”
    “काय म्हनतोस?” दुर्पदी एकदम खुशीत आली. “ हे मला आता सांगतायस गाढवा? मेल्या दरखेपेला तिचं पोट फुगलं की कसा खुशीत हसतो नि रिकामं झालं की दोघांची तोंडा व्हतात, जोडा मारल्यागत. हां… पन या खेपेला बजावते, तसं होता कामा नये. बाळकृष्ण घेऊनच घरी यायचं. कळलं?”
    “अगं पन आये, पोरगा का पोरगी ते माझ्यावरच अवलंबून असताय. वाचलाय मी कोठेतरी.” भगवंता समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. “त्यामुळे मला तिचा गर्भारपण थांबवायची आहेत. मैतर मला टोकतात, बाबल्या म्हनून.”
    “आरं त्येंचं काय घोडं मारलंय आपून? तुझ्या प्रत्येक दोस्ताला एक तरी टग्या हायच ना? ज्याच्या पदरी पोरगं नाय त्येची खंत त्येंना कशाला उपजते?” दुर्पदी लेकाच्या पाठीवर हात फिरवते, “तू नगस ध्यान देऊ त्यांच्याकडं. जा कामाला लाग!”
    भगवंता जाता जाता काहीतरी विचार आल्यासारखा परततो, “आये, एक उपाय हाय. अगोदरच माहिती करून घेतलं तर, पोरगा की पोरगी त्ये?”
    “त्या कुळबुडव्या जोशाच्या नग मागं लागूस. गेल्या दोन्ही खेपेला पोरगाऽ म्हणून ओरडला आणि नोटा उपटल्यान. काय झालं?”
    “ज्योतिषाकडे नाय जायचा आता. इस्पितळात एक मिशीन असतंय.
    ते पोटावर फिरवलं, म्हंजे सिनेमागत दिसतंय पोरगा हाय की पोरगी त्वे.”
    त्याच्या उत्साहावर थंड पाणी शिंपडायला दुर्पदी तयारच असते, “अरे, पर त्ये मिशिन बंद केलंय म्हन अलीकडं. तो नाम्या सांगत व्हता. कायद्याच्याइरूद्ध हाय त्ये…”
    “आता तुला कायदा आठवला का? नाम्या पुराण लावत्ये…” भगवंता आईची समजूत काढतो. “हे बघ माझा एक मैतर वॉर्डबॉय आहे, एका नव्या इस्पितळात. तो हे सगळं करून देतो. पण… पण… फक्त दहा हजार घालायचे त्याच्या बोडक्यावर.”
    “काय दहा हजार रुपये? अन् समजा इतकं बोडक्यावर पेरून न्हाय दिसलं पोरगं, मग रे?”
    “पाडायचं… त्येची सोय तिथंच…”
    दुर्पदी हबकतेच, “मेल्या, मानुस हायस की हैवान? जलमल्याआधीच खून?”
    “मग काय करू आई? पुन्हा पुन्हा त्येच त्ये अन् त्येच ते. रत्नी रडत कडत म्हनते, आता बास झालं हे. न्हाय सहन होत तिला… आन तू म्हनत्येस त्ये बी काय नाय, पोरगंच झालं पायज्येल. मी कात्रीत सापडलोय. कोंडी होत्येय माझी.” भगवंता वैतागून तरातरा निघून जातो.

रत्ना भीत भीत गाढ झोपलेल्या भगवंताला हालवते, “मालक, आवं मालक… सासुबाईनला सांगितलं नव्हं? मला पुन्हांदा…”
“कालच्यालाच सांगितलंय, एव्हढे काय दिवे लावल्येस, झोपेतून उठवायला.”
“तसं नाय, ऐकायचं व्हतं. काय म्हनल्या? खुशीत व्हत्या?” रत्ना लाडात आली होती.
“टकुर तुझं, आय… आन खुशीत? नेहमीचीच गत, चिडचिड.”
“काय म्हन्ता? आन त्येंची इच्छा पुरी झाल्ये नव्हं? घेतलाय चानस.” रत्ना आश्‍चर्यचकित.
“रत्ने, किती गं सोशिक तू?” भगवंता तिला थोपटतो, “तुला किती तरास होतोय, मला नाय का समजत? पण ती… आये, पुन्हांदा वाजावते तुणतुणं. पोरगंच झालं पाहिजेल… समजलास? च्या मायला”, रत्ना त्याच्या तोंडावर हात ठेवते.
“आता नका राग राग करू. त्ये आपल्या हातात का हाय? देवाची मर्जी असंल तर… झोपा आता.”
“फुकाचं समजाऊ नगस मला!” भगवंता तिला फिस्कारतो. “तीन तीन पोरींचं लेंढार लावून घेतलंय आणि आता पुन्हा… देवा?”
“असं काय करताय धनी? पोरी किती गुनाच्या हायत आपल्या? थोरली तर कामाला बी लागलेय आता. धाकली, हुशार हाय, मोप शिकनार. म्हंजी आपल्यालाबी आणिक तीन घरं… काय? आन् पोरगी आई होत्ये मोठ्ठी झाल्यावर. पोरगा व्हतो… आई?” रत्ना धन्याला खुशीत आणण्याचा प्रयत्न करते. तरी तो उखडतोच.
“जास्त अक्कल पाजळू नकोस. या खेपेला पोरगा झालाच पायजेल.”
“आन् न्हाय झाला तर हो?”
“खुडून टाकू.” भगवंता रागारागाने उठतो. “मशिनखाली कळतय!”
“देवा… देवा… काय बोलताय? माहीत न्हाय तरी अदुगरच?” रत्नाच्या अंगावर काटा येतो. “काय त्ये? काय म्हनत होतात? मला मिशिनखाली ठेवू नका. पोरगी दिसली, तर मग तुम्ही… नको नको हात जोडते.”
“पुरे झाली तुझी नाटकं. मशीनखाली जायचं म्हणजे जायचंच. उद्याच.” भगवंता ठाम असतो. “नको! मग पहिलंच संपवून टाकू सगळं. पोरगं न्हाय झालं म्हणून घरात होणारा तमाशा आता मला नकोच. समजलं? चल चीप झोप आता.” भगवंताच्या निर्वाणीच्या दमाने रत्ना शहारते.


डॉक्टर गुंडे या गायनॅकोलॉजिस्टच्या दवाखान्यात अनेक पोटुशी बायका नंबर येण्याची वाट पाहत बसल्या आहेत. काहींच्या चेहर्‍यावर हसू, तर काहींच्या आसू. डॉक्टर समोरच्या चिठ्ठ्या चाळतात आणि पुकारतात.
“सिस्टर, मिसेस रत्नाला आत पाठवून द्या… हं या रत्नाबाई. काही प्रॉब्लेम आहे? बसा.”
सशासारखी भेदरलेली रत्ना चाचरतच उत्तर देणार, इतक्यात सोबत आलेला भगवंता तिला थांबवतो.
“डागदर, मी हिचा धनी. ही चिठ्ठी घेऊन आलोय. आपल्याकडे तो एक वॉर्डबॉय हाय ना… तो माझा मित्र.”
“त्याची काही गरज नाही.” डॉक्टर ठामपणे सांगतात, “मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. कोणीही पेशंट आला, तरी तिला तपासणारच. ओ.के.? बोला बाई, किती महिने झाले?”
“त…तीन.” रत्ना कसंबसं उत्तरते.
“काही त्रास होतोय? आधीची काही मुलं बाळं?” डॉक्टर विचारतात.
“व्हय… तीन मुली.” रत्ना खाली मान घालूनच पुटपुटते.
“काय? तीन? आणि पुन्हा?”
“डॉक्टर त्याचं काय हाय…” भगवंता मध्येच तोंड खुपसतो. तर डॉक्टर भडकतात, “मिस्टर, त्यांना बोलू द्या म्हणजे मला समजेल. त्यांच्या मनाविरुद्ध तर हे नाही ना लादलंय. बाई… अहो तुमची तब्येत आधीच नाजूक वाटत्ये. आणि आता चौथं बाळंतपण? तुम्हा लोकांना केव्हा जाण येणार हो?”
“डॉक्टरसाहेब, माझी हौस भागल्ये हो!” रत्ना कळवळते, “पण…”
“बोला बोला, डॉक्टरपासून काहीही लपवून ठेवायचं नाही. स्पष्ट बोला.”
“सासुबाईनला वंशाचा… दिवा… म्हून मला पोरगा…” रत्ना गडबडते.
“बाई काय हा वेडेपणा? अशी कोणी गॅरेंटी देऊ शकतो का? मुलगाच होईल म्हणून!” डॉक्टर समजावतात.
“एक विचारू डॉक्टर?” भगवंता पुन्हा तोंड खुपसतोच. “एका यंत्रातून माहीत पडतं ना, पोरगा आहे की पोरगी ते? त्याखाली तिला… म्हणूनच आणल्ये.”
“अहो. अशी टेस्ट करणे बेकायदेशीर आहे. मी तसला डॉक्टर नाही.”
“टेस्ट करीत नाही? मग कसले… तुम्ही डॉक्टर?”
भगवंताच्या या डिवचण्याने डॉक्टर प्रचंड भडकतात, “स्टॉप दॅट नॉनसेन्स. मी कसला डॉक्टर, ते मला चांगलं माहीत आहे. तसे काही येथे होणार नाही. चला तुम्ही!”
“हां हां… समजलं!” भगवंताचा आवाज तरी चढाच, “हे घ्या. हजार आहेत. आता?”
“यु फूल. लाच देतोय मला? उचला त्या नोटा अ‍ॅण्ड गेट आऊट!”
“डॉक्टर, ही कोणाची चिठ्ठी आहे, म्हाईत हाय नव्हं?” भगवंता दरडावणीच्या सुरात, “आमदाराचा सगेवाला आहे. हा… हाँ!”
“मला ब्लॅकमेल करतोस? मला?” डॉक्टर ताडदिशी उठतात.
“ताबडतोब चालायला लागा, नाहीतर पोलिसांना बोलवीन. तुझ्यासारख्या माणसाकडे इतक्या नोटा पाहूनच काय ते समजतील… बोलावू?”
“नको नको डॉक्टरसाहेब. जातो जातो… रत्ना… चल… बिगीबिगी…!”
“बाई सॉरी.” भेदरलेल्या रत्नाला डॉक्टर शांत करतात, “तुम्ही घाबरणे साहजिकच आहे, पण काही नाही सांगता येत हो. धीराने घ्या.”


विचारमग्न रत्नाला भगवंता भानावर आणतो. “सारखा ईचार काय करत्येस? जेवत न्हाईस, खात नाहीस.
रातला दचकून उठते. काय झालंय?”
“काय झालंय? तुम्ही विचारता? डॉक्टरनी सांगितलं, पहिलं नाय सांगता येणार तवापासून घोर लागलाय जिवाला.”
“काय तरीच तुझं. कसला घोर आलाय? या खेपेला पोरगा नक्की आहे. व्हनार म्हंजे व्हनार. काय सांगितलंय त्या दिवशी, साधूबाबांनी?” भगवंता समजावतो. “आयनी आणला होता तो मौनबाबा… अंगारा लावत्येस ना रोजला?”
“आवं वेडं का खुळं तुम्ही? डॉक्टर काही सांगू शकत नाही, तो मौनीबाबा काय सांगनार… डोंबलं!” रत्ना कळवळतेच.
“जाम पॉवरबाज आहे तो मौनीबाबा. शेजारणीला आलाय ना अनुभव!”
“पुरे. मला त्येचं कौतुक सांगू नका. फुडं काय करायचं ते बोला? आतावेळपर्यंत तीन वेळा बाबा चांगलेच भोवत्येय!”
“अगं, असं घायकुतीला काय येतेस? चार महिने तर राहिलेत. होईल चल.”
मोठ्या आवाजातली बोलाचाल ऐकून दुर्पदी बाहेर येते. “काय चाललंय गुलुगुलु? जोडप्याचं? माझ्या नातवाशी कानगोष्टी चालल्यात का? लाता-बिता फार मारतंय का पोरगं?”
“सासूबाई, अहो तुम्ही पक्कं समजून चाललात, नातू होणार म्हणून?”
“काय बी वंगाळ बोलू नंगस”, दुर्पदी आवाज चढविते. “व्हनार… अन् रत्ने, न्हाय झाला तर तुझी खैर न्हाय. दिवटीला घेऊन बाहेर पडायचे. घरात यायचंच न्हाय, हां!”
“सासूबाई, असे काय बोलताय? तुम्हीच सांगितलंत ना पुन्हांदा चानस घे? मी न्हायच म्हनत व्हती.”
“ते कायबी नाय. पोरगी झाली,
तर चंबुगबाळ आवरायचं, घरातलं.”
“जाऊ कोठे मी सासूबाई?” रत्ना काकुळतीला येते. “नका अशा निष्ठुर होऊ. सासूबाई पाया पडते. पदर पसरते सासूबाई.” हुंदका देऊ लागते.


डॉक्टर गुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेहमीची लगबग चालू असते. नवजात बालके रडत असतात. टेकीला आलेल्या बायका कण्हत असतात. नर्सेस आणि आया यांच्यावर खेकसत असतात. “अहो, होतात कुठे तुम्ही? ही बाई… तुमची बायको ना? तिला वार्‍यावर सोडून भटकता? आजची तारीख होती ना तिची, मग हजर
नको का इथे?… का भरती केली
की जबाबदारी संपली, नवर्‍याची?”
“सांगून गेलो होतो, मोठ्या सिस्टरला. जरा जेवायला गेलो होतो…”
“हो… दोन घास खायला फुरसत नाही आम्हाला आणि तुम्ही जेवणावर ताव मारताय?… ओल्या बाळंतिणींकडे बघायचं की केकाटणार्‍या पोरांकडे? आम्ही मक्ता घेतलाय?”
“कोठे नेलाय… रत्नाला.” दम दिल्यामुळे भगवंताची बोबडी वळते.
“अहो, डिलिव्हरी रूममध्येच नेतात, बाईला कळा लागल्या की. कपडे आणल्येत तिचे?… माझ्यापुढे काय धरता आहात… आयाला द्या.”
“आयला, मी हितं टेन्शनमधी आणि ही माझ्यावरच डाफरत्ये. सरकारी हॉस्पिटल ना… राम… राम… राम… पोरगा होऊ दे रे, देवा.” भगवंता प्रार्थना करू लागतो.
काही वेळातच एक नर्स आतून येते आणि “तुमच्या बायकोची झाली सुटका. मुलगी झाल्ये तुम्हाला, गोंडस आहे!” अत्यंत कोरडेपणाने भगवंतावर माहितीचा मारा सुरू करते.
“काय? मुलगी?” भगवंता मटकन खाली बसतो. “पुन्हा… मुलगी? देवा, किती रे निष्ठुर तू? काय करू आता मी?” त्याचा आकांत सुरू होतो.
“अहो मिस्टर, इथे आकांत नाही हं करायचा. आभाळ नाही कोसळलं. बाईंना बाहेर आणत्येय आया. नंतर जा, मदत करा तिला, मुलीला कॉटवर ठेवायला.” नर्स त्याला गप्प करून तरातरा निघून जाते.
ट्रॉलीवरूनच आणलेल्या रत्नाची आणि भगवंताची नजरभेट होते. त्यातील करुण भाव ती लांबूनच टिपते. “किती वाट पाहिली? काय झालं? कोणीबी सांगत न्हाय. झाला ना पोरगा? तुमचा चेहरा असा का पडलेला?”
“मग काय खदखदू?” भगवंताला हुंदका आवरत नाही. “नेहमीसारखंच… मुलगी!”
“काय? मुलगी!” त्या स्थितीतही रत्ना सटपटते, “ईचारलंत ना नीट?”
“अगदी स्पष्ट सांगितलंय. मुलगी… चौथी… एक दोन तीन आणि चार… अपशकुनी चौकट!”
“देवा…” रत्नाचं धाय मोकलणं बाकी असतं. “कां अंत पाहात आहेस देवा? आता… सासूबाई? काय होईल हो?”
“दुसरं काय होणार!” भगवंता ठामपणे सांगतो, “तुला घर बंद. आईचा निर्णय म्हणजे, ब्रह्मवाक्य असतंय.”
“असं कसं हो? माझं घर मला बंद? पोरीला घेऊन जाऊ कुठे मी?”
“पोरगी न घेताच घरी जायचं!” भगवंता कठोरपणे निर्णय सुनावतो, “विल्हेवाट लावायची, अनेक वाटा आहेत. मी रातच्याला येतो, दाखवतो त्या.” ताडकन चालू लागतो.
“काय? पोटचं अरभक टाकायचं?” रत्ना सुन्न होत बडबडू लागली. “का… का… घर सोडायचं? मुलगी की घर… घर की मुलगी? घर की मुलगी? कोंडीत सापडल्येय मी देवा.”


हॉस्पिटलमध्ये मध्यरात्र उलटून गेलेली असते. आजूबाजूला भटकी कुत्री भुंकत असतात. वॉर्डमध्ये मात्र सारी गिपचिप असते. बायकोच्या शेजारी बसलेला भगवंता हळूच उठतो. इकडे तिकडे पाहून रत्नाच्या कानाला लागतो.
“रत्ना ऐक… आजूबाजूला कोणी जागे नाहीये! हे बघ, हॉस्पिटलच्या दारापलीकडे एक कचराकुंडी आहे. खूप कचरा साचलाय त्यात. दिवस फटफटायला उठायचं, बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने पोरटीला अलगद उचलायची. गुपचूप बाहेर पडायचं आणि ते मुटकळं अलगद कचराकुंडीत विसर्जन करायचं. ती कचराकुंडी कधी उघडत नाहीत. उजाडताच बोंबाबोंब करायची. मुलगी चोरीला गेली म्हणून.
अलीकडंच हितं अशीच चोरी झाली होती. नंतर भोकाड पसरायचं. शोधाशोध चालू असताना दुसर्‍या दिवशी घरी रडत यायचं. तिथलं नाटक आईनं रचलंय.” अत्यंत बेडरपणे बोलून भगवंता तेथून हळूच सटकतो.
रत्ना मात्र रात्रभर टक्क जागी असते. तिची नजर वॉर्डभर भिरभिरते, तर कधी पाळण्यातल्या बालिकेवर स्थिरावते. डोळ्यातून अश्रुधारा वाहत असतात. मध्येच हळवी होते, तर मध्येच कठोर. कोंडी फोडायचा तिचा निश्‍चय होतो. उदास रात्र संपत येता येता ती हळूच उठते. कॉटवरचे पांघरूण लपेटते आणि बालिकेला पाळण्यातून उचलून उराशी घट्ट धरते. बालिका तिच्या छातीला डोकं घासत असते. तेव्हा रत्ना तिची चुंबने घेत राहते. एकाएकी तिच्यात सैतान संचारतो आणि बालिकेला घेऊन ती हॉस्पिटलच्या बाहेर पडते. दारावरचा वॉचमन गाढ झोपलेला असतो, ते तिच्या पथ्थ्यावरच… काही वेळातच ठरलेले काम उरकून रत्ना कॉटवर येऊन पांघरुणात घुसते.
हॉस्पिटलबाहेर लांबवर कोंबडा आरवतो, तरी नेहमी पहाटेला सुस्त पडलेली कुत्री ओरडतच असतात. वॉर्डामधील उजाडताची लगबग सुरू असते. ड्युटी संपणार्‍या नर्स आणि आयांची काम उरकण्याची लगबग धावपळीत चालू असते. वॉर्डातला सन्नाटा एकदम भंग पावतो, तो एका बाळंतिणीच्या किंचाळीने.
“बाळ… माझं बाळ… आया, माझं बाळ कोठाय? नेलंय का?” रत्ना ओरडत असते. आयाच्या नकारानंतर ती एकदम टाहोच फोडते. “माझं बाळ गेलं हो… चोरीला… कोणी चोरलंय माझं बाळ? शोधा जल्दी शोधा…”
वॉर्डमध्ये एकाकी गोंधळ सुरू होतो… आरडाओरडा चालू असतानाच, एक सफाई कामगार बाहेरून धावत येतो. “सिस्टर… सिस्टर मी कचरा टाकायला गेलो तर, तेथून रडण्याचा आवाज आला. बाळ होतं… हे पाहा!”
“काय कचरापेटीत?” नर्स किंचाळते, “ओ माय गॉड! कपाळावर लिहिलेला नंबर तपासा.” रजिस्टर पाहिल्यावर जोराने ओरडते, “रत्ना, अगं तुझीच मुलगी. बघ बघ. किती निष्काळजी गं तुम्ही?” रत्ना तरीही ढिम्म असते. सगळेच बुचकाळ्यात पडतात.
व्याकूळ झालेल्या, भांबावलेल्या रत्नाच्या सावरलेल्या भावनांचा बांध अखेर फुटतोच, “होय, माझंच बाळ. मीच टाकलं कचराकुंडीत!” रत्ना भेसूर हसत असते. “कोंडीतून सुटण्यासाठी! पोलिसांना सांगा हीच… हीच ती निर्दय आई… आणि माझ्या सासूलाही सांगा… मी कोंडी फोडली! नाही येत आता घरी. मुलगीही नाही तुमचं घर बघणार. आता माझं घर तुरुंगाची कोठडी! हा… हा… हा…” वेड्यागत हसत सुटते रत्ना.

Share this article