कावळ्याच्या सात पिढ्यांच्या घरट्यांची सोय तिच्या विगमुळे झाली. कावळ्याच्या सात पिढ्या आरामात त्या केसांच्या गादीवर बसून किडे खातील इतकी प्रोव्हिजन पमीने करून दिली. त्यामुळे त्यानंतर कुठल्याही कावळ्याने पमीकडे वाकड्याच काय पण सरळ नजरेनेही पाहिलं नाही.
वास्तविक कावळा किती क्षुद्र पक्षी! किती नगण्य! पण पमीच्या आयुष्यात त्याने किती कावकाव करावी, तिला किती कावून सोडावं याला काही सुमारच उरला नाही. त्या दिवशी पमी तिच्या ऑफिसात जायला निघाली. ऑफिस होतं रानडे रोडवर! एका ट्रॅव्हल कंपनीत पमी सुखाने नोकरी करत होती. ती ऑफिसच्या इमारतीत शिरणार तोच कावळा सुसाट वेगाने उडत तिच्या डोक्याला चाटून गेला. त्याच्या पायाचे काटेरी स्पर्श तिच्या कवटीपर्यंत झाले असं पमीने सर्वांना सांगितलं. तेव्हा तिची मैत्रिण मिनू पटकन उद्गारली, “अगबाई, म्हणजे एवढं टक्कल पडलंय्
वाटतं तुला?”
“काय तरी काय? हे दाट केस बघ माझे!” पमी करवादली. “ए, पमे, कावळा तुझ्या मागे का लागलाय् ते कळलं मला!” कुंदा नेहमीच स्वतःच्या एका विश्वात असते. आपल्याला सगळं कळतं, कावळ्याच्या काकमनाचं शास्त्रही आपण अवगत केलंय् असं तिचं तिलाच वाटलं. “का, का?” पमीने उत्सुकतेने विचारलं.
“का का? काय करतेस?” कुंदाने पटकन म्हटलं, “काव? काव?” त्यावर सगळ्या मैत्रिणी हसायला लागल्या. तशी घाबरून पमी म्हणाली, “अरे देवा! आता मी कावळ्यासारखी…”
“कावळ्यासारखी काय? कावळीसारखी म्हण! आता तू कावळीसारखी ओरडणार, काव, काऽऽव…” मिनूने तिची टिंगल
करत म्हटलं
“तसं काही होणार नाही,” कुंदाने तिला दिलासा देत पुढे म्हटलं, “अग कावळ्याला आय मीन कावळीला अंडी घालायची असणार, त्यासाठी तो कावळा घरटं बांधतोय् कळलं?” “पण मग त्याने माझ्या डोक्यावर का म्हणून चोच मारायला यावं?” पमीने गाल फुगवत विचारलं. “अग वेडे, तुझे हे दाट, मऊ केस हवेत त्याला घरट्यासाठी! ते चोचीने उपटायला आला होता तो! काही दिवसांनी तुझ्या केसांच्या घरट्यात त्याची लाडकी कावळी अंडी टाकणार… मग त्यातून गोड गोड, इवली इवली पिल्लं बाहेर येणार… तुझ्या केसांच्या मऊशार गादीवर ती पिल्लं झोपणार… खेळणार… किडे खाणार!”
कुंदाच्या डोळ्यांसमोर कावळ्याची नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली लालसर अंगाची कोवळी पिल्लं
दिसत होती.
“शी! शी! किडे कुठे आणलेस माझ्या केसात!” आपल्या डोक्यावरून हात फिरवत पमी शिसारी आल्यासारखी बोलली.
“अग एकदा त्या कावळ्याने तुझे केस उपटले की ते केस तुझे कुठे राहिले? ते कावळ्याचे नाही का
झाले, पमे?”
कुंदाने कायद्यावर बोट ठेवले. “अग पण, हे चिटींग आहे. माझ्या परवानगीशिवाय माझे केस उपटणं हे कानूनन गलत है. असं असून तू कावळ्याची बाजू घेतेस? तू माझी मैत्रिण आहे की… की… त्या काळ्या कावळ्याची?” अपमानाने पमीच्या तोंडून शब्द फुटेना.
“इनफ पमे इनफ! तू आता हद्द ओलांडलीस! लक्षात ठेव, तुझ्या आजोबांच्या पिंडाला कावळा लग्गेच शिवला म्हणून भुकेने कळवळलेल्या तुला-लहानग्या पमीला खीरपुरी पटकन खाता आली असं तूच एकदा सांगितलं होतस… अशा उपकारकर्त्या कावळ्याला तू काळा, काळ्या असं म्हणालीस? अग, त्या होऊ घातलेल्या एका बापाच्या भावना तू दुखावल्यास!” कुंदा पोटतिडीकेने बोलत होती.
“बाप? कुणाचा बाप?” पमीने चक्रावून विचारलं.
“इवल्या इवल्या पिल्लांचा बाप! तोच तो मजबूर कावळा! अग मजबूर वडील आपल्या कुटुंबाच्या पोषणासाठी नाही का चोर्यामार्या करत?” कुंदाने रोखठोक प्रश्न केला.
“हो हो! हे बाकी खरं हं! अग वाल्या कोळी वाटमार्या करायचा!” पमीने लगेच कुंदाला दुजोरा दिला.
“मग? आणि पुढे वाल्याचा कोण झाला, सांग बघू!”
“वाल्मिकी! अग त्यानेच तर ‘रामायण’ लिहिलं माहिताय् मला!” पमी फुशारकीने म्हणाली. मग एकदम गोंधळून तिने विचारलं, “अरे देवा! म्हणजे हा कावळादेखील भविष्यकाळात ‘कावळायण’ लिहील का ग? त्यात…. त्यात तो माझं हे बोलणं घालेल का?”
“हे बघ! या जगात काहीही घडू शकतं! ज्याला कावळ्याची काकभाषा कळते तो ते लिहून प्रसिद्ध करू शकतो. म्हणून म्हणते संभाळून रहा, विचारपूर्वक बोल.” इतक्यात मिनू म्हणाली, “अग आता बंद करा बघू कावळापुराण! कस्टमर्स येताहेत.”
“येऊ देत, आहात ना तुम्ही सात आठ जणी! बघा त्यांना! तर पमे, मला सांग असं वर्णावरून कुणाला ब्लॅक म्हणशील? मग कावळ्यालाच का हिणवतेस?”
“अग पण कुंदे, आजच नाही तर रोज हा कावळा मला डोक्यावर चोच मारायला येतो ग, उद्यापासून मी मोठ्ठी छत्रीच घेऊन येते बाई! करू तरी काय सांग!” पमी अगदी रडवेली झाली होती. “अगबाई, तुम्हालाही कावळा सतावतोय का?” तिथे टूरच्या चौकशीला आलेल्या एका बाईने विचारलं. “हो, का?” पमीने उदास स्वरात म्हटलं
“अहो का काय? माझ्या मागे लागलाय हो कावळा हात धुऊन!” “हात धुऊन?”
“अं… कावळ्याला हात नाहीत नाही का? मग चोच धुऊन लागलाय्… अहो मी घरातून बाहेर पडले रे पडले की तो कावळा आलाच माझ्या मागे! मी बाजारात गेले की तिथे हा माझ्या आधी हजर!” ती बाई अगदी अगतिकपणे सांगत होती. “अहो, मग ठिकाणं बदलून बघा,” कुंदाने न मागता सल्ला देण्याचं काम केलं.
“ते ही केलं, प्लाझा सिनेमाच्या जवळ भाजीमार्केटात जाते ना मी? एकदा मी अगदी विरुद्ध दिशेला म्हणजे भायखळा मार्केटमध्ये गेले, बसने! तर तिथे देखील तो कावळा हजर! गेल्या गेल्या काव काव करून डोक्यावर चोच मारलीन्!”
“अग बाई! काय पुरानी दुश्मनी बिश्मनी आहे की काय तुमची कावळ्याशी?” कुंदाने
उलटतपासणी केली.
“कसली दुश्मनी ताई? रोज काकवळ ठेवते…”
“तुम्ही नाही पण तुमच्या घराण्यात कुणी कावळ्याचा अपमान केलाय् का? त्याला दुखापत केलीय् का?” कुंदाने चिंताग्रस्त स्वरात विचारलं.
“काय माहीत नाही हो मला! पण या कावळ्याने माझं जिणं हराम केलंय्… मुंबई सोडून मी चेन्नईला माझ्या मुलाकडे राहायला गेले तर तिथेही हा कावळा एअरपोर्टवर काव काव करत माझं स्वागत करायला हजर! शेवटी यावर उपाय
शोधला मी…” ती बाई विजयी
स्वरात उद्गारली.
“कोणता? कोणता?” पमीने उत्सुकतेने विचारलं.
“मी आता इंडिया सोडून कायमची यूएसला माझ्या मुलाकडे जाणार! मग बसू दे त्याला काव काव करत!” आणि ती बाई आत्मविश्वासाने तिच्या कामासाठी तिथून निघून गेली.
“पण मला कळत नाही कावळा यूएसला नाही का ग जाऊ शकत?” पमीने चिंतातुर आवाजात विचारलं, “नाही! नाही! नाही! अग पमी, मगाशी बोलता बोलता मी त्या बाईला विचारलं, तुमची त्या कावळ्याशी पुरानी दुश्मनी होती का? आठवतं ना? तो पॉइंट लक्षात घे. तुझी कावळ्याच्या बाबतीत काही आगळीक घडलीय का?”
कुंदाने गंभीरपणे विचारलं. “आगळीक… आगळीक…. अग गेल्या महिन्यात मी माहेरी गेले होते ना पारल्याला. तेव्हा अग आमच्या बागेत, एका नारळाच्या झाडावर कावळ्याने घरटं बांधलं होतं, तर नारळ काढताना आमच्या माळ्याच्या हातून ते घरटं पडलं की ग खाली,” पमी अपराधीपणे म्हणाली.
“अगबाई, पण अंडी होती का घरट्यात? ती फुटली बिटली की काय पमे?” कुंदाने दरडावून विचारलं. कुंदा गेल्या जन्मी नक्की कावळीण असली पाहिजे अशी पमीची आता खात्रीच पटली. किती पुळका
हिला कावळ्याचा!
“अग अंडीबिंडी काही नव्हतं.
घरटं तुटलं, मोडलं म्हणून कावळा चिडला आणि त्याने अग रागाने माझ्या धाकट्या भावाच्या नाकावर चोच मारली! अग रक्तबंबाळ झाला
तो बिचारा!” पमी रडवेल्या आवाजात म्हणाली.
“अग पण तुमच्या माळ्याने घरटं पाडलं ना? मग भावाचं नाक का फोडलं त्या कावळ्याने? का दोघे सारखे दिसतात?” कुंदाने खवचटपणे विचारलं.
“बरी आहेस ना? माळी नि भाऊ सारखे कसे दिसतील? अग भाऊ नारळ गोळा करायला झाडाखाली उभा होता तर त्या मूर्ख कावळ्याने त्याचं नाक फोडलंन्!” पमी वैतागून म्हणाली.
“मूर्ख नाही ग, बिचारा दुःखाने सैरभैर झाला असणार तो कावळा! अग, त्याचं घरदार, संसार उद्ध्वस्त केल ग तुम्ही… शी! इतके क्रूर, निर्दय असाल तुम्ही असं स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं ग!” कुंदा रागाने लाल झाली होती.
“अग अग मी कुठे काय केलं, माळ्याने घोळ घातला ना!” पमी काकुळतीला येऊन म्हणाली.
“पण फातरफोंडेंच्या झाडावरून पाडलं ना घरटं? तू फातरफोडेंच्या कुळात जन्मलीस ना? मग? म्हणून तो कावळा असा रोज तुला डोक्यावर चोच मारतो, कळलं?”
“म्हणजे तो मला ओळखतो?” पमीने आश्चर्याने विचारलं.
“अग का नाही ओळखणार? सारखी सारखी माहेरी जात असतेस ना? कावळ्याची काकनजर असतेच की!” कुंदाने स्पष्टपणे खुलासा केला.
“असं ग काय म्हणतेस कुंदे?
लग्न होऊन वर्षच होतंय् ग, वाटणारच ना माहेरची ओढ?” पमीने लाडिकपणे म्हटलं.
“हो ना? मग खा मार चोचीचा!” कुंदा फणकारली.
“म्हणजे मी माहेरी जायचंच
नाही काऽऽ?” पमीने दाटल्या गळ्याने विचारलं. “तसं नव्हे ग!
पण आता उपाय काय यावर?”
कुंदा थोडं पमीशी, थोडं स्वतःशी बोलल्यासारखी म्हणाली.
“अग तूच असे हातपाय गाळलेस तर मी कुणाच्या तोंडाकडे पाहू ग?” पमीने अजीजीने विचारलं. “अग पमे, मला उपाय शोधताना कावळ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी लागते ग. बिचार्या कावळ्यावर लहान मुलांच्या गोष्टीतही अन्याय होत आलाय् ग….” कुंदा कावळ्याच्या प्रेमाने कळवळून म्हणाली. “म्हणजे ग काय?” पमीने गोंधळून विचारलं “बावळटासारखं काय विचारतेस? कावळ्याचं शेणाचं घर पावसात वाहून गेल्यावर कावळा कुणाच्या घरट्यापुढे येतो, सांग बघू!”
“चिमणीच्या!” पमी उत्तरली. “पण चिमणी किती वेळ त्या कावळ्याला पावसात तिष्ठत ठेवते ग! थांब
माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाचं अंग पुसते… मग पावडर… काजळ… कपडे… देवा देवा देवा! आणि हा भोळा गरीब कावळा बापुडा ‘चिऊताई, चिऊताई दार उघड’, असा आक्रोश करत बसतो. तुला चालेल असं मी तुला दारात उभं केलं तर? बोल!”
“नाही चालणार ग!” पमी पडलेल्या आवाजात उत्तरली. “मग? चिमणीने बेल वाजल्या वाजल्या दार उघडायला हवं होतं…
कावळ्याला लिव्हिंग रूममध्ये बसवायला हवं होतं…”
“हो बाई चिमणीचं चुकलंच! पण आता माझं काय? माझं डोकं,
कसं वाचवू कावळ्यापासून?”
पमीने विचारलं. “सांगते! सांगते! आता एक गोष्ट कळली की, कावळा तुझ्या माहेरामुळे दुखावला गेलाय्… त्याचं घरटं तुमच्या माळ्याने तोडलं… बरोबर?” कुंदाने प्रॉब्लेमचं विश्लेषण केलं.
“हो! हो! मग?” पमी आता घायकुतीला आली होती.
“तर आता तू एक काम करायचं! नुकसानभरपाई करून द्यायची!”
“म्हणजे ग काय करायचं!?” पमीचा प्रश्न.
“खरं तर कावळ्यासाठी सोन्याचे वाळे कर असं सांगणार होते ग. ती ओवी आहे ना… पैल तो गे काऊ कोकताहे… उड उड गे काऊ, तुझे सोन्याने मढवीन पाऊ… म्हणून ग, पण सोनं काय महाग झालंय्…”
कुंदा म्हणाली. “हो बाई! मग पितळेचे वाळे करू? त्या कावळ्याला सोनं आणि पितळ थोडंच कळणार? पिवळं दिसल्याशी कारण!” पमी म्हणाली.
“हीच ती वृत्ती! खोटी! फसवी!
या मुळेच घात होतो. देवाला नवस बोलतात आणि फेडताना पळवाटा काढतात, पण पमे, कावळ्याची काकदृष्टी तीक्ष्ण असते, दगाफटका केलास तर तो नाक फोडतो हे माहिताय ना, भावाच्या अनुभवावरून? तुझं तो डोकंसुद्धा फोडेल चिडला तर…” कुंदाने पमीला समज
दिली. “अगबाई, मग काय करू ग मी? बुरखा घेऊन येऊ
उद्यापासून काळाकाळा?”
“हा उपाय नाही… झाला! झाला! काकदृष्टान्त झाला. पमे, तू निश्चिंत रहा. आताच माझ्या बंद डोळ्यांपुढे तो कावळा नाचून गेला. त्याच्या बॉडीलँग्वेजमधून त्याला काय हवंय् ते मला कळलं… काकक्षात्कार झाला ग मला! कान कर इकडे!” म्हणत कुंदाने तोडगा तिच्या कानात सांगितला.
दुसर्याच दिवशी पमी ऑफिसमध्ये यायला निघाली. ऑफिसच्या गेटपाशी आली, तोच तो कावळा खुन्नसमध्ये तिला चोच मारायला आला, पण पमी शांत, स्थितप्रज्ञासारखी उभी राहिली. कावळ्याने जोराने तिला चोच मारली तो काय, त्याच्या चोचीत दाट केसांचा छानसा विग (केसांचा टोप) आला, तशी कावळा पटकन उडून त्याच्या कावळीला ते भरघोस केस दाखवायला नि द्यायला घरट्याकडे उडाला. पमीचे केस, डोकं, कवटी शाबूत राहिलं. पमी खूष झाली. कावळ्याच्या सात पिढ्यांच्या घरट्यांची सोय तिच्या विगमुळे झाली. कावळ्याच्या सात पिढ्या आरामात त्या केसांच्या गादीवर बसून किडे खातील इतकी प्रोव्हिजन पमीने करून दिली. त्यामुळे त्यानंतर कुठल्याही कावळ्याने पमीकडे वाकड्याच काय पण सरळ नजरेनेही पाहिलं नाही.
कुंदाचे उपकार फेडण्यासाठी पमीने तिला कावळ्याचं सुंदर चित्र भेट दिलं. काळ्या रंगाची एक साडीही दिली. मस्कतचा काळा खजूर खाऊ घातला. तरीही कुंदा म्हणालीच, “अग, मला कशाला करतेस एवढं? करायचंच असेल तर एक कर! कावळ्याकडे किनई तू कावळीच्या नजरेने बघ!”
“म्हणजे?” पमी घाबरली आता ही काकवेडी कुंदा कावळ्याची प्रतिमा देव्हार्यात ठेवून त्याची पूजाबिजा करायला सांगणार नाही ना?
“अग म्हणजे प्रेमाने बघ. कावळी कावळ्याची कोण लागते? पत्नी! अग म्हणजे पत्नी कशी आपुलकीने, प्रेमाने बघते नवर्याकडे, तशी तू कावळ्याकडे बघ, पण प्रेमाने! करशील ना एवढं? दे वचन दे!” पमीने पटकन तिला हातावर हात ठेवून वचन दिलं आणि ती कामाला लागली.
- प्रियंवदा करंडे