- संगीता माथुर
माझं एक नाव आहे… माझी स्वतःची अशी आयडेंटिटी आहे. मी काम्या आहे. माझी स्वतंत्र ओळख आहे. माझं ब्युटिक माझ्या नावावर चालतं. माझ्या नवर्याला मिस्टर काम्या मल्होत्रा म्हणून कोणी हाक मारत नाही. मग मलाच का त्यांच्या नावाने हाक मारायची?
पार्टीमधून बाहेर पडताच माझा निस्तेज चेहरा पाहून राहुलने लगेच निशाणा साधला, “काय गं? नेहमी पार्टीमधून निघालो की
तू अगदी ताजीतवानी, आनंदी दिसतेस. आज तुझा नूर काही वेगळाच दिसतोय. काही बिनसलंय का? कोणी काही बोललंय का तुला?”
“नाही नाही, तसं काही नाही. मला झोप आलीये. बाकी काही नाही.” ती वेळ तर मी निभावून नेली. पण घरी परतल्यानंतर कपडे बदलून अंथरुणावर पडेपर्यंत माझ्या नजरेसमोर ती दृश्यं झळकत होती… पार्टीत नवीन लोकांना भेटणं, त्यांच्याशी ओळख वाढवून आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढविणं, हा माझा आवडीचा कार्यक्रम होता. त्यामुळे राहुलच्याच शब्दात सांगायचं, तर अशा पार्ट्या मला ताजीतवानी करीत असत…
आज संध्याकाळच्या पार्टीतही मी नेहमीच्याच उत्साहाने आम्हा बायकांच्या ग्रुपकडे वळले होते. हाय-हॅलो करत मी सगळ्यांना हसत हसत भेटले. त्यातच माझी नजर या घोळक्यात उठून दिसणार्या
एका वेगळ्याच, आधुनिक महिलेकडे गेली. ती आपल्या सभोवती असणार्या महिलांशी एका गंभीर विषयावर चर्चा करत होती. खरं
म्हणजे, इतरांवर ती चर्चेने कुरघोडी करत होती. दोन-तीन मिनिटे
तिला निरखून पाहिल्यानंतर मला तिची ओळख पटली. अन् मी उत्साहाने तिच्याकडे सरकले.
“हाय, मिसेस रंजन मल्होत्रा! ओळखलंत का?… गेल्या महिन्यात आपण सुधाकर रावांच्या पार्टीत भेटलो होतो, नाही का?”
“हॅलो”, एक निस्तेज स्मित माझ्याकडे टाकून ती पुन्हा आपल्या
चर्चेत गुरफटली. त्यांचं निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलं की,
ती आपला मुद्दा सभोवतालच्या महिलांना अट्टहासाने पटवून देत होती. तिची देहबोली आणि चेहर्यावरील भाव तसेच होते. ऐकणार्या मात्र मूकसंमती असल्यासारख्या फक्त होकारार्थी मान हलवित उभ्या होत्या. थोड्या वेळाने मीही तिच्या संमोहनाच्या प्रभावाखाली जात इतरांसारखीच मान हलविणार आहे, याचा त्या क्षणी मला जराही अंदाज आला नाही. तिचा भारदस्त आवाज आणि बोटं नाचवत आपला मुद्दा गळी उतरविण्याच्या शैलीने हळूहळू तिच्याभोवती महिलांचा मोठा घोळका जमला होता.
“मिसेस रंजन मल्होत्रा म्हणून मला कोणी हाक मारली नं, की मला फार विचित्र वाटतं बघा…” ती मोठ्या आवाजात बोलत होती. खरं म्हणजे, हे वाक्य तिने माझ्याकडे पाहून म्हटलं नव्हतं. तरीही ते मला इतकं लागलं की, भर बाजारात कोणीतरी माझे कपडे फाडल्याचाच भास झाला.
ती पुढे बोलू लागली, “कां सांगू? माझं एक नाव आहे. माझी स्वतःची
अशी आयडेंटिटी आहे. मी काम्या आहे. माझी स्वतंत्र ओळख आहे. माझं ब्युटिक माझ्या नावावर चालतं. माझ्या नवर्याला मिस्टर काम्या मल्होत्रा म्हणून कोणी हाक मारत नाही. मग मलाच का त्यांच्या नावाने हाक मारायची? आपला समाज पुरुषप्रधान आहे म्हणूनच ना! आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, पण त्यांनी मात्र आपल्या पाठीशी उभं राहायचं नाही. माझं म्हणणं असं की, आपण सर्व महिलांनी किती दिवस असं पुरुषांच्या गुलामगिरीत राहायचं? आपलं नाव न घेता, पतीच्या नावाने लोकांनी आपल्याला काय म्हणून हाक मारायची? अरे, आपलं काही स्वतंत्र अस्तित्व… आयडेंटिटी आहे की नाही?… काय वाट्टेल ते झालं तरी आपल्याला आपले अधिकार मिळवायचे आहेत. अन् त्याची सुरुवात आपल्याला आपापल्या घरापासून केली पाहिजे…”
विचारांची आवर्तने थांबतच नव्हती. अन् डोळ्यांवर झोप दाटून आली होती. गाढ झोपेतही स्त्री-स्वातंत्र्य आंदोलनाचं गारूड माझ्यावर स्वार झालं होतं. हातात बॅनर्स घेतलेल्या, मोठमोठ्याने घोषणा देणार्या जागरूक महिलांचा मोर्चा मला स्वप्नात दिसत होता. काम्या हिरिरीने त्या मोर्चाचं नेतृत्व करताना दिसत होती. त्यातील गर्दीचा एक हिस्सा असलेली मी शांतपणे चालत होते…
तेवढ्यात राहुलच्या हाकेने मी जागी झाली. “काय गं, आज तर अगदी गाढ झोप लागली होती तुला! चल उठ, आपल्याला सुगंधाच्या शाळेत जायचंय नं. मी सॅण्डविचचे टोस्ट गरम करायला ठेवले आहेत. दूध मंद गॅसवर ठेवलंय. सुगंधालाही उठवलंय. मी अंघोळ करून येतो. तोवर तू तयार हो.”
“बस्स, अगदी दोन मिनिटांत तयार होते.” पांघरूण झटकून मी लगेच उठून उभी राहिले. सुगंधाच्या शाळेत आज स्पोर्टस् डे आहे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिला आज सुवर्ण पदक देण्यात येणार आहे. व्हॉली बॉल टीमची ती कॅप्टन असल्यामुळे व्हिक्टरी स्टॅण्डवर तिलाच उभं राहायचं आहे. सुगंधाच्या विजयाने माझ्यात नवा उत्साह संचारला होता. फटाफट ब्रश करून मी टेबलावर नाश्ता लावला.
आम्ही अगदी उत्साहात सुगंधाच्या शाळेत पोहोचलो. टाळ्यांच्या कडकडाटात गळ्यात मेडल घालून, सुगंधा जेव्हा व्हिक्टरी स्टॅण्डवर उभी राहिली, तेव्हा आमची छाती अभिमानाने फुलून गेली. ओळखीच्या, ओळख नसलेल्या पाहुण्यांना राहुल अगदी पुढाकार घेऊन भेटत होता.
“हॅलो, मी सुगंधाचा डॅडी आहे. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला”, असं तो आवर्जून सगळ्यांना सांगत होता. तेवढ्यात राहुलचा एक मित्र, आपल्या ओळखीच्या व्यक्तीशी राहुलची ओळख करून देऊ लागला, “हे आमच्या कंपनीचे चेअरमन
आहेत- मिस्टर राहुल वर्मा!”
“ओह येस, मी तर यांना आधीपासूनच ओळखतो. पण सुगंधाचे डॅडी म्हणून! टीचर-पॅरेन्ट्स मिटिंगला आम्ही
बरेचदा भेटलोय. आपण एवढ्या
मोठ्या कंपनीचे चेअरमन आहात, हे कधी बोलला नाहीत. आम्ही तर तुम्हाला कधीपासून सुगंधाचे डॅडी म्हणूनच ओळखतो.”
“त्या आयडेंटिटीचीही एक वेगळीच मौज आहे बघा. आय अॅम अ प्राउड फादर!” त्या अनोळखी इसमाशी हात मिळवून राहुल त्याच्याशी गप्पा मारण्यात तल्लीन झाला. अन् मी आश्चर्याने त्याच्याकडे बघतच राहिले. विचारांची आवर्तनं आता एका वेगळ्याच वळणाकडे निघाली होती.आयडेंटिटी हा गर्वाचा विषय आहे, खोट्या अहंकाराचा नव्हे. त्याला तक्रारीचा मुद्दा बनविणे म्हणजे असमंजसपणा होय. वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची वेगवेगळी आयडेंटिटी असू शकते. लहानपणी ती व्यक्ती कुणाची मुलगा-मुलगी तर कुणाचा भाऊ वा बहीण असू शकते. नंतर तरुणपणात पत्नी किंवा पती, मेहुणा, दीर अशी आयडेंटिटी त्याच्याशी जोडली जाऊ शकते. या सर्वांसोबत त्याची प्रोफेशनल आयडेंटिटीही जोडली जाते आणि ती टप्प्याटप्प्याने वाढत जाते. वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्तीची ओळख, तिच्या वेगवेगळ्या आयडेंटिटीने होते.
त्यामुळे प्रत्येक आयडेंटिटी ही तिच्या स्वतःपुरती महत्त्वाची ठरते.
विचारांच्या या चक्रव्यूहात संशयाचा एक किडा अजूनही माझ्या मनात गटांगळ्या खात होता. काम्यासारख्या महिलांची शिकवण किंवा बालपणापासून पुरुषप्रधान समाजातील रंगढंग पाहून कदाचित माझी विचारधारा तशी झाली असेल, ते सांगता यायचं नाही. पण विचारांचा वळवळणारा किडा हा प्रश्न माझ्या मनात निर्माण करत होता की, सुगंधाचा पिता म्हणून राहुलला जेवढा अभिमान वाटत होता, तेवढाच अभिमान माझा पती म्हणूनही त्याला असेल का? की सर्वसाधारण भारतीय पतीप्रमाणे तो माझ्या गुणांना डावलून पुढे निघून जाईल?
माझ्या या विचारांची पारख पटण्याची संधी लवकरच चालून आली. कविता करणे हा माझा आवडता छंद आहे. सुगंधा मोठी झाल्यापासून ती आपल्या कामांसाठी माझ्यावर कमी अवलंबून राहते आहे. त्यामुळे माझा हा छंद अधिकच वाढीस लागला आहे आणि कविता करण्याचं माझं प्रमाणही पूर्वीपेक्षा वाढलं आहे. कविता लिहून मी बर्याच मासिकांकडे प्रसिद्धीस पाठवते. प्रसिद्ध झालेल्या माझ्या प्रत्येक कवितेची राहुलकडून चांगलीच प्रशंसा होते आहे. आज अचानक मला अकादमीकडून पत्र आलं की, त्यांनी पुरस्कृत केलेल्या कविता स्पर्धेत माझ्या कवितेला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झालाय. आनंदाच्या या उत्कट क्षणी मी सर्वांत आधी राहुलला फोन केला.
ही आनंदाची बातमी ऐकून तोही भलताच खूष झाला.
“मी लगेच घरी येतो”, असं तो म्हणाला. मी नको म्हटलं तरी, ऑफिसपासून घरापर्यंतचं वीसेक किलोमीटरचं अंतर काही मिनिटांत कापून माझ्या पुढ्यात उभा ठाकला. घरी येताच त्याने मला मिठीत घेतलं आणि आपला आनंद व्यक्त केला. अकादमीकडून आलेलं निमंत्रण पत्रही त्याने वाचलं. पुढल्या महिन्याच्या चौदा तारखेला ते प्रथम पारितोषिक मला सन्मानपूर्वक दिलं जाणार असल्याची माहिती त्यात होती. शाल, श्रीफळ आणि स्मृती चिन्ह प्रदान करून रोख रकमेचं बक्षीसही दिलं जाणार होतं. पत्र वाचता वाचता राहुलच्या चेहर्यावर मला गंभीर भाव दिसले. त्याने मला आठवण करून दिली की, येत्या महिन्याच्या दुसर्या आठवड्यात तो ऑस्ट्रेलियात असणार आहे. तिथे बोर्ड ऑफ चेअरमनची महत्त्वाची बैठक आहे.
“डोन्ट वरी! काही तरी अॅडजस्ट करतो मी. अगं, इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी मी तुझ्यासोबत राहू इच्छितो.”
“मी एकटीच जाईन. या समारंभासाठी तुमच्या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहण्याची आवश्यकता नाही.” मी राहुलला पुष्कळ समजावून पाहिलं, पण त्याने आपल्या पठडीतील युक्तीने माझे ओठ बंद केले.
अकादमीच्या प्रथितयश समारंभात ज्या प्रतिष्ठित कवींसोबत माझा सन्मान होणार होता, त्यांच्यामध्ये मी अवघडून बसले होते. पण राहुल मात्र त्या शामियान्यात उपस्थित सर्व निमंत्रितांशी स्वतःहून पुढाकार घेत भेटत होता. प्रत्येक वेळी तो माझ्याकडे बोट दाखवत होता. अन् त्याच्या पुटपुटणार्या ओठांतून एकच वाक्य बाहेर पडून माझ्या कानावर येत होतं, “मी निमिषाचा- हो, ज्यांना सर्वश्रेष्ठ कवियत्रीचं पारितोषिक मिळणार आहे नं, त्यांचा पती आहे… होय, धन्यवाद! धन्यवाद!”
अभिमानानं ओसंडून पाहणारा त्यांचा
चेहरा पाहून माझा संकोच दूर निघून गेला. मला पुरस्कार देण्यात आला, तेव्हा टाळ्यांचा जो कडकडाट झाला, त्यामध्ये राहुल आणि सुगंधाच्या टाळ्यांचा कडकडाट सर्वांत मोठा होता.
मधुर आठवणी सोबत असतील, तर प्रतीक्षेचा काळ कसा पटापट निघून जातो. समारंभाच्या आणि इतरही कित्येक प्रसंगांच्या मधुर आठवणींची उजळणी करत मी ऑस्ट्रेलियाहून राहुल परतण्याची वाट पाहत होते. राहुल आणि त्याच्या कंपनीने केलेल्या विशेष विनंतीनुसार, त्याला तेथील बैठकीत दोन दिवस उशिराने सहभागी होण्याची अनुमती देण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणेच राहुलचं प्रेझेंटेशन सगळ्यात उत्तम झालं. सर्व्हे करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे काही पाहुणे राहुलसोबतच भारतात आले होते. ऑस्ट्रेलियातील यशस्वी कामगिरीबद्दल राहुल आणि त्या पाहुण्यांच्या सन्मानार्थ कंपनीतर्फे ग्रॅण्ड मेरियट हॉटेलमध्ये एका भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही तिथे पोहचलो, तेव्हा पार्टी ऐन रंगात आली होती. माझं लक्ष महिलांच्या एका घोळक्याकडे गेलं. नेहमीप्रमाणेच महिलांच्या गर्दीत काम्या आपलं तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि आग्रही हावभावांनी सर्वांना मंत्रमुग्ध करत होती. मी पण क्षणभरासाठी तिच्याकडे जाण्यास वळले, तेवढ्यात एक ऑस्ट्रेलियन पाहुणे राहुलकडे माझी चौकशी करत होते. राहुलच्या नजरेनं माझा शोध घेण्याआधी मीच त्यांच्याकडे वळले. अन् निर्भय व मोठ्या स्वरात माझा परिचय करून दिला, “हॅलो, मायसेल्फ मिसेस राहुल वर्मा. ग्लॅड टू मीट यू.”
माझा मोठा आवाज ऐकताच काम्याने आपला मोहरा माझ्याकडे वळविलेला मी पाहिला. तिच्या नजरेत माझ्या या पवित्र्याबद्दल तिरस्काराचे भाव उमटलेले मला दिसून आले, मात्र त्याच्यामुळे आता मी डळमळीत झाले नाही. आयुष्यात पहिल्यांदाच अभिमानाच्या तेजाने माझा चेहरा उजळला होता. त्या तेजासमोर काम्याचा चेहरा काळवंडला असल्याची मला जाणीव झाली.
- संगीता माथुर