- ऊर्मिला भावे
एक दिवस प्रणदचे नशीब उघडले आणि खरोखरच त्याची परदेशी जाणार्या संघात निवड झाली. तो फारच खूष झाला. त्याहीपेक्षा पवन आणि अनय आनंदी झाले. त्याच्यामुळेच यांना फुटबॉलची आवड निर्माण झाली होती. प्रणद परदेशी दौर्यात खेळत होता. प्रत्येक सामन्याला प्रणद त्याच्या खेळात अव्वल ठरत होता.
प्रणद, पवन आणि अनय या तीन मित्रांचे त्रिकूट होते. ते अगदी बालपणापासूनचे मित्र. अगदी बालवर्गापासूनचे. खूप चांगले दोस्त. चिंचा, आवळे प्रेमाने एकमेकांना भरवत. खेळताना कुणाला खरचटलं तरी दुसरा रडायला लागेल. शाळेचा डबा तर ते सारं एकत्र करूनच खात. शाळा सुटली की ते रिक्षावाले काकांच्या रिक्षातून आपापल्या घरी उतरले तरी त्यांचं मस्ती करणं, बाय बाय करणं काही संपत नसे.
खेळत भांडत ते मोठे झाले. कॉलेजला गेले. प्रणदला पुढे फुटबॉल खेळायची आवड निर्माण झाली. त्याला या दोघांनी अगदी मनापासून प्रोत्साहन दिले. त्याची मॅच कुठेही असली तरी त्यासाठी पवन आणि अनय पाहायला हजरच असायचे. तो राज्यस्तरीय खेळाडू झाल्यावर त्याला एक प्रकारचे ग्लॅमर प्राप्त झाले. त्याची मॅच टी.व्ही. वर दिसू लागली. पेपरात त्याचे फोटो झळकू लागले. पवन म्हणाला.
“प्रणद, मला खात्री आहे की, तू इंटरनॅशनलमध्ये खेळणार.”
तो म्हणे, “इथवर पोचलो हेच खूप आहे. उगीच मोठी मोठी स्वप्नं कशाला पाहू?”
“का? का पाहू नकोस.”
“अरे आता तुला पैशाला कमी नाही. तो तू खेळातूनच कमवत आहेस. पुढची एन्ट्रन्स फी भर.”
“नाही रे”, अनय म्हणाला.
“नाही रे, मला तर वाटतंय भारत सरकारच तुला पुढे पाठवेल. परदेशी संघात तुझी निवड नक्की होईल.”
त्यांच्या बोलण्याने प्रणदलाही मोठी मोठी स्वप्नं पडू लागली होती.
पवनला लहानपणापासून पोलिसी वर्दीचे आकर्षण वाटत होते. तो पोलिसात आयपीएस म्हणून वरच्या पदावर रुजू झाला. त्यासाठी त्यानं अपार मेहनत घेतली होती. तर
अनय बुध्दीबळमध्ये चमकत होता आणि एका सरकारी बँकेत नोकरीला होता. या तिघांना एकमेकांचा फार अभिमान वाटे.
एक दिवस प्रणदचे नशीब उघडले आणि खरोखरच त्याची परदेशी जाणार्या संघात निवड झाली. तो फारच खूष झाला. त्याहीपेक्षा पवन आणि अनय आनंदी झाले. त्याच्यामुळेच यांना फुटबॉलची आवड निर्माण झाली होती. प्रणद परदेशी दौर्यात खेळत होता आणि त्याचे प्रावीण्य, कर्तृत्व हे दोघे आणखी मित्रांबरोबर घरी टीव्हीसमोर बसून पाहत होते. टाळ्या वाजवत होते, आनंद घेत होते. प्रत्येक सामन्याला प्रणद त्याच्या खेळात अव्वल ठरत होता. देशविदेशातील अनेक सामन्यांसाठी प्रणदची निवड झाली असल्याने त्याचे सतत परदेशी दौरे चालू असत. पण त्याच्या दौर्याचे वेळापत्रक त्याच्या मित्रांना पाठ असेे. यामुळे प्रत्यक्ष भेट नसली तरी सतत फोन, एसएमएसमधून तो मित्रांच्या जवळच असे. या त्रिकुटांच्या ग्रुपमध्ये आता साम आणि वैश्व हे दोन मित्र सामील झाले होते. हे पाचही मित्र एकत्र आले की, धमाल करीत.
पण यांच्याकडून कधीही वेडीवाकडी वागणूक घडली नाही.
प्रणद असाच एकदा मोठ्या
दौर्यावरून परत आला होता. त्याच्या चमूच्या विजयानं ह्या पाच जणांच्या आनंदाला अजून उधाण आलं होतं. बर्याच दिवसांनी प्रणद बरोबर असल्यानं त्यांचं मस्त सेलिब्रेशन चाललं होतं. मजामस्ती करीत केलेल्या एका पार्टीनंतर सार्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.
दुसर्या दिवशी एकमेकांशी फोनाफोनी केली. मात्र प्रणद काही फोन उचलत नव्हता. असेच तीन दिवस गेल्यानंतर समजले की, तो तीन दिवसांसाठी कोचींगला गेलाय. आज येणार आहे.
मित्रांना वाटले. तो कुठेही का जाईना, एक फोन करायला काय होतंय? आणि फोन उचलायला काय झाले? तो काय पहिल्यांदाच कुठे गेलाय का? मॅचचा वेळ सोडला तर कायमच फोनवर हजर असतो. येऊ दे, मग चांगला समाचार घेऊ.
पण त्या दिवशी तो आलाच नाही तो जिथे गेला होता असे समजले होते तिथे चौकशी केली तर तेथून समजले की, तो येथे आलाच नाही.
तो तिथे गेलाच नाही, मग कुठे
गेला.घरचे व्याकूळ झाले. सारे हवालदिल झाले. सर्वांनी सर्वत्र शोध घ्यायला सुरुवात केली. पण उपयोग झाला नाही.
पवनमधला पोलीस जागा झाला. त्याने प्रणदच्या घरच्यांना पेपरात फोटोसह बातमी द्यायला सांगितली.
दुसर्या दिवशीच्या पेपरात बातमी आली.
‘-- या दिवशी कोचिंगला जातो असे सांगून बाहेर पडलेला वरील फोटोतील मुलगा प्रणद अद्याप घरी आलेला नाही. त्याच्याबद्दल कुणाला माहिती समजल्यास --- या क्रमांकावर संपर्क साधा.’
त्यालाही आठवडा गेला. पोलीस तपास चालू होता. पण प्रणद सापडत नव्हता. घरच्यांना अन्न जाईना. चैन पडेना आणि अश्रूही थांबेनात.
‘हरवला आहे. बेपत्ता आहे’ अशा मथळ्याखाली दोन वेळा परत तीच बातमी देऊन झाली. वर बक्षिसाचे आमिषही दाखवून झाले. पण
परिणाम शून्य. बेपत्ता प्रणदचा पत्ता लागेना. घरचे शोधून थकले. मित्र हरले. पोलिसांनी सहा महिन्यांनी केस बंद केली.
केस बंद झाली. तरी पवन बैचेन होता. त्याच्या डोक्यातून मात्र प्रणदचा विषय जात नव्हता. त्याच्या मनात टोकाचे विचार येत होते.
प्रणद मेला म्हणावे तर निदान त्याचे प्रेत तरी सापडायला हवे होते. खरं तर मित्राबद्दल असा विचार करणे योग्य नाही. पण शेवटी हा विचार मनात येतच होता. तो विचार त्याने मित्रांजवळही बोलून दाखवला.
दुःखी मनाने अजय म्हणाला.
“प्रणदचा हा विचार आमच्याही मनात आला होता. त्याचे प्रेत जरी सापडले असते तरी त्याला शेवटचे पाहिल्याचे समाधान वाटले असते. पण त्याच्याबद्दल आता सारेच अंधकारमय झाले आहे. काहीच मार्ग दिसत नाही. आपल्या प्रणदचा शोध घ्यायला पोलीसही थकले का रे?” असं म्हणून त्यालाही भरून आले.
असेच आणखी आठ दिवस गेले.
पवन समुद्राकाठी विमनस्कपणे एकटाच बसला होता. अंधार पसरत चालला होता. तरी समुद्राकाठी गर्दी होतीच. पवनला खरं तर असा निवांत वेळ मिळणं कठीणच. पण प्रणद बेपत्ता झाल्यापासून पवनचे चित्त कामावरही लागत नव्हते. म्हणूनच त्याने काही दिवसांची रजा घेतली होती. तो एकटाच समुद्राकडे पाहात बसला होता. ना त्याचे उसळणार्या लाटांकडे लक्ष होते, ना भोवतालच्या गर्दी गोंगाटाकडे लक्ष होते. त्याच्या डोक्यात एकच विचार होता.
‘प्रणदचे काय झाले असेल?
महापुरात वाहून गेलेल्यांची प्रेते कधी तरी कुठे तरी काठावर सापडतात.
कुठे झाडाझुडपात अडकलेले सापडतात. पण याचे काय?’ या प्रश्नावर, त्याचा तोच चमकला.
त्याने मनालाच विचारले.
‘याचा अर्थ काय? आपण तो गेलाय, असंच समजत आहोत काय? नाही
तर त्याचा एवढा दिवस बेपत्ता होण्याचा अर्थ तरी काय असू शकतो?’
‘निदान त्याचा नाही तर त्याच्या प्रेताचा तरी पत्ता लागायला हवा.
मग प्रेत नाही तर तो जिवंत आहे, असाच त्याचा अर्थ काढायला हवा. पण त्याचे प्रेत नाही. तो बेपत्ता आहे तर त्याचे अपहरण झाले असेल काय? तेच असेल तर निदान अपहरणकर्त्याचा फोन तरी यायला हवा. तो तसा त्याच्या दहशतीचा भागच असतो. पण आता सहा महिने उलटून गेलेत. हेही नाही, तेही नाही. मग काय? प्रणद,
तू आहेस तरी कुठे रे?’
‘मी इथेच आहे पवन.’
‘काय? कोण? कोण बोलले?’
‘मी बोललो पवन. मी प्रणद…’
‘प्रणद? खरंच…’
पवनने अविश्वासाने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले. तर खरंच त्याच्या मागे प्रणद बसला होता. पवन त्याला अत्यानंदाने मिठी मारायला गेला. पण प्रणद म्हणाला,
“थांब पवन.”
“का? काय झाले? पण तू एवढे दिवस होतास कुठे? किती दिवस झाले सांग?”
“पवन, मी तुमच्यातच होतो.”
“पण नंतर तर तू गायब झालास,
ते आज भेटतो आहेस इथे. प्रणद,
अरे एक फोन तरी करायचास.”
“पवन, मी इथेच होतो रे. तुमच्यातच होतो. तुला कळत कसं नाही.”
“तू गेल्यापासून आम्हाला चैनच नाही. काय चूक काय बरोबर काहीच कळत नव्हतं.”
“मी तुमच्यातच आहे. पण मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
मी तुम्हाला ओरडून सांगितलं तरी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पेाहोचू शकणार नाही. मी तुमच्या वाटेत उभा राहिलो तरी तुम्ही सरळ माझ्यातून आरपार निघून जाल”
“म्हणजे? काय म्हणालास प्रणद?”
“होय. आत्ताही तू मला मिठी नाही मारू शकत नाही.”
“का? का नाही मारू शकत?” असं म्हणत पवनने प्रणदला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला
ते जमलंच नाही. पवन घाबरला.
त्याने विचारले.
“प्रणद, याचा अर्थ काय?”
“याचा अर्थ सरळ आहे पवन.”
“म्हणजे?”
“म्हणजे, मी आत्ता तुमच्यात नाही. माझं जग वेगळं आहे.”
“प्रणद, नीट सांग. असं कोड्यात बोलू नकोस.”
“सांगतो. पवन राजकारण कुठे नसतं. खेळात तर ते असतंच असतं. त्या राजकारणात माझा जीव गेलाय.
मी जीव गमावलाय.”
“काय? प्रणद काय बोलतोस? कोणामुळे तुझा जीव गेला? पण प्रणद तीही शक्यता आम्ही स्वीकारली. तरी तुझे निदान…”
त्याला पुढे बोलवेना. प्रणद म्हणाला.
“मित्रा, त्या दिवशी आपण पाचजण मौजमजा करून निघालो. दुसर्या दिवशी मला अचानक कोचचा फोन आला. त्याने मला अचानक बोलवून घेतले. मी घरी तसे सांगून बाहेर पडलो. पण बाहेर मी कुणा कोचकडे नाही गेलो तर सरळ मृत्यूनेच मला गाठलं.”
“काय झालं ते नीट सांग.”
“कोचकडे नेण्यासाठी एका फोर व्हिलर गाडीकडे मला दोन जण घेऊन
गेले. मला गाडीत बसवलं आणि
गाडी रात्रीची एका शेताकडे गेली.
मी विचारलेही, की इकडे कुठे चाललोय आपण. तर कुणीच उत्तर दिलं नाही. गाडी शेताच्या बांध्यावर उभी करून त्यांनी मला खाली उतरवलं. ते माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नव्हते. मी घाबरलो. त्यांचे चेहरे अनोळखी होते.”
“मग?”
“गाडीतून उतरवल्यावर त्यांनी पाठीमागे माझे हात बांधले. ते मला ढकलत शेतात नेत होते. मी कोच कुठे आहेत, हे विचारले. पण त्यांनी मला उत्तर दिले नाही. पुढचा एक जण मोबाइलवर बोलत होता, ‘दीपक सर, त्याला बांधावर आणलंय. पुढे?’ मला नाव आठवले, दीपक रासने. तो तर नसेल ना यात सहभागी असे वाटले.”
“कोण दीपक रासने?”
“आमचा लीडर. तो अत्यंत उर्मट आणि उद्धट आहे. पुढच्या मॅचचा कॅप्टन मला व्हायची संधी मिळणार होती. त्याच वेळी दीपक मला म्हणाला होता, ‘प्रणद संघातून बाहेर पड.’ कुणी डोईजड झालं तर हा दीपक खपवून घेत नसे. त्यानंतर दुसर्याच दिवशी कोचकडे जायचं म्हणून मला त्या शेतावर घेऊन गेले आणि…”
“मग… मग काय झालं?”
“त्यांनी शेतात आधीच करून ठेवलेल्या खोल खड्ड्यात मला ढकललं. मी खूप विनवण्या केल्या. पण त्या यमदूतांनी माझा जीव घेतला.”
“काय? प्रणद आता मी गप्प बसणार नाही. त्या दीपकला फासावर लटकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी तुझी केस पुन्हा ओपन करणार. तुला न्याय मिळवून देणार.”
पवनने ही गोष्ट मित्रांना सांगितली. दीपकला पुराव्यानिशी पकडून फासावर चढवण्याची त्याने प्रतिज्ञा केली. त्यानं कारवाईला सुरुवात केली. प्रणदला कोणत्या शेतात
नेऊन पुरलं आहे. याचा तो शोध घेत होता. त्याच्या पोलिसी नजरेने ती जागा शोधली.
त्याने दुसर्याच दिवशी मित्रांना हे सांगितलं. तेथे जाऊन तेथून प्रणदचा मृतदेह काढणार असल्याचं सांगितलं. या केससाठी त्याने पवनला त्याचा वकील मित्र हेमंत भोसले याची साथ लाभली. त्याने त्याला केस नीट समजावली व म्हणाला.
“हेमंत, प्रणदला नाही तर सत्याला न्याय द्यायचा आहे. यासाठी झटपट कारवाई करायला हवी.”
“पवन, तू ही केस परत उघडलीस यावरून त्याचा अंदाज येत आहे.
काही काळजी करू नकोस.”
पवनने त्या शेताच्या भोवती साध्या वेषातील पोलिसांची गस्त करून ठेवली होती. त्याला माहीत होते, ही केस ओपन झाल्यावर दीपक सावध होणार आणि तो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार.
केस उभी राहिली. वकील हेमंतने न्यायमूर्तींच्या परवानगीने पंचांसमक्ष प्रणदचे शेतात दफन केलेले प्रेत वर काढले. प्रेताची ओळख पटवायला त्याच्या घरच्यांना बोलावले. त्याच्या हातावरील घड्याळ, बोटावरील अंगठी, गळ्यातील चेन, खिशातील मोबाइल व इतर वस्तू त्याची ओळख पटवायला पुरेशा होत्या. प्रेतावरील वस्तूंचा पंचनामा करून प्रेत पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले. न्यूजपेपर आणि चॅनेलने या केसला चांगलीच प्रसिद्धी दिली. पवनने तीन मारेकर्यांना प्रयासाने शोधून काढले. त्यापैकी एक ‘रमण लाड’ हा माफीचा साक्षीदार बनला. दीपकच या सार्याचा सूत्रधार आहे आणि त्याने यांना एक एक लाख रुपये दिले आहेत, हेही एव्हाना उघड झाले होते.
शेवटी बरीच भवती न भवती झाली. सार्या साक्षी पुराव्याची छाननी झाली. हेमंत भोसलेंनी सुसूत्रपणे आरोपी तपासले. साक्षीदारांची तपासणी
झाली. माफीच्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरली गेली आणि केसचा निकाल लागला. दीपकवर मनुष्यवधाचा आरोप सिद्ध झाला. मरेपर्यंत फाशीची शिक्षा मिळाली आणि प्रणदला न्याय मिळाला.
काय साधले दीपकने?
फुटबॉल कॅप्टन होण्याचे त्याचे स्वप्न तर विरलेच. पण त्याचं तरुणपण खडी फोडण्यात जाणार होतं. त्याने स्वतःचे जीवन उद्ध्वस्त केले होते. त्याने प्रणदसाठी चर खणला पण त्याची फासाची पायाखालची फळीही एका चरातच उघडणार होती, हे तो विसरला. केवळ द्वेष, मत्सर, असूया या गोष्टींनं त्याच्या जीवनाचा शेवट केला आणि सारं काही संपलं…
Link Copied