Close

गोंधळेकर (Short Story: Gondhalekar)


तुम्हाला खरंच सांगतो. परतपरत सांगतो. मी गोंधळेकर आहे. मी गोंधळ घालतो आणि मी असेच गोंधळ पुढेही घालत राहणार आहे. कधी कुणाला हसवण्यासाठी… कधी कुणाला खुलवण्यासाठी…. कधी कुणाच्या उदासीन चेहर्‍यावर हास्याची लकेर आणण्यासाठी…


हॅलो गोंधळेकर, काय म्हणता? कसे आहात?” रेगेंनी माझ्या पाठीवर हात ठेवत म्हटलं.
“ओह, हॅलो रेगेसाहेब, मी मजेत. तुम्ही बोला.”
“काय बोलायचं आता? आता फक्त रिटायर्ड लाईफ एन्जॉय करायचं. ह्या पेन्शनर्स असोसिएशनच्या निमित्ताने सर्वांची भेट होते नाही? बरं वाटतं. पुराने दोस्त मिलते है.” रेगेसाहेब बोलत होते, तेवढ्यात तिथून पाठक आला.
“अरे गोंधळेकर, तू इथे आहेस होय. चल, जेऊन घेऊया,” म्हणत मला घेऊन गेला.
तुम्हाला सांगतो, आता रिटायर्ड होऊन चार वर्ष झाली. आमंत्रणपत्रिका येते जोंधळेकर नावाने. पण अजूनही मित्रपरिवार हाक मारतो गोंधळेकर म्हणूनच. मग माझाही पार गोंधळ उडतो कधीकधी. अहो, मी पार विसरून गेलोय माझं खरं नाव. जोंधळेकर की गोंधळेकर? दोन मिनिटं शांत बसून स्मरणशक्तीवर ताण दिला की आठवतं. माझं नाव सदानंद दामोदर जोंधळेकर. होय जोंधळेकरच. पण आमच्या बेटर हाफनं आम्हाला मस्करीत गोंधळेकर म्हणायला सुरुवात केली नि मग आम्ही बनलो स.दा. गोंधळेकर.
म्हणजे तसा मी नीटनेटका, सरळमार्गी, कामसू वगैरे वगैरे. पण सगळेच चांगले गुण असून चालेल का माणसाचं? थोडं कमी थोडं जास्त. तसा उडतो माझा गोंधळ कधीकधी. म्हणजे खरं सांगू का, तसा कधीकधी नाही तर बरेचदा. म्हणजे माझा हा गोंधळ्या स्वभाव लहानपणापासूनचाच. पण तो ठळकपणे लक्षात आला तो लग्नानंतरच.
म्हणजे झालं असं की लग्नानंतर आम्ही देवदर्शनाला मध्य प्रदेशात गेलो होतो. आमचा देवसुद्धा सेटल व्हायला तिथे मध्य प्रदेशात कुठे गेला कोणास ठाऊक? असो. त्यावेळचं हे देवदर्शन वगैरे आपलं सांगायला हो. खरा तर तो हनिमूनच, पण आपला जुन्या पद्धतीचा. तर आम्ही एक छानसं हॉटेलही बुक केलं गेल्यावर. ही दमली होती. थोडी विश्रांती घेते, मग फिरायला जाऊ म्हणाली. तसा मी फ्रेशच होतो. मग म्हटलं ही विश्रांती घेतेय तोवर आपण बाजारात एक फेरी मारून यावी. फेरी मारून आलो आणि चुकून स्वतःची समजून दुसर्‍याच कोणाच्या खोलीत शिरलो. ड्रेसिंग टेबलवर बसून नटणार्‍या त्या बाईला आमची बेटर हाफ समजलो नि तिचे डोळे मागून जाऊन बंद केले. त्याबरोबर ती अशी किंचाळली की एकाच वेळेस तिचा नवरा बाथरूममधून नि आमची बेटर हाफ आमच्या खोलीतून तिथे येऊन पोहोचले. त्या बाईचा नवरा मी दिलेले स्पष्टीकरण ऐकण्याच्या मनःस्थितीत अजिबात नव्हता. त्याच्याकडून माझी पिटाई होणारच होती. तेवढ्यात हिने माफी मागून माझा झालेला गैरसमज त्याला समजावला व मला वाचवले. आता ह्या दोन्ही बायकांची साडी इतकी सेम होती. शिवाय तो मानेवरचा आंबाडा, त्यावरची शेवंतीची वेणी सारं काही सेम. अंगलटही तशीच. त्यातून वीज गेलेली. संध्याकाळ झालेली. त्या धूसर प्रकाशात गोंधळ उडेल नाहीतर काय?
हा एक प्रसंग आणि त्यामागून लगेच तो दुसरा प्रसंग. झालं असं, आम्ही मध्य प्रदेशात जाणार हे समजल्यावर आमच्या गिरगांवातल्या शेजारच्या भीमाआत्यानी मला एका दुकानाचा पत्ता देऊन तिथून एक लोखंडी तवा आणायला सांगितला. खूप चांगले असतात तिथले तवे म्हणाली म्हातारी. मग काय, हो म्हणालो. पण बेटर हाफला सांगितलं नाही. म्हटलं आता हिला तिथल्या चांगल्या क्वालिटीच्या तव्यांचं कळलं की मग झालं आपलं कल्याण. मग आमच्या स्वतःच्या घरासाठी दुसरा, हिच्या आईसाठी तिसरा, ताईसाठी चवथा, एखाद्या सोम्यासाठी पाचवा नि गोम्यासाठी सहावा; असे अनेक तवे, शिवाय चांगल्या वाटल्या म्हणून लोखंडी कढया, पळ्या असं करून अर्ध दुकान मला घ्यायला लावेल कदाचित. आणि ते सर्व जड लोखंडी सामान वाहून कोण आणणार? तर हा हक्काचा हमाल. म्हणजे तेव्हा मला हिची विशेष माहिती नव्हती म्हणा. पण बाई आणि खरेदी ह्या गोष्टी एकत्र आल्या की त्यात पुरुषाचे हाल ठरलेले एवढे मात्र मला नक्की माहीत होते. म्हणून मग गप्पच बसलो. तिच्या नकळत हळूच जाऊन आणू असा विचार केला. पण हनिमूनच्या गडबडीत त्या तव्याबद्दल मग विसरूनच गेलो. आठवलं तेव्हा मी मुंबईत पोहोचलो होतो. स्टेशनवरून बस पकडून घरी जात होतो. आठवलं तसा मी डोक्यावर हात मारला. हिने विचारलं, “आता काय झालं?”ं म्हणजे त्या दोन तीन दिवसांत किती काय काय झालं होतं ह्याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. ह्या दोन तीन दिवसांत ही बर्‍यापैकी हुशार आहे ह्याची मला कल्पना आली होती. ती काहीतरी तोडगा काढेल असे वाटून मी तिला सर्व सांगितलं. तर हिने मला एक आयडिया सांगितली.


तशी आम्ही दोघं एक स्टॉप आधी उतरलो. समोरच असलेल्या तांबोटकरांच्या दुकानात गेलो आणि एक जाडजूड तवा तेव्हाच्या पंधरा रुपयांनी खरेदी कला. भीमाआत्याचा विश्‍वास बसावा म्हणून त्याची किंमत दहा रुपये सांगून उरलेल्या पाच रुपयांचा हिशोब अक्कलखाती लिहायचा ठरवला. हे सर्व एवढ्याचसाठी की खरे सांगितले तर भीमाआत्यांनी आणि तिच्या बरोबरीने आमच्या घरच्या मंडळींनी आम्हा दोघांचा उद्धार केला असता. ‘इतके काय बाई विसरायचे? कोणाची लग्ने कधी झाली नाहीत की कोण कधी देवदर्शनास गेले नाही?’ वगैरे वगैरे टोमणे खाष्ट सासूमंडळींनी हिला मारले असतेच. त्यापेक्षा पाच रुपये अक्कलखाती गेलेले बरे असे वाटले. तर तवा घेऊन तो बॅगेत तळाशी घालून मग आम्ही घरी गेलो. आम्ही घरात शिरतोय तोच भीमाआत्या आमच्या पाठोपाठ घरात शिरल्या. फे्रश होणे, चहापाणी घेणे वगैरे सगळे राहिले बाजूला. सर्वात आधी आम्ही आमच्या बॅगा उघडाव्या लागल्या. सर्व सामान आम्ही बाहेर काढले. आणि तो लोखंडी तवा बॅगेच्या तळातून मी बाहेर काढला. अरे व्वा! बेटर हाफची तवा अगदी तळाशी ठेवायची आयडियाही योग्यच होती म्हणायची, असे मनातल्या मनात म्हणून तिचे कौतुकही मी करून टाकले आणि तो तवा मी भीमाआत्यांच्या ताब्यात दिला.
“अरे व्वा! सदा, अगदी सुरेख आणला आहेस हो तवा बघून. अगदी जाडजूड आहे. असा तवा इथे मुंबईत मिळणारच नाही. मला माहीतच होतं म्हणून मुद्दाम तुला त्रास दिला हो!” भीमाआत्यानी प्रेमाने त्या तव्यावरून हात फिरवला आणि तेवढ्यात त्यांचा चेहरा बदलला. त्यांनी तो जाड तवा दोन्ही हातांनी उचलला आणि खिडकीजवळ नेऊन नीट निरखून पाहिला तर त्यांना दिसले की त्या तव्याच्या मध्य भागातला थोडा लोखंडी टवका निघालेला होता.
“अरे बापरे हा तवा बरोबर नाही हो सदा. हे पहा, ह्यात पीठ अडकून बसणार. काय हे सदा? जरा बघून तरी घ्यायचा ना? माझे पैसे फुकट जाणार आता…” भीमाआत्यांची टकळी सुरू झाली.
वैतागून मी म्हणालो, “आत्याबाई अजिबात काळजी करू नका. थोड्या वेळाने जाऊन बदलून आणतो तांबोटकरांकडून. आहे काय नि नाही काय?”
“तांबोटकर कसे घेतील पण…” भीमाआत्या अचंबित.
“अरे व्वा! घेतील नाहीतर काय न घेऊन सांगतील कोणाला? त्यांचा खराब तवा ते घेणार नाहीत तर कोण घेणार?” मी सांगून मोकळा झालो नि मग माझ्या लक्षात आलं मी काय बोलून गेलो ते. हळूच बेटर हाफकडे पाहिलं. तर तिचाही चेहरा अगदी गोरामोरा झालेला. ह्या कटकारस्थानात ती ही सामील होती. आता खोटं बोललं म्हणून दोघांचाही उद्धार होणार होता. पण काय झाले ते सर्वांच्या लक्षात आले आणि मग सर्वजण पोट धरधरून हसले. त्याच रात्री आमच्या बेटर हाफने आमचं नामकरण केलं मिस्टर गोंधळेकर. अर्थात त्यावेळेस फक्त एकांतात.
पण मग काही वर्षांनी मी मला राजरोसपणे गोंधळेकरच म्हणू लागली.
आणि मग कसे कोण जाणे, पण माझे एकएक गोंधळाचे किस्से प्रसिद्ध होऊ लागले आणि त्याबरोबरच माझं गोंधळेकर हे नावही. एकदा बसमधून आम्ही हिच्या माहेरी चाललो होतो. मी आमचं तिकीट काढलं. तिकीटांची घडी घालून ती नीट घड्याळाच्या पट्ट्यातून सरकवूनही टाकली. आणि मग मला त्या छान वार्‍यावर एक छानशी डुलकीही लागली. पंधरा मिनिटांनी जाग आल्यावर मी विसरूनच गेलो की मी आधीच तिकीट काढलंय ते. मी परत एकदा तिकीटं काढली. कंडक्टर थोडा आश्‍चर्याने माझ्याकडे पाहू लागला. पण मग तो तरी किती लोकांचं लक्षात ठेवू शकणार नाही का? आणि तिकीटं न काढणारी माणसं तो लक्षात ठेवतही असेल. पण दोनदा तिकीटं काढणारा कोणी महाभाग असेल ह्यावर त्याने बापड्याने तरी विश्‍वास का ठेवावा नाही का? आपलीच काहीतरी गफलत झाली असेल असं वाटून त्याने दुसर्‍यांदाही मला तिकीटे दिली. ती तिकीटे नेहमीच्या सवयीने घडी करून घड्याळाच्या पट्ट्यात सरकवताना मला माझी चूक लक्षात आली. बेटर हाफही झोपली होती मघापासून. म्हणून मला एवढे टेन्शन नव्हते. पण तरीही नक्की झोपलीच आहे ना हे पहावे म्हणून मी तिच्याकडे पाहिले तर नेमके नको त्या क्षणी तिने डोळे उघडलेले होते बहुधा. आणि ते डोळे खाऊ का गिळू अशा नजरेने माझ्याकडे पहातही होते. ब्बास! पुढे माझी काय अवस्था झाली असेल हे तुम्ही सुजाण मंडळी जाणताच.
अशीच फजिती माझी ऑफिसातही होत असे. तिथलाही एक प्रसंग तुम्हाला सांगून टाकतो. मी एलआयसीत सर्व्हिसला होतो. एकदा एक विधवा स्त्री मृत्युचा दावा करण्यासाठी ऑफिसात आली. बाई रडत होती. तिने बरोबर पॉलिसी क्रमांक आणला होता. मी त्या पॉलिसीचे डॉकेट मागवून घेतले. त्या पेपर्सवर नजर टाकून मी म्हटलं, “ताई, रडू नकात. झालं ते वाईट झालं. पण तुमच्या नवर्‍याने तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी विमा काढून ठेवला तो किती शहाणपणा केला ते लक्षात घ्या. तो घेतला नसता तर आज तुमची काय अवस्था होणार होती? नातेवाईक वगैरे थोड्या दिवसांचे. अशा वेळेस जीवन विमाच कामाला येतो.” बाईच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. मृताच्या नातेवाईकांना असा दिलासा दिला की मला माझ्या कामाचे समाधान वाटत असे. पियुनला आणायला सांगितलेला पाण्याचा ग्लास तिच्यापुढे सरकवत मी म्हटले, “सरस्वतीबाई, तुम्हाला विम्याचे दोन लाख रुपये मिळणार आहेत.”
“साहेब, काय बोलताय तुम्ही? माझं नाव लक्ष्मी कांबळे हाय. सरस्वती न्हाय.”
परत एकदा वारसाच्या नावाकडे नजर टाकून मी म्हटले, “अरे बापरे, हो का? पण इथे तर वारसाचे नाव सरस्वती आणि नाते पत्नी असेच लिहिले आहे. ताई, तुमच्या नवर्‍याची अजून एखादी पत्नी वगैरे….”
“अरे माझ्या कर्मा हे काय ऐकतोय म्या? धनी, तुम्ही काय करून ठेवलंत वो,” धाय मोकलून ती बाई रडू लागली. तिची समजूत काढण्याकरता मी इतर स्त्री कर्मचार्‍यांची मदत घेतली. तेवढ्यात माझ्या बाजूला बसणार्‍या काळेबाईंनी तिच्या हातातला पॉलिसी क्रमांक आणि माझ्या हातातल्या पेपर्सचा पॉलिसी क्रमांक तपासून पाहिला. नऊ अंकांच्या त्या नंबरापैकी एक अंक वेगळा होता. 3 हा आकडा मला 8 ह्या आकड्यासारखा दिसला होता. योगायोगाने तो चुकीचा नंबरही कांबळे नावाच्या माणसाचाच होता. पुढचं सारं काही काळे बाईंनीच हॅन्डल केलं. मात्र ह्या प्रसंगानंतर माझ्या गोंधळेकर ह्या पत्नीने ठेवलेल्या नावावर ऑफिसातही शिक्कामोर्तब झालं.
अजून एक असाच प्रसंग आठवतो. तेव्हा गुजराथला भुज परिसरात भूकंप झाला होता. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते. पहाटे पाच वाजता भूकंप झाला. आम्ही सर्व हादर्‍याने जागे झालो. नक्की भूकंपच झाला का ते पाहाण्यासाठी म्हणून आमचे मेहुणे श्रीयुत श्रीधर गोखले ह्यांना फोन लावला. आम्ही तळमजल्यावर रहात होतो आणि श्रीधर गोखले चवथ्या मजल्यावर. सर्वांनी भूकंप झाल्यावर मोकळ्या मैदानात यायचे असते हे मला माहीत होते. परत भूकंप झाला तर ते गोखल्यांनाही माहीत असावे असेही मला वाटले.
फोन वाजला. पलिकडून उचलल्यावर मी घोगर्‍या आवाजात विचारले, “भूकंप झाला का हो आता?” हा प्रश्‍न ऐकून पलिकडचे गृहस्थ घाबरले असावे.


“आपण कोण? आपल्याला कोण हवे आहे?” असा प्रश्‍न पलीकडून आला.
“अहो, मी कोण ते जास्त महत्त्वाचं आहे का? आता वेळ कुठली आणि नावगाव काय विचारत बसलाय दादा,” असे मी म्हणतोय तेवढ्यात दुसरा भूकंपाचा धक्का बसला, “पहा, परत भूकंप झालाय. उतरा लवकर खाली. नाहीतर जीवास मुकाल. आम्हीही बाहेर पडतोय सगळे.” असे म्हणून मी फोन ठेवूनही दिला. घरातल्या सगळ्यांना बाहेर पडूया म्हणू लागलो तर कोणी तयार होईनात. “अहो, एवढा मोठा भूकंप नाही झालाय. उगाच काय बाहेर पडूया?” बेटर हाफ गुरकावली.
अर्ध्या तासाने फोन वाजला. मीच घेतला.
“आता ह्या नंबरवरून फोन आला होता आमच्याकडे. जरा सांगाल का कोण बोलत होतं ते?”
“अहो दादा, असं काय करताय? मी गोंधळे… सॉरी सॉरी. जोंधळेकर. तुमचा मेहुणा. अहो तुमच्या बहिणीचा नवरा. महंत रोड, विलेपार्ले. ओळखलं नाहीत का?”
“ओह, काका तुम्ही. अहो काका, तुम्ही चुकीचा नंबर फिरवलात. अहो मी दादा गोखले नाही. मी दत्ता गोखले. हल्ली दिल्लीत आहे मुक्काम माझा. अहो काका, मी टॉवरमध्ये रहातो इथे. बाराव्या मजल्यावर. त्यामुळे जाम घाबरलो भूकंप झाला ऐकल्यावर. तुम्ही खाली उतरा म्हणालात नि मी सगळ्या शेजार्‍यांना उठवलं की झोपेतून. भूकंप झाला म्हणून. एवढा गोंधळ उडाला ना इथे सर्वांचा. थोड्या वेळाने लक्षात आलं काहीतरी गडबड झालीये ते. बरं तिथे सर्व ठीक आहे ना मुंबईत?”
“हो हो, अगदी ठीक. फार मोठा नाही रे भूकंप. मला आपलं वाटलं. सॉरी रे दत्ता. अरे, तुझा नि दादा गोखलेंचा नंबर अगदी वरखाली आहे रे डायरीत. दादांचा म्हणून तुझाच नंबर लावला. उगाच तुझी झोपमोड झाली. खरंच व्हेरी व्हेरी सॉरी हं.” असे म्हणून मी फोन ठेवला. नेहमीप्रमाणे मी गोंधळ घातला होता. नेहमीप्रमाणे मी न चुकता चुकीचा नंबर लावला होता. दादा गोखल्यांच्या ऐवजी माझ्या चुलत भावाच्या मुलाला, दत्ताला फोन लावला होता. फोन ठेवला तरी मान वर कराविशीच वाटत नव्हती. कारण माझ्याभोवती आमच्या घरातल्यांचा कोंडाळा होता. बेटर हाफ, मुलगा, सूनबाई, नातवंड ह्या सर्वांचे पाय मला दिसत होते. तरीही हिंमत करून वर पाहिले. सगळ्यांना हसू फुटले होते. त्या सर्वांचे हसरे चेहरे पाहून मग मलाही हसू फुटले तो भाग वेगळा.
तर अशा विविध प्रकारे गोंधळ घालूनही मी नेटका संसार केला. आमच्या ह्या नेटक्या संसाराचे सारं श्रेय आमची बेटर हाफच घेते म्हणा आणि खरं सांगू का मीही मोठ्या मनाने तिला त्याचं श्रेय देऊन टाकलेलं आहे. जो तो म्हणतो सदा वेंधळा पण त्याची बायको मात्र हुशार, स्मार्ट. यथावकाश आमचा सुपुत्र आणि कन्यारत्नही मोठी झाली. त्यांची लग्नही पार पडली. सूनबाई घरात आली. बाकी कोणी नाही पण ती मात्र माझ्या बाजूची झाली. बाबांचे नाव उगाचच खराब
केले आहे असे कौतुकाने म्हणू लागली, पण सुरुवातीची काही वर्षेच. मग तिलाही अनुभव आला माझ्या ह्या
गोंधळ्या स्वभावाचा.
कसा तेही सविस्तरपणे सांगतो. झाले असे की आम्ही एकदा आमच्या पुतण्याच्या तळेगावच्या ब्लॉकवर चाललो होतो. मी, बेटर हाफ, सुपुत्र, सूनबाई, पुतण्या आणि त्याची पत्नी. एवढ्यांचे जायचे ठरले नि बेटर हाफला त्यांच्या मैत्रिणीची आठवण आली. बिचारी विधवा. तिचे कोणाकडे येणे नाही की जाणे. तिला घेऊन जावे दोन दिवस म्हणून बेटर हाफने पुतण्याला विचारून तिलाही आमंत्रण दिले. तीही तयार झाली. आमची इंद्रायणीची तिकीटे होती. इंद्रायणी तेव्हा सकाळी आतापेक्षा लवकर सुटत असे. आता बेटर हाफची मैत्रिण म्हणजे देवस्थळीबाई ह्या मालाडच्या. खरं तर बेटर हाफने त्या बाईंना डायरेक्ट दादरला यायला सांगायचे की नाही. पण ह्या बायका म्हणजे ह्यांचे पायात पाय. बेटर हाफने तिला पार्ल्याला उतरायला सांगितले. लेडीज डब्याजवळ भेटायचे ठरले. पण आमच्या बेटर हाफनी कुठला लेडीज ते सांगितलेच नाही. आता तुम्हीच सांगा ह्या वेळेस तरी चूक बेटर हाफची की नाही. मग मी वैतागलो. शेवटी पुतण्याला लास्ट लेडीज, आम्ही सारे मिडल लेडीज व सुपुत्राला दोन लेडीज डब्याच्या मध्यावर उभे केले. तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. घरी लँडलाईनवर फोन केला तेव्हा देवस्थळीबाई ऑलरेडी निघालेल्या. इंद्रायणी गाठायची म्हणजे किमान पावणेसहाची लोकल पार्ल्याहून पकडायला हवी. भल्या पहाटे माझी बेटर हाफबरोबर शाब्दिक चकमक उडालेली.
“गोंधळेकर, एरवी तुम्ही गोंधळ घालता. कधीतरी आम्हालाही संधी द्या की चुका करायची. एवढं काय रागवायचंय. येईल देवस्थळी वेळेवर.” अशी आशा आम्हाला बेटर हाफनी दाखवली. मग काय आम्ही गप्प. पण मग दोन तीन ट्रेन देवस्थळीसाठी सोडल्यावर जसजसा घड्याळाचा काटा पावणेसहाच्या जवळ जाऊ लागला तसतसा माझा बीपीचा काटाही वर चढू लागला.
“हं. घ्या आता. म्हणे देवस्थळी शब्दाची पक्की आहे. देवस्थळी वेळ पाळणारी आहे. देवस्थळी यांव आहे, देवस्थळी त्यांव आहे. घ्या आता. त्या देवस्थळीपायी आमची इंद्रायणी चुकणार. आता मात्र काही सांगू नका. त्या देवस्थळीपायी आपली इंद्रायणी चुकायची नाहीतर. आता जी कुठली ट्रेन येईल त्यात आपण चढायचंच. मग तुमची देवस्थळी येवो अथवा न येवो.” माझं फर्मान. कधी नव्हे ते बेटर हाफ चूप. गाडी आली. मी, पुतण्याला आणि सुपुत्राला लांबूनच चढण्यासाठी खुणावले. दोन्ही सुना, बेटर हाफ आणि मी एका डब्यात चढतोय तोच शेजारच्या डब्यातून देवस्थळी खाली उतरताना दिसल्या. हिने त्यांना हाकही मारली पण तोपर्यंत त्या उतरलेल्या होत्या आणि आम्ही चढलेले होतो. इतका वेळ त्या देवस्थळीवर रागावलेला मी त्या क्षणी मात्र विरघळलो. त्या एकट्या बाईची मला आली. घाईघाईत मी हिला म्हटलं, “चल, बाकीच्यांना पुढे होऊं दे. आपण दोघं उतरू खाली. देवस्थळी एकट्या पडतील नाहीतर.” एवढ्या गडबडीतही बेटर हाफच्या नजरेतील माझ्याबद्दलचे कौतुक मला जाणवले. आम्ही दोघं पटकन खाली उतरलो तर तेवढ्यात आम्हाला ट्रेनमध्ये चढलेलं पाहिलं असल्याने उतरलेल्या देवस्थळी बाई परत त्यांच्या डब्यात चढल्या. आणि तुम्हाला काय सांगू? देवस्थळी पार्ल्याहून दादरला आणि आम्ही दोघं मात्र इथेच. परत एका गोंधळाचा शिक्का माझ्या माथी.
मला प्रचंड पाठिंबा देणारी आमची सूनबाई त्या प्रसंगानंतर मात्र आपल्या सासुला सामील झाली. म्हणजे झालं काय की मे महिन्यात आमचं कन्यारत्न अमेरिकेतून इथे यायचं होतं पंधरा दिवसांसाठी. अगदी चांगल्या प्रतीच्या आंब्याची पेटी सूनबाईंनी खास नणंदबाईंसाठी मागवलेली. नणंदबाई आल्या त्या दिवशीच पेटी घरात दाखल. पण त्यातले आंबे हिरवे होते. मग ती पेटी ह्या सर्वांनी तशीच ठेवायची व तोपर्यंत डझन दोन डझन सुटे आंबे आणायचे ठरवले. हिरव्या आंब्यांची चर्चा झाली तेव्हा मी घरात नव्हतो. चार पाच दिवसांनी आमच्या बेटर हाफनी सुपुत्रांना म्हटलं, “आज आंबे आण रे बाबा. घरातले संपलेत.” मला वाटलं पेटी रिकामी झालीय. दुसरे दिवशी कचरेवाला कचरा न्यायला आला. कचर्‍याचा डबा दिला आणि त्या बाईला आत येऊन आंब्याची रिकामी झालेली खरी तर भरलेली पेटी उचलून घेऊन जायला सांगितली. ती घेऊनही गेली. जेव्हा सर्वांना ही गोष्ट समजली तेव्हा आधी सर्वच जण माझ्यावर रागावले. आमचे सुपुत्र म्हणालेही, “बाबा, आईने तुमचं नाव ना अगदी बरोबर ठेवलंय. गों..ध..ळे..क..र..” आणि मग परत एकदा सर्वांना मस्करीकरता एक विषय मिळाला.
माझं आयुष्यच गोंधळमय असल्यामुळे माझ्या रिटायरमेंटच्या दिवशीही गोंधळ नसता झाला तर नवल. झालं असं की त्यावेळेस आमचा अकाऊंटंट नवीन होता. जेमतेम आठवडा झाला असेल त्याला आमच्या ऑफिसात. आमच्या ऑफिसात मात्र टर्मिनल ड्यूजचे चेक्स अगदी रिटायरमेन्टच्या शेवटच्या दिवशी हातात मिळतात. माझा निरोप समारंभ झाला नि मी ते प्रॉव्हिडंट फंड, गॅच्युईटी, ग्रुपसेव्हिंग वगैरेचे चेक्स घेऊन घरी आलो. दुसरे दिवशी ते लाखो रुपयांचे चेक्स बँकेत जाऊन डिपॉझिटही करून आलो. थोड्या वेळात मला बँकेतून घरी फोन आला. “तुम्ही भरलेले चेक्स चुकीच्या नावाचे आहेत. परत घेऊन जा, नाहीतर डिसऑनर होतील.” मी लगेच जाऊन चेक घेऊन आलो. आमच्या नव्या अकाऊंटंटने चक्क ते चेक सदानंद गोंधळेकर ह्या नावाने काढलेले होते. त्याला जाऊन विचारलं तर घाबरला आणि म्हणाला, “चुकलंच हो माझं. म्हणजे खरं तर व्हॉऊचरवर जोंधळेकरच होतं. पण मला वाटलं चुकून आलं असेल. तुम्हाला तर सगळे गोंधळेकरच हाक मारत होते ना! एनी वे माझा गोंधळ झाला खरा.” म्हणजे त्याने अगदी कबूल करून टाकलंन त्याने गोंधळ केला ते.
जसं आमच्या अकाऊंटंटने त्या दिवशी मान्य केलं ना तसंच मीही मान्य केलंय.. अगदी आयुष्यभरासाठी. होय मी गोंधळेकर आहे. मी अनेक गोंधळ घातलेले आहेत. आणि घालत ही रहाणार आहे. ह्या गोंधळांनी कधीकधी लोकांची थोडीफार गैरसोयही झाली असेल तरी त्यांनी लोकांना भरपूर हसवलेलंही आहे आणि खरं सांगू तुम्हाला? काही गोंधळ जरी माझ्या स्वभावामुळे झाले असले ना तरी काही गोंधळ मी हेतुपुरस्सरही घातलेले आहेत.
मघाशी आंब्याच्या पेटीचा प्रसंग सांगितला ना तो हेतुपुरस्सर घालेला गोंधळ. आदल्याच दिवशी त्या भंग्याची उघडीनागडी छोटी पोरगी आईकडे आंबे मागत होती. आणि तिची आई रागाने तिला बडव बडव बडवत होती. त्या रागामागे एक भावना होती. हताशपणाची… आपल्या पोटच्या गोळ्याची इच्छापूर्ती न करू शकल्याच्या असहाय्यतेची… जीवनातील पराजयाची… आई आपल्यावर इतकी का रागावली आहे हे न कळल्याने ती पोरगी अजूनच जोरात रडत होती. मला ते पहावलं नाही आणि मग घालून टाकला मी एक गोंधळ. हेतुपुरस्सर. बाकी सर्वांना तो चुकून झालेला गोंधळ वाटला. फक्त बेटर हाफला कळलं खरं काय आहे ते. तिच्या कौतुकभरल्या नजरेने माझी पाठ थोपटली आणि मग मला धन्य वाटलं.
तुम्हाला खरंच सांगतो. परतपरत सांगतो. मी गोंधळेकर आहे. मी गोंधळ घालतो आणि मी असेच गोंधळ पुढेही घालत राहणार आहे. कधी कुणाला हसवण्यासाठी… कधी कुणाला खुलवण्यासाठी…. कधी कुणाच्या उदासीन चेहर्‍यावर हास्याची लकेर आणण्यासाठी…

-राजश्री बर्वे

Share this article