- मनोहर मंडवाले
मळभ दाटून आलेल्या त्या अवस्थेतच लंच-टाइम संपला. जेवायची इच्छाच राहिली नव्हती. पण पोटात काहीतरी ढकलायला हवं म्हणून नाइलाजानेच डबा संपवून अमित नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडला. पुन्हा त्याचं मन स्वत:शीच बोलू लागलं. मुलीचं शिक्षण, तिचं लग्न, फ्लॅटचं कर्ज, सगळंच तर बाकी आहे.. अशात नोकरी गेली तर?…
‘सूर्यवंशी अॅण्ड सन्स’ या कंपनीचे सी.ई.ओ. अभिजित सूर्यवंशी यांनी स्टाफ मिटिंगमध्ये गंभीरपणे कंपनीची परिस्थिती सांगितली. अन् आरती अधिक स्पष्टपणे तुम्हाला समजावेल, म्हणून त्यांनी आरतीला सूत्रे सोपविली.
‘खरं तर तुम्हा सार्यांना आणखी काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. आपल्याला दरवर्षी मिळणारी हिमालया ग्रुप्सची चाळीस करोडची ऑर्डर, या वर्षी आपण गमावलीय. येत्या काही महिन्यात आपल्याला पुन्हा आपल्या टार्गेटपर्यंत पोहचायलाच हवं.
पण तोपर्यंत काही उपाय करायलाच हवे. शक्य होईल तिथं ऑफिसचा खर्च कमी करण्यावर तर आमचा भर राहीलच, त्याशिवाय कॉस्टकटिंगसारख्या आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पुढच्याच आठवड्यात आपला अॅन्युअल डे येतोय, या वर्षी तोही रद्द केलाय. गेल्या पंधरा दिवसात सात जणांना कमी करण्यात आलंय तेही याच कारणांसाठी. आय अॅम सॉरी टू से… नाइलाजानंच आम्हाला सार्या स्टाफची सॅलरी कमी करण्याचं डीसिजन घ्यावं लागतंय. आणि ते काम आम्ही सतीश अन् बासू यांच्यावर सोपवलं होतं. त्या बाबतीत आमच्या मिटिंग्जही झाल्या. तसं दुपारनंतर नवीन पॅकेजच्या बाबतीत मी प्रत्येकाशी पर्सनली बोलणारच आहे. ओ. के!… कोणाला आणखी काही प्रश्न आहेत?’ असं बोलून झाल्यावर कंपनीच्या एच.आर. हेड आरती मॅडमनं प्रश्न केला.
त्यांचं बोलणं ऐकून कॉन्फरन्स हॉलमध्ये मिटिंगसाठी जमलेले सारेच स्तब्ध झाले. असं काहीतरी ऐकावं लागणार आहेत ही कुणकुण तशी गेल्या आठवड्यातच लागली होती. तरी प्रत्यक्षातला हा धक्का सगळ्यांना हादरवून गेला.
‘सूर्यवंशी अॅण्ड सन्स’ एक नावाजलेली मार्केटिंग कंपनी. ओळखीच्या सात-आठ जणांना घेऊन, अभिजित सूर्यवंशींनी चौतीस वर्षापूर्वी सुरू केलेल्या या कंपनीत, आजच्या घडीला जवळ जवळ एकशे नव्वदच्या आसपास कर्मचारी होते. पहिल्यापासून कंपनीचा आलेख सतत चढताच राहिला होता. त्यामुळे भारतातच नव्हे तर भारताबाहेरही कंपनीच्या नावाभोवती एक वलय तयार झालं होतं.
पण न घडणारी गोष्ट घडल्यानं मॅनेजमेंटपासून प्यूनपर्यंत सारेच हादरले होते. मार्केटिंगच्या व्यवसायात दादा समजल्या जाणार्या सूर्यवंशी अॅण्ड सन्सला हा धक्का अनपेक्षित होता.
बहुधा ऑफिसमधलंच कुणी फितूर झालं होतं. तीन महिन्यांपूर्वीच सूर्यवंशी अॅण्ड सन्स सोडून शहा ग्रुपला जॉईन झालेल्या पंकज खन्नाचाही यात मोठा हात होता.
या आधीही एकदोनदा असं घडलं होतं. रेग्युलर मिळणार्या दोन-तीन करोडच्या ऑर्डर्स प्रतिस्पर्धी कंपन्यांनी चिटिंग करून खेचल्या होत्या. त्यामुळे कंपनीला फारसा फरक पडला नव्हता. पण चाळीस करोडचा बिझनेस गमावणं ही कंपनीसाठी गंभीर बाब होती.
मिटिंग संपल्यावर सारेच आपापल्या जागेवर जायला निघाले. अमितही काळजीत पडला होता. ‘सालं… जबाबदार्यांच्या ओझ्यात आत्तापर्यंत अख्खं आयुष्य घालवलं. अन् हे आता नवीन टेन्शन. येणार्या काही दिवसात कुणाची नोकरी जाईल हे सांगता येत नाही. …अमित, अरे मी तुझ्याशी बोलतोय.’ लॉबीतून चालता चालता राजीवच्या मनातली खदखद बाहेर पडली.
‘आपल्या हातात तरी काय आहे?’ निराश मनानंच अमित उत्तरला.
मिटिंग तिसर्या मजल्यावर होती. लिफ्ट असूनही सवयीनं अमित पायर्यांकडे वळला. संजीव व रॉकी सोडले तर सेल्स डिपार्टमेंटमध्ये बरेचसे अमितसोबतच जॉईन झालेले होते. अन् या वयात नोकरी गेली म्हणजे ती कायमचीच. हे सांगायला एखाद्या ज्योतिष्याची गरजच नव्हती.
‘पण काही म्हण, मॅडम आज चिकन्या दिसताहेत.’ संजीवनं नेहमीसारखी आरती
मॅडमची तारीफ केली.
‘कमाल आहे तुझी. इथं सगळे टेन्शनमध्ये आहेत आणि तुला हे असलं काही सुचतंय’ - राजीव.
‘जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करून काय उपयोग? बिनधास्त राहायला शिका. जास्त सुखी व्हाल’, सुखी जीवनाचा कानमंत्र संजीवनं दिला.
तो नेहमीच असं काहीतरी ऐकवायचा. त्याच्या जिंदादिलीचं सार्यांना आश्चर्यही वाटायचं. संजीवच्या तारुण्याचा बहर अजून रसरशीत असल्यानं भंकस करायची त्याला सवयच होती. मात्र मॅडमबद्दलचं त्याचं बोलणं अमितच्या मनाला नेहमीसारखं बोचलं.
मळभ दाटून आलेल्या त्या अवस्थेतच लंचटाइम संपला. जेवायची इच्छाच राहिली नव्हती. पण पोटात काहीतरी ढकलायला हवं म्हणून नाइलाजानेच डबा संपवून अमित नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडला. पुन्हा त्याचं मन स्वत:शीच बोलू लागलं. मुलीचं शिक्षण, तिचं लग्न, फ्लॅटचं कर्ज, सगळंच तर बाकी आहे.. अशात नोकरी गेली तर?… या
जर-तरनंच गेल्या आठवड्यापासून त्याचं डोकं आउट झालं होतं.
बुधवार असल्यानं त्याच्या ऑफिसच्या एरिआत असलेलं मच्छी मार्केट गिर्हाइकांनी चांगलंच फुललं होतं. लगबगीनं मच्छी, कोळंबी, खेकडे विकणार्या तिथल्या कोळिणी, चेहर्यानं त्याच्या परिचयाच्या झाल्या होत्या. ओळख तशी कुणाशीच नव्हती, तरीही त्यांच्याशी एक वेगळं नातं जुळल्यासारखं वाटायचं.
आज त्यांच्याबद्दल त्याला फारच अप्रूप वाटलं. त्यातल्या बर्याचशा साठीच्या आसपासच्या होत्या. तरीही त्यांचा जगण्याचा उत्साह तरुणांना लाजवेल असा असायचा. सकाळी ऑफिसला येतानाही दोन्ही पाय मांडीपासून गमावलेल्या एका अठरा-वीस वर्षाच्या मुलाला, मोठ्या हिमतीनं लोकलमध्ये चढताना त्यानं पाहिलं,
त्या वेळी त्या मुलाच्या जिद्दीचं संजीव व केदारजवळ आपण कौतुक केलं होतं. त्याला ते आठवलं. या विचारांसरशी त्याला स्वत:चीच लाज वाटली. आपलंही बावन्नावं नुकतंच कुठं संपलंय. अन् नोकरी जाणार की काय?
या भीतीनेच आपण हातपाय गाळून बसलोय. जे घडेल ते घडू दे. घडणारी गोष्ट आपण टाळू शकत नाही, मग त्याला सामोरं जाण्यातच खरं आव्हान आहे. जास्तीत जास्त काय होईल? गेल्या वर्षी बुक केलेला फ्लॅट कदाचित ताबा घ्यायच्या आधीच सोडावा लागेल. पुन्हा कुठंतरी चाळीत राहावं लागेल.
त्याला आठवलं - काही महिन्यांपूर्वी फ्लॅट बुक केल्याची बातमी सगळ्यांना सांगताना किती आनंदात होतो आपण.शुभांगीचीही बर्याच वर्षापासूनची इच्छा पूर्ण होणार होती. गेल्या चोवीस वर्षांच्या सहवासात तिने आपल्यासाठी कितीतरी तडजोडी केल्या. शिरोडेकाकांच्या दहा बाय दहाच्या छोट्याशा खोलीत सुरू झालेला आपला संसार, तिने हसत हसत जिद्दीने फुलवला. आपल्या धाकट्या भावांना, भावासारखंच वागवून त्यांच्या संसाराच्या गाड्याही रुळावर आणल्या.
शुभांगीशी लग्न झालं तेव्हा आपल्याजवळ काहीच तर नव्हतं. जे होतं ते आधीच उद्ध्वस्त झालेलं होतं. धंद्यात बाबांचं दिवाळं निघालं तेव्हा गावची दोन्ही घरं विकली गेली. राहता बंगलाही विकावा लागला. सुरुवातीपासून मोठेपणा करण्यात बाबांनी वारेमाप पैसा खर्च केला. त्यात त्यांना लागलेल्या दारूच्या व्यसनानं सारंच गेलं. कॉलेजची सुरुवातीची वर्षे आपणही त्याच मस्तीत जगलो. मात्र दिवाळं निघाल्यावर महिन्यातच होत्याचं नव्हतं झालं. त्या वेळी कुणी मदतीला नाही आलं. तसं पाहिलं तर चौथीच इयत्ता शिकलेले बाबा अन् शाळेचं गेटही न पाहिलेल्या आपल्या अडाणी आईनं, संसाराच्या जबाबदार्या तशा चांगल्याच निभावल्या. घात केला तो बाबांच्या नको त्या व्यसनांनी. ज्या लोकांकडनं त्यांनी कर्ज उचललं होतं, ते रोज पैशांसाठी दाराशी यायचे. तगादा लावायचे. नको नको ते बोलायचे.
पंचक्रोशीत बाबांनी स्वकष्टानं मिळवलेला सन्मान या एका घटनेनं पार धुळीला मिळाला. फार मोठा धक्का बसला होता या गोष्टीचा त्यांना. शेवटी देणेदारांचं बोलणं असह्य झाल्याने एके रात्री काही न सांगताच ते घरातून निघून गेले. किती भेदरून गेलो होतो आपण. आई तर दोन दिवस बेशुद्धच होती. भावंडही सैरभैर झाली होती. बाबांना शोधून शोधून थकलो. मनात नको-नको त्या शंकाही यायच्या. या घटनेनं अवघ्या कुटुंबाची वाताहत झाली. जगण्याचे मार्गच बदलले. शिक्षणापेक्षा तेव्हा नोकरीला लागणं गरजेचं म्हणून शेवटच्या वर्षाची परीक्षा न देताच आपण मित्राच्या भरवशावर मुंबईला आलो.
पुढे मात्र बाबांनी करून ठेवलेलं बँकांचं देणं, नातेवाइकाचं देणं कर्तव्य म्हणून अंगावर घेतलं. ते फेडता-फेडता आपल्यासोबत शुभांगीही स्वत:साठी जगणं विसरली. तिनेही मनापासून साथ दिली.
भूतकाळ! डोळ्यांसमोर सतत तरळणारा भूतकाळ अमितची पाठ सोडत नव्हता. नुकतेच कुठे आता सुखाचे दिवस आले होते आणि हे संकट. गेलेलं सारं पुन्हा मिळवावं याच ध्येयानं तेव्हा आपण गाव सोडलं. त्यामुळेच कस्तुरीलाही नेहमीसाठी दुरावलो. गत आठवणींच्या कल्लोळात आता आयुष्याचा मध्यांतरही होऊन गेलाय. तरी जबाबदार्या पाठ सोडत नाहीयेत. डोक्याचा पार भुगा झालाय. त्या तंद्रीतच राउंड संपवून तो ऑफिसला परतला.
लंच संपल्या संपल्याच सेल्स हेड सतीश अन् बासू, आरती मॅडमसोबत डिस्कशनसाठी बसले होते. मध्येच काही वेळानं ते बाहेर यायचे. झेरॉक्स मशीनवरून स्वत:च झेरॉक्स करून आत घेऊन जायचे. काही वेळातच मॅडमनं एकेकाला बोलवायला सुरुवात केली. गेल्या महिन्याभरापासून डोक्यावर असलेली टांगती तलवार एकदाची पडणार होती. सार्यांनाच टेन्शन आलं.
सुरुवातीलाच संजीवला आत बोलावण्यात आलं. सर्वांच्याच भवितव्याची दोर जणू आज आरती मॅडमच्या हातात होती. डिपार्टमेंट हेड सोडून इतर स्टाफशी मॅडमचं फारसं बोलणं नव्हतंच. संबंधही यायचा नाही. पण जॉईन झाल्या झाल्या मात्र स्टाफसाठी त्यांनी, फॅमिली ग्रुप इन्शुरन्स, फूड कुपन्स या महत्त्वाच्या सवलती दिल्या होत्या. पावसाळ्यात ट्रेनचे प्रॉब्लेम झाले तेव्हाही सुट्टी डिक्लेअर केल्यानं त्यांच्याविषयी स्टाफचं मत तसं झालं चांगलंच होतं. केव्हातरी त्या समोरून जायच्या तेव्हा दिलकश स्माईल द्यायच्या.
त्या स्माईलशी अमितचे जुने ऋणानुबंध होते. ते स्माईल थेट तिच्या हसण्यासारखंच होतं. कधीकधी तर त्याला शंकाही यायची, ही तिचीच तर मुलगी नसावी? त्यामुळेच मॅडमबद्दल त्याच्या मनात एक वेगळीच अनुकंपा होती. वयाचं अंतर सोडलं तर मॅडम दिसायलाही तशाच होत्या.
‘ती’… जी कॉलेज जीवनात त्याची जिवलग होती. तिच्यासोबतची त्याची फ्रेण्डशिप अख्ख्या कॉलेजमध्ये फेमस होती. तसा तो उडाणटप्पूच. पण ती त्याच्या आयुष्यात आली अन् त्याचं आयुष्यच बदललं. आपल्या नावासारखीच होती ती, एका अनामिक गंधानं घमघमणारी कस्तुरी.
जगणं वार्यावरती उडवणारा तो तिच्या सुवासानं, सहवासानं जगण्याचा अर्थ इतरांना सांगू लागला होता. एका वेगळ्याच कारणानं ती दोघं समोरासमोर आली होती. अमितचं मन भूतकाळात डोकावू लागलं…
अमळनेरच्या प्रताप कॉलेजचा विस्तीर्ण परिसर. कॉलेजच्याच बाजूला असलेली तीन मजल्यांची त्यांची हॉस्टेल. दोघा रुममेटसोबत दुसर्या मजल्यावरील रुममध्ये तो राहायचा. अमळनेरपासून अठरा कि.मी.वर असलेलं मूडी
हे त्याचं गाव. सुरुवातीपासूनच अमितला लीडरशीपची आवड. त्यात त्याच्या उमद्या, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची छाप समोरच्यावर अगदी सहज पडायची. त्यामुळे महिन्याभरातच अवघ्या कॉलेजमध्ये तो फेमस झाला. घरचा लँडलॉर्ड. म्हणून की काय, सारे टप्पोरी त्याच्या अवती-भोवती जमायचे.
असंच एकदा गॅदरिंगच्या कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी दोघा-तिघा सरांसोबत प्रिन्सिपलच्या केबीनमध्ये तो बसला असताना ऑफिसचा शिपाई रामा पोटे आत आला.
‘सर, कस्तुरी दीक्षित आपल्याला भेटू इच्छितेय.’
‘कस्तुरी दीक्षित?’ प्रिन्सिपलनी प्रश्नार्थक नजरेनं पाटील व महाजन सरांकडे पाहिलं.
‘माझी विद्यार्थिनी आहे ती. तिने एक्झाम फी भरली नाहीये. मला वाटतं त्या संदर्भातच ती आली असावी.’ महाजन सरांनी खुलासा केला.
‘हो हो, फीबद्दलच बोलायचंय तिला.’ शिपाई.
‘तिला म्हणावं हेड क्लार्कला भेट.’ प्रिन्सिपल.
‘हेड क्लार्कनीच तिला पाठवलंय.’ शिपाई.
‘ठीक आहे. पाठव तिला.’ प्रिन्सिपल उत्तरले.
कस्तुरी दीक्षितचं नाव ऐकल्यावर, क्लासरुममध्ये एन्ट्री करताना दुसर्याच टेबलावर रेवती फडके नावाच्या रँकरसोबत बसणारी तिची छबी अमितला आठवली. प्रत्येक तासाला जातीने हजर राहणारी. कोणत्या सरांनी कोणत्या दिवशी काय शिकवलं, कधी ऑफ पीरिएड होता, या सार्याच गोष्टी स्मरणात ठेवणारी म्हणूनच ती त्याला परिचित होती.
खरं तर कॉलेज-लाइफ म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला श्रावण! कितीही भिजलं तरी, त्यातल्या सरी कमीच वाटाव्या अशा. प्रेमाच्या नानाविध रंगछटांनी, अवीट ढंगांनी रंगलेला इंद्रधनू याच तारुण्यनभात बहुतेकांना गवसतो. पण कस्तुरीचं बोलणं, वागणं, राहणं याच्या अगदी उलट. छान छान ड्रेस घालून स्वत:ला चारचौघांत मिरवताना कधी कुणी तिला पाहिलंच नव्हतं. कधी कधी तर एकच सलवार-कमीज ती दोन दोन दिवस घालायची. तिचं अस्सल सौंदर्य परिस्थितीनं झाकोळून गेलं होतं.
‘सर, येऊ मी आत?’ तिच्या बोलण्यातली अदब अमितला आवडली.
‘ये ये. काय प्रॉब्लेम आहे?’ प्रिन्सिपल
‘सर…’ सांगावं की सांगू नये या संभ्रमात ती बोलायचं थांबली.
‘बोल की, थांबलीस का?’ प्रिन्सिपल
‘एक्झाम फी पुढच्या आठवड्यात भरली तर…’
‘अगं फी भरायची तारीख तीन चार दिवसापूर्वीच संपलीय. आणि तू आणखी एक आठवड्यानं भरणार म्हटल्यावर तुझा फॉर्म अॅक्सेप्ट तरी कसा करता येईल?…आणि फी तरी किती भरायचीय, दोनशे साठ. जा, उद्या भरून टाक… हां तर, आपलं काय चाललं होतं?’ मिटिंगकडे आपला मोर्चा वळवत प्रिन्सिपल सरांनी तिला जणू ऑर्डरच सोडली.
काही क्षण ती घुटमळली. फी उद्याच भरून टाक, असं प्रिन्सिपलनी म्हटल्यावर तिचा चेहराच पडला. सर्वांसमोर ऐकावं लागल्यानं तिला लाजिरवाणं झालं. तिची असहायता बघून पार्टीच्या वेळी मित्रांवर शे-दीडशे सहज खर्च करणार्या अमितला, पहिल्यांदाच दोनशे साठ रुपयांची किंमत कळली. परीक्षेला वेळ होता. पण फी वेळेवर भरली नाही तर कस्तुरीचं वर्ष वाया जाईल हे त्यालाही जाणवलं.
मिटिंग संपल्यावर तो बाहेर आला. तिला क्लास मध्ये बघितलं, लायब्ररीत शोधलं… पण कस्तुरी कुठं दिसेना. एवढ्यात त्याचा जिगरी दोस्त पंकज त्याला दिसला.
‘काय रे, तू कस्तुरीला पाहिलंस?’
‘अमित, तू ठीक तर आहेस ना?’ त्याच्याकडे अविश्वासानं पाहत पंकजनं विचारलं.
गेल्या तीन वर्षापासून एकाच क्लासमध्ये असूनही जिला कधी धड पाहिलं नाही, तिच्याबद्दलच अमित विचारतोय म्हटल्यावर पंकजला आश्चर्य वाटणं स्वाभाविकच होतं.
‘मी काय विचारतोय?’ अमितनं त्याला पुन्हा विचारलं.
‘कळलं कळलं! कस्तुरी नं, थोड्या वेळापूर्वीच मी तिला घरी जाताना बघितलं.’
‘ओ नो!’
‘का रे, काय झालं?’
‘काही नाही… चल जरा चव्हाण सरांकडे जाऊया.’ असं म्हणून अमितनं त्याला जवळपास ओढतच नेलं.
‘चव्हाण सर, निघालात वाटतं?’ हेड-क्लार्क चव्हाणांना ऑफिसच्या कपाटांना कुलूप लावताना बघून अमितनं विचारलं.
‘हो. का रे?’
‘जरा ही परीक्षा फी भरायची होती.’ अमित
‘पण तू तर फी भरलीयस ना?’
‘म… म्… माझी नाही. कस्तुरी दीक्षितची.’ चाचरतच तो उत्तरला.
‘तिची फी तू भरतोयस?’ हेड क्लार्क चव्हाणांनी आश्चर्याने प्रश्न केला.
‘मी नाही. तिनेच दिलेत पैसे. तिच्या आईची तब्येत अचानक बिघडल्यानं तिला घरी जावं लागलं. जाताजाता ती मला फी भरायचं सांगून गेली.’
‘बरं झालं. कस्तुरीच तेवढी फी भरायची बाकी होती. खरं तर आत्ताच मी रजिस्टर वगैरे आत ठेवून कपाटांना कुलपंही घातलीत. ठीक आहे. आत्ताच एन्ट्री घेतली तर उद्या सकाळीच मला युनिव्हर्सिटीला रेकॉर्ड पाठविता येईल.’ असं म्हणून हेड क्लार्क चव्हाणांनी सारं रेकॉर्ड
काढलं. अमितकडून फी चे पैसे घेऊन पावती दिली. तेव्हा कुठं अमितला बरं वाटलं.
‘अमित, एक विचारू?’ ऑफिसच्या कार्यालयातून बाहेर पडल्या पडल्या पंकज म्हणाला.
‘हां. विचार.’
‘कस्तुरीची फी, तू का म्हणून भरलीस?’ पंकज
‘सहज.’
‘म्हणजे?’ पंकज
‘सांगेन नंतर.’
‘अरे पण एवढे पैसे…’
‘करेल अॅडजस्ट कसेही. नाहीतर बाबांना सांगेन, एका गरजू विद्यार्थिनीची फी भरली म्हणून.’
‘ते रागावणार नाहीत?’ पंकज.
‘कस्तुरीचं वर्ष वाचलं ना… ते कितीही रागावले तरी बेहत्तर. तू मात्र कुणाजवळ पचकू नकोस.’ बोलता बोलता त्याने पंकजला तंबी दिली.
दोन दिवसांपूर्वीच आपला ड्राफ्ट आला म्हणून बरं झालं, नाही तर?… नाही तर मनात असूनही आपण कस्तुरीची फी भरू शकलो नसतो. पण मेसच्या पैशांचं अन् आपल्या महिन्याभराच्या खर्चाचं काय?
बघू, करू काहीतरी अॅडजेस्ट. मनातच तो बडबडला.
कॉलेज जीवनातल्या एकेक आठवणी अमितच्या स्मृती पटलावरून सरकत होत्या.
ऐन वेळी आपण फी भरली म्हणून कस्तुरीचं वर्ष वाचलं होतं. तेव्हापासून तिच्याशी आपली गाढ मैत्री झाली. सार्या कॉलेजमध्ये अल्पावधीत दोघं फेमसही झालो. कस्तुरीच्या सहवासानं आपल्या जीवनात प्रितगंध दरवळला होता. पण तो गंध जेमतेम दोन-तीन महिनेच आपल्या आयुष्यात घमघमला. इच्छा असूनही आपण कस्तुरीशी लग्न करू शकलो नव्हतो. त्या वर्षी ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाल्याचं पंकजने आपल्याला पत्राने कळवलं होतं.त्या वेळच्या स्वत:च्या असहाय्यतेनं त्याचे डोळे पाणावले.
‘अमित, ए अमित, अरे कुठं हरवलास? अन्
हे काय, तुझ्या डोळ्यांत पाणी?’
राजीवनं त्याला तंद्रीतून जागं केलं.
‘काही नाही, असंच.’ अमितला जाणवलं आपण ऑफिसमध्ये आहोत.
‘जा, तुला आत बोलवलंय’, हातात लेटर घेतलेला राजीव त्याला म्हणाला.
तीस वर्षापूर्वीचा आयुष्यपट मात्र अमितच्या नजरेसमोरून हलायला तयार नव्हता. मोठ्या प्रयत्नाने डोक्यातले विचार झटकून तो जायला निघाला.
‘आत येऊ मॅडम?’ दार लोटून त्यानं विचारलं.
‘या फडके या.’ मॅडमच्या डाव्या बाजूला सतीश अन् बासू मुस्कटात दिल्यासारखे बसले होते.
‘फडके, बाकी गोष्टी तर तुम्हाला सकाळच्या मिटिंगमध्ये समजल्याच. हे तुमचं नवीन पॅकेज.’ मॅडमनं हातातील लेटर त्याच्यासमोर धरलं.
त्यानं लेटर घेतलं. बघितलं. मनात काही आकडेमोड केली. त्याला धक्का बसला. नवीन पॅकेजनुसार त्याच्या पगारात जवळपास तेवीस टक्के कपात करण्यात आली होती.
मंदीमुळे पगार कपात अटळ होती हे त्यालाही मान्य होतं, पण एवढी? मॅनेजमेण्टमध्ये सेकंड व फर्स्ट ग्रेडच्या पदावर असलेल्यांची कपात तर सहा टक्केच झाली होती. बाकी इतर डिपार्टमेंटच्या लोकांची सुद्धा जास्तीत जास्त दहा टक्केच. आपलीच पगार कपात एवढी का? या वर्षीचं इन्क्रीमेंटसुद्धा दिलं जाणार नव्हतं.
‘फडके, या डुप्लिकेट लेटरवर सही…’ मॅडम.
‘मी जरा नीट वाचतो. मग करतो साईन.’
‘अमित, काही प्रॉब्लेम?’ त्याच्या बॉसनं सतीशनं पहिल्यांदाच तोंड उघडलं.
‘तुम्हीच सगळं ठरवलंय म्हटल्यावर ठीकच असेल. तरी म्हटलं…’ अमित.
‘हां हां हरकत नाही.’ बासू.
बासूंच्या बोलण्याकडे लक्ष न देताच तो बाहेर पडला. त्याच्याआधी लेटर मिळालेल्या सार्यांच्या नजरा अमितवरच होत्या. राजीव, प्रमोद, अँथोनी, संजीव सारेच त्याच्या भोवती जमा झाले.
‘तुझा सहा टक्केच कापला असेल, नाही?’ संजीवनं नेहमीच्या सहजतेनं विचारलं.
‘किती?’ प्रमोद.
‘तेवीस टक्के!’ अमित.
‘काय? तुझाही तेवढाच! …शक्यच नाही!’ असं म्हणत राजीवनं त्याच्या हातातून लेटर घेतलं.
‘त्यांच्या मर्जीतल्यांचा पगार मात्र दहाच टक्के कापलाय. संक्रांत आपल्यावरच आलीय.’ संजीव.
‘हा अन्याय आहे-’ प्रमोद.
‘मलाही कळतंय, त्यासाठीच डुप्लिकेटवर मी अजून सही केली नाहीये-’ तो.
‘काय तू सही नाही केलीस?’ संजीव.
‘म्हणजे? तुम्ही सही करून आलात?’ तो.
‘मग काय करणार. नोकरी राहिली हेच खूप आहे-’ प्रमोद.
‘यामुळेच… यामुळेच… मॅनेजमेंटचं फावतं. तुम्ही असे नांगी टाकून आलात म्हटल्यावर…’ तो चिडला होता.
‘एकाच डिपार्टमेंटला काम करणारे आपण. मग त्या तिघांपेक्षा आपलीच पगार कपात जास्त का?’ अठरा वर्षापासून त्यांच्यात समरस झालेल्या अँथोनीनं प्रश्न केला.
‘तेच तर मला कळत नाहीये. कालपर्यंत बॉस अमितच्या बेस्ट प्लॅनिंगची त्याच्या परफॉर्म्सची किती तारीफ करायचे-’ संजीव
‘ढोंग आहे सगळं!’ अमित.
‘पण करणार काय?’ राजीव.
‘सगळ्यांनी आवाज उठवायला हवा.’ त्याच्या बोलण्यात आता बेफिकिरी होती.
‘उगाच काही करायला जावं आणि…’ प्रमोद.
‘आणि नोकरीच जायची. हीच भिती वाटते
ना?’ तो.
‘म्हणजे काय? तुला नाही भिती वाटत?
अरे जीवनातल्या कितीतरी जबाबदार्या राहिल्याहेत अजून. तुझंच बघ ना, तुझी मुलगी रोमा तर अजून शिकतेय. त्यानंतर तिचं लग्न. तुझ्या बाबांच्या आजारपणाचा खर्च. आता मला सांग, आजच तुझी नोकरी गेली तर…’ संजीव.
‘तुझं म्हणणं खरंय रे, पण म्हणून काहीही अन्याय सहन करायचा?’ तो.
‘मॅनेजमेंट आपल्याशीच असं का वागतेय?’ संजीव.
‘मॅनेजमेंट वगैरे कसलं काय? ह्या दोघांनीच सारं ठरवलंय. त्यातही आपल्या मर्जीतल्यांच त्यांनी भलं केलंय. याचा जाब विचारायलाच हवा.’
असं म्हणत तो उठला.
त्याचं अंतर्मन पेटून उठलं होतं. पगार कपातीचं त्याला दु:ख नव्हतं. पण ज्या पद्धतीनं ते करण्यात आलं होतं याचीच त्याला चीड आली होती.
‘मे आय कम इन?’ अमित.
‘कम इन. फडके, बराच वेळ घेतलात. आतातरी नीट वाचलं ना, द्या ते लेटर माझ्याकडे.’ हातातलं डुप्लिकेट लेटर अमितनं मॅडमच्या हातात दिलं.
‘हे काय, तुम्ही सही नाही केली अजून?’ लेटर उघडून पाहत त्यांनी विचारलं.
‘क्षमा करा, यातल्या काही गोष्टी मला मंजूर नाहीत. जास्तीत जास्त पगार कपात दहा टक्क्यांपर्यंतच झालीय. आमच्याच डिपार्टमेंटची मात्र तेवीस टक्के. असं का?’
‘हे बघा फडके, हे तुम्ही तुमच्या बॉसला विचारा. प्रत्येकाच्या स्किलनुसार अन् परफॉर्मन्सनुसार त्यांनी हे ठरवलंय. अन् त्यांच्या सांगण्यानुसार मी केलं. यासाठीच गेल्या दोन दिवसांपासून आमच्या मिटिंगाही सुरू होत्या.’
‘स्किलनुसार? परफॉर्मन्सनुसार? साफ चुकीचंय. तुम्ही स्वत: याबद्दल माहिती घेतली? गेल्या अठरा-वीस वर्षापासूनचे इन्क्रीमेंट्सचे रेकॉर्ड्स नजरेखालून घातलेत? त्या तिघा जणांच्या परफॉर्मन्सविषयी सूर्यवंशी सरांजवळ चौकशी केली?… निव्वळ आमच्या बॉसनं सांगितलं म्हणून त्याचंच म्हणणं ऐकणं हे कितपत योग्य आहे? त्यांनी आपल्या मर्जीतल्या तिघाजणांचं…’ बोलताबोलता त्याचा आवाज जरा चढला.
‘मर्जी-बिर्जी मला काही माहिती नाही. मॅनेजमेंटला त्यांनी काही गोष्टी पटवून दिल्या. तुम्हाला सही करायची नसेल तर…’
‘तर काय?’
‘नाइलाजानं मला…’
‘तुम्ही कशाला नाइलाजानं काही करताय, न पेक्षा मीच राजीनामा देतो.’ असं म्हणून तो तडक आरती मॅडमच्या केबीनमधून बाहेर पडला.
‘मिस्टर फडके, फडके.’ मॅडमनं त्याला
आवाज दिला.
पण मनात उठलेल्या वादळानं तो आवाज अमितपर्यंत पोहचलाच नाही.
‘अमित, तू वेडा आहेस का? अरे या वयात पुन्हा नोकरी मिळवणं, तेही या रिसेशनच्या काळात?… नको असा विचार करूस. देऊन टाक सही. तुझ्या एकट्याच्या राजीनाम्यानं मॅनेजमेंटला काहीच फरक पडणार नाहीये. उलट ते त्यांच्या पथ्यावरच पडेल.’ अमितचा इरादा ओळखून संजीवनं त्याला हटकलं.
‘आता काहीही होवो! राजीनामा द्यायचा म्हणजे द्यायचा.’ असं म्हणून अमितनं दहा मिनिटांत राजीनामा खरडला.
रात्री नऊ-सव्वानऊची वेळ! जेवणं नुकतीच आटोपली होती. नॅशनल जिओग्राफिकवर अमित काही बघत बसला होता. एवढ्यात दारावरची बेल वाजली. अमितनं दार उघडलं. बघतो तर समोर संजीव उभा. संजीव टेकताच, ‘बघा ना भाऊजी, डोक्यात उगाच खूळ घालून बसलेत. म्हणे माझ्यावर अन्याय झाला. भावजींवरही अन्याय झाला, पण त्यांनी नाही केलं रिझाइन.’ संजीवच्या हातात पाण्याचा ग्लास देत शुभांगीचा राग खदखदला.
‘याच्यासारखं पटकन निर्णय घेणं नाही जमत मला. बरं झालं विषय निघाला… तुला एक महत्त्वाची न्यूज कळली का?’ संजीव.
‘कोणती?’ अमित.
‘आरती मॅडमनंही रिझाइन केलंय म्हणे!’
‘काय? मॅडमनं रिझाइन केलं? कधी?’ अविश्वासानंच अमितनं विचारलं.
‘आजच कळलं. ऐकूनही त्यावर कुणाचा विश्वास बसत नाहीये. कारण त्याबद्दल आज उलट सुलट चर्चा होती ऑफिसमध्ये. पण ही न्यूज खरी आहे एवढं नक्की. गेल्या आठवड्यात तू रिझाइन केल्यापासून त्याही खूप अस्वस्थ होत्या म्हणे. तू जे त्यांना बोललास त्यानंतर त्यांनी बरीच माहिती काढली. बरंचसं सत्य त्यांना कळलंय. त्या तिघांच्या पगार कपातीविषयी आपल्या बॉसलाही त्यांनी धारेवर धरलं होतं.’
‘पण हे तुला कसं कळलं?’
‘त्यांची सेक्रेटरी, ती मोना नाही का…ती आपली खास फ्रेण्ड आहे. अन् अशा बातम्या त्याशिवाय माहिती पडत नाही. तुझ्या वर्कमनशीपबद्दल कळल्यावर भरभरून बोलल्या म्हणे त्या!… अशी चांगली माणसं नोकरी सोडून जाणं कंपनीच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून योग्य नाही असंही म्हणल्या. पण मॅनेजमेंट आपला हेका सोडायला तयार नाहीये.’
‘हे चांगलं नाही झालं. मॅडमने रिझाइन करायला नको होतं. त्या होत्या म्हणून तर मॅनेजमेंट थोडं दबून होतं.’
‘मॅडमनं तरी काय विशेष केलंय?’ संजीव.
‘नाही म्हटलं तरी फॅमिली इन्शुरन्स, फूड कुपन्स, लिव एनकॅश, बर्थ डे वा वेडिंग अॅनिव्हर्सरीची कम्पलसरी सुट्टी, हे सारं त्यांनीच तर सुरू केलं. आता हेच बघ ना, मॅनेजमेंटशी त्या फाइट करताहेत त्या निव्वळ त्यांचं, एच. आर.चं कर्तव्य म्हणून… किंवा मॅनेजमेंटच्या हातातलं बाहुलं बनून राहणं त्यांना मान्य नसावं.’
‘माझं ऐकशील, रेजिग्नेशन मागे घेऊन टाक. हट्ट सोडला तर तुझी नोकरी आहेच की. पगार कमी तर कमी. मला वाटतं तू मॅडमना भेटावंस.’ संजीव.
‘मी? मी का म्हणून त्यांना भेटू?’
‘काही तोडगा काढण्यासाठी.’ संजीव.
‘मी सांगून काय फरक पडणारेय?’
‘तू सडेतोड बोलल्यानंच तर हे सारं घडलंय.’ संजीव.
‘त्यांच्या नैतिक जबाबदारीची आठवण तेवढी मी करून दिली. रिझाइन करणं, हा निर्णय सर्वस्वी त्यांचाय.’
‘अरे पण अमित, आत्ताच तू म्हटलंस, त्यांनी रिझाइन करायला नको होतं. मग एकदा त्यांची भेट घेतली तर काय बिघडणारेय?’
‘मला विचार करावा लागेल.’ अमित.
‘ठीक आहे. तू विचारच करत राहा. येतो मी.’ असं म्हणून निराश मनानंच संजीव निघून गेला.
अमितच्या मनात मात्र कितीतरी गोष्टींची उलथापालथ सुरू करून गेला. स्वाभिमानानं आपण रिझाइन केलं याचा अभिमान वाटण्यापेक्षा शुभांगीही आपल्याला तडजोड करायला सांगतेय? तीही आपल्याला समजू शकली नाही याचंच त्याला जास्त वाईट वाटत होतं.
‘मम्मी, कसं वाटतंय आता?’ आरती
‘बरंय.’ मम्मी
‘मला एवढ्या उशिरा का कळवलंस?’
‘मी तर म्हटलं होतं. पण तुझ्या पप्पांनीच कळवू नाही दिलं. म्हणाले, आधीच ती टेन्शनमध्ये आहे. तिला आणखी टेन्शन कशाला.’
‘बघितलं, यासाठी मागेच मी तुला म्हटलं होतं डोळ्याचं ऑपरेशन करून टाक म्हणून. पण तू आपलं दुर्लक्ष केलंस. पायाच्या फ्रॅक्चरवर निभावलं म्हणून ठीक आहे, डोक्याला कुठं लागलं असतं म्हणजे?’
‘अगं पायर्या उतरताना पायच वाकडा पडला. त्यात दिसण्याचा न दिसण्याचा काही संबंधच नव्हता. बरं एक सांग, तू नोकरी सोडलीस म्हणे.’
‘तुला कुणी सांगितलं?’
‘काल तू मुंबईहून इकडे यायला निघालीस, तेव्हा जावयांचा फोन येऊन गेला.’
‘आणखी काय म्हटले तुझे जावई?’ मिस्कील हसत तिने विचारलं.
कितीही, काहीही घडलं तरी स्वत:ला शांत ठेवण्याचा तिचं कसब तिच्या मम्मीलाही आवडायचं.
‘तुमच्या ‘सूर्यवंशी अॅण्ड सन्स’मध्ये सध्या खूप गडबड सुरू आहे म्हणे. अन् सॅलरी कपातीच्या त्या वादातून, कुण्या एम्प्लॉइसाठी तू रिझाइनही केलंस.’
‘कुण्या एम्प्लॉइसाठी नाही! माझ्या तत्त्वांसाठी मी रिझाइन केलंय. एच. आर. म्हणजे मॅनेजमेंट अन् कर्मचारी यांच्यातील दुवा. असं तूही सांगितलं होतंस ना…’
‘हां तर… बस्स, दोघांतला सुवर्णमध्य मी साधू शकले नाही. आमच्या स्टाफपैकी अमित नावाच्या कर्मचार्यानं एका एच. आर.च्या नैतिक जबाबदारीवर आरोप केले.’
‘अन् म्हणून तू रिझाइन केलंस?’ मम्मी.
‘त्यांचं बोलणं अगदी सत्य होतं. मलाही नंतर जाणवलं की त्या वेळी मी मॅनेजमेंटचीच बाजू घेतली. अमितच्या आरोपांनी गेल्या आठ दिवसापासून झोप नाहीये मला.’
‘अगं पण त्यात तुझा काय दोष? शेवटी पगार तुला मॅनेजमेंटच देते ना. मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुला वागावं…’
‘नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं वागून मी एच. आर. या पदाला कलंकित करू इच्छित नाही. फडक्यांच्या बोलण्यात तथ्य होतं.’
‘आता हे फडके कोण?’ मम्मी.
‘अगं तेच ना, ज्यांच्या विषयी मी केव्हाचं सांगतेय. त्यांचंच आडनाव फडके… अमित फडके. फारच स्वाभिमानी आहेत ते.’
‘अमित फडके?’ हे नाव ऐकून तिची मम्मी विचारात गढली.
‘मम्मी, काय गं नाव ऐकून एकदम कुठं हरवलीस?’
‘काही नाही. माझाही एक कॉलेज फ्रेण्ड होता. त्याचंही नाव अमित फडकेच होतं.’ आपल्या मम्मीच्या बोलण्यातला ओलावा तिला जाणवला.
‘काय सांगतेस, हे तेच तर नसावे?…एक मिनिट.’ असं म्हणून आरती आतल्या खोलीत गेली. बॅगेतून तिने लॅपटॉप काढला. सार्या स्टाफचा डेटा असलेली फाईल उघडली. त्यातील अमितचा डेटा वाचता वाचता त्याच्या पत्त्यामधील नेटिव्ह प्लेसच्या नावावर तिची नजर थबकली…
पुण्याच्या त्यांच्या ‘कस्तुरी’ बंगल्याची ऐट काही वेगळीच होती. खरं म्हटलं तर मुंबईच्या वर्दळीत आरतीला घुसमटायला व्हायचं. तिला पुण्यातच करिअर करायचं होतं. चार वर्षापूर्वी अमेरिकेला एम.बी.ए. करून ती तिथंच एका कंपनीत असिस्टंट एच. आर. म्हणून जॉईन झाली होती. पण नंतर तिचं मन तिथं रमेना. दोन वर्षापूर्वीच ती भारतात परतली होती. अमेरिकेतील तिच्या मित्र-मैत्रिणींना तिच्या या निर्णयाचं आश्चर्यच वाटलं होतं. पण ती मात्र समाधानी होती. म्हणायची, ‘ज्यांनी माझ्या पंखांना अवघ्या विश्वात विहरण्याचं बळ दिलं त्या माझ्या मम्मी-पप्पांसाठी मी परतले तर काय विशेष. करिअर काय अमेरिकेतच घडवता येणारेय. भारतातही सार्या सुखसुविधा आहेतच की.’
तिच्या निर्णयाचं तिच्या मम्मी-पप्पांनाही अप्रूप वाटलं होतं. तीच त्यांची सातासमुद्रापार जाऊन आलेली एकुलती एक लाडकी, पुण्याहून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईसारख्या ठिकाणी सूर्यवंशी अॅण्ड सन्समध्ये एच.आर. हेड होती.
मम्मीच्या पायाचं फ्रॅक्चर झाल्याचं समजल्यावर लगेच धावून आली होती.
‘हे बघ, गेल्या वर्षीचे आमचे अॅन्युअल डे चे फोटो.’ असं म्हणत ती, मम्मीच्या बाजूलाच लॅपटॉप घेऊन बसली.
ती एण्टर करू लागली तसतसा एकेक फोटो स्क्रीनवर येऊ लागला. ‘हे आमचे सी.ई.ओ. अभिजित सूर्यवंशी. या आमच्या मार्केटिंग हेड… मिसेस अनुजा. हे सेल्स हेड सतीश आणि बासू’ आरती बोलत होती, पण तिच्या मम्मीचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. स्क्रीनवर येणार्या फोटोंवर तिची नजर होती. अन् काही वेळानं, अमित… ’हाच, हाच तो. अमित फडके. माझा कॉलेज फ्रेण्ड.’ अत्यानंदानं त्या ओरडून उठल्या.
लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्यांची नजर खिळली होती. आपल्या मम्मीच्या, कस्तुरीच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद आरती पाहत होती. जवळपास तीस वर्षांनी कस्तुरीला तिचा कॉलेज मित्र दिसला होता. इतक्या वर्षानंतरही तिने अमितला ओळखलं होतं.
नाही म्हटलं तरी तिने स्वत:च्याही नकळत अमितचा शोध घेतला होता. ती जिथंही जायची तिची नजर अमितला शोधायची. तो मुंबईत आहे याची कल्पना असूनही, कधीतरी, कुठेतरी तो अचानक दिसेल असंच तिला वाटायचं. अन् घडलंही तसंच होतं. आज आरतीमुळे, स्वत:च्या लेकीमुळे तिला माहिती झालं होतं की अमित आरतीच्याच कंपनीत नोकरीला होता म्हणून.
मम्मीच्या चेहर्यावरचा आनंद पाहून
आरतीही सुखावली.
आत्तापर्यंत तू कधीच काही बोलली नाहीस की, ‘तुझाही कुणी कॉलेज फ्रेण्ड आहे म्हणून.’ आरतीनं लाडिक तक्रार केली.
‘अगं… गेल्या तीस वर्षात आमची भेटच
नाही. त्यात त्याचा ठावठिकाणा माहिती नाही. मग तुला सांगणार तरी काय? अन् माझं
कॉलेज लाइफ…’
‘मला ऐकायचंय तुझ्या कॉलेज लाइफबद्दल.’
‘काय सांगू? सांगण्यासारखं असं…’ बोलता बोलता कस्तुरीला तीस वर्षापूर्वीची आपली असहायता आठवली. अन् तिच्या नजरेसमोर पुन्हा सारं उभं राहिलं.
‘काय गं, गेल्या तीन-चार दिवसापासून तू कॉलेजला का नाही आलीस?’ कागदी पिशव्या बनवत बसलेल्या कस्तुरीला रेवतीनं विचारलं. कॉलेज शिकत असताना गेल्या तीन वर्षात कस्तुरीसोबत रेवतीची छान गट्टी जमली होती.
‘येऊन तरी काय करणार?’
‘म्हणजे?’ रेवती.
‘तुला तर माहितीच आहे, माई माझ्या शिक्षणावर पैसे खर्च करायला तयार नाही. माझं लग्न उरकून टाका म्हणून वर्षभरापासून ती बाबांच्या पाठीमागे लागलीये. बाबांना सारखं काय काय ऐकवत असते. पोरीच्या जातीला कशाला एवढं शिकायला पाहिजे? तिच्या एकटीसाठी एवढे पैसे उधळले तर माझ्या पोरांचं कसं होईल?… आई काय गेली, बाबांनी हाय खाल्ली. खरं तर मी लहान होते म्हणून माझा सांभाळ करण्यासाठी बाबांनी माईंशी दुसरं लग्न केलं. पण झालं उलटंच. आता हेच बघ ना… फी चे पैसे भरायचेत म्हणून गेल्या आठवड्यापासून सांगतेय मी, पण…जाऊ दे. माझ्या नशिबात कदाचित
यापुढे शिक्षण…’
‘आहे. किमान ग्रॅज्युएशन तरी तू नक्कीच पूर्ण करणार.’
‘कसलं ग्रॅज्युएशन, न कसलं काय.’ निराश मनानंच कस्तुरी उत्तरली.
‘यू आर लकी! तुझी फी अमितनं भरली.’ रेवती.
‘काय? अमितनं? शक्यच नाही. सूर्य पश्चिमेकडे उगवणं शक्य आहे. पण त्या टपोरीकडून हे असं वर्तन…’
‘घडलंय खरं. ते कसं? ते मात्र त्यालाच विचार.’
‘आलं लक्षात. मी प्रिन्सिपलकडे गेले होते तेव्हा अमितही तिथंच होता. पण त्याची ही मेहेरबानी मी तरी का स्वीकारावी? नको नको. सांगून टाक त्याला…’
‘ए बाबा, तुझं तू बघून घे. मला जे कळलं, ते मी
तुला सांगितलं.’
रेवतीनं असं सांगितल्यावर दुसर्या दिवशी आपण अमितला भेटलो होतो. त्याच्याशी बोलल्यावर आपल्याला जाणवलं, आपल्याबद्दल त्याच्या मनात विणल्या गेलेल्या रेशमी बंधनाने त्याच्यामधला टप्पोरी संपला होता. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. गॅदरिंगच्या वेळेचा अमितसोबतचा फोटो आजपर्यंत कितीदा तरी तिने पाहिला होता.
‘कॉलेज लाइफ आठवलं, हो ना?’ भानावर आलेल्या आरतीने आपल्या मम्मीला विचारलं. मान हलवूनच कस्तुरीने होकार दिला.
‘तुला माहितीये, ह्या अमितमुळेच मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाची एक्झाम देऊ शकले होते.’ त्या वेळेसची अमितची छबी तिच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हती.
‘ते कसं?’ आरती.
‘ऐन वेळेला माझी दोनशे साठ रुपये एक्झाम फी यानेच भरली होती.’
‘दोनशे साठ रुपये?’ आश्चर्यानं आरतीनं विचारलं.
‘हो. दोनशे साठ. त्या वेळी तेही फार होते. अन् विशेष म्हणजे आमची पर्सनल ओळख नसताना.’
‘म्हणजे पर्सनल ओळख नंतर झाली…
असंच ना?’
‘हो नंतर झाली. पण काही महिन्यांसाठीच.
नंतर तो स्वत:च परीक्षा देऊ शकला नव्हता. त्या वेळी त्याच्या बाबांचं धंद्यात दिवाळं निघालं. त्यांच्या दारूच्या व्यसनाने सार्या कुटुंबाचा घात केला. महिन्याभरातच होत्याचं नव्हतं झालं.’
एक निःश्वास सोडून कस्तुरी पुन्हा बोलू लागली.
‘गॅदरिंगमध्ये फारच धमाल करायचा तो. छान गायचाही. व्हॉईस ऑफ प्रताप कॉलेज सलग तीन वर्षे होता तो. शेवटच्या वर्षाची स्पर्धा तर त्याने… सखे हा अबोला छळतो गं मनाला, बघ आलो फिरूनी सलगी करायला, या स्वत:च रचलेल्या गाण्यानं जिंकली होती. फॅशन कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा स्वत:ची मूछ उडवून अवघ्या वीस मिनिटांत पठ्ठा बाई बनून रॅम्पवर आला होता. मीही पटकन ओळखू शकले नव्हते. असाच आहे तो, सगळ्यांना हवाहवासा वाटणारा. तसं म्हटलं तर त्यानंच माझ्या आयुष्याला एक
विधायक वळण दिलं. त्यानं नुसतीच फी भरली नव्हती, तर जगण्याच्या उत्साहासोबत खंबीर आधार दिला. माझ्या मिटल्या पंखांना बळ दिलं, त्यामुळेच या नभात मी भरारी मारू शकले. नोकरी मिळाली. तिथंच तुझ्या पप्पांची भेट झाली. अमितनंच माझ्याशी लग्न केलं असतं तर… तर आज तू समाजात आरती दिवाणऐवजी आरती फडके म्हणून ओळखली गेली असतीस.’
मम्मीच्या नजरेतून भूतकाळाला जिवंत होताना आरती पाहत होती.
‘मग तुमची पुन्हा भेट नाही झाली?’
‘झाली. फक्त पत्रातून. अवेळीच अंगावर पडलेल्या जबाबदारीनं लगेच लग्न करणं शक्य नसल्याचं त्यानं लिहिलं होतं.’
‘तू वाट नाही पाहिलीस?’
‘सावत्र आईपुढे, जिथं तुझ्या आजोबांचंही काही चालेना, तिथं मी किती वेळ तग धरणार? माझ्या निर्णयानं बहिणींची लग्न जमवायला अडथळे येऊ लागले. सुरुवातीची तीन-चार स्थळं मी नाकारलीही. पण शेवटी नाइलाज झाला. तेव्हा तुझ्या बाबाचं… निखिलचं स्थळ आलं होतं.’
बोलता-बोलता कस्तुरीनं अवंढा गिळला. तिच्या दोन्ही डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
‘ऊं हू, अगं जे घडलं त्यात कुणाचाच दोष नाही. परिस्थितीनं तुम्ही दोघं दुरावलात.’
‘मम्मी, अमित तुझ्या आयुष्याचे शिल्पकार आहेत का नाही ते नाही सांगता यायचं, पण त्यांच्या सहकार्यांच्या भावी आयुष्याला त्यांनी आकार दिलाय असं म्हणायला हरकत नाही. धाडसानं त्यांनी सत्य सगळ्यांसमोर आणलं. नाहीतर त्यांच्या बॉसच्या चुकीच्या वागण्याचे परिणाम आयुष्यभर सगळ्यांनाच झेलावे लागले असते. आणि हो, इतक्या वर्षानंतर आता तुझा तो डॅशिंग मित्र भेटतोय म्हटल्यावर, आनंद व्यक्त करायचा की असं वेड्यासारखं रडायचं?’ आरतीनं आपल्या मम्मीचं कस्तुरीचं सांत्वन केलं.
‘अगं हे तर आनंदाश्रू आहेत. खरं तर अमितची पुन्हा भेट होईल असं वाटलंच नव्हतं. आत्तापर्यंत एक रितंपण होतं मनात. तो विधाताच खरा शिल्पकार आहे. कुठे, कुणाचे संदर्भ आपण कधी अपूर्ण ठेवले होते, हे बरोबर लक्षात असतं त्याच्या. एकेका नात्याचा गोफ कधी कधी फारच मोहक गुंफतो तो. पण कधी कधी एखाद्या नात्याचे धागे असेच विस्कटून टाकतो. मग शोधत बसतो आपण विस्कटलेल्या धाग्यांचे टोक… गाठी मारण्यासाठी.’
‘त्याने गुंफलेले मनामनांचे गोफ कधी कधी अवघ्या नात्यांवर भारी ठरतात.’
आरतीचं बोलणं संपत नाही एवढ्यात तिचा मोबाइल वाजला.
सी.ई.ओ. अभिजित सूर्यवंशी फोनवर होते. कंपनीला या वर्षीदेखील बिझनेस लीडर अॅवॉर्ड मिळाल्याची बातमी त्यांनी आरतीला सांगितली.
त्यावर तिला फारसा आनंद झालेला दिसला नाही. तेव्हा त्यांनी उद्या ऑफिसला येण्यास सांगितले.
‘काय गं, कसला विचार करतेयेस?’ कस्तुरीनं विचारलं तरीही आरतीची तंद्री भंग
पावली नव्हती.
गेल्या पाच-सहा दिवसात घडलेल्या वेगवान घडामोडी आरतीच्या नजरेसमोर आल्या. अमितचं नोकरी सोडणं. त्यानंतर स्वत:चं रिझाइन करणं… कुठला कोण तो अमित? तरीही का कुणास ठाऊक त्याच्या भविष्याच्या चिंतेनं काळजीत होतो आपण. आणि आज हे असं! तिला हसायला आलं.
‘हसायला काय झालं?’ आरतीच्या चेहर्यावरचे मिनिटामिनिटाने बदलणारे भाव बघून कस्तुरीनं विचारलं.
‘कित्ती विचित्र आहे नाही मानवी जीवन?
आपण विचार काय करतो, अन् घडतं काय. सगळंच तर्काच्या पलीकडे. कशी सांगड घालत असेल तो विधाता ह्या सार्यांची? कसं जमतं त्याला हे सगळं?’
‘यालाच तर जीवन म्हणतात. कळून…
न उमगलेलं. भोगून… अतृप्तच राहिलेलं.’
‘तो नियंता फार मोठा शिल्पकार आहे. आपण सारे म्हणजे त्याच्या कलाकृतीच. या नश्वर देहामध्ये प्राण ओतून ही शिल्पकृती तो घडवतो. देह तेवढे बदलतात. म्हटल्या तर त्याच्या या सार्याच कलाकृती अप्रतिम आहेत. पण त्यांचं सौंदर्य बिघडवतो तो मानवच. उच्च आचारविचारांच्या आभूषणांनी अलंकृत करून या अनमोल कलाकृतींना चिरंजीव करतो तोही मानवच. बरं ते राहू दे.’
‘मम्मी, जीवनाचं केवढं मोठं तत्त्वज्ञान तू किती सहजतेनं उलगडलंस. नियंत्यानं निर्मिलेल्या या अगम्य ब्रह्मांडाचा जेव्हा मी विचार करते त्या वेळी जाणवतं, किती क्षुद्र आहोत आपण.’
‘मानव क्षुद्र असला तरीही आपल्या कर्मकर्तव्याने आभाळाहूनही उत्तुंग होतो, सागराहूनही
विशाल ठरतो.’
‘खरंच नाही तर काय.’
‘मग काय ठरवलंस? जाणारेयेस उद्या ऑफिसला?’ कस्तुरीनं विचारलं.
‘हो, मला जायलाच हवं. असं स्वस्थ बसून चालणार नाही. तुझ्या त्या कॉलेज फ्रेण्डला न्याय मिळवून द्यायचाय. अन् महत्त्वाचं म्हणजे, तीस वर्षांपूर्वी अमळनेरला दुरावलेल्या दोघा जिवलगांची भेटही घालून द्यायचीय.’ असं म्हणून आरती बेडरूमकडे वळली.
गेल्या आठ दिवसांपासून तिच्या मनात उठलेलं वादळ शमलं होतं. पंखात बळ आलेल्या आपल्या लेकीकडे कस्तुरी पाहतच राहिली.
उठल्या उठल्या आरतीनं भराभर आवरलं. ड्रायव्हरला रात्रीच फोन करून सांगितल्यानं तोही वेळीच हजर झाला होता.
आरती मॅडमला ऑफिसमध्ये पाहून रिझाइन केल्यानंतर मॅडम इथं कशा? म्हणून राजीव, अँथोनी, संजीव यांना तर आश्चर्यच वाटलं. अमितचं मॅडमशी बोलणं झालं की काय? अशीही त्यांना शंका आली.
इतक्यात सूर्यवंशी साहेब आले.ती त्यांच्यासोबत कॉन्फरन्स रुममध्ये गेली. तासाभरातच मिटिंग संपवून आरती मॅडम खाली आल्या. त्यांच्या चेहर्यावर नेहमीचं स्माईल होतं.
मॅडम खाली यायच्या आधीच पांडेनं त्यांची केबीन उघडली होती.
‘संजीव सर, मॅडमनं तुम्हाला आत बोलवलंय.’ मॅडमच्या असिस्टंटनं नीतानं संजीवला
मेसेज दिला.
मॅडमनं आपल्याला कशाकरता बोलवलं असावं? बहुधा त्यांनी रिझाइन मागे घेतलेलं दिसतंय. पण मग… संजीव विचारात पडला. मॅनेजमेंटशी आपल्याच पद्धतीनं बोलणार्या अमितची नोकरी गेली होती हे तो विसरला नव्हता.
‘या मिस्टर संजीव नूलकर, बसा. अमित आता घरीच असतील ना?’
‘हो हो, घरीच असेल. आपण मला कशाकरता…’
‘सांगते, सांगते. मी केव्हापासून अमितचा मोबाईल ट्राय करतेय, पण स्विच-ऑफ दाखवतोय.’
‘मोबाईल बंद आहे त्याचा. घरचाच नंबर लावा.’
‘अॅम आय स्पिकिंग टू अमित?’ मॅडमने
फोन लावला.
‘याऽ, टेल मी, मिसेस आरती दिवाण.’
‘अरे, कमाल आहे, फोनवर मीच आहे हे तुम्ही कसं ओळखलं? तुमच्याकडे तर माझा मोबाइल नंबरही नसावा.’
बोलण्यातलं हे अदब फार पूर्वीपासून परिचयाचंय. ‘बोला, काय म्हणता?’
‘अमित, गुड न्यूज फॉर यू.’
‘सॉरी! मी कधीच रिझाइन केलंय!’
‘आणि मी जर असं म्हटलं की, तुमचं रेझिग्नेशन मी केव्हाच कचर्याच्या डब्यात टाकलंय तर.’
‘तो तुमचा प्रश्न आहे.’
‘ओ हो!… अमित, मला असं म्हणायचंय की, तुमचं रिझाइन कंपनीने स्वीकारलेलं नाहीये. महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अख्ख्या डिपार्टमेंटची सॅलरी कपात दहा टक्केच राहील. अन् कंपनीचा बिझनेस पूर्ववत झाल्यावर तर ही कपातही
रद्द होईल.’
‘काय म्हणताय काय, विश्वास नाही बसत.’ अविश्वासानं त्यानं म्हटलं.
‘अमित तुम्ही जिंकलात. तुमच्या बाणेदारपणाचा मला खरोखरच खूप अभिमान वाटतोय. इटस् रिअली टेरिफीक.’
‘खरं तर तुम्ही साथ दिली म्हणूनच मॅनेजमेंट नमलंय.’ अमित
‘माती कितीही चांगली असली, तरी त्याला आकार देणार्या कुंभाराचे हातही तसेच असावे लागतात. तेव्हाच एखादी सुंदर कलाकृती जन्माला येते. सत्यासाठी तुम्ही
रिझाइनही केलंत.’
‘नाही. या सार्यांचं श्रेय सर्वस्वी तुमचंचय.’ अमित.
‘मी माझं कर्तव्य तेवढं केलं. विशेष म्हणजे सूर्यवंशी सरांनीही तुमच्या मॅटरमध्ये जातीनं
क्ष घातलं.’
‘थँक यू-’ अमित.
‘अरे हो, दुसरं म्हणजे, दरवर्षी आमच्या इथे कोजागिरीला गाण्यांची मैफल सजते. येत्या शनिवारला कोजागिरी आहे. या वेळी गाण्यांची मैफल पुण्याला आमच्या घरी सजणारेय.’
‘अरे व्वा. मलाही आवडतात अशा मैफली.’ अत्यानंदानं तो म्हटला.
‘तुम्हाला यायचंय. ऊं हू, नुसतंच यायचं नाहीये तर ती मैफलच रंगवायचीय.’
‘काय, मला मैफल रंगवायचीय? मला हो
कुठं गाता… ’
‘अमित, तीस वर्षांपूर्वी ज्याच्या आवाजावर प्रताप कॉलेजच नव्हे, तर अवघं अमळनेर भाळलं होतं. त्याने मला हे सागावं? एका व्हॉईस ऑफ…’
‘आलं लक्षात. तुमच्या मम्मीने तुम्हाला
सांगितलं असेल.’
‘हो, मम्मीनेच सांगितलं… तुमच्याबद्दल, तुमच्या गाण्याबद्दल. एवढंच नाहीतर तीस वर्षांपूर्वीचं तुमचं गाढ नातं अजूनही तिच्या डोळ्यांत मला दिसलं. अन् तेच आता तुमच्या बोलण्यातूनही जाणवतंय. त्या दिवशी अॅन्युअल डेच्या फोटोतली तुमची छबी बघून खूप आनंद झाला तिला. मग येणार ना, तुमच्या मैत्रिणीचा संसार बघायला? तीस वर्षांपूर्वी अधुरी राहिलेली मैफल आता पूर्ण होणं तर शक्य नाही. पण मैफलीत आळवलेल्या त्या अवीट सुरांना, कधीतरी गुणगुणायला काय हरकत आहे?’
‘जाऊया आपण. शुभांगीचीही इच्छा आहे कस्तुरीला भेटायची. रोमालाही सोबत घेऊया.’
‘मम्मी-पप्पांना मी आत्ताच सांगून ठेवते. शनिवारी आपण सगळेच तिथं येणार आहोत
म्हणून. ओके. आणि हो, उद्यापासून ऑफिसला…’
‘डोन्ट वरी…’ हसून तो उत्तरला.
‘आय नो…’ असं म्हणून आरतीनं फोन ठेवला.
समोर बसलेल्या संजीवचे ओठ आनंदाश्रूंनी जणू मुके झाले होते. काय बोलावं ते क्षणभर दोघांनाही कळेना.
‘येऊ मी मॅडम?’ बोलताना त्याचाही ऊर
दाटून आला.
उत्तराची वाट न पाहताच तो उठला.
‘काय संजीव, आज मी चिकनी दिसतेय की नाही?’ मॅडमच्या या विचारण्यानं संजीव उडालाच!
शरमेनं त्याचा चेहरा खाली गेला. मॅडमच्या चेहर्यावर मात्र मिस्कील भाव होते.
‘मॅडम…’ पुढचे शब्द त्याच्या ओठांतच राहिले.
‘काय आहे नं, आमचे काही सिक्रेटस् तुम्हाला कळतात. तशा तुमच्या कानगोष्टी कधीतरी आम्हालाही कळतीलच की!’
‘सॉरी मॅडम. पुन्हा असं…’
‘नो नो, इटस् ओ. के. तुम्हा तरुणांनी मजा नाही करायची तर आणखी कुणी करायची? आजचा दिवस उद्या येत नसतो. वेळ, काळ कुणासाठीही थांबत नाही संजीव. हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या ब्रह्मांडाच्या आयुष्याच्या तुलनेत मानवाचं आयुष्य तसं क्षणभंगुर म्हणायला हवं. पहाटे पहाटे पानावर पडलेल्या एखाद्या दवबिंदूसारखं! जोपर्यंत पानावर असतं तोपर्यंत ते एखाद्या मोत्यासारखं वा क्वचित
कधी हिर्यासारखंही सुरेख दिसतं. मात्र जरा धक्का लागला की पानावरनं घरंगळून क्षणात आपलं रूप बदलवत मातीत मिसळून जातं. मनुष्यही असाच मातीत मिसळून जातो, पुन्हा नव्याने जन्मण्यासाठी. मानवी जीवन फार सुंदर आहे. ते भरभरून जगायला हवं. ओ. के,
एन्जॉय द लाइफ.’
एकविसाव्या शतकातील ग्लोबलाईज जगाशी स्पर्धा करणार्या, मॅडमच्या या आगळ्याच रूपाचं कोडं डोक्यात ठेवून संजीव केबीनबाहेर पडला तेव्हा त्यांच्या जिंदादिलीचं कौतुक त्याच्या डोळ्यांत मावत नव्हतं.
संजीवच्या पाठमोर्या छबीकडे पाहता पाहता आरतीच्या नजरेसमोर एकदम जेनचा
चेहरा आला.
‘एन्जॉय द लाइफ…’ नकळत त्याचेच शब्द ती आता बोलून गेली होती.
तिच्या डोळ्यांत पाणी आलं. केबीनच्या दारावरून तिने खिडकीकडे नजर वळवली.
जेनच्या डोळ्यांसारखं निळं निळं आभाळ खिडकीतनं तिला दिसू लागलं.
जेनचा हसरा चेहरा आभाळभर पसरला.
जेन. अमेरिकेतला तिचा बॉयफ्रेण्ड. ती अमेरिकेला असताना दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. दोन वर्षांच्या नोकरीच्या त्या काळात तिला त्याची खूप मदत झाली होती. दोघांचे विचार परस्पर तसे भिन्नच होते. तरीही एकमेकांवरील गाढ प्रेमामुळे बर्याचदा वाद होऊनही ते कधी दुरावले नव्हते. त्याला नेहमी तिच्याशी खूप सार्या गप्पा कराव्याशा वाटायच्या. प्रत्येक भेटीत तिचा तास-दीड तास सहवास मिळूनही त्याच्या मनाचं कधी समाधान व्हायचं नाही. तो तिला नेहमी म्हणायचा, ‘मी येतोय तुला भेटायला. खूप काही बोलायचंय मला तुझ्याशी. मस्तपैकी दोन तास तरी गप्पा मारूया.’ ती त्याला चिडवायची, ‘दोन तासांच्या गप्पांमध्ये दीड तास तर वाद घालण्यात जाईल.’ मग तोही हसून उत्तरायचा,
‘आरू, तुझ्याशी वाद घालण्यातही मजा येते.’
कधी कधी फोनवर मनसोक्त बोलून झाल्यावर आपण जेव्हा त्याला म्हणायचो,
‘ठेवू मग फोन. तेव्हा तो खूप हळवा व्हायचा आणि म्हणायचा- उं हं. नको. तुझ्या श्वासांचा गंध भरून घेऊ दे तनामनात. आपणही मग काही न बोलता दोन चार मिनिटं फोन तसाच धरून ठेवायचो.
एवढं देऊनही तो कधी तृप्त व्हायचा नाही.
त्या दिवशीही शॉपिंगच्या निमित्ताने आपण संध्याकाळी भेटणार होतो. आपल्या लग्नाची संमती घेण्यासाठी म्हणून जेन, त्याच्या अंकलना भेटायला ट्विन टॉवरला गेला आणि काही वेळातच आपल्याला बातमी कळली- ट्विन टॉवरवर अतिरेक्यांचं विमान धडकलं म्हणून!
क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
हॉस्पिटलमध्ये शेवटचे काही मिनिटंच जेनची व आपली भेट झाली होती. या जगातून आपण जाणार हे कळल्यावर त्याच्या चेहर्यावर जराही भीती नव्हती. आपल्या होणार्या वियोगाचं दु:ख मात्र त्याला सलत होतं. म्हटला होता- ‘आरू, माझ्या पश्चात, माझ्या आठवणीत आयुष्य मातीमोल होऊ देऊ नकोस. जीवन खूप सुंदर आहे. माझ्याइतकंच त्याच्यावरही प्रेम कर. मी नसलो म्हणून काय, दुसरा कुणी जोडीदार मिळेलच. डोन्ट वरी. एन्जॉय द लाइफ!
डोळे मिटता मिटता त्याने उच्चारलेले ते शब्द नेहमीसाठी आपण आपल्या उरात चिरंतन
करून टाकले.
त्यानंतर तीन महिन्यातच अमेरिका सोडून आपण पुण्याला मम्मी पप्पांकडे आलो.
तसंही आपण नेहमीसाठी तिथं राहणारच नव्हतो. बर्याचदा यावरूनच आपला जेनशी वादही व्हायचा. आपल्या मातृभूमीचा आपल्याला अभिमान होता.
जेनला आपण कधीही विसरू शकणार नाही. आणि विसरायचं तरी का?…आवडणार्या फुलांचा गंध नेहमीच हवाहवासा वाटतो ना? आवडतं गाणंही हज्जारदा ऐकतो आपण! इतरही आवडणार्या गोष्टी सांभाळूनच ठेवतो ना?
‘हो, सांभाळतोच!’ नकळत ती स्वत:शीच बडबडली. जेनच्या स्मृती माझ्यासाठी चिरंजीव आहेत. मी त्यांना आयुष्यभर प्रेमानं जिवापाड जपेन. या निश्चयानं हलकेच तिच्या चेहर्यावर हसू सांडलं.