आकाश डॉक्टर बनला. लहानपणापासूनच तो खूप जिद्दी, हेकेखोर, बेजबाबदार होता. आई-बाबा, बहिणीबद्दल त्याने कोणतीही आत्मियता दाखविली नाही. उलट त्यांच्यापासून दूर बदली करून घेतली. तरी पण आईला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटत होता.
पतीच्या पार्थिव शरीराच्या पायाजवळ बसून मंगला रडत होती तर मुलगी पूजा वडिलांच्या चेहर्यावरून मोठ्या प्रेमाने हात फिरवून आक्रोश करीत होती. ती आकाशभैयाची वाट पाहत होती. मधूनमधून गालावरचे अश्रू ओढणीनेच पुसत होती.
मंगलाच्या पतीना, माधवना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायुचा झटका आला होता. त्यात शरीराची अर्धी बाजू पूर्णपणे संवेदनाहीन बनली होती. माधव कलेक्टर ऑफिसमध्ये क्लार्क होते. त्यांची अजून आठ वर्षांची नोकरी बाकी होती. त्याआधीच नियतीने आपला डाव साधला होता.
मंगलाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. मोठा आकाश लहानपणापासूनच खूप हुषार अन् वंशाचा दिवा. त्यामुळे आई साहजिकच आकाशकडे अधिक लक्ष द्यायची. त्याची प्रत्येक मागणी मग ती कितीही महागडी असो, आवश्यक असो वा नसो- ती पूर्ण करायची. त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायची. त्याचं खाऊन झाल्यावर उरलेली दूध-फळं पूजाला द्यायची. “चल, तू पण घे खाऊन. जणू खूप उपकार केलेत माझ्यापोटी जन्म घेऊन!” असंही ती वर बोलायची. पण पूजा फार सहनशील पोर. ती कधीच तक्रार करीत नसे.
आकाश डॉक्टर बनला.
लहानपणापासूनच तो खूप जिद्दी, हेकेखोर, बेजबाबदार होता. आई-बाबा, बहिणीबद्दल त्याने कोणतीही आत्मियता दाखविली नाही. उलट त्यांच्यापासून दूर बदली करून घेतली. तरी पण आईला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटत होता.
माधवना अर्धांगवायुचा झटका आल्याचे त्याला कळविले. तो सावकाश आठ दिवसांनी बाबांना भेटायला आला. तो लांबूनच बाबांना पाहात होता. पूजा त्यांचं सर्व नीट करीत होती. त्यांचं खाणं-पिणं, पाठीला आधार देऊन उठविणं, त्यांचं औषध सर्व व्यवस्थित करीत होती. वडिलांची सर्व जबाबदारी आई व बहिणीवर टाकून तो दुसर्याच दिवशी निघून गेला. मंगलाला फार वाईट वाटलं. पण करणार काय? पेरलं तेच उगवणार! बाभळीचं झाड पेरून त्याला गोड फळ कुठून येणार!
आकाश डॉक्टर बनल्यावर मंगला त्याच्या विवाहाची स्वप्नं पाहण्यात गुंग झाली. खूप देखणी सून आणील. ती येताना सोबत भरपूर धनदौलत घेऊन येईल. त्यांनी दोन-तीन मुली पण पाहिल्या होत्या. त्यातील एक त्यांना खूप आवडली होती. करोडपती बापाची एकुलती एक मुलगी होती ती!
पूजा आता बी. एस्सी. फायनलला होती. तिचेही आता विवाह करण्याचे वय झाले होते. पण तिच्याकडे लक्ष द्यायला आईला वेळ नव्हता.
“आई! मी ज्युलियाशी विवाह करतोय पुढच्या आठवड्यात. तीही एक डॉक्टर आहे.” एके दिवशी आकाशचा फोन आला. मंगलाच्या स्वप्नांचा महाल क्षणार्धात कोसळला. त्या दिवशी घरात कोणीच जेवले नाही. ती एका कोपर्यात बसून खूप रडली. मुलाच्या या वागणुकीला आपणच जबाबदार
आहोत, हे तिला कळून चुकले. पण आता पश्चाताप करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता!
माधव आधीच मितभाषी होते. त्यांचं बोलणं विकत घ्यावं लागायचं. मुलाच्या वागणुकीमुळं त्यांच्या मनावर विलक्षण दडपण आलं. त्यांची तब्येत अजूनच बिघडली. पुनः आकाशला फोन करण्यात आला. आकाश आला. सोबत ज्युलिया नव्हती. ती गर्भवती असल्यामुळे प्रवास करू शकत नव्हती.
“आई, मला मुंबईत दवाखाना बांधायचाय. मला वीस लाख रुपये पाहिजेत.” आकाश बोलला.
“आकाश, अरे तू बाबांना पाहायला आला आहेस की पैसे मागायला? तुला लाज वाटली पाहिजे.” आता आई त्याच्यावर रागावली.
“मॉम, बी प्रक्टिकल! हे आजारपण, मरणं, जगणं, हा तर नैसर्गिक नियम आहे. अन् मग तू अन् पूजा आहात ना बाबांची सेवा करायला!” आकाश बोलला. पुन्हा एकदा मंगलाला मुलासमोर झुकावंच लागलं. फंडातून दहा लाख रुपये काढून मुलाला दिेले.
पूजाला पदवी मिळाली. ती एका कंपनीत मॅनेजरच्या पदावर नोकरीला लागली. आपली नोकरी सांभाळून ती बाबांची सेवा करायची. बाबांची प्राणज्योत मालवल्यावर पूजाने आकाशला फोन केला.
“भैया, बाबा गेले आपल्याला सोडून. तू लवकर…” तिकडून फोन कट झाला होता.
माधवरावांची प्राणज्योत मालवून 20 तासांचा अवधी लोटला होता. सर्व नातेवाईक जमा झाले होते. पण आकाशचा अजून पत्ता नव्हता. अजून किती वेळ पार्थिव शरीर ठेवणार? आता सायंकाळचे पाच वाजले होते. भटजी घाई करीत होते. दिवस मावळण्याच्या आतच मुखाग्नी द्यायला पाहिजे. इतक्यात कोणीतरी बोलले. “आकाश आला.”
भटजी म्हणाले, “आकाश बेटा! किती उशीर केलास. चल आता लवकर बाबांच्या अर्थीला खांदा दे. आपल्या बाबांना मुखाग्नी देऊन पितृऋणातून मुक्त हो!”
आकाशने बाबांच्या पायांना स्पर्श केला मात्र, मंगलाच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडण्याऐवजी आग बाहेर पडू लागली, कठोर आवाजात त्या बोलल्या.
“थांब आकाश, माझ्या पतीच्या पार्थिव शरीराला तू स्पर्श करू नकोस. त्यांच्या पार्थिव शरीराला मुखाग्नी देणार आमची सुकन्या पूजा…”
“मंगलाबाई, शास्त्रात हेच सांगितलेले आहे की मुलगाच…” भटजी सांगू लागले.
“नाही! पंडीतजी, शास्त्राच्या गोष्टी इथे सांगू नका. ज्या मुलाने वडिलांची जबाबदारी उचलली आहे, त्या मुलासाठी हे शास्त्र लिहीले असावे. माझ्या मुलाने वडील जिवंत असताना त्यांची कोणतीही सेवा केली नाही, कोणत्याही पुत्रधर्माचे पालन केले नाही. त्याला पित्याच्या पार्थिव शरीराला मुखाग्नी देण्याचाही काही अधिकार नाही.”
जुन्या रुढी-परंपरा मिटवण्यास निघाली होती मंगला. ती सत्य तेच बोलत होती.
“जीवनभर जिने बाबांची सेवा केली. चंदनासारखं झिजली ती माझी मुलगी. चल पूजा! मुखाग्नी देऊन आपल्या बाबांचा उद्धार कर!”
आकाश दुसर्याच दिवशी निघून गेला. बाबांच्या तेरवीची पूजापण पूजानेच केली.
पतीच्या मृत्युनंतर मंगला पूर्णपणे खचून गेली होती. पूजा आता तीस वर्षांची झाली होती. आता तिला लेकीच्या लग्नाची चिंता लागली होती. पण ती लग्न करून आईला सोडून जायला तयार नव्हती. तिने आता आईच्या सेवेचे व्रत हाती घेतले होते. ऑफिसला गेल्यावर आईची सेवा करण्यासाठी तिने एक नर्स ठेवली होती. मुलगा -सून डॉक्टर असून काय फायदा?
मंगलाबाई माधवरावांच्या फोटोसमोर दिवा लावून म्हणायची, “आपण वंशाला दिवा मागतो- मुलगा. काय कामाचा मुलगा? देवाने सर्वांना पूजासारखी एकच पणती द्यावी, जी आई-वडिलांच्या सेवेसाठी दिवस-रात्र जळत राहील. स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारी एकच पणती हवी. एकच पणती हवी!”
पूजा आईच्या मागे उभी होती.
तिने भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकीला पाहिले.
“आई! काय पाहतेस अशी?”
पूजा म्हणाली.
“माझ्या पणतीला! एकच पणती पेटवा दारी, उजेड देईल ती घरोघरी!”
- लता वानखेडे