Close

डायमंड ज्युबिली (Short Story: Diamond Jubilee)


  • अहो, मी आता 75 वर्षांची झाले, कित्ती मोठ्ठा इव्हेन्ट आहे हा, शिवाय85 वर्षांचे तुम्ही… माझ्या कुंकवाचे धनी, माझं खरंखुरं वैभव, ऐश्‍वर्य… तुम्हीच! तुमची मला प्रेमाची साथ आहे… प्लीज, येऊ दे ना हो माझ्या सखींना… आम्ही दूर दूर बसू, अगदी अर्ध्या तासासाठी एकत्र जमू…

  • “अगं पण वसु, या पेन्डॅमिकच्या दिवसात तू तुझ्या दहा साळकाया, माळकायांना…” मनोहरला अडवत वसुंधरा जरबेच्या स्वरात म्हणाली.
    आँऽऽ… काय म्हणालात?
    अग म्हणजे तुझ्या जिवलग… मैत्रिणींना तू घरी… बोलावून… मनोहर चाचरत बोलत होता.
    होऽऽ! घरी बोलावून जंगी पार्टी करणार अहो मनोहरपंत, अहो, या वसुंधरा मॅडमचा 75 वा वाढदिवस आहे म्हटलं, विसरलात? डायमंड ज्युबिली! काऽऽय? अस्सा दणक्यात साजरा करते ना, तो, की त्या एकेका सटवीला कळलंच पाहिजे माझा रुबाब काय आहे ते…. आणि अभावितपणे आपण खरं बोलून गेलो म्हणून वसुंधरा लाडे लाडे मान हलवत गोड स्वरात म्हणाली, असं काय डोळे विस्फारून बघता हो? इश्य् … मी किनई माझ्या मैत्रिणींनी प्रेमाने सटवी म्हणते तुम्हाला कशी मी खुषीत आल्यावर म्हणते मनुटला, बिनुटला… किंवा ससुटल्या…
    कळलं कळलं तरीही घरात तुझ्या 75 व्या वाढदिवसाचा गोंधळ नकोऽऽ
    मनोहर चिंतेच्या मनःस्थितीत असूनही इतका ठामपणे बोलला तेव्हा मात्र वसुंधरा सावध झाली. गेले कितीतरी महिने घरातच राहिलेल्या या मुखदुर्बळ, घाबरट, ससुटल्यालाल एकदम वाघाप्रमाणे डरकाळी मारण्याचं सामर्थ्य आले? म्हणजे? हा त्या दोन वेळा घेतलेल्या लसींचा … म्हणजे एकदा घेतलं व्हॅक्सिनेशन… मग 84 दिवसांनी बूस्टर… हो बरोबर त्यामुळे म्हणे शरीरात ते काय अँटीबॉडीज निर्माण होतात… त्या असल्या पॉवरफुल असतात म्हणे की त्या आपल्या शरीरात त्या विषाणू…

  • जंतुंबरोबर चक्क लढाई करतात… अगं बाई म्हणजे आपला नवरा ही लढाई करतात… अगं बाई म्हणजे आपला नवरा ही लढाई माझ्यापेक्षाही जास्त प्रमाणात जिंकलेला दिसतोय्… म्हणून तर या मेंगळटाने माझ्या वरताण आवाज चढवलाय्… आणि एवढा ठामपणे बोलतोय् हं म्हणजे आता शक्तीपेक्षा मला युक्तीने जिंकला पाहिजे डाव लगेच रडकुंडीला येत वसु आपल्या गुलाबी चुनरीचा पदर डोळ्यावर घेत मुसमुसत म्हणाली, अहो, असं हो काय करता? अहो मी आता 75 वर्षांची झाले, कित्ती मोठ्ठा इव्हेन्ट आहे हा, शिवाय85 वर्षांचे तुम्ही… माझ्या कुंकवाचे धनी, माझं खरंखुरं वैभव, ऐश्‍वर्य… तुम्हीच! तुमची मला प्रेमाची साथ आहे… प्लीज, येऊ दे ना हो माझ्या सखींना… आम्ही दूर दूर बसू, अगदी अर्ध्या तासासाठी एकत्र जमू… मी… मी त्यांना किनई प्रत्येकीला एकेक लंचबॉक्स आणि रिटर्न गिफ्टचं पार्सलच देईन… खूऽऽष ना मग मनुटला माझा? आणि असं म्हणत तिने चक्क त्याच्या गालावर हलकेच चापट मारली. खरं तर मनुटल्याचं मगाशी ओलेलं उसनं अवसान गळून पडलं होतं. तरीही तशाही घाबरट मनःस्थितीत त्याला एक आयडिया सुचली. वसुंधरा त्याच्याकडे स्नेहार्द्र आणि प्रेमाच्या नजरेने त्याला पाहत होती. बाकी काही असलं तरी ती अजूनही सुंदर दिसत होती. पुन्हा आपली विकेट उडेल आणि आपण पुन्हा तिच्या त्या जिवलग, खरं तर जीव नकोशा करणार्‍या शत्रुणींना बोलाव म्हणणार या भीतीने तो पटकन म्हणाला, अगं एक आयडिया आहे माझ्याकडे. तू व्हिडिओ कॉन्फरन्स मधून एकत्र भेट ना सर्व मैत्रिणींना आणि जे काही गिफ्ट वगैरेचं पार्सल ऑनलाइन पाठव त्यांना. एकत्र पार्टी करत धमाल करा तुम्ही आणि हो. मी ही एक गिफ्ट आणलंय तुला. आजच देऊ का ते? गिफ्टची मात्रा बरोब्बर लागू पडणार हे मनोहरला माहीत होतंच. आपल्याला हे सगळं कसं सुचतंय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. इतक्या महिन्यांच्या आत्मचिंतनाचं तर हे फळ नसेल ना असा विचार करतच त्याने वसुंधरेच्या हातात एक लाल रंगाची मखमली लांबट पेटी ठेवली. अय्या काय आहे? म्हणत तिने पेटी उघडली. अगं बाई डायमंड नेकलेस? कित्ती गोड आहे हा नेकलेस… अगदी तुमच्यासारखा म्हणत वसुंधरेने त्याचा एक गालगुच्चा घेतला.
    तशी संधी साधून मनोहर म्हणाला, मग डन, तुझा 75 वा वाढदिवस ऑनलाईन सेलिब्रेट करायचा. हो ना ?
    तुम जो कहे वो सर आँखोपर जनाब. त्याच्यापुढे चक्क मुजरा करत वसुंधरा उद्गारली आणि सर्व नवर्‍यांप्रमाणेच डोकं शांत राहावं, स्वसंरक्षण व्हावं म्हणून पांघरायचं, घ्यायचं चिलखत म्हणजे वर्तमानपत्र डोळ्यांपुढे दोन्ही हातांनी धरून मनोहर पेपर वाचू लागला. लहानपणी आपण आपल्या भोवती चटई गुंडाळून घेऊन लपायचो त्यात, तसंच आता या पेपरांच्या गुंडाळ्यात आपण लपेटून घेऊन निवांत लपून बसावं असंही मनोहरच्या मनात येऊन गेलं आणि नुसतं येऊन गेलं म्हणेपर्यंत त्याने खरोखरंच पटकन उठून गुंडाळी करून ठेवलेली चटई उघडून त्यात स्वतःला चक्क लपेटून घेतलं… अगदी लहानपणी स्वसंरक्षणासाठी लपून बसायचा… तसाच आत्ताही तो लपला…
    आणि आपल्या डोळ्यांसमोर आपला नवरा चक्क स्वतःला चटईत गुंडाळून घेऊन लपलाय् हे दृष्य पाहून वसुने ओरडून म्हटलं, अहो… अहो… अरे मनु… मन्या… अरे तू चटई का गुंडाळलीस स्वतःभोवती? … या कोरोनामुळे डोक्यावर परिणाम झाला रे… अरे देवा… तू … मॅडोबा झालास… मनोबाचा मॅडोबा… आणि आता तर वसु रडायलाच लागली.
    अग अग, वेल्डा… अगं रडतेस का?म्हणत मॅडोबाने वेल्डाला झोपेतून हलवत जागं करत विचारलं. वेल्डाने डोळे उघडले… अरे… मॅडोबा… अरे तू मॅडोब ना? पण तू एवढा तरुण कसा?
    अगं तरुण काय काय? आपण तरुणच आहोत ग. अग बघ, आराशात बघ स्वतःला… म्हणत मॅडोबाने वेल्डाला आरशापुढे उभी केली. वेल्डाने स्वतःलाच पाहिलं…

  • अय्या, मी पण तरुणच आहे. अजून…
    अग अजून म्हणजे? मॅडोबाने आश्‍चर्याने विचारलं.
    अरे म्हणजे मी …. मी…. 75 वर्षांची होते, झाले होते. म्हणजे,
    अगं काय बरळतेयस वेडे. तुला स्वप्न पडलं होतं वाटतं. मॅडोबाने तिला जवळ घेत म्हटलं.
    अग आपण दोघे पंचवीस वर्षांचे आहोत.
    अरे, नाही अरे मी 75 आणि … आणि तू दहा वर्षांनी मोठा …85… गोंधळलेल्या अवस्थेत वेल्डा उत्तरली.
    त्यावर जोरजोरात हसत लाडाने तिचा गालगुच्चा घेत म्हणाला, वेल्डे, अगं मी तुझ्यापेक्षा दहा दिवसांनीच मोठा आहे…. म्हणून तरी आपलं लग्न झालं, दहा तर दहा दिवस, नवरा वयाने मोठा आहे ना, असं म्हणत तुझ्या आजीने आपल्या लव्हमॅरेजला परमिशन दिली… आठवतयं का? त्यावर आता वेल्हा ही स्वतःला पुन्हा आरशात पाहत म्हणाली, अरे हो की. मी कित्ती कित्ती तरुण आणि सुंदर दिसतेय… म्हणजे आहेच…
    मग? आणि आपलं प्रेम जमलं कसं ते पण आठवतंय ना वेल्डा मॅडम? मॅडोबाने तिला आता कुशीतच घेतलं. तशी वेल्डा थोडीशी लाजली. तेव्हा मॅडोबा म्हणाला, लाजतेस कशाला आता? तेव्हा माझ्या कामावर कारखान्यात मी वेल्डिंगचं काम करत होतो… तिथे तू माझ्या मम्मीबरोबर कुणाची तरी वाट पाहात होतीस… इतक्यांत तुझं लक्ष माझ्याकडे गेलं. वेल्डिंगच्या उडणार्‍या ठिणग्या पाहून तू उत्स्फुर्तपणे म्हणालीस, मम्मी… कित्ती छान चांदण्या उडताहेत ग.. मस्त वाटतय्…
    आणि तू पुढे पुढे आलीस… मी सांगत होतो… पुढे नको येऊ… तर तू चक्क मला एकटक पाहत उभी राहिलीस… म्हणालीस, मला साक्षात्कार झाला… मग मीही म्हटलं. मलाही.
    तर तुझ्या मम्मीने विचारलं, कसला? कसला साक्षात्कार? त्यावर वेल्डा मॅडोबाला साथ देत म्हणाली, मेड फॉर इच अदर. आणि आता दोघेही हसायला लागली. आणि म्हणून मी माझं जुनं वसुंधरा बदलायला लावून तुला वेल्डिंगची गो… ड आठवण म्हणून काय नाव ठेवायला सांगितल लग्नात… संाग बरं… वेल्डाने लाडात येत विचारलं.
    वेल्डा, मॅडोबा आनंदाने ओरडला.
    आणि आज आपल्या लग्नाला75 दिवस झाले म्हणून आपण आपल्या लग्नाचं 75 वा दिनाचा कौतुकसोहळा…
    डायमंड डे सेलिब्रेशन साजरं करतोय्
    कित्ती छान… पण स्वप्नात मी माझी 75 वी साजरी केली… 75 वर्षांची होते मी. वेल्डा म्हणाली.
    शुभशकुन… आयुष्यमान भव…
    असा आशिर्वाद आहे तुला… तुला अगदी खूप छान स्वप्न पडलं… चल तर… आता आपण … पण मॅडोबाला मध्येच अडवत वेल्डा म्हणाली, अरे पण मनुटल्या …. स्वप्नात मला अजून एक शुभवार्ता कळली,.. नव्हे तू प्रत्यक्ष दिलियस्…
    बोल… काय आहे ती? मॅडोबाने विचारलं.
    अरे डायमंड नेकलेस दिलास जा जा आता माझं गिफ्ट आणं… तोपर्यंत मी पार्लरमध्ये जाऊन येते.
    वेल्डा सहजपणे म्हणाली. आणि हिच्या खर्‍या 75 व्या वाढदिवसाला तरी आपण खरा डायमंड नेकलेस कसा देणार या विचाराने मॅडोबा काळजीत पडला. नेहमीप्रमाणेच्
  • प्रियंवदा करंडे

Share this article