Close

दैवाधीन (Short Story: Daivadhin)

पहाटेचे साडेतीन वाजले होते. या भलत्या वेळी हा फोन नीताची अशुभ बातमी घेऊनच आला असणार, असं वाटून हातपाय घामेजले रवींद्रचे. काळीज लकाकलं. फोन घ्यायला त्याने प्रयत्नपूर्वक हात उचलला. रिसिव्हर कानाला लावला. त्याच्या तोंडून ‘हॅलो’ निघण्यापूर्वीच पलीकडून आवाज आला…


रात्रीपर्यंत या कुशीवरून त्या कुशीवर अस्वस्थपणे तळमळणार्‍या रवींद्रला नंतर केव्हातरी झोप लागली. तेवढ्यात फोनची रिंग कर्कश वाजली. अगदी डोक्याशीच फोन असल्यामुळे तो आवाज त्याला जास्तच मोठा वाटला. गाढ झोपेतून जाग आल्यामुळे हा आवाज कशाचा आहे, हे लक्षात यायला चार-पाच सेकंद जावे लागले. त्याने घड्याळात पाहिलं. पहाटेचे साडेतीन वाजले होते. या भलत्या वेळी हा फोन नीताची अशुभ बातमी घेऊनच आला असणार, असं वाटून हातपाय घामेजले रवींद्रचे. काळीज लकाकलं. फोन घ्यायला त्याने प्रयत्नपूर्वक हात उचलला. रिसिव्हर कानाला लावला. त्याच्या तोंडून ‘हॅलो’ निघण्यापूर्वीच पलीकडून आवाज आला,
“डॉ. पांडे आहेत का? दवाखान्यात एक इमर्जन्सी आली आहे. लवकर पाठवा त्यांना.”
“अं… कोण डॉ. पांडे?”
“अहो, पांडे हॉस्पिटलमधून बोलतोय मी. डॉक्टरांना…”
रवींद्रने ‘राँग नंबर’ म्हणून ठेवून दिला. नीताबद्दल फोन नव्हता, हे जाणवून त्याने सोडलेला समाधानाचा सुस्कारा आजूबाजूच्या वातावरणात रेंगाळत राहिला. एका स्फूर्तीने संचार केला शरीरात. त्याने भराभर आपलं पांघरूण, उशी आवरून ठेवली. नीता सुखरूप होती. नीताला बघायला दवाखान्यात जायची घाई झाली त्याला आता. त्याने तोंड धुऊन चहा करून घेतला. आंघोळ आटोपून देवपूजाही झाली. तरी बाहेर अंधारच होता. त्याने घड्याळात पाहिलं. पाचच वाजले होते. दवाखान्यात जायचं म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार. कारण शहराच्या या भागात फारशी रहदारी नसते. रात्री उशिरा किंवा पहाटेही वाटमारी होते या भागात.
खरं तर त्याला शहरापासून इतकं लांब घर बांधायचंच नव्हतं. पण नीताचा हट्ट. तिला शांततेचं अन् हिरवळीचं कोण वेड! शहरातली गजबजलेली वस्ती, रखरखीतपणा नको होता तिला. म्हणून हे असं शहरापासून साधारण वीस किलोमीटर दूर प्लॉट घेऊन घर बांधलं. आता इथेही खूप घरं झाली आहेत म्हणा. पण तरी सगळं लांबच पडतं. सारखं शहरातच जावं लागतं.
नीता बाबतीतही डॉक्टर असंच म्हणाले की, पंधरा-वीस मिनिटं आधी आला असता, तर त्यांचा मेंदू वाचवता आला असता. तो इतका डॅमेज झाला नसता. पण पहाटे-पहाटे तिचा जीव खूप घाबरायला लागला. उष्णतेमुळे वाटत असेल, असं वाटून रवींद्रने तिला लिंबाचं सरबत करून दिलं. मग बी.पी.ची गोळी घ्यायला लावली. पण तरीही बेचैन वाटतंय म्हटल्यावर त्याने घरी होते नव्हते तेवढे पैसे घेऊन गाडी काढून सरळ दवाखान्याची वाट धरली. दवाखान्याच्या फॉरमॅलिटिज पूर्ण करून लगेच डॉक्टरांच्या स्वाधीन केलं. नीताला सिव्हियर हार्ट अ‍ॅटॅक आलाय म्हणाले डॉक्टर. त्यांनी भराभर ट्रिटमेंट सुरू केली. तीन आणखी डॉक्टर बोलावले. रवींद्र एकटाच बाहेर बसून डॉक्टरांची धावपळ पाहत होता. ऑफिसमध्ये फोन करून त्याने दोन मित्रांना बोलावून घेतलं. नीताच्या भावाला फोन केला. तो रवींद्रचा डबा घेऊनच दवाखान्यात आला. त्याला बळेच चार घास खायला लावले. डॉक्टरांशी बोलला. बी.पी. खूप वाढल्यामुळे आणि सिव्हियर हार्ट अ‍ॅटॅकमुळे ब्रेन डॅमेज झालाय सांगितलं त्यांनी. त्यामुळे नीता कोमात गेली होती.
डॉक्टर म्हणाले, “रुग्णाला सी.टी. स्कॅनला न्यायचंय. पण तब्येत थोडी स्थिर झाली की, नेता येईल. न्यूरोसर्जनला बोलावलं आहे. ते येऊन बघून गेले की, डिटेलमध्ये सांगता येईल.” नीताचा भाऊ सुनील भांबावल्यासारखा डॉक्टरांकडे पाहत राहिला.
डॉक्टरांनी एकदा त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या पाठीवर थोपटलं आणि पुढे म्हणाले, “सध्या रुग्णाला श्‍वास घ्यायला कमालीचा त्रास होतोय, म्हणून व्हेंटिलेटर लागू शकतो. त्यासाठी त्यांच्या मिस्टरांची एका फॉर्मवर सही लागेल. ती घेऊन ठेवा. म्हणजे अडचण होणार नाही. घाबरू नका. सगळं ठीक होईल.” सुनीलने रवींद्रचा हात गच्च पकडला. दोघं एकमेकांकडे आधारासाठी बघू लागले. डॉक्टरांनी औषधं सुरू केली. बहात्तर तास कठीण आहे, म्हणाले ते. ते जर निघाले तर धोका नाही.
…आणि आज सहा दिवस झाले, तरी नीता कोमातच होती.
मुंबईला वरुणला कळवलं होतं. त्याला सहाच महिन्यांपूर्वी तिथे नोकरी मिळाली होती. तो विमानाने आला. दोन दिवस राहून परत गेला. काम संपवून पुन्हा येतो म्हणाला.
…रवींद्रने बाहेर पाहिलं. आता उजाडलं होतं. त्याने दवाखान्याची वाट धरली. रवींद्र दवाखान्यात पोहोचला तेव्हा सुनील डॉक्टरांशी बोलत होता. लांब-लांब पावलं टाकतच तो त्या दोघांपर्यंत पोहोचला.
“काय झालं डॉक्टर?” आता कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतंय, ही भीती होती त्याच्या स्वरात.
“सॉरी मिस्टर रवींद्र, रुग्णाची फारशी प्रगती नाहीये. म्हणून दुसर्‍या न्यूरोसर्जनची अपॉईंटमेंट घेतली आहे. ते येतीलच इतक्यात.”
“डॉक्टर, ती कोमातून बाहेर येईल ना?”
रवींद्रच्या चेहर्‍याकडे पाहून डॉक्टर काहीच न बोलता नुसतेच त्याच्या पाठीवर थोपटून निघून गेले.
पहिल्या तीन दिवस अन् रात्री रवींद्र दवाखान्यातच थांबला होता. तिथून हलावसंच वाटत नव्हतं त्याला. पहिल्या रात्री एक मिनिटही डोळ्याला डोळा लागला नाही. तो अन् सुनील आय.सी.यू.च्या बाहेर बसून होते. प्रत्येक वेळी नर्स बाहेर आली की, पोटात धस्स होई. नीताचं तर काही बरं-वाईट? नर्सने बाहेर बसलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांकडे शोधक दृष्टीने पाहिलं की, प्रत्येकालाच आपापल्या रुग्णाबद्दल काळजी वाटे.
पहिल्याच रात्री एक अ‍ॅक्सिडेंट केस आली. दोघं जण अ‍ॅडमिट झाले. त्यातला एक मुलगा पहाटे गेला. डॉक्टरने बाहेर येऊन सांगितलं आणि बाहेर एकच गोंधळ झाला. त्या मुलाचे नातेवाईक हंबरडा फोडून रडू लागले. रवींद्रच्याही पोटात गलबललं. तरुण मुलगा होता. नुकतंच त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्याच्या मृत्यूनंतरच्या सगळ्या फॉरमॅलिटिज होऊन बॉडी घेऊन जाईपर्यंत दवाखान्यात खूप वाईट वातावरण होतं. त्या मुलाच्या पालकांकडे पाहून नकळत रवींद्रच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
नवीन न्यूरोसर्जन आले होते. त्यांना पाहून रवींद्रला जरा धीर आला. त्यांनी तासभर नीताला तपासलं. न्यूरोसर्जन आणि डॉक्टर यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यांच्यातील सिनियर डॉक्टर जवळ येताच रवींद्रने प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली.
“डॉक्टर कसं आहे आता हिचं? कधी शुद्धीवर येईल? लवकर बरी होईल नं ती?”
“घाबरू नका. या कधी शुद्धीवर येतील काहीच सांगता येत नाही. त्या ट्रिटमेंटला कसा प्रतिसाद देतात याच्यावर त्यांचं बरं होणं अवलंबून आहे. तुमच्या मुलाला पुन्हा बोलावून घ्या.” डॉक्टर दुसर्‍या रुग्णाकडे वळले. पुन्हा मागे आले. रवींद्रच्या खांद्यावर थोपटून म्हणाले, “आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. तुम्ही काळजी करू नका. पण शेवटी हे सगळं रुग्णाच्या इच्छाशक्तीवर आणि देवाच्या हातात आहे.”


रवींद्रच्या डोळ्यातून खळकन पाणी बाहेर आलं. डोळे पुसून तो नीताजवळ येऊन बसला. तिच्या हातावरून, चेहर्‍यावरून हात फिरवत तिच्याकडे एकटक पाहत बसून राहिला. त्याला वाटलं तिला हलवून हलवून उठवावं. ‘उठ बाई आता! खूप झालं तुझं असं झोपून राहणं. तू अशी जर इथे झोपून राहिलीस, तर कसं होईल माझं?’ पुन्हा त्याचे डोळे भरून आले. एक नर्स कसलासा चार्ट घेऊन आली. त्याने कसेबसे डोळे पुसले.
“तुम्ही इथे फार वेळ थांबू नका.”
रवींद्र पुन्हा बाहेर येऊन बसला. एव्हाना नीताच्या दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याची बातमी सगळ्या नातेवाइकांत पसरली होती. तिच्या मैत्रिणी, नातेवाईक, रवींद्रच्या ऑफिसचे सहकारी सगळ्यांची गर्दी झाली. काहींनी फोनवर चौकशी केली. सगळे आपापल्या परीने मदत करायला तयार होते. रवींद्रला आज सगळ्यांच्या आधाराची खरंच गरज वाटत होती. रुग्णाला कोणालाच भेटू देत नव्हते. त्यामुळे सगळे रवींद्रशी बोलून काही वेळ थांबून परत जात होते. तसा रुग्णांच्या नातेवाइकांना थांबायला एक वेगळा हॉल होता. हॉल ए.सी. होता. बसायला मोठमोठे सोफे होते. म्हणजे, रात्री त्याच्यावर आरामात झोपता येऊ शकेल एवढे मोठे. पण ते आठ-दहा सोफेही कमीच पडत होते. त्यामुळे काही रुग्णांचे नातेवाईक खालीच आपापल्या सतरंज्या टाकून बसले होते. काही झोपले. काही घरून आलेले डबे खात होते. रात्री त्याच हॉलमध्ये जशी जागा मिळेल तसे सगळे झोपत.
रवींद्र उभा राहून नुसता सगळ्यांचे चेहरे न्याहाळत होता. जे रुग्ण गंभीर आजारी होते, त्यांचे नातेवाईक सुन्न मनःस्थितीने एकमेकांशी काही विचारविनिमय करत होते. त्याला खरं तर नीताच्या बाजूलाच बसून राहावंस वाटत होतं. एक क्षणभरही तिथून हलावसं वाटत नव्हतं. झोप तर डोळ्यातून कधीच गेली होती. खाणं-पिणं कशात लक्ष नव्हतं. कधी बहात्तर तास पूर्ण होतात आणि डॉक्टर आउट ऑफ डेंजर सांगतात, अशा आशेने तो कितीतरी वेळ नुसता उभाच होता.
नीताची भावजय, सुजाता घरून डबा घेऊन आली. तिने बळेच चार घास खायला लावले.
बहात्तर तास उलटून गेले. आठ-दहा दिवस झाले. महिना झाला, तरी नीताची तब्येत तशीच. ती कोमातच. आता भेटायला येणारेही कमी झाले. जे नातेवाईक रोज संध्याकाळी एक चक्कर टाकायचे ते चार-पाच दिवसांनी, तर कधी आठ दिवसांनी येऊन जात. तीच वाक्यं, तीच सहानुभूती, तीच काळजी… डॉक्टरही काही समाधानकारक सांगत नव्हते. वरुणची नवीन नोकरी. म्हणून तोही शनिवार-रविवार येऊन जायचा.
नीता आता उठेल, मग उठेल अशी रवींद्रची भाबडी आशा आता मरून गेली होती. रोज दिवस-रात्र दवाखान्यात राहून त्याची तब्येत निम्मी झालेली पाहून नीताच्या भावाने रवींद्रला घरीच झोपत जा, म्हणून सांगितलं. कधी तो स्वतः, कधी भाऊ असे चार-दोन दिवसाआड रात्रीचे थांबत. मात्र दिवसभर रवींद्र दवाखान्यातच बसून राही. बंगळुरूहून एक मोठे डॉक्टर येऊन पाहून गेले होते. त्यांनीही काही फारसं पॉझिटिव्ह सांगितलं नाही. आता रवींद्र समजून चुकला होता, कधीतरी ते सगळं संपेल.
टण्… टण्… घड्याळात दोनचे ठोके पडले. रवींद्रची नजर घड्याळाकडे गेली. रात्रीचे दोन वाजले तरी डोळ्यात मुळीच झोप नव्हती. डोळ्यात आता काही भावही नव्हते. अश्रूही येत नव्हते. गेल्या सहा महिन्यातील कितीतरी रात्री जागून काढल्या होत्या. डोळ्यांतून कितीतरी पाणी वाहिलं होतं. पण आता मात्र रवींद्रला रडूही येत नव्हतं. आता भावना बाजूला सारून रवींद्र व्यवहाराचा विचार करू लागला होता. गेले सहा महिने त्याची रजा सुरू होती. तीन महिने इ.एल. घेऊन, नंतर बिनपगारी रजा सुरू झाली होती. अजून किती दिवस रजा लागेल, याची बॉसकडून विचारणाही झाली होती. पण रवींद्र काय उत्तर देणार? वरुणची तर नवीन नोकरी. पुढचं सगळं करिअर या नोकरीच्या रिपोर्ट्सवर अवलंबून होतं. एकीकडे आई आणि दुसरीकडे नोकरी, या चक्रात तोही अडकला होता. त्याच्याही सारख्या चकरा व्हायच्या. तो आल्यावरही तेच ठरावीक प्रश्‍न, तीच उत्तरं… नवीन प्रकारच्या तपासण्या, इंजेक्शन्स, औषधं… पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. गाठीला पैसा होता म्हणून बरं… गरीब रुग्ण असता, तर त्याने एव्हाना केव्हाच वरची वाट धरली असती. पण हे सगळं किती दिवस चालणार? अजून किती दिवस?
रवींद्र दचकला. म्हणजे आपण आता नीताच्या अंत समयाची वाट पाहतोय? भीती आणि अपराधीपणाची एक धारदार सुरी अंगभर फिरली. कितीही कठोर वाटलं तरी ते एक कटू सत्य होतं. नीताच्या तब्येतीत काहीच सुधार नव्हता. औषधांच्या भरवशावर नीता तग धरून होती. किती दिवस?…
किती महिने??…

स्मिता वाईकर

Share this article