आई येता जाता लग्न कसे महत्त्वाचे आहे हे तिला समजावून सांगणाचा क्षीण प्रयत्न करीत होती. पण उपयोग होत नाही म्हटल्यावर तिने व बाबांनी त्यांचा मोहरा उपेनकडे म्हणजे मुलाकडे वळविला. तो सुद्धा जर साशंक मना
बेडवर पडल्या पडल्या रिता पुस्तक वाचत होती. कारण आज रविवार! हक्काचा विश्रांती घेण्याचा वार! कशाचीच घाई गडबड नव्हती. त्यामुळे त्या कथेत रममाण झाली होती. कथा शृंगारीक होती. अन् मग ती वाचता वाचता त्या नायिकेच्या जागी
स्वतःला कल्पू लागली. अन् अंगावर रोमांच उमटले. नायकाने नायिकेला घट्ट मिठीत घेतले होते. त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले होते. त्यामुळे नायिका लाजून थरथरत होती. ते वाचून रिताच्या हातून पुस्तक पडले, ते तिने उचलले आणि मग वेड्यासारखी फोटोतल्या नायकाची चुंबने घेत सुटली. अन् एकाएकी उशीत तोंड खुपसून रडायला लागली. पण तिचे ते हुंदके ऐकायला होतेच कोण तिथे. कारण घरात ती एकटीच होती. आणि हा एकटेपणा तिने स्वतःहून ओढवून घेतला होता. त्यामुळे कुणाला दोष देता येत नव्हता. म्हणूनच आतासुद्धा रडताना तिच्या डोळ्यासमोर आईचा केविलवाणा चेहरा येत होता. बाबांचा व्यथित चेहरा डोळ्यासमोर येत होता. कितीदा तरी त्या दोघांनी विनवण्या केल्या होत्या की, ‘बाई ग, लग्न कर, शेवटी जोडीदार लागतोच.’
पण तिने ठामपणे नकार दिला. त्यांना म्हणाली, ‘मला सासू सासरे, नवरा व बाकीचे यांच्या ताब्यात राहायला जमणार नाही. ऑफिसमध्ये बघते ना मैत्रिणींची तारांबळ. खूप वैतागलेल्या असतात त्या. नको रे बाबा. कशाला सुखाचा जीव दुःखात घालायचा. लग्न झाल्यावर पस्ताविण्यापेक्षा लग्न न झालेलेच बरे ना! निदान मला हवं तसं वागता येईल.’
शेवटी रोजच्या तिच्या त्याच त्या उत्तराला ते कंटाळले व त्यांनी तिच्यासाठी स्थळे बघणे सोडून दिले. मात्र ऑफिसात मैत्रिणींनी तिच्या या निर्णयाचे स्वागत केले. उषा म्हणाली, “तुझ्यासारखी आमच्यात हिंमत असती ना, तर आम्ही पण नकारच दिला असता.” तर जानी दोस्त पियुष म्हणाला, “चला एक मुलगा सांसारिक कटकटीतून सुटला. कारण बिचार्याला कायम तुझेच ऐकावे लागले असते.”
तरी पण आई येता जाता लग्न कसे महत्त्वाचे आहे हे तिला समजावून सांगणाचा क्षीण प्रयत्न करीत होती. पण उपयोग होत नाही म्हटल्यावर तिने व बाबांनी त्यांचा मोहरा उपेनकडे म्हणजे मुलाकडे वळविला. तो सुद्धा जर साशंक मनाने!
आईने त्याला विचारले “बाबा रे, तू पण आता लग्नाचा झालास. तेव्हा तुझा काय विचार आहे?” त्यावर तो जरा घुटमळला; ते बघून बाबा म्हणाले, “काय ते स्पष्ट सांग. कारण आता तुझ्यामागे टुमणे लावण्याइतकी आमच्यात ताकद नाही. आणि कुणाशी जमविले असशील तरी सांग!’
“हो रे बाबा!” आई म्हणाली. “अगदी परजातीची, धर्माची सुद्धा चालेल. संसार नीट केला म्हणजे झाले.”
ते ऐकल्यावर तो पटकन म्हणाला, “तसे नाही. लग्न करायला मी तयार आहे. पण सगळ्यांना काय वाटेल माझ्याविषयी? मोठ्या बहिणीचे लग्न नाही झाले अजून, अन् धाकटा असून याला मात्र लग्नाची घाई लागलीय. सगळ्यांना मी स्वार्थी वाटेन.”
तेव्हा मात्र आई उसळून म्हणाली होती की, “लोक गेले खड्ड्यात. ते काय दोन्हीकडून बोलतात, तुला लग्न करायचे आहे ना. मग हरकत नाही.”
आणि मग उपेनचे लग्न झाले. अनुजा चांगली होती. त्यामुळे सुरुवातीला सगळे छान व्यवस्थित चालले होते. पण शेवटी रिता नि ती समवयस्य! त्यामुळे खटके उडू लागले. आई बाबा, उपेन यांची तगमग तिला जाणवली. अन् मग तिने वेगळा राहण्याचा निर्णय घेतला. ती सगळ्यानाच म्हणाली, “हा निर्णय मी रागावून घेतलेला नाही, पण माझ्या असं लक्षात आले की उपेन-अनुजाला पण ‘स्पेस’ हवीच! त्यामुळे आईबाबा कधी माझ्याकडे राहतील, तर कधी इकडे! वेगळं राहूनसुद्धा आपले प्रेम टिकेलच!”
आणि मग आई-बाबांनी पण सुज्ञ विचार केला की, रिता म्हणते ते पण बरोबर आहे. अन् तशी पण ती मुंबईतच तर राहणार! त्यामुळे रिता नवीन ब्लॉकमध्ये आली. पंधरा-वीस दिवसांनी आई बाबांची चक्कर होत होती. कधी उपेन-अनुजा येत होते. शिवाय मित्र-मैत्रिणी येत होत्या. त्यामुळे सगळेच स्थिरावले. तर लग्न न करता ही एकटी कशी राहते, या उत्सुकतेपोटी खरे तर प्रेमळ असे नातेवाईक चक्कर मारून जात होते. कुठे काही बोलायला, नाव ठेवायला वाव मिळतो का? याची पण चाचपणी करत होते. अर्थात रिताला हे सगळे कळतच होतेच. शिवाय ते भेटल्यावर त्यांच्या त्या खोट्या वागणुकीमुळे करमणूक पण होत होती. पण ती कोणाला वाह्यातपणा करायला वाव देत नव्हती. त्यामुळे ‘लाडकी सुमनआत्या’ जरा दुखावली होती. कारण रिताच काय पण रिताचे बाबा पण स्वतःच्या बहिणीला ओळखून होते. उडत उडत का होईना आईबाबांच्या कानावर आलं होतं की म्हणे, सुमनआत्या म्हणाली होती की, बरोबर आहे दादा-वहिनीचे. रिताला एवढा चांगला पगार मिळतोय. तो तिचे लग्न झाल्यावर यांना मिळणे बंद होईल ना. म्हणूनच लेकीचे मन वळवित नसतील. तर अनुजाला म्हणाली, “माझ्या दादा-वहिनीची काळजी घे हो. खूप कष्ट उपसलेत त्यांनी संसारासाठी.” पण ती नाटकीपणाने खोटेपणाने बोलतेय हे नवीन होती तरी अनुजाच्या लक्षात आले होते. म्हणूनच ती उपेनकडे बघून हसली, हे रिताच्या लक्षात आले होते.
अन् जेव्हा सगळ्यांच्याच लक्षात आले की इथे आपली डाळ शिजणार नाही, तेव्हा सगळे थंड झाले. बघता बघता या गोष्टीला पण दहा वर्षे झाली. तेव्हा मात्र आईबाबांना वयानुसार तिच्याकडे जा-ये करण्याची दगदग झेपेनाशी झाली. उपेन ऑफिसच्या कामात आकंठ बुडाला होता तर अनुजा संसार अन् दोन मुलांचे करण्यात बुडाली होती. मित्र-मैत्रिणींचे देखील हेच होऊ लागले. वाढता संसार, जबाबदारी यामुळे त्यांना आता धमाल करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. अन् तसंही धमाल करण्याचे सगळ्यांचेच वय संपले होते. अन् हेच रिताच्या बाबतीत घडत होते. शॉपिंगची आवड असणारी ती. तिचा पण सिनेमा, नाटक, हॉटेलिंगचा उत्साह मावळला. एक प्रकारचे अनामिक रितेपण जाणवू लागले. शरीर बंड करून उठू लागले. काहीतरी हवंय अशी हुरहूर दाटू लागली. अन् मग तिची अस्वस्थता, तगमग वाढू लागली. डोळ्यासमोर काल्पनिक दृश्ये येऊ लागली. बरं हे ती कुणाबरोबरच शेअर पण करू शकत नव्हती. ऑफिसात नुकताच लागलेला हॅण्डसम थत्ते हवाहवासा वाटतोय, हे ती म्हणू शकत नव्हती. म्हणूनच काल्पनिक विश्वात रमू लागली.
त्याच्याबरोबर आपण पसरलेला निळाशार समुद्र बघतोय. त्याच्या छातीवर डोके ठेवून विसावलो आहोत, त्याच्यात ती बुडून जाऊ लागली. आणि आता फक्त शृंगारीक कथा-कादंबर्या वाचण्याचा नाद लागला.
तिच्यातला हा बदल आईनेच टिपला. कारण शेवटी आईच ना ती! शरीराने उपेनकडे होती, पण मनाने रितापाशीच होती. अजूनसुद्धा ती रिताच्या बाबांना म्हणे, “आत्तासुद्धा हिने जोडीदार शोधावा. सुख दुःख शेअर करायला आपलं कुणीतरी हवंच! खरं तर असं मी तुम्हाला विचारू नये, पण माणूस आहे, कधीतरी शारीरिक गरज उसळत असेल ना.”
तेव्हा आईला झटकून ते म्हणत, “छट! करिअर वगैरे पुढे तिला बाकी सगळं गौण आहे. उगाच कल्पनेचे खेळ खेळू नकोस.”
हे ऐकल्यावर रिताला भेटण्याची तिची उर्मी वाढे अन् मग ती आठ दिवस राहायला येत असे.
अशीच त्या दिवशी आईला अकस्मात आलेली बघून रिताला आनंद झाला. भरपूर गप्पा झाल्या. तरी रात्री बेडवर पडल्या पडल्या दोघींची टकळी चालूच होती. तेवढ्यात आई म्हणाली, “थोडं स्पष्ट बोलते पण तुला एकटेपणा जाणवतोय, काहीतरी हवंहवंस वाटतंय हे मला हल्ली जाणवतंय. अजून माझं ऐक! लग्न कर!”
“अग पण तुला का असं वाटतंय?”
“कारण हल्ली ज्या पद्धतीची तू पुस्तके वाचतेस, काही मजकुरांखाली खुणा केल्यास. तर का अशी एकटेपणाची शिक्षा भोगतेस?”
हे ऐकल्यावर रिताला रडू आवरेना. आईच्या कुशीत शिरून म्हणाली, “आई! खरंच माणसाला आई का लागते ते आज कळलं. तू बरोबर ओळखलंस. पण आता लग्नाची तडजोड जमणार नाही. उगाच दुसर्याचे जीवन कशाला दुःखी करा.”
“ठीक आहे. मग योगाला जा. कुठल्यातरी अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन फावल्या वेळेत काम कर. तुझेच तुला हलकं वाटेल.”
“बरं करेन मी विचार! पण तू खूप विचार करू नकोस माझा. नाहीतर आजारी पडशील.” रिताने तिला शांत करण्यासाठी म्हटलं.
अन् मग खरंच अनाथाश्रमात गेली. तिथे काय असते ते बघून आली. त्यांच्यात रमली. त्यांच्या सुखदुःखात एकरूप झाली. मग त्या मुलांची रितामावशी कधी झाली ते कळलेच नाही. रिताचा हा बदल आईबाबा सगळ्यांनाच भावून गेला. आता अनाथाश्रमाचे काम करायला लागून पण दोन वर्षे झाली. आणि एके दिवशी ती तिच्या तिथल्या मुलांशी बोलत असताना दोन अनोळखी बायका येऊन तिला नमस्ते म्हणाल्या, तशी ती गोंधळून गेली. तेव्हा त्या हसून म्हणाल्या, “बाकी आमचं काही काम नाही. पण इकडे ज्या मिसेस पोंक्षे काम करतात, ती माझी बहीण! तिने मला तुम्हाला भेटायला सांगितलंय. तेव्हा आता सरळ मुद्याचेच बोलते की माझा मुलगा लग्नाचा आहे. आमचे सगळे उत्तम आहे. फक्त त्याला कधी मूल होऊ शकणार नाही. तेव्हा तुम्ही या प्रस्तावाचा विचार करावात. माझ्या बहिणीने खूप आग्रह केला म्हणून तुम्हाला थेट भेटले. सॉरी!” म्हणून निघून गेल्या.
किती तरी वेळ त्या दिशेने बघत राहिली.
अन् मग लहान मुलं करतात तशा उत्साहाने आईला फोन करून सांगितले व म्हणाली, “आता तुमचे जावई येण्याचे स्वप्न पूर्ण होणार बरं का!” तेव्हा आईचा ‘हो’ म्हणतानाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला व ती हसली. मनाशी म्हणाली, ‘बहुतेक प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते.’ अन् मग अचानक मागे एकदा तिच्या मैत्रिणीने सुचविलेला उपाय तिला आठवला. वर्षा म्हणाली होती, “सरळ लिव्हिंग इन रिलेशनशिप स्विकार. डोक्याला झंझट नाही. म्हटलं तर जोडीदार म्हटलं तर आपलं स्वातंत्र्य अबाधित!”
“पण हे करूनसुद्धा मी सुखी आनंदी झाले असते का? कारण कुणाचेच कुणावर बंधन नसल्याने तो सोडून गेला असता तर! किंवा मलाच त्याचा कंटाळा आला असता तर. ते काय कपडे आहेत सारखे बदलायला.”
इतक्या वर्षानंतर आईबाबांच्या नात्यातील गोडी जशी अजून टिकून आहे, तशीच या नात्यात टिकली असती. बहुतेक नाही. तेव्हा आता होतंय तेच चांगलंय. अन् मग डोळ्यासमोर स्वतःची लग्नप्रत्रिका दिसू लागली. रिता प्रकाश जावडेची सौ. रिता आनंद देशमुख झालेली!
-ज्योती आठल्ये