मराठमोळा अभिनेता शरद केळकरनं छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. शरद केळकरनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आज शरद केळकरचे चाहते फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात आहेत. त्याचे लाखो चाहते आहेत. आता इतक्या वर्षांनी तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या मालिकेत शरद केळकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो देखील प्रदर्शित झाला आहे.

शरद केळकची ही मालिका झी टीव्हीवर प्रदर्शित होणार असून या मालिकेचं नाव 'तुम से तुम तक' आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून सगळीकडे याचीच चर्चा रंगली आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की एक सामान्य घरातील १९ वर्षांची मुलगी अनु हिच्या लग्नासाठी तिची आई देवीकडे प्रार्थना करते. तर, दुसरीकडे ४६ वर्षांचा आर्यवर्धन हा बिझनेसमॅन असून त्याची आई लग्नाचा सल्ला देत असताना अर्ध आयुष्य निघून गेल्यानंतर आता कोणाशी लग्न करू असं बोलताना दिसतो. आता या १९ वर्षांच्या अनूमध्ये आणि ४६ वर्षांच्या आर्यवर्धनची कशी भेट होते आणि त्यांची कशी गाठ जुळते हे पाहण्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.