आजारपणाचा आपल्या दिनचर्येपासून सर्वच गोष्टींवर परिणाम होतो. पथ्य, औषधं यांनी आपलं आयुष्य व्यापून जातं. मात्र याचा सर्वात जास्त परिणाम होतो तो कामजीवनावर. अशा वेळी आपल्या जोडीदाराला सांभाळून घेत कामजीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. कसा? ते जाणून घेऊया. सध्याच्या गतिमान युगात प्रत्येकाचे राहणीमान बदललेले दिसते. जीवनशैलीत मोठा फरक पडला आहे. नव्या युगातील जीवनशैलीने ताणतणाव वाढलेत, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. फास्ट फूड, जंक फूड आणि हॉटेलिंगचे जणू व्यसनच जडले आहे. झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे आजार जडले आहेत. साधारणपणे जे आजार पूर्वी चाळिशी-पन्नाशीनंतर जडायचे, त्यांनी आता तरुणपणात आपल्यापैकी काही जणांच्या शरीरात घर केलेले दिसून येत आहे. या आजारपणांमुळे कामजीवन प्रभावित झाले आहे. हवा-पाणी-खाद्य याबरोबरच सेक्स ही मानवी गरज आहे. परंतु त्याची भूक भागविण्यात या आजारपणांची अडचण निर्माण झाली आहे. या अडसरातून मार्ग कसा काढता येईल, ते पाहूया. मधुमेह मधुमेह अर्थात डायबेटिसचा कामजीवनावर फार मोठा परिणाम होतो. कामेच्छा कमी होते, कामक्रिडा प्रभावित होते आणि उत्कर्ष बिंदू गाठणे मधुमेहींना कठीण होऊन बसते. काही मधुमेहींना तर नपुंसकत्व येते. जे रुग्ण इन्सुलिन घेतात, ते कामक्रीडा करतेवेळी अधिक उत्तेजित झाले तर हायपोग्लेसोमियाने पछाडतात. समागमाच्या वेळी हृदयाचे ठोके वाढणे, शरीराला कंप सुटणे, चक्कर येणे, लक्ष विचलित होणे, इत्यादी लक्षणे दिसून येतात. अशा अवस्थेत कामसुखाचा आनंद कसा घेता येणार? उपाय काय? हायपोग्लेसोमियाची वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसून येताच त्वरित साखरेच्या गोळ्या घ्या. लैंगिक संबंध ठेवण्याआधी जास्ती पिठूळ किंवा कर्बोदकांनी युक्त, उदा. भात, पास्ता, ब्रेड इत्यादी पदार्थ खाऊ नयेत. तसेच शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. हृदयविकार कॉरोनरी हार्ट डिसीज् असलेल्या रुग्णांस लैंगिक संबंधाच्या वेळी छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, ह्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण, कामक्रीडा करताना हृदयाचे ठोके वाढतात अन् रक्तदाबदेखील वाढतो. अशा अवस्थेत जर प्रणय आणि समागमाची क्रिया जास्त वेळ चालली तर हृदयरोग्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते. उपाय काय? ज्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका आला असेल, त्यांनी 6 आठवडे लैंगिक संबंध ठेवू नयेत. कॉरोनरी हृदयरोग्यांना जर मधुमेहाचाही विकार असेल तर हा झटका येण्याचा धोका जास्तच असतो. तेव्हा 6 आठवड्याहून अधिक काळ गेल्यानंतर शरीर पूवर्वत क्रियाशील झाले नि रक्तदाब व नाडीचे ठोके नॉर्मल झाल्यानंतर शरीरसंबंध ठेवावेत. शिवाय अशा रुग्णांनी जेवण व्यवस्थित जिरल्यानंतर, म्हणजे साधारणपणे तीन तासांनी कामक्रीडा करावी. लठ्ठपणा अलीकडे लठ्ठपणा बर्याच लोकांमध्ये दिसून येतो. अशा लोकांचे लैंगिक संबंध समाधानकारक नसतात. जाडजूड असलेल्या व्यक्तींची कामेच्छा मंदावते. कारण, शरीरात चरबीचा जास्त संचय झाल्याने आळस येतो. शिवाय समागमाची क्रियादेखील व्यवस्थित होत नाही. शरीराच्या हालचालीत जाडेपणा आडवा येतो. कित्येक जाड्या व्यक्तींना समागमात उत्कर्ष बिंदू गाठता येत नाही. कारण, हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत. उपाय काय? लठ्ठपणा हे काही भूषण नव्हे. कामजीवनच नव्हे तर आरोग्यासही तो चांगला नाही. तेव्हा लठ्ठपणा कमी करण्याचा निकराने प्रयत्न केला पाहजे. तळलेले पदार्थ, चरबी वाढविणारे मांसाहारी पदार्थ अजिबात खाऊ नयेत. व्यायाम आणि योगासने नियमितपणे करा. सकाळी लवकर उठून भरपूर चाला. जेणेकरून आपली देहयष्टी बारीक होईल, शरीर फिट राहील. अन् कामानंद घेता येईल. थायरॉईड थायरॉईडचा विकार असणार्यांमध्ये हार्मोनल बदल आढळून येतात. अचानक वजन वाढणे, अंगाची लाही लाही होणे इत्यादी. अशा विकारग्रस्त व्यक्तींमध्ये कामेच्छेचा अभाव आढळतो. उपाय काय? डॉक्टरांच्या सल्ल्याने आजारावर नियंत्रण ठेवता येते. तो नियंत्रित झाला की, शारीरिक त्रास कमी होऊन कामजीवनात संतुलन राखता येते. अस्थमा अस्थमा हा मुळातच श्वासनलिकेस अवरोध करणारा नि त्यामुळे धाप लागणारा विकार आहे. हा विकार असणारी व्यक्ती कामक्रीडा करू लागल्यास अधिक उत्तेजित होऊन तिला अस्थमाचा अॅटॅक येण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी पुरुषांच्या वीर्यात असलेल्या प्रोटीन्सची काही महिलांना अॅलर्जी होऊन श्वासनलिकेस अवरोध होतो. अन् अस्थमासदृश्य अॅटॅक येतो. काही महिला व पुरुषांना लॅटेक्सची अॅलर्जी असते. शरीरसंबंध निर्धोक ठेवण्यासाठी किंवा संततीनियमनासाठी कंडोमचा वापर केला जातो. ते कंडोम लॅटेक्सचे असते. ह्याच्या अॅलर्जीनेदेखील अस्थमाचा अॅटॅक येऊ शकतो. उपाय काय? डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रॉन्कोडिलेटर थेरपी घ्यावी. त्याच्याने आराम पडेल. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते व्यायाम व औषधोपचारांनी देखील चांगला आराम मिळतो. पाठदुखी वेगवेगळ्या कारणांनी निर्माण झालेली पाठदुखी भल्याभल्यांना बेजार करते. ह्या पाठदुखीने नित्याच्या व्यवहारावर व कामजीवनावर देखील प्रभाव पडतो. पाठदुखीने हैराण असलेली व्यक्ती काम सुख धडपणे घेऊ शकत नाही. कधी कधी कामक्रीडेत अवघड असा पवित्रा घेतल्याने स्नायू एकमेकांवर चढून पाठदुखी निर्माण होऊ शकते. उपाय काय? शरीरसुख घेताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, अवघड असा पवित्रा अथवा पोझ देण्याचा प्रयत्न करू नये. अशा पोझमध्ये जमले नाही तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या जोडीदारास पाठदुखीची समस्या असेल, त्याने खाली झोपावे व ज्याची पाठ दुखत नाही, त्याने वर राहावे. त्याचप्रमाणे भुजंगासन, शलभासन, सुलभ उत्तासन, सर्पासन आदी योगासनांचा आधार घ्यावा. त्याच्याने पाठदुखीस आराम पडेल व शरीरसुखात त्रास होणार नाही. संधीवात संधीवाताचे दुखणे असलेल्यांचे कामजीवन सुखकारक नसते. ज्याला हे दुखणे असते त्याला कामसुख घेताना क्लेश होतात व नको तो सेक्स, असे वाटते. त्यामुळे त्या व्यक्तीचा जोडीदारदेखील अतृप्त राहतो. दोघांमध्ये रुष्टता निर्माण होते. असे दुखणे असणार्याने कामक्रीडेत वेगळे प्रयोग किंवा आसनांचा वापर करू नये. उपाय काय? सेक्स करतेवेळी पायांच्या जोडांवर दाब किंवा ताण पडणार नाही, अशा आसनांचा उपयोग करावा. ज्याला संधीवाताचे दुखणे नसेल, अशा पार्टनरने ‘अॅक्टिव्ह’ अर्थात् क्रियाशील असावे व दुखणे असणार्या जोडीदाराला सांभाळून घेत कामसुखाचा आनंद घ्यावा.
Link Copied