Close

चिरतरुण राहण्याचे रहस्य (Secret Of Living Forever)


वयाच्या चाळीशीतही तुम्हाला ‘अजूनी यौवनात मी’ चा अनुभव घ्यायचाय्. मग निश्‍चितच ह्या गोष्टींचा आतापासूनच अवलंब करा नि चिरतरुण व्हा.

सकारात्मकता हवी
दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा. मन प्रसन्न असलं की सारं काही छान आणि उत्साही वाटतं. मग हा मनात भरलेला उत्साह दिवसभर तुमची साथ करेल.
सकारात्मक विचार केल्याने आनंदी वाटतं नि मन देखील शांत होतं. नकारात्मक विचार मनावर दडपण आणतात. मन दुःखी, निरुत्साही आणि अशांत होतं. त्यामुळे सकारात्मक विचारांची कास धरा अन् आनंदी राहा.
या जगात परिपूर्ण असं कोणीच नसतं. त्यामुळे आपल्या कमजोरींवर काम करा. त्यात सुधारणा घडवून आणा. आपल्या क्षमतेनुसार पूर्ण उत्साहाने आणि झोकून देऊन काम करा. त्यातून मिळणारा आनंद तुमच्या चेहर्‍यावर चमक आणेल.
तुमच्यात सुधारणा घडवून आणणारी आणि तुमचा आत्मविश्‍वास वाढवणारी प्रत्येक संधी साधा आणि तिचे सोने करा. त्यामुळे हळूहळू तुमच्यात झालेल्या सकारात्मक बदलाने तुम्ही खुलून दिसाल.
महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा फेशियल करून घ्या. बॉडी मसाज किंवा बॉडी स्पा घ्या. त्यामुळे त्वचा सुंदर आणि नितळ होईल.
योगासन, ध्यानधारणा किंवा हलका व्यायाम नियमित करा. त्यामुळे तुम्ही निरोगी व सुदृढ राहाल. योग ही एक जीवनशैली आहे. तिचा स्विकार केला तर संपूर्ण जीवन सुखकर होईल.
नकारात्मक विचार करणार्‍या, सतत रडगाणी गाणार्‍या लोकांपासून शक्य तितकं लांब राहिलेलं बरं. कारण त्यांच्या प्रभावात आपले विचारही नकारात्मक होण्याची शक्यता असते.
दिवसभरात एखाद चांगलं काम करा. त्यातून तुम्हाला समाधान लाभेल व तुमच्या मनातील सकारात्मकता वाढीस लागेल.
मुळातच अन्नात मीठ, साखरेचे प्रमाण मर्यादितच असावे. परंतु एका ठराविक वयानंतर ते प्रमाण कमी असलेले जास्त चांगले. त्यामुळे तुमची प्रकृती उत्तम राहील आणि तुम्ही टवटवीत दिसाल.
दारू, सिगरेट किंवा अन्य नशा उत्पन्न करणार्‍या पदार्थांचे सेवन शरीर स्वास्थ्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे शरीरात फॅटस्चे प्रमाण वाढून जाडेपणा येतो. त्याचबरोबर ह्या पदार्थांच्या सेवनामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे ह्यापासून दूर राहणे हे तुमच्या सौंदर्य आणि आरोग्यासाठी उत्तम.
आयुष्यात येणार्‍या समस्यांकडे सकारात्मकतेने पाहा. मीच का? माझ्यासोबतच का होतं असं नेहमी? हा दृष्टीकोन बदलायला हवा. समस्या आपल्याला खूप काही शिकवतात. त्यातून आपले विचार प्रगल्भ होतात अन् आपण समर्थ, अधिक सक्षम होतो. असा विचार केल्यास आपण समस्यांना शांतीने, संयमाने आणि धैर्याने सामोरं जाऊ शकतो.
नैराश्य, उदासीनता यांना आपल्या आयुष्यात स्थान देऊ नका. त्यामुळे आयुष्यातला आनंद, उत्साह निघून जाईल आणि नैराश्याची लकेर तुमच्या चेहर्‍यावर उमटेल.
आपल्या सगळ्यांमध्ये एक लहान मूल दडलेले असते. परंतु वयोमानुसार आपल्याला त्याचा विसर पडतो. पण ते लहान मूल जर आपण जागृत ठेवले तर आपल्याला जीवनात आनंद, मज्जा-मस्ती अनुभवता येईल.
मनाने कायम तरुण राहा. त्यामुळे तुमच्या जगण्याला नवी उभारी मिळेल. तुम्ही फ्रेश, आनंदी, उत्साही, निरोगी राहाल.

फलदायी आहार
हिरवं सफरचंद त्वचेला आर्द्रता पुरवतं. त्वचेचा पोत सुधारतो. त्यात व्हिटॅमिन अ, ब, क असल्याने त्वचा सुंदर व आकर्षक बनते.
केळ्याच्या सेवनाने त्वचा मुलायम होते. त्यात व्हिटॅमिन अ, ब, ई च्या बरोबरच मॅग्नेशियम, पोटॅशियम असल्याने त्याचा वापर फेसपॅक म्हणून केल्यास मृदु मुलायम त्वचेचा अनुभव घेता येईल.
संत्र्याचे सेवन केल्याने वाढत्या वयाचा परिणाम दिसून येत नाही.
आपल्या आहारात द्राक्षांचा समावेश करा. त्यामुळे चेहर्‍यावर सुरकुत्या येत नाहीत. तसेच चेहर्‍यावरील काळे डाग, मुरमं यासारख्या समस्या देखील कमी होतात.
अननस खाल्ल्याने त्वचा मुलायम, तजेलदार होते.
पपई खाल्ल्याने आपल्याला तंतूमय घटक, व्हिटॅमिन क आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचेवर तकाकी येते.
स्ट्रॉबेरीमुळे त्वचा चमकदार आणि तरुण राहण्यास मदत होते.

फिल गुड फॅक्टर वाढवा
सदैव हसतमुख राहा.
कोणाकडून काही नवीन शिकण्यास मिळाले, दोन चांगले शब्द ऐकायला मिळाले, प्रेरणादायी विचार कानावर पडले तर आयुष्यात त्याचा नक्की उपयोग करा. कारण आपले विचारच आपल्याला घडवत असतात.
आपल्या धकाधकीच्या जीवनात कामाव्यतिरीक्त स्वतःलाही वेळ द्या. मोकळ्या हवेत फिरा. जगण्याचा पूर्ण आनंद घ्या. मैत्रीचा आनंद लुटा नि आपल्या रटाळ आयुष्यात आनंद भरा.
आपल्या माणसांसोबत आयुष्याची मज्जा घ्या. त्यामुळे थकलेल्या जीवाला विसाव्याचे क्षण मिळतील.

सकारात्मक बदल महत्त्वाचा
स्वतःमध्ये बदल करायचं म्हटलं की त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. हा सकारात्मक बदल आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि चिरतरुण राहण्यासाठी आहे. तर मग तो सक्तीचा न होता मनापासून व्हायला हवा. आपल्या विचारांवर सारं काही अवलंबून असल्याने जरूरी आहे चांगले विचार करणं, चांगला भाव मनी ठेवणं. आपले मन स्वच्छ असेल तर मनातील प्रसन्न भाव चेहर्‍यावर उमटतात.
आपल्या त्रासाचे, दुःखाचे मूळ कारण आपले विचार असतात. त्यामुळे कधी कधी चुकीच्या विचारांमुळे गैरसमज, चुकीच्या कल्पना मनात प्रवेश करतात व त्यातून राग, द्वेष, ईर्ष्या उत्पन्न होते. असे दूषित मन असलेला चेहरा निश्‍चितच चांगला दिसत नाही. दुःखात, रागात आपण नकारात्मक विचार जास्त प्रमाणात करतो आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे आपण सगळ्यांबद्दल चांगल्या, सहयोगाच्या, प्रेमाच्या, आपुलकीच्या भावना जोपासल्या तर त्या चेहर्‍यावर दिसतील अन् तुम्हाला आतून आनंदी, उत्साही वाटेल. तसेच भूतकाळातले दुःख नि भविष्याची चिंता सोडून आजच्या क्षणाचा आनंद घ्या.

Share this article