- वर्षा गाडगीळ, कोल्हापुर
अलीकडे अध्यात्म हा विषय माझा आवडीचा व्हायला लागलाय…
खरंतर सर्वात अवघड म्हणजे अध्यात्मात शिरणं किंवा अध्यात्म आत्मसात करणं. कारण प्रपंचात गुंतून पण अध्यात्माची आवड असूच शकते…पण आवड असणं वेगळं आणि अध्यात्म आत्मसात करणं वेगळं… षड्रिपूंवर विजय मिळवून परमेश्वर प्राप्तीसाठीची मार्गक्रमणा करणं ही अध्यात्माची पहिली पायरी आहे आणि याच पहिल्या पायरीपर्यंत पोहोचणं खूप खूप कठीण आहे. कारण या पायरीपर्यंत पोहोचायचं तर मनावर ताबा ठेवावा लागतो… आणि तिथेच आपली गाडी अडकते नाही का..? निरिच्छ होणं म्हणजे कर्मकठीण…..काम,क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर या षड्रिपूंना आयुष्यातून हद्दपार करणं ज्याला जमेल तो अध्यात्मा च्या पहिल्या पायरीपर्यंत पोहचेल.
यासाठी समाधानहा अध्यात्माचा पाया आहे…नाही का? तोच पाया निर्माण करणं हे कुठे जमतंय आपल्याला..जे माझ्याजवळ आहेत्यात मी समाधानी असणं …आपल्याला जमतंच नाही हो…आणि नाहीच जमणार ..त्यात चुकीचं काहीच नाहीय्ये कारण आपण थोडेच संत आहोत….?आपण अगदी सर्वसामान्य माणसं आहोत…मी स्वतः असं समाधानी राहण्याचा प्रयत्न करतेय…याचा अर्थ.. मी अती महत्त्वाकांक्षी बनायचं नाही असं ठरवलंय….आत्ता या वयात हा…ज्या वयात ती गरजेची असेल तिथे ती हवीच….पण अती सर्वत्र वर्जयेत्…… म्हणजेच आपल्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त महत्वाकांक्षी असू नये.. नाहीतर मनस्वास्थ्य हरवते….
पण मी स्वतः अनुभवलं आहे ..की समाधानी राहिलं ना तर मनाला खूप शांतता लाभते…..सगळ्या कठीण गोष्टी सोप्या होत जातात..आणि त्या सोप्या वाटणार्या गोष्टी कालांतराने सुंदर होतात…..आपल्याला हव्या असतात अगदी तशाच..=च…म्हणून चित्ती असू द्यावे समाधान….समाधान, मनावर ताबा, वाणीवर ताबा.. आणि ’ अशी एक दैवी शक्ती आहे ती आपल्याबरोबर सतत असते’ यावर विश्वास=ज. याच मनाच्या अवस्थेत एक कविता सुचली जी तुमच्या सोबत शेअर करत आहे…
माझे सारे तुझे झाले, माझे मी पण तुला अर्पिले…
नको आता मोह माया, तुझ्या चरणी दंग काया…
हृदयी वसे तुझे रूप, श्वासांमध्ये एकरूप..
तन माझे राम व्हावे, अंतरंगी राम गावे..
नाही जपली जपमाळ, ओठी नाम सर्वकाळ..
चुके काळजाचा ठोका, तुझा ध्यास हाच हेका..
चुकवावे जन्म मरण, ओवळीते पंचप्राण..
प्रचिती दे रे एक क्षण, तुझ्या अस्तित्वाची खूण…