सिनेसृष्टीत कुणीही वारसा नसताना आपलं भक्कम स्थान निर्माण करत, कला कौशल्याने तसेच जिद्दीवर, स्वबळावर मिळवलेलं हे स्थान या शर्यतीच्या जगात टिकवून ठेवलं आहे ते म्हणजे गायक, दिग्दर्शक संजू राठोड याने. धानवड तांडा, जळगाव येथील एका छोट्याशा तांडातला मुलगा म्हणजे संजू राठोड. 'नऊवारी पाहिजे', 'बाप्पावाला गाणं', 'बुलेटवाली', 'गुलाबी साडी' यांसारखी दमदार व मिलियन व्ह्यूज मिळवलेली गाणी संजूने देत प्रेक्षकांची मन जिंकली. दहावीपर्यंत हॉस्टेलमध्ये शिक्षण झाल्यानंतर संजूने डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये असल्यापासून संजूला लिखाणाची व गायनाची आवड होतीच. त्याची ही आवड कधी व्यसन बनलं हे त्याचं त्यालाच कळलं नाही. कलाक्षेत्रात काम करणं ही संजूची जिद्द तर होतीच आणि स्वप्नही होतं.
या सिनेसृष्टीतला संजूचा प्रवास सुरू झाला तो गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. संजूचं पहिलं गाणं होतं 'बाप्पा वाला गाणं'. हे गाणं सोशल मीडियावर तुफान वायरल झालं. मिलियन व्ह्यूज मिळाल्यानंतर चक्क रितेश देशमुखने सुद्धा या गाण्यावर रील बनवली आणि ही संजूच्या कामाची पोचपावती बनली. त्यानंतर संजूने काही मागे वळून पाहिलं नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही घरच्यांनी दिलेला पाठिंबा हा त्याच्या या खडतर प्रवासात खूप मोलाचा ठरला.
गावाकडे राहिलेल्या आई-वडिलांचे जुने विचार असले तरी त्यांनी संजूला आणि त्याच्या भावंडांना उच्च शिक्षण देत त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनाने विचार केला. संजूच्या यशामागे त्याचा भाऊ सचिन, दर्शन याचीसुद्धा त्याला साथ लाभली. संजूच्या या प्रवासात गौरव राठोड (gspark) याचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय संजूचे असे बरेच मित्रमंडळी आहेत, ज्यांनी त्याच्या अडचणीच्या प्रवासात साथ सोडली नाही.
गायन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, तंत्रज्ञान, अभिनय या प्रत्येक क्षेत्रात संजूने त्याची कलाकुसर दाखवली. साधं आणि खरी वाटणारी कलाकृती देत संजूने साऱ्यांचेच मन जिंकलं आहे. सिनेसृष्टीत आल्यानंतर संजूला बरेच चांगले-वाईट अनुभव आले. यादरम्यान तो माणसं ओळखायला शिकला, आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची ताकद मिळाली. सिनेसृष्टी खूप मोठी आहे त्यामुळे इथे येणारा प्रत्येक माणूस हा चांगला वाईट अनुभव देणारा असू शकतो असं संजूचं म्हणणं आहे. संजूने शेवटी कलाकारांना असा सल्लाही दिला आहे की, कितीही कठीण परीक्षा असो घाबरून न जाता स्वतःवर, देवावर विश्वास ठेवा, यश हे नक्कीच मिळेल.