अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट रमजान ईदच्या दिवशी प्रदर्शित होतो आहे. त्यासाठी सलमान खान सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान त्याने एक फोटो शूट केलं आहे. त्यामध्ये त्याच्या हातावर भगवं घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या डायलवर राम मंदिर आहे. यावरुन आता मौलानांचा संताप झाला आहे. सलमान खानच्या हातातील घडाळ्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मौलाना यांनी त्याच्या या घड्याळ्यावरून आक्षेप घेतला आहे.
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या कपड्यांची, केसांची, घडाळ्यांची स्टाइल नेहमीच चर्चेत असते. सलमानचा ‘बीईंग ह्युमन’ हा कपड्यांचा ब्रँड चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेच. आता त्याने स्पेशल एडिशन घड्याळसुद्धा लाँच केलं आहे. ‘सिकंदर’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने त्याच्या हातात हे घड्याळ घातलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमानने त्याच्या हातातील घड्याळ दाखवत खास फोटोशूट केलंय. त्याच्या हातातील या घडाळ्याच्या मॉडेलने सर्वांचंच लक्ष वेधलंय.
कारण त्याच्या डाएलवर राम जन्मभूमी बनवण्यात आली आहे. त्याचसोबत इतरही डिझायनिंग आहे. या घड्याळाचा पट्टा भगव्या रंगाचा आहे. अनेकांना सलमानचा हा राम जन्मभूमी स्पेशल एडिशन वॉच खूपच आवडला आहे. परंतु त्यावरून काहींनी आक्षेपसुद्धा घेतला आहे. सलमानने घातलेलं राम जन्मभूमीचं हे घड्याळ हे ‘हराम’ (इस्लाममध्ये नाकारलं गेलेलं) आहे, असं धर्मगुरू आणि अखिल भारतीय मुस्लीम जमातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेल्वी म्हणाले.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना मौलाना म्हणाले, “भारतातील प्रसिद्ध मुस्लीम व्यक्तीमत्त्व सलमान खान याने राम मंदिराचं समर्थन करणारं ‘राम एडिशन’चं घड्याळ घातलं होतं. मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे सलमानसह इतर कोणत्याही मुस्लीम व्यक्तीसाठी ‘हराम’ (परवानगी नसणारं) आहे. इस्लामविरोधी संस्थांना किंवा धार्मिक चिन्हांना प्रोत्साहन देण्याची परवानगी त्यांना नाही.” मौलाना यांनी सलमानला त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करण्याची, इस्लामिक कायद्याचा (शरिया) आदर करण्याची आणि त्यांच्या तत्त्वांचं पालन करण्याचा सल्ला दिला.
“अशी कृती अन्याय्य आणि निषिद्ध आहे. त्याने माफी मागावी (तौबा) आणि अशी चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मी सलमानला सल्ला देतो की त्याने इस्लामिक कायद्याचा (शरिया) आदर करावा आणि तत्त्वांचं पालन करावं”, असं ते पुढे म्हणाले. राम जन्मभूमी असलेलं घड्याळ घालणं किंवा त्याचं प्रमोशन करणं म्हणजे इस्लामी नसलेल्या धार्मिक प्रतीकांना समर्थन देण्यासारखं आहे आणि हे अजिबात मान्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सलमान खानच्या घड्याळाची खासियत काय?
सलमान खानच्या घड्याळाचा बेल्ट भगव्या रंगाचा आहे.
सलमान खानच्या या खास घड्याळाच्या डायलवर रामजन्मभूमी कोरलेली आहे.
तसंच जय श्रीराम असंही लिहिलेलं आहे, प्रभू रामाचं चित्रही कोरलं आहे.
हनुमानाचं चित्रही कोरलं आहे
या सगळ्यामुळे या घड्याळाची डायल खूप सुंदर दिसते आहे.
सलमान खानच्या हाती असलेलं रामजन्मभूमीचं घड्याळ जेकब अँड कंपनी एपिकने तयार केलं आहे. घड्याळ जेकब अँड कंपनी एपिक एक्स रामजन्मभूमी टायटॅनियम एडिशन 2 आहे. हे लिमिटेड एडिशन वॉच असून त्याची किंमत ३४ लाख रुपये आहे. सलमान खानने घातलेलं घड्याळ केवळ राम मंदिरामुळेच नाही तर त्याच्या किंमतीमुळेही चर्चेत आहे. हे घड्याळ एपिक स्केलेटन मालिकेतील सर्वोत्तम आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्याने हातात भगवा रंगाचा पट्टा असलेले घड्याळ घातले आहे, ज्याचा डायल राम मंदिराच्या थीमवर बनवलेला आहे. या घड्याळाची किंमत ३४ लाख रुपये आहे असं सांगितलं जातं आहे.