Close

राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी यांनी पुण्यात सुरू केलं स्वतःचं नवं हॉटेल (Salil Kulkarnis Step Into Hotel Business)

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णींनी आता उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी यांनी पुण्यात स्वतःचं नवं हॉटेल सुरू केलं आहे. ही आनंदाची बातमी त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवरून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात सलील कुलकर्णींनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये सलील कुलकर्णी म्हणाले होते की, आज मला दोन चांगल्या बातम्या द्यायच्या आहेत. भारताने विश्वचषक जिंकल्यामुळे आपण सर्वजण इतक्या छान मूडमध्ये आहोत. सगळ्यांचे चेहरे हसरे आहेत. म्हणून तुम्हाला मी आज दोन चांगल्या बातम्या द्यायचं ठरवलं आहे. लहानपणापासून ज्या ज्या गोष्टींविषयी वेड होतं. म्हणजे चित्रपट तर चित्रपट केला. मग टेलिव्हिजन तर त्यात रिॲलिटी शो केला. खूप गाणी केली. पण गाण्यांबरोबर अजून एक वेड म्हणजे खाणं. कुठेतरी असं वाटतं होतं की, खाण्यासंबंधित काहीतरी करायला हवं आणि असा विचार करत इथे (बँगलोर कँटीन) एक दिवस आलो. इथली चव बघितली. इथला डोसा खाल्ला. इथली कॉफी प्यायलो आणि असं वाटलं की, आपला काहीतरी सहभाग इथे हवाच. त्यामुळे बँगलोर कँटीनशी मी सहयोगी होतोय. आता माझा बँगलोर कँटीनमध्ये सहभाग असणार आहे. लवकरच नवीन ब्रँच सिंहगडच्या खाऊगल्लीमध्ये येत आहे.”

पुढे सलील कुलकर्णी म्हणाले, “दुसरी चांगली बातमी म्हणजे ‘एकदा काय झालं’च्या राष्ट्रीय पुरस्कारानंतर सगळेजण विचार होते पुढला चित्रपट कधी? तर मी चित्रपट लिहित होतो, पण ही बातमी कधी सांगावी हे कळतं नव्हतं. पण विश्वचषक जिंकल्यानिमित्ताने मी ही बातमी सांगतो की, नवीन चित्रपट तयार आहे. गोष्ट लिहून तयार आहे. लवकरच त्याचं नाव आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्ही जाहीर करू. बँगलोर कँटिनविषयी पुढच्या भागात नक्की सांगणार आहे.”

३० जूनला सलील कुलकर्णींनी या दोन चांगल्या बातम्या जाहीर केल्यानंतर काल, ६ जूनला बँगलोर कँटिनची फ्रँचायझी सिंहगड रोडच्या खाऊगल्ली सुरू केली आहे. सलील कुलकर्णींच्या आईच्या हस्ते त्यांच्या हॉटेलचं उद्घाटन झालं. याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत लिहिलं आहे, “लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कँटिनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कँटिनला.”

दरम्यान, सलील कुलकर्णींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते संगीत क्षेत्रातील काम सांभाळत चित्रपटाचं देखील काम करत आहेत. ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाला ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला. आता सलील कुलकर्णींचा नवा चित्रपट कोणता असणार आहे? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Share this article