मंगळवारी ५ दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी परतला आहे. डिस्चार्जपूर्वी, सैफ अली खान त्या रिक्षाचालकाला भेटला जो त्याला त्या रात्री रुग्णालयात घेऊन गेला होता. आता सैफचे ऑटो ड्रायव्हरसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत आणि चाहते सैफच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.
हा तोच ऑटो ड्रायव्हर भजनसिंग राणा आहे, ज्याने त्या रात्री रक्ताने माखलेल्या सैफला लीलावती रुग्णालयात नेले होते. जर त्या रात्री त्या ऑटो चालकाने सैफला वेळेवर रुग्णालयात नेले नसते तर सैफ अली खानच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. भजन सिंग यांनीही त्या रात्रीची संपूर्ण कहाणी माध्यमांना सांगितली होती की तो त्या रात्री लिंकिंग रोडवरून राईडच्या शोधात जात होता. सतगुरू शरण इमारतीतच्या इथे पोहचताच, एका महिलेने त्यांना हाक मारली आणि सांगितले की कोणाला तरी लवकर रुग्णालयात घेऊन जावे लागेल. "मी चार जणांना एका जखमी माणसाला घेऊन येताना पाहिले. त्यापैकी एक रक्ताने माखलेला होता, त्याने पांढरे कपडे घातले होते आणि त्याच्यासोबत एक लहान मूल होते. तेव्हा मला माहित नव्हते की तो सैफ अली खान आहे."
आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी सैफ त्या ऑटो ड्रायव्हरला भेटला. त्याने त्याला भेटण्यासाठी खास बोलावले आणि मिठी मारून त्याचे आभार मानले . एवढेच नाही तर त्याने त्याच्यासोबतचे काही फोटोही काढले जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केवळ सैफनेच नाही तर त्याची आई शर्मिला टागोर यांनीही ऑटो ड्रायव्हरचे आभार मानले आणि त्याच्या मदतीबद्दल त्याचे कौतुक केले. सैफने भजनसिंग राणा यांना आश्वासन दिले की जेव्हा जेव्हा त्यांना मदतीची आवश्यकता असेल तेव्हा त्यांना मदत केली जाईल.
सैफने या कृत्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. चाहते म्हणत आहेत की सैफ मनानेही नवाब आहे. सैफने आपला जीव वाचवणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाचे आभार मानून मोठेपणा दाखवला आणि यासाठी तो कौतुकास पात्र आहे.