अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्याचे समोर आले आहे. काल रात्री अडीचच्या सुमारास अभिनेत्याच्या राहत्या घरी हा प्रकार घडला.
अभिनेता सैफ अली खान घरी झोपला असताना अज्ञात चोर त्याच्या घरी घुसला. त्याने त्याच्या मुलांच्या रूममध्ये उडी मारली तेव्हा मुलांच्या नॅनीला चोराची चाहूल लागली आणि तिने आरडा ओरड करायला सुरुवात केली. आरडा ओरड ऐकून सैफ झोपेतून जागा झाला आणि बाहेर आला तेव्हा त्याचा सामना चोराशी झाला.
अचानक सैफ समोर आल्यामुळे चोराने त्याच्यावर हल्ला केला. अभिनेत्याच्या मानेवर तसेच पाठीवर आणि हातावर चोराने धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला आहे.
हल्ला झाल्यानंतर घरात गोंधळ सुरू झाला. सैफ वाचवण्यासाठी घरातले सगळेजण जमले याच संधीचा फायदा घेत चोराने पळ काढला.
सध्या अभिनेता सैफ अली खान लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती असून त्याच्यावर ऑपरेशन केले जात आहे. त्याच्या पाठीत खूपलेल्या चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला आहे.