सचिन तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियममधील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण काल (१ नोव्हेंबर) पार पडले. यावेळी खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी सचिन सचिनचा जयघोष देखील केला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल क्रिकेटचा महान दिग्गज सचिन तेंडुलकरच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण केले गेले. सचिन तेंडुलकरचा आयकॉनिक शॉट खेळतानाचा हा लाईफ साईज पुतळा आहे. हा पुतळा सचिन तेंडुलकर स्टँडच्या जवळ बसवण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अधिकारी यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
आर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी हा पुतळा तयार केला आहे. ते मुळचे अहमनगर जिल्ह्यातील आहेत. सचिन तेंडुलकरने बरोबर १० वर्षापूर्वी आपल्या मुंबईमधील होम ग्राऊंडवर, वानखेडेवर शेवटचा सामना खेळला होता. त्याच दिवसाच्या मुहूर्तावर त्याच्या वानखेडे स्टेडियमवरील पुतळ्याचे अनावरण केले गेले आहे. यापूर्वी सचिन हा आपल्या ५० व्या वाढदिवसादिवशी पुतळ्याचे अनावरण करेल असे सांगितले होते. मात्र पुतळ्याचे फिनिशिंग टच राहिले असल्यामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली. आता जवळपास सहा महिन्यांनी सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अखेर अनावरण झाले आहे.