Close

सौंदर्यवर्धक तांदळाचे पाणी, त्वचा आणि केसांसाठी नैसर्गिक उपाय (Rice Water; For Beautiful hair And Growing Hair)

तांदळाचे पाणी हे उत्तम नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. तांदळाच्या पाण्याने चेहरा आणि केस धुतल्यास आश्चर्यकारक लाभ मिळू शकतात. कसे ते पाहूया.
तांदळाचं पाणी म्हणजेच भाताची पेज केवळ आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यवृद्धीसाठीही उपयुक्त आहे. त्वचेचा रंग उजळण्यासाठी तसंच त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, फार पूर्वीपासून तांदळाच्या पाण्याचा उपयोग केला जात आहे. जपान आणि कोरिया सारख्या देशातील महिलांच्या ब्युटी केअर रुटीनमध्ये तांदळाच्या पाण्याचा समावेश असतो. त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पोषक असलेल्या घटकांचा तांदळामध्ये समावेश आहे. म्हणूनच त्वचा आणि केसांसाठी हे तांदळाचे पाणी रामबाण उपाय आहे.

तांदळाच्या पाण्यातील घटक
तांदळाच्या पाण्यामध्ये खनिज, व्हिटॅमिन, अमिनो अ‍ॅसिड आणि अँटी ऑक्सिडेंट्सचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे सर्व घटक त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी पोषक आहेत.

असे तयार करा तांदळाचे पाणी
पहिली पद्धत : अर्धा कप तांदूळ घ्या आणि स्वच्छ धुवा. यानंतर एका भांड्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि दोन कप पाणी मिक्स करा. गॅसच्या मध्यम आचेवर तांदूळ शिजत ठेवा. तांदूळ प्रेशर कुकरमध्ये शिजवू नका. पाणी घट्ट होऊ लागल्यानंतर गॅस बंद करा. दुसर्‍या भांड्यामध्ये तांदळाचे पाणी गाळून घ्या. या पाण्याला पेज किंवा मांड असंही म्हटलं जातं. एका हवाबंद डब्यामध्ये हे पाणी भरून ठेवा आणि तुमच्या वेळेनुसार त्याचा वापर करावा.
दुसरी पद्धत : अर्धा कप पॉलिशरहित तांदूळ धुऊन ते 3 कप पाण्यामध्ये भिजवून ठेवा. 1 ते 4 दिवस हे पाणी असेच ठेवा. हे पाणी गाळून ते सौंदर्यवर्धक म्हणून वापरा. उरलेल्या तांदळाची जाडसर पेस्ट करून त्याचा स्क्रबसारखा वापर होऊ शकतो. या स्क्रबमध्ये तुम्ही दही, हळद, बदामाची पेस्ट आणि ऑलिव्ह तेलाचे काही थेंब घालू शकता.

तांदळाच्या पाण्याचा कसा वापर करायचा

  • तांदळाच्या पाण्याने चेहर्‍यास नियमित मालीश केल्याने सनबर्न पिगमेंटेशनचा त्रास होत नाही आणि त्वचा उजळते.
  • कोरडी त्वचा असणार्‍या व्यक्तींसाठी तांदळाचं पाणी अतिशय उपयुक्त ठरते. त्यांनी तांदळाचं पाणी रात्रभर त्वचेवर लावून ठेवल्यास रूक्षपणामुळे होणारी इचिंग होणार नाही.
  • ब्लॅक हेड्सवर तांदळाच्या पाण्याचा परिणाम अ‍ॅस्ट्रिंजेंटसारखा होतो.
  • मुरुमांची समस्या कमी करण्यासाठीही तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. मुरुमांमुळे चेहर्‍यावर येणारी सूज, लालसरपणा, डाग इत्यादी समस्याही दूर होतील.
  • तसंच सनबर्नचा त्रास कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास त्वचेला थंडावा मिळेल. पाणी तयार करून फ्रीजमध्ये ठेवा आणि कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा.
  • तांदळाचे पाणी आपल्या चेहर्‍यासाठी एक उत्तम क्लींझर आणि टोनरच्या स्वरूपात कार्य करते. कापसाच्या मदतीने हे पाणी चेहर्‍यावर लावा आणि सुकू द्या. थोड्या वेळानं थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. तांदळातील पोषक घटकामुळे आपल्या त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते.
  • ओपन पोअर्सच्या समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल तर तांदळाच्या पाण्याचा उपयोग करावा. कापसाच्या मदतीने चेहर्‍यावर तांदळाचे पाणी लावा. या पाण्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार होईल. महत्त्वाचे म्हणजे त्वचेवरील रोमछिद्रांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
  • तांदळाचे पाणी कोरड्या त्वचेसाठीही रामबाण उपाय आहे. कोरड्या त्वचेवर होणारी जळजळ या पाण्यामुळे कमी होते. रॅशेज, खाज सुटणे आणि रूक्षपणा दूर करण्यासाठी तांदळाच्या पाण्याची मदत मिळेल.
  • महागडी अँटी एजिंग क्रीम वापरण्याऐवजी तांदळाच्या पाण्याचा वापर करून पाहा. क्रीमच्या तुलनेत या नैसर्गिक उपचारामुळे त्वचेला भरपूर लाभ मिळतील. त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत मिळेल. शिवाय चेहर्‍यावरील डाग, सुरकुत्या देखील कमी होतील. या पाण्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहरा चमकदार देखील होतो. तांदळाचे पाणी चेहर्‍यावर लावा आणि सुकू द्या. थोड्या वेळाने तांदळाच्या पाण्यामध्ये नारळाचे तेल मिक्स करा आणि चेहर्‍यावर मसाज करा. या उपायामुळे चेहरा सतेज दिसेल.
    केसांसाठी उत्तम कंडिशनर
  • तांदळाच्या पाण्याने केस धुण्यास सुरुवात करा. काही दिवसातच केसांशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळेल. केस चमकदार, मजबूत आणि घनदाट होतील.
  • तांदळाचे पाणी केसांमध्ये लावा. एखादे तेल आणि तांदळाचे पाणी एकत्र घ्या. या मिश्रणाने केसांचा मसाज करा. यामुळे तुमच्या केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. या उपायामुळे कोंड्याची समस्या देखील कमी होते.
  • तांदळाचं पाणी केस अकाली पांढरे होऊ देत नाही. तसेच यामुळे केसांचे गळणे कमी होते.
  • तांदळाच्या पाण्यामध्ये भरपूर जीवनसत्त्व आणि प्रोटीन्स असतात. आठवड्यातून 2-3 वेळा ते केसांना लावा. यामुळे केसांना फाटे फुटत नाहीत.
  • 1 कप तांदळाच्या पाण्यामध्ये 1 छोटा चमचा मध आणि इसेंशिअल ऑइलचे काही थेंब घाला. हे मिश्रण स्वच्छ केसांमध्ये लावा आणि 15 मिनिटानंतर धुऊन टाका. यामुळे केस चमकदार आणि मुलायम बनतील.
  • तांदळाचे पाणी बॉडी स्क्रब म्हणूनही वापरता येईल. त्यात नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह तेल घालू शकता.
  • तांदळाच्या पाण्यामध्ये शिकेकाई पावडर आणि कोरफडीचा रस घाला. या मिश्रणाने केस स्वच्छ करा. यामुळे केसांच्या मुळाशी खाज येणार नाही.

Share this article