प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सोशल मीडियावर बराच लोकप्रिय आहे. त्याचे पॉडकास्ट तुफान व्हायरल होतात आणि त्याला नेटकऱ्यांकडून खूप पसंती मिळते. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रणवीर नुकताच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गोव्याला फिरायला गेला. मात्र गोव्याच्या समुद्रात पोहताना रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा जीव धोक्यात आला होता. त्याने खुद्द इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित घडलेली थरारक घटना सांगितली. एका IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने रणवीर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला बुडण्यापासून वाचवलं.
रणवीर अलाहाबादियाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुम्हा सर्वांना गोव्यातून ख्रिसमसच्या शुभेच्छा! माझ्या आयुष्यात हा ख्रिसमस अनेक घडामोडींनी भरलेला ख्रिसमस ठरला. मला व माझ्या गर्लफ्रेंडला खुल्या समुद्रात पोहायला खूप आवडते. मी लहान असल्यापासून समुद्रात पोहतो. आम्ही दोघे चांगले जलतरणपटू आहोत; पण निसर्ग कधीतरी तुमच्या क्षमतांची परीक्षा घ्यायचे ठरवतो. काल समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आम्ही बुडत होतो. माझ्याबरोबर हे आधीही झाले आहे. मात्र, त्यावेळी माझ्याबरोबर कोणीही नव्हते. एकटे पोहत बाहेर येणे सोपे आहे. पण, तुमच्याबरोबर कोणी असेल, तर त्यांना तुमच्याबरोबर बाहेर आणणे कठीण असते. ५-१० मिनिटे आम्ही प्रयत्न केल्यानंतर मदतीसाठी हाक मारली. जवळच पोहत असलेल्या एका कुटुंबाने आम्हाला मदत केली. लाटांमध्ये पोहायला मजा येते; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आम्ही अडचणीत सापडलो. आम्ही पाण्यात बुडण्यापासून वाचण्यासाठी धडपडत होतो. जेव्हा खूप पाणी पोटात गेले आणि मी थोडा पाण्याच्या आत जाऊ लागलो, त्याच वेळी मदत मागण्याचे ठरवले.”
“आम्हा दोघांना वाचवणाऱ्या आयपीएस पती व आयआरएस पत्नी असलेल्या कुटुंबाचा मी ऋणी आहे. या अनुभवामुळे आम्ही नि:शब्द झालो आहोत; पण त्याबरोबरच आम्ही कृतज्ञदेखील आहोत. असे वाटले की, या संपूर्ण घटनेत देवानेच आमचे रक्षण केले. आम्ही जिवंत आहोत यामुळे आम्हाला कृतज्ञता वाटत आहे. या अनुभवामुळे माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.”, असे लिहीत रणवीरने त्याच्या पोस्टमध्ये तो व त्याची गर्लफेंड पूर्णत: बरे असल्याचे म्हटले आहे.
ही पोस्ट शेअर करताना रणवीर अलाहाबादियाने त्याचे व त्याच्या गर्लफ्रेंडचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबरच समुद्रात पोहतानाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. रणवीर अलाहाबादिया अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो शेअर करतो; मात्र तिचा चेहरा दाखवत नाही. त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, याबद्दल त्याने खुलासा केलेला नाही. त्याची गर्लफ्रेंड कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.