दिवंगत दिग्गज अभिनेता राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'बावर्ची' या आयकॉनिक चित्रपटाचा रिमेक होणार आहे. चित्रपट निर्मात्या अनुश्री मेहता हिच्यावर या आगामी रिमेक चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
'बावर्ची' हा चित्रपट १९७२ मध्ये हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. यात जया बच्चन आणि असरानी यांच्यासह राजेश खन्ना प्रमुख भूमिकेत होते. विशेष म्हणजे, हा चित्रपटही रबी घोष अभिनीत १९६६ साली आलेल्या तपन सिन्हा यांच्या 'गाल्पो होलियो सत्ती' या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक होता.

चित्रपट दिग्दर्शित करण्याबद्दल उत्सुक असलेली अनुश्री मेहता म्हणाली, "जेव्हा माझे बिझनेस पार्टनर अबीर सेनगुप्ता (जादुगर फिल्म्स), समीर राज सिप्पी आणि मी अशा तिघांनी मिळून या आयकॉनिक चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही स्पष्ट होतो की आम्ही त्यांचा रिमेक अत्यंत प्रेमाने आणि आदराने करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. बावर्ची चित्रपटावरील आमच्या चर्चेदरम्यान, अबीर आणि समीरचे असे मत झाले की या रिमेकचे लेखन आणि दिग्दर्शन मी करावे."

"ही कथा मी उत्तम प्रकारे मांडू शकेन याबद्दल त्यांना खात्री वाटत होती. आम्ही आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत होतो आणि मी लेखक-दिग्दर्शक म्हणून जबाबदारी घेण्यासाठी मनापासून सहमती दिली," असं त्या पुढे म्हणाल्या.

"बावर्ची चित्रपटाचा रिमेक बनवताना सध्याच्या काळानुसार त्याचे रुपांतर करणे आणि आज आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगाशी तो अधिक संबंधित बनवणे आणि मूळचा आत्मा आणि हेतू अबाधित ठेवणे ही यामागची संकल्पना आहे. बावर्ची हा स्वतः बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. हृषिदा यांनी त्यांच्या काळातील चित्रपट बनवण्यासाठी तो पुन्हा तयार केला आणि तो त्या कालखंडाशी सुसंगत बनवला. बावर्चीची क्लासिक कथा सर्व वयोगटातील कौटुंबिक चित्रपटाचे प्रेक्षक एकत्र पाहू आणि आनंद घेऊ शकतील अशा पद्धतीने पुन्हा सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. मी एक निरोगी, अविस्मरणीय कौटुंबिक अनुभव तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे," असे अनुश्री मेहता म्हणाली. सध्या या आगामी रिमेक चित्रपटाच्या कालाकारांची निवड सुरू झाली आहे.