Close

‘पुष्पा २’ चित्रपटामध्ये‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन (Pushpa 2 Exclusive: Not Shraddha Or Triptii Dimri, Sreeleela To Join Allu Arjun For A Dance Number)

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा: द रूल’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी आलेल्या ‘पुष्पा: द राइज’मध्ये समंथा रुथ प्रभूच्या ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगने सिनेविश्वात प्रचंड खळबळ उडवली होती. प्रेक्षकांमध्येही हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं.

‘पुष्पा २’मध्येही ‘ऊ अंटावा’ इतकंच दमदार आयटम नंबर असणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या गाण्यात यावेळी समंथा दिसणार नाही. या गाण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून जान्हवी कपूर आणि श्रद्धा कपूर यांचं नाव चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातम्यांनुसार ‘स्त्री २’च्या यशानंतर ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांनी या सिनेमातील आयटम डान्ससाठी श्रद्धा कपूरशी संपर्क केला होता. मात्र, आता कळतंय की हे शक्य झालं नाही. परंतु, ताज्या माहितीनुसार, या गाण्यात आता दक्षिणेतील नवोदित अभिनेत्रीला संधी मिळाली आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अल्लू अर्जुन स्वतः एक अत्यंत कुशल डान्सर आहे आणि त्याची डान्समधील गती व अदा याची जी क्षमता आहे, तशी क्षमता फारच कमी कलाकारांमध्ये आहे; त्यामुळे ‘पुष्पा २’मध्ये त्याच्या समोर दमदार परफॉर्मन्स साकारणारी कलाकार हवी होती. दक्षिणेतील नवोदित अभिनेत्री श्रीलीला एक उत्कृष्ट डान्सर असल्याने ‘पुष्पा २’ मधील आयटम नंबरसाठी तिची निवड करण्यात आली आहे.

श्रीलीलाने ‘गुंटूर करम’ चित्रपटातील ‘कुरिची मदाथापेटी’ गाण्यात महेश बाबूबरोबर धमाकेदार नृत्य सादर केले होते. त्यांच्या या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. टॉलीवूडमध्ये श्रीलीला नवोदित डान्सर म्हणून नावाजली गेली आहे. ‘धमाका’ चित्रपटातील ‘पल्सर बाईक’ आणि ‘जिंथाक’ या गाण्यांमध्ये तिने आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

‘पुष्पा २’च्या निर्मात्यांनी श्रीलीलाला याआधीही या गाण्यासाठी संपर्क साधला होता. काही वृत्तांनुसार, तिने यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यामुळे निर्मात्यांनी श्रद्धा कपूर, जान्हवी कपूर आणि तृप्ती डिमरी यांसारख्या बॉलीवूड अभिनेत्रींचा विचार केल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. मात्र, नव्या अहवालानुसार या केवळ अफवा होत्या आणि प्रोडक्शन हाऊसने अशी कोणतीही चर्चा केली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Share this article