पुरण खवा बर्फी
साहित्य : 1 वाटी शिजवलेलं पुरण, 1 वाटी खवा, दीड वाटी साखर, अर्धा टीस्पून वेलदोड्यांची पूड, पाव वाटी काजू-बदामाचे पातळ काप, काही केशर काड्या.
कृती : डाळीचं पुरण, खवा आणि साखर एकत्र करून शिजत ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. साखर वितळल्यामुळे हे मिश्रण प्रथम पातळ होईल. मात्र सतत ढवळत घट्ट येईपर्यंत शिजवा. नंतर त्यात वेलदोड्यांची पूड, केशर काड्या आणि काजू-बदामाचे काप घालून एकत्र करा. मिश्रण तळ सोडू लागल्यावर, एका ताटाला तुपाचा हात लावून, त्यात हे मिश्रण ओता आणि पसरवा. साधारण थंड झाल्यावर, सुरीने काप पाडा.
पुरणाची खीर
साहित्य : 1 वाटी चणा डाळ, 1 लीटर दूध, अर्धा टीस्पून वेलदोड्यांची पूड, काही केशर काड्या, पाव वाटी काजू-बदामाचे काप, पाऊण वाटी साखर.
कृती : कुकरमध्ये बेताच्या पाण्यात चण्याची डाळ शिजवून घ्या. गरम असतानाच डावाने घोटून घ्या. दुसर्या पातेल्यात दूध उकळवत ठेवा. दूध आटून पाऊण भाग झालं की, त्यात घोटलेलं पुरण, साखर, वेलदोड्यांची पूड, केशर काड्या आणि काजू-बदामाचे काप घाला. उकळी आल्यावर आच बंद करा.