भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा आणि प्रियंका चोप्रा निर्मित 'अनुजा' या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मच्या श्रेणीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे हे नामांकन पुढे ढकलण्यात आले होते, परंतु आता ते गुरुवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी हे १७ जानेवारीला जाहीर होणार होते.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्कर पुरस्कार २०२५ साठी जगभरातील चित्रपटांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 'अनुजा'ने लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपटात ९ वर्षांच्या 'अनुजा'ची कथा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲडम जे. ग्रेव्हज यांनी केले आहे. हा एक भारतीय-अमेरिकन चित्रपट आहे.
‘अनुजा’ चित्रपटाची कथा अनुजा (सजदा पठाण) या ९ वर्षांच्या मुलीची आहे. ती दिल्लीत एका कपड्याच्या कारखान्यात काम करते. ती बालकामगार आहे. अनुजाला अचानक शाळेत जाण्याची संधी मिळते, पण त्या बदल्यात तिला तिच्या आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो. या निर्णयाचा फटका अनुजा आणि तिच्या बहिणीच्या भविष्याशी संबंधित आहे. या शॉर्ट फिल्मचे शूटिंग दिल्लीत झाले आहे.
हा चित्रपट केवळ बालमजुरी आणि गरीब लोकांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षावर बोलत नाही तर या चित्रपटात दोन बहिणींचे नाते आणि त्यांचे प्रेमही दाखवण्यात आले आहे. त्यांचे आयुष्य सुधारण्याचा निर्णय त्यांच्या नात्याची कशी परीक्षा घेतो हे देखील लघुपटात दाखवले आहे. आपल्या देशात आजही मुलींना कसा संघर्ष करावा लागतो हेही ‘अनुजा’ या शॉर्ट फिल्ममध्ये सांगण्यात आले आहे.
या चित्रपटातील 'अनुजा'ची भूमिका ९ वर्षांची मुलगी सजदा पठाण हिने साकारली आहे. सजदा ही खऱ्या आयुष्यात अनाथ आहे. सलाम बालक ट्रस्टमध्ये ती राहते. सजदाने यापूर्वी २०२३ मध्ये आलेल्या 'द ब्रेड' या चित्रपटात देखील काम केले आहे.
अनन्या शानभागने 'अनुजा' चित्रपटात सजदा पठाणच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहे. यासोबतच या शॉर्ट फिल्ममध्ये नागेश भोसले आणि गुलशन वालिया देखील आहेत. स्कार्स पुरस्कार सोहळा हा २ मार्च २०२५ रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन कॉनन ओब्रायन करणार आहेत. तर 'अनुजा' ने आतापर्यंत न्यूयॉर्क शॉर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२४, हॉलिवूड शॉर्ट्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट लाइव्ह इन ॲक्शन फिल्म आणि मॉन्ट क्लेअर फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार जिंकले आहेत.