पोस्ट-पार्टम सायकोसिस हा एक गंभीर स्वरूपाचा भीतीदायक मानसिक आजार आहे. या आजाराला तातडीच्या मानसोपचाराची गरज असते, कारण त्यामुळे मातेच्या जिवाला तसेच तिच्या बाळाच्या जिवाला धोका संभवू शकतो. बाळाला जन्म दिलेल्या प्रत्येक 1000 स्त्रियांमधील 1-2 स्त्रियांवर याचा परिणाम झालेला दिसतो. या आजाराबद्दल प्रसूती व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. नेहा कर्वे यांनी दिलेली माहिती अतिशय मौलिक आहे.
एक मूल वाढवायला संपूर्ण गावाची गरज लागते, असं बरेचदा म्हटलं जातं. खर्या अर्थाने पाहायचं झालं तर ही म्हण बाळाला मोठे करण्याच्या बाबतीत जितकी लागू पडते तितकीच ती मातेलाही लागू पडते. प्रसूतीवेदना आणि बाळाला जन्म देणे हे स्त्रीच्या आयुष्यातील बहुधा सर्वाधिक लक्षणीय प्रसंग असतात. या काळात शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत होणारे बदल, मानसशास्त्रीय आणि जैविक बदल इतके टोकाचे असतात की त्यामुळे ती प्रचंड मोठ्या शारीरिक व भावनिक स्थित्यंतरातून जाते. हे सर्व बदल शरीराच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करतात.
प्युरपेरियम काळात (प्रसूतीनंतर सहा महिन्यांचा काळ) स्त्रीची अवस्था अत्यंत असहाय असते, त्यातच नियंत्रण गमावल्याची भावना तिच्या मनात घर करते. नवमातेच्या इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये, तिच्या कौटुंबिक विश्वामध्ये प्रचंड बदल घडून येतात, त्यामुळे काही स्त्रियांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात काही अडचणी येतात, तर इतर काही स्त्रियांच्या मन:स्थितीमध्ये होणारा बिघाड अतिशय गंभीर आणि कमकुवत करणारा असू शकतो. याच स्थितीला ’पोस्टपार्टम डिप्रेशन’; म्हणजे प्रसूतिपश्चात येणारे नैराश्य असे म्हणतात.
फोर्टिस नेटवर्कमधील हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी येथील प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नेहा कर्वे यांनी वरील मौलिक माहिती दिली आहे. त्या पुढे म्हणतात -
अनेकदा पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास सहन करणार्या स्त्रियांची व्यथा मूकच राहते. त्यांची मनोवस्था कुणाच्याही लक्षात येत नाही, कुणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच एक समाज म्हणून अशा स्थितीतून जाणार्या स्त्रिया ओळखणे आणि त्यांना या मन:स्थितीसाठी योग्य ते उपचार मिळवून देण्यास मदत करणे हे एक समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.
गरोदर स्त्रियांमधील समस्यांना कसे ओळखावे?
अशा प्रसंगी प्रेमाने वागून, काळजी घेऊन मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा महिलेशी बोलणे, तिने प्रसूतीचा काळ कसा घालवला याची विचारपूस करणे, तिला उदास वाटते आहे का, मन भरून येत आहे का याची चौकशी करणे अशा साध्या कृतींमुळे तिच्या मनात दबलेल्या भावना बाहेर पडू शकतात. घरच्या कामांमध्ये मदत करणे, तिला पुरेशी झोप मिळेल याची काळजी घेणे, तिला काही काळ स्वत:साठी काढता यावा, तिच्या व्यावसायिक कामांमध्ये तिला मदत मिळावी या दृष्टीने प्रयत्न केल्यास तिच्या मनावरील ओझं कमी करण्याच्या कामी दूरगामी परिणाम होऊ शकतो. तिच्या वागण्यात काही बदल जाणवल्यास किंवा ती आपल्या स्वभावापेक्षा वेगळे वागत असताना दिसल्यास व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घ्या. गरोदर किंवा स्तनदा मातांची काळजी घेणारे डॉक्टर्स प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी आवर्जून प्रश्न विचारतात. त्यामुळे स्त्रीच्या वर्तणुकीत काही बदल दिसून आल्यास तिच्या कुटुंबातील सदस्य/देखभाल करणारे सदस्य यांनी असे बदल डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यायलाच हवेत.
आधीपासूनच्या काही मानसिक स्वास्थ्यविषयक समस्या असलेल्या महिलांची काळजी मानसोपचार तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ यांच्या साथीने, इतर मानसिक स्वास्थ्य तज्ज्ञांच्या टीमकडून घेतली जाते. मानसोपचार तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ यांच्याबरोबर इतर मानसिक स्वास्थ्य तज्ज्ञांच्या टीमच्या साथीने काळजी घेतली जाते. त्याचवेळी अशा स्त्रीच्या देखभालीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला तिच्या स्थितीची, तिच्या गरजांची आणि धोक्याची लक्षणे माहीत असली पाहिजेत. सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. महिलेला मदतीची गरज आहे असे काळजीवाहू व्यक्तींना वाटल्यास त्यांनी लगेचच डॉक्टरांना सूचना दिली पाहिजे. स्त्रियांना विशेषत्वाने त्यांच्या आयुष्यातील या अनेक गोष्टींची मागणी करणार्या टप्प्यामध्ये उद्भवणार्या विशिष्ट गरजांनुसार देखभाल आणि मार्गदर्शनाची गरज भासेल हे लक्षात घ्यायला हवे.