भररस्त्यावरून मध्यरात्री घोडागाडी शर्यत लावणाऱ्या ३ जणांना काशिगांव पोलिसांनी पायबंद घातला. ‘पेटा’ या प्राणिमात्रांचे हक्क जपणाऱ्या संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले.
मीरा रोड येथे मध्यरात्री ३ घोडागाड्यांची शर्यत या आरोपींनी आयोजित केली होती. प्रत्येक गाडीला २ असे ६ नर जातीचे घोडे जुंपण्यात आले होते. त्यांनी शर्यतीत वेगाने पळावे, म्हणून हे आरोपी त्यांना चाबकाने फटकारत होते. मध्यरात्री भर रस्त्यात चाललेली ही शर्यत पाहण्यासाठी स्कूटरस्वार त्यांच्या बरोबरीने धावत होते.
घोडागाडी शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली असताना, या आरोपींनी कायदा मोडण्याचे धाडस केले. तेव्हा पेटा या प्राणिमात्रांवर दया दाखविणाऱ्या संस्थेने तक्रार करून निदर्यपणे घोड्यांना पळवून, रहदारीस अडथळा व रस्त्यावरील जनतेच्या जिवितास धोका निर्माण करण्याचा, काशिगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बेनी परेरा, रन्सी पिटर कालतील व ओविन डिमेलो यांना अटक केली.