Close

पाकातील पुर्‍या (Pakatil Purya)

साहित्य : 4 वाट्या बारीक रवा, 1 वाटी आंबट दही, 7 वाट्या साखर, अर्धा वाटी तेल, तळण्यासाठी तूप, चवीनुसार मीठ, केशर किंवा केशरी रंग, लिंबू.
कृती : तेल गरम करून रव्यामध्ये घाला. त्यात मीठ व दही घालून रवा घट्ट भिजवून घ्या. हा रवा झाकून दोन तासांकरिता बाजूला ठेवून द्या. नंतर रवा चांगला कुटून घ्या. साखरेचा दोन तारी पाक तयार करा. त्यात केशरी रंग किंवा केशर घाला. आवडीनुसार लिंबूरस घाला. रव्याच्या पिठाच्या सम आकाराच्या पुर्‍या लाटून, तूप गरम करून त्यात तळून घ्या. तळलेल्या पुर्‍या लगेच साखरेच्या पाकात घाला. एकेक पुरी तळून पाकात घाला आणि दुसरी पुरी तळल्यावर पहिली पुरी पाकातून काढून उभी करून ठेवा. म्हणजे अतिरिक्त पाक निथळून जाईल.
टीप :
साखरेचा पाक गरम असावा, म्हणजे पुरीमध्ये सहजच शोषला जातो.
केशर वा केशरी रंग न घातल्यास, अशा पांढर्‍या पुर्‍याही छान दिसतात.
या पुर्‍या साधारण चार दिवस छान टिकतात.

Share this article