ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आणि सामाजिक कल्याणमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कार्यरत असलेली, मुंबई-स्थित स्वयंसेवी संस्था, अधाता ट्रस्टने आपल्या १२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ व्यक्ती दिन अतिशय उत्साहात साजरा केला. गेले एक दशकभर हा ट्रस्ट 'पॉझिटिव्ह एजिंग' अर्थात वृद्धत्वाच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रवासाला सकारात्मक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. "एजिंग विथ डिग्निटी" या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संकल्पनेला अनुसरून यंदाच्या वर्षीचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाच्या वर्षी अधाता ट्रस्टने 'रूट्स अँड रिदम्स: नयी पीढ़ी - पुरानी परंपरा' या संकल्पनेला अनुसरून हा कार्यक्रम आयोजित केला होता. आजच्या काळात समाज वेगाने बदलत असताना परंपरांचे पाईक बनून राहण्याची भूमिका ज्येष्ठ निभावत आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला. वृद्धत्वाकडे नेणाऱ्या प्रवासाविषयीच्या दृष्टिकोनांना अतिशय कुशलतेने नवे आकार देत, या कार्यक्रमामध्ये १४ पेक्षा जास्त केंद्रांमधील ज्येष्ठ सदस्यांनी मंचावर येऊन पारंपरिक लोकगीते सादर केली, भारतातील समृद्ध आणि विविधांगी संस्कृतीचा आनंद साजरा केला, आपल्या सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांनी यावेळी सांगितले, "या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या समाजातील ज्येष्ठ सदस्य, आपल्या कुटुंबांचे खरे प्रमुख इतक्या सुखासमाधानाने जगत आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. आपली संस्कृती आणि मूल्यांचे ते आधारस्तंभ आहेत, त्यांच्याकडील ज्ञानाचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यांनी आयुष्यात सदैव उत्कर्ष साधावा यासाठी त्यांची साथसोबत केली पाहिजे. वृद्धत्वाच्या सौंदर्याचा आणि समृद्धतेचा आनंद आपण सर्वांनी मिळून साजरा करू या."