सध्या मराठी रंगभूमीकडे प्रेक्षक वर्ग विशेष वळताना दिसत आहे. या झगमगत्या सिनेविश्वात आता नाटकांकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर प्रेक्षकवर्ग ही रंगभूमीला प्राधान्य देताना दिसतोय. दरम्यान, एका मराठमोळ्या अभिनेत्याची एकाच वेळी दोन नाटकं सुरु असून तो रंगभूमी गाजवताना दिसत आहे. आणि हा मालिकाविश्वातील मराठमोळा लोकप्रिय चेहरा म्हणजेच लागिरं झालं जी मधून विक्या म्हणून घरा घरात पोहचलेला निखिल चव्हाण. निखिलने आजवर अनेक मराठी मालिका वेब सिरिझ,चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
आता रंगभूमी गाजवणाऱ्या देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट' या नाटकातून तो रंगमंच गाजवणार आहे. या नाटकांत अभिनेता अंकुश चौधरी ने मुलसंच्यात साकारलेलं पात्र आता निखिल साकारणार आहे. आजवर या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिले आणि आता यानंतर निखिलही त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मन जिंकायला सज्ज झाला आहे. याशिवाय निखिल अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर 'तू तू मी मी' या नाटकांत रंगभूमी शेअर करत आहे. भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित आणि केदार शिंदे लिखीत व दिग्दर्शित 'तू तू मी मी' या नाटकांत देखील निखिल अंकुश चौधरीने साकारलेली भूमिका साकारत आहे.
या दोन्ही नाटकांबद्दल बोलताना निखिल म्हणाला, "आजवर मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. आता मी रंगमंचावर परतलो असून एक नाही तर दोन नाटक एकाचवेळी मी सादर करत आहे. 'ऑल द बेस्ट' हे नाटक कोणालाच नवं नाही आणि अशा गाजलेल्या नाटकांत मला काम करण्याची संधी मिळतेय हे माझं भाग्य. ऑल द बेस्ट मध्ये मी आंधळ्याची भूमिका साकरत आहे जे बरंच चॅलेंजींग आहे. देवेंद्र सर आणि मयुरेश ने खूप उत्तम रित्या तालमी घेतल्या मुळे मला ते सहज सोपं झालं.भरत सरां मुळे मी रंगभूमीशी जोडला गेलो. आजवर साऱ्या प्रेक्षकांनी माझ्या कामाचं नेहमीच कौतुक केलं आहे आणि आता रंगमंचावरीलही माझ्या अभिनयाला तशीच दाद मिळेल अशी आशा करतो".