नवरतन कुर्मा
साहित्य: प्रत्येकी 100 ग्र्रॅम फ्लॉवर, गाजर, मटार व कोबी, 50 ग्रॅम पनीर, अननस, सफरचंद, द्राक्ष, मोसंबी (ऋतुनुसार उपलब्ध फळे वापरू शकता.), 150 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम खसखस, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 100 ग्रॅम मावा, 2 टेबलस्पून बटर, 1 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून मलई, 1 टेबलस्पून काजू पावडर, चिमूटभर जिरे व मीठ चवीनुसार.
कृती: सगळ्या भाज्या चिरून उकडून घ्या. काजू व खसखस 5 मिनिटे वेगवेगळे पाण्यात भिजवून ठेवा. काजू उकडून घेऊन खसखस सोबत वाटून घ्या. कढईत तेल गरम करून जिर्याची फोडणी द्या. जिरे तडतडल्यानंतर काजू पेस्ट टाकून खरपूस परतून घ्या. यात मावा, बटर व साखर टाका. मीठ टाका. आता मलई व काजू पावडर टाका. यात भाज्या टाकून 2-3 मिनिटे शिजवा. शेवटी सगळी फळे टाका. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
व्हेज पार्सल
साहित्य: 1 कप अमेरिकन कॉर्न, अर्धा कप बारीक चिरलेले मशरूम, 100 ग्रॅम बेबीकॉर्न, 1 हिरवी भोपळी मिरची, 1 लाल भोपळी मिरची, अर्धा टीस्पून पॅपरिका, अर्ध्या लिंबाचा रस, 1 टीस्पून बारीक चिरलेले आलं-लसूण, पाव कप बारीक चिरलेला पातीचा कांदा, मीठ चवीनुसार.
कृती: अमेरिकन कॉर्न उकडून घ्या. एका बाऊलमध्ये सगळे साहित्य एकत्र करून मिक्स करा. या मिश्रणाचे चार भाग करून हे मिश्रण सिल्व्हर फॉईलमध्ये गुंडाळून ओव्हनमध्ये 15-20 मिनिटे बेक करा.