आपली त्वचा सुंदर, टवटवीत, मुलायम असावी, असं वाटत असेल तर ती आर्द्र ठेवण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. कारण कोरडी त्वचा अकाली सुरकुत्यांसारख्या अनेक सौंदर्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
घराबाहेर पडताना पावडर लावलं की झाली तयारी… बहुतेकांचं ब्युटी डेली रूटीन हे पूर्वी काहीसं असंच होतं. पण हल्ली बाजारात आलेल्या विविध फेशिअल क्रीम्स, मॉइश्चरायझर्सच्या कृपेने बर्याच जणांच्या या ब्युटी रूटीन्सचा मॉइश्चरायझर्स हे एक अविभाज्य भाग बनले आहेत. लिपस्टिक, काजळ लावलं नाही
तरी किमान चेहर्यावर मॉइश्चरायझर लावण्यासाठी अनेक जण आग्रही दिसू लागले आहेत. पण त्यासाठी बहुतेकदा बाजारात मिळणार्या मॉइश्चरायझर्सचा वापर होताना दिसतो. ही किमती मॉइश्चरायझर्स काहींच्या त्वचेला सूट होतात, काहींना नाही होत. मात्र नैसर्गिक मॉइश्चरायझर्स त्वचा आर्द्र, मुलायम राखण्यासोबतच त्वचेला चिरतरुण ठेवण्यासही मदत करतात.
घरच्या घरी बनवा मॉइश्चरायझर्स
गुलाब पाण्यात ग्लिसरीन चांगले एकत्र करा.
चेहर्याला ताजी मलई लावून मसाज करा.
कोको बटर व खोबरेल तेल समप्रमाणात एकत्र करा.
तिळाचे तेल व ऑलिव्ह ऑईल एकत्र करून त्वचेवर लावा.
संत्र्याचा रस व ऑलिव्ह ऑईल एकत्र करा.
नैसर्गिक मार्गरीन (वनस्पती लोणी) हेही चांगले मॉइश्चरायझर आहे. मार्गरिनने चेहर्यावर हलका
मसाज करा.
पीचमधील बिया काढून त्याचा गर स्मॅश करा. हा गर अगदी मुलायम होईपर्यंत फेटा. नंतर त्यात प्रत्येकी
१ चमचा बदामाचे व खोबरेल तेल आणि प्रत्येकी पाव कप ऑरेंज ऑईल व गुलाबपाणी घालून एकजीव करा.
हे मिश्रण चेहर्यावर लावा.
४ टेबलस्पून अॅलोव्हेरा जेल, ३ थेंब टी पाइन ऑईल व १ टेबलस्पून इसेन्शिअल ऑईल एकत्र करून त्वचेवर लावा. हे मॉइश्चरायझर संमिश्र त्वचेसाठी उपयुक्त आहे.
१ टेबलस्पून खोबरेल तेल,
१ टीस्पून मध व १ टीस्पून लिंबूरस एकजीव करून फ्रीजमध्ये ठेवून हवे तेव्हा वापरा.
१ काकडी, १ टेबलस्पून लिंबूरस आणि २ टेबलस्पून इसेन्शिअल ऑलिव्ह ऑईल एकत्र मिक्सरमधून बारीक करून फ्रीजमध्ये ठेवून द्या.
या मॉइश्चरायझरमुळे त्वचा ताजीतवानीही राहते.
खोबरेल तेल, जोजोबा ऑईल, अंडे
फेटून, प्लम, पेर इत्यादी घटक वेगवेगळे मॉइश्चरायझर म्हणून वापरता येतात.
मॉइश्चरायझिंग पॅक
मध चेहर्यावर लावून, १० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.
पिकलेले केळे कुसकरून, हा गर पॅकसारखा चेहरा व मानेवर लावा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने
चेहरा धुवा.
स्मॅश केलेल्या केळ्यामध्ये मध एकजीव करून चेहर्यावर लावा.
पॅक सुकल्यावर चेहरा धुवा.
२ चमचे मुलतानी माती, १ चमचा
मध व १ चमचा दूध एकत्र करून चेहर्यावर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा धुवा.
१ चमचा लिंबूरस, अर्धा चमचा मध आणि ३ चमचे दही एकत्र फेटून घ्या. हे मिश्रण चेहर्यावर लावून थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवा.
मध व दूध समप्रमाणात एकत्र करून चेहर्यावर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा धुवा.
झेंडूच्या पाकळ्या पाण्यात २-३ तास भिजत ठेवा. नंतर हातानेच कुसकरून त्यात १ चमचा ग्लिसरीन एकत्र करा. हा पॅक चेहरा व मानेवर लावून
१५ मिनिटांनंतर धुवा.
पेरचा रस व मलई समप्रमाणात एकत्र करून चेहरा व मानेवर लावा. थोड्या वेळाने धुवा. दररोज वापरासाठी हा पॅक तयार करून फ्रीजमध्ये ठेवल्यास काही दिवस चांगला टिकतो.
अक्रोडाची बारीक पूड करून ठेवा. यामध्ये अर्धा चमचा दही किंवा मलई घालून एकजीव करा. हा पॅक चेहर्यावर लावून २० मिनिटांनंतर चेहरा धुवा.
१ चमचा लिंबूरस, प्रत्येकी २ चमचे अंड्यातील पांढरा भाग व मध आणि अर्धा कप स्ट्रॉबेरीची पेस्ट एकजीव करून हे मिश्रण चेहर्यावर लावा आणि काही वेळाने थंड पाण्याने धुवा.
स्ट्रॉबेरीच्या गरामध्ये १ चमचा लिंबूरस आणि अर्धा कप दूध वा दही एकत्र करून हे मिश्रण
अर्ध्या तासाकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर चेहरा व मानेवर लावून २० मिनिटांकरिता ठेवा. नंतर स्क्रबप्रमाणे बोटांच्या टोकाने हळुवार गोलाकार फिरवत काढा आणि चेहरा धुवा.
कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर
कोरड्या त्वचेसाठी तिळाचे तेल, बदामाचे तेल, एरंडेल तेल, खोबरेल तेल, रोज हिप ऑईल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, व्हिटामिन इ इत्यादी तेल अतिशय चांगला परिणाम देतात. कोरड्या त्वचेसाठी काही खास मॉइश्चरायझिंग पॅक्स तयार करता येतील.
१ अंडे फेटून त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल व अर्धा चमचा लिंबूरस एकत्र करून पुन्हा चांगले फेटा आणि चेहर्यावर लावा.
१५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
मध, दूध व ऑलिव्ह ऑईल एकत्र करून चेहर्यावर लावा.
१० मिनिटांनंतर चेहरा धुवा.
४ टीस्पून अॅलोव्हेरा जेल, १ टीस्पून बदामाचे तेल, १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल आणि काही थेंब रोझ इसेन्शिअल ऑईल एकजीव करून चेहर्यावर लावा.
कोरड्या त्वचेवर मेयॉनिजही लावता येईल.
सामान्य त्वचा
सामान्य त्वचेसाठी जोजोबा ऑईल, अॅव्होकॅडो ऑईल इत्यादी हलक्या
तेलांचा वापर करायला हवा.
४ टीस्पून अॅलोव्हेरा जेल व
१ टीस्पून बदामाचे तेल एकजीव करून चेहर्यावर लावा.
१ कप दह्यात प्रत्येकी १ चमचा संत्र्याचा रस व लिंबूरस एकजीव
करून चेहर्यावर लावा. पॅक थोडा सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा.
तेलकट त्वचेसाठी
तेलकट त्वचा असणारे बरेचदा मॉइश्चरायझर लावणे टाळतात. मात्र तेलकट त्वचा डिहायड्रेट होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच तेलकट त्वचेवर दिवसातून दोनदा थोड्या प्रमाणात मॉइश्चरायझर लावणे आवश्यक असते.
४ टीस्पून अॅलोव्हेरा जेल, १ टीस्पून ग्रेपसीड ऑईल व ३ थेंब टी ट्री ऑईल एकजीव करून लावा.
पाव कप ताज्या दुधामध्ये २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल एकजीव करा. नंतर २ टेबलस्पून लिंबूरस घालून चांगले एकत्र करा. हे मिश्रण मॉइश्चरायझर म्हणून वापरा.
एका सफरचंदाचा गर बारीक करून त्यात अर्धा चमचा मध एकजीव करा. हा पॅक चेहर्यावर लावून थोड्या वेळाने थंड पाण्याने धुवा.
एका भांड्यात गुलाबपाणी घेऊन त्यात १ कप गुलाबाच्या पाकळ्या घालून उकळवा. नंतर हे मिश्रण गाळून थंड होऊ द्या. थंड गुलाब पाण्याच्या मिश्रणात २ टेबलस्पून अॅलोव्हेरा रस घालून एकजीव करा. मिश्रण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून, नंतर चेहर्यावर लावा.
संपूर्ण शरीरासाठी मॉइश्चरायझर्स
अंघोळीपूर्वी संपूर्ण शरीरावर थोडे मध चोळून ५-१० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या, नंतर अंघोळ करा. मध हे एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
एक तृतीयांश कप दूध, २ टेबलस्पून लिंबू रस व १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल एकजीव करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. तुम्ही हे मॉइश्चरायझर दररोज संपूर्ण शरीरावर लावू शकता.
खोबरेल, तिळाचे व बदामाचे तेल समप्रमाणात एकत्र करून बाटलीत भरून ठेवा. मुलायम त्वचेसाठी हे तेल अंघोळीनंतर संपूर्ण शरीरावर लावा.
अंघोळीनंतर संपूर्ण शरीरावर थोडे तिळाचे तेल चोळा.
मॉइश्चरायझिंग नाइट क्रीम
३ टेबलस्पून ग्लिसरीन व १ टेबलस्पून मध एकत्र करा. हे मॉइश्चरायझर नाइट क्रीम म्हणूनही वापरता येईल.
पाव कप बटाट्याचा कीस, १ टीस्पून तिळाचे तेल आणि १ टेबलस्पून चहाची पाने एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्या.
सुंदर, टवटवीत, मुलायम त्वचा हवी असल्यास, ती आर्द्र ठेवण्यासाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर्सना आपल्या ब्युटी रूटीनचा महत्त्वाचा भाग अवश्य बनवा.