नाट्यशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणाऱ्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आयोजित ‘भारत रंगमहोत्सव’ हा नाटकांचा महोत्सव उद्या दि. १ फेब्रुवारीला मुंबईत सुरू होत आहे. एनसीपीए नाट्यगृहात हा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते होईल. या प्रसंगी संस्थचे अध्यक्ष, अभिनेता पद्मश्री परेश रावल, रंगदूत पंकज त्रिपाठी व प्रमुख पाहुणे रघुवीर यादव उपस्थित राहतील.
“हा महोत्सव जगातील सर्वात मोठा उत्सव असून त्याची सुरुवात १९९९ साली झाली. यंदाचे वर्ष हे २५ वे वर्ष आहे. असे सांगून एनएसडीचे संचालक चंद्रशेखर त्रिपाठी यांनी महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. २१ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ६१ नाटके सादर करण्यात येतील. त्यामध्ये २५ हिंदी तर २ मराठी नाटके असतील. तसेच इतर भारतीय भाषातील नाटके सादर करण्यात येतील. ‘ताजमहाल का टेंडर’ या एनएसडीच्या कलावंतांनी सादर केलेल्या नाटकाने महोत्सवाचा आरंभ होईल,” असे त्यांनी सांगितले.
६१ पैकी २२ नाटकांचे दिग्दर्शन महिला कलाकारांनी केले आहे. शिवाय मिता वशिष्ट व लुबिना या अभिनेत्रींनी सादर केलेल्या एकपात्री नाटकांचा समावेश आहे. नाटकांबरोबरच कार्यशाळा, परिसंवाद, चर्चा, मास्टर क्लास व रंगहाट या कार्यक्रमांचा सदर रंगमहोत्सवात समावेश असेल.
हा रंग महोत्सव दादरच्या श्री शिवाजी मंदिरात व अंधेरीच्या मुक्ती फाऊंडेशन रंगमंचावर सादर केला जाईल. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत व मुक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्मिता ठाकरे यांनी आपली नाट्यगृहे नि:शुल्क उपलब्ध करून दिली आहेत. हे दोघेही या प्रसंगी उपस्थित होते. “रंगमंच हा असा मंच आहे, जो प्रेक्षकांना फक्त आनंद देतो,” असे सांगून सदर रंगभूमी महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावा, असा आशावाद स्मिता ठाकरे यांनी व्यक्त केला.
एनएसडीचे विद्यार्थी व महोत्सवाचे रंगदूत, अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “जास्तीत जास्त प्रेक्षकांमध्ये नाटकाची ही चळवळ पोहचली पाहिजे. समाजातील प्रत्येक माणसाने नाटकाचा आनंद घेतला पाहिजे,” या महोत्सवातून नवा प्रेक्षक तयार होईल, हा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी एनएसडीचे अध्यक्ष, अभिनेता परेश रावल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपले विचार प्रकट केले. दिल्ली, मुंबई सह पुणे, बेंगलुरू , वारणसी अशा १५ शहरांमधून हा २१ दिवसांचा रंगमहोत्सव साजरा होत असून २१ फेब्रुवारीला त्याची सांगता दिल्लीत होईल.