Close

मायरा वायकुळ आगामी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात झळकणार (Myra Vaikul Upcoming New Marathi Movie Mukkam Post Devacha Ghar)

टीव्ही मालिका आणि सोशल मीडियातून लोकप्रिय झालेली बालकलाकार मायरा वायकुळ लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात ती झळकणार आहे. पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नावामुळे आणि सोशल मीडियावर सुरु असलेल्या अनोख्या प्रमोशनमुळे या चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. सहकुटुंब पाहता येणाऱ्या या चित्रपटाचं पहिलं पोस्टर चित्रपटाच्या नावाप्रमाणेच श्री सिद्धिविनायकाच्या चरणी अर्थात देवाच्या घरी प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी मायरा वायकुळ, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते उपस्थित होते.

एसीडी कॅटचे मनीष कुमार जयस्वाल आणि साहील मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई यांनी ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई यांनी चित्रपटाच्या प्रस्तुती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. किमया प्रॉडक्शन्स आणि स्वरुप स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश कुमार जयस्वाल, किर्ती जयस्वाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर चिनार – महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलं आहे.

अल्पावधीतच जगभरात पोहोचलेल्या मायरा वायकुळची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका आहे. त्याचबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात मायराच्या वाट्याला आलेली भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पहावी लागणार आहे.

Share this article