मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली होती. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, शिक्षण पद्धतीतले नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरु म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तसंच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले होते. याच स्नेहलता देशमुख यांचं आज सकाळी निधन झालं. कुलगुरु या पदावर असताना अनेक धडाडीचे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत सक्षम युवा पिढीच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि ‘दुग्धपेढी’ ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहिल यात शंका नाही.
स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांमध्ये महत्त्वाचं कार्य केलं. स्नेहलता देशमुख या शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाताही होत्या. १९९५ मध्ये त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून नियुक्त झाल्या. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी धडाडीचे निर्णय घेतले. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या प्रमाणपत्रावर वडिलांप्रमाणेच आईचंही नाव असलं पाहिजे हा निर्णय त्यांनीच घेतला होता.
स्नेहलता देशमुख यांनी गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार ही पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. मुंबईतील पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचाल मंडळात त्या विश्वस्थ म्हणूनही कार्यरत होत्या. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.