आशा भोसले यांची नात जानाईने नुकताच तिचा २३ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील हजर होता, जो या पार्टीनंतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिला मोहम्मद सिराज डेट करत आहे का, अशी मोठी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
जनाईने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामध्ये तिचा सिराजबरोबरचा एक फोटो होता, ज्यामध्ये दोघे एकमेकांकडे बघून हसताना दिसत होते. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना सुरूवात झाली, मात्र आता जानाईनेच त्यांच्यातील नात्याचा खुलासा करून सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
जनाईने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सिराजबरोबरचा फोटो शेअर करत ‘माझा प्रिय भाऊ’ असं खास कॅप्शन तिने दिलं आणि सिराजला टॅगदेखील केलं. जनाईच्या या पोस्टनंतर सिराजनेही ती स्टोरी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आणि त्या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये सिराजने ‘मेरे बहेना की जैसी कोई नहीं’ या प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या काही ओळीही लिहिल्या. या पोस्टनंतर आता हे स्पष्ट झाले आहे की दोघेही एकमेकांना भाऊ-बहीण मानतात आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या होत्या. सिराजच नव्हे तर जनाईच्या वाढदिवसाला श्रेयस अय्यरने देखील हजेरी लावली होती.
मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियातून बाहेर आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी त्याला भारतीय एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले नाही आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातही त्याला संधी मिळाली नाही. पण सिराजने हार मानली नसून तो यानंतरही जोमाने सराव करतानाचा व्हीडिओ आणि फोटो त्याने शेअर केले.