पती-पत्नी कितीही कामात असले तरी कामसुखाकडे पाठ फिरविता कामा नये. जेवणात मीठ जितके आवश्यक असते, तितकाच जीवनात सेक्स आवश्यक आहे. नवयुग अवतरले आहे. या युगात जीवनशैली बदलली आहे. युग स्पर्धेचे आहे. नोकरीच्या ठिकाणी काय किंवा उद्योगधंद्यात स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. या स्पर्धेत टिकून राहायचे तर काम, काम आणि काम करत राहण्याची गरज आहे. कामाच्या या धबडग्यात पती-पत्नीचे कामजीवन पणास लागले आहे. पण लक्षात कोण घेतो? अशी स्थिती त्यांच्या जीवनात निर्माण झाली आहे. आपल्यापैकी काही जण कदाचित अशा लोकांपैकी असतील. तेव्हा सगळे एकाच माळेचे मणी म्हणत नवयुगातील आपले कामजीवन कसे सुकर करता येईल ते पाहूया. कारण पती-पत्नी कितीही कामात असले तरी कामसुखाकडे पाठ फिरविता कामा नये. जेवणात मीठ जितके आवश्यक असते, तितकाच जीवनात सेक्स आवश्यक आहे. तणावग्रस्त जीवनशैलीमधून निवांतपणा केवळ शरीरसंबंधच देऊ शकतात. मनावरील दडपण शरीरसंबंधानेच दूर होऊ शकतात. एकसाची दैनंदिनी व मनाला आलेली मरगळ केवळ कामसुखानेच झटकता येते. जवळपास सर्वच मनोचिकित्सक व लैंगिक समस्या तज्ज्ञांनी हे मत व्यक्त केलं आहे की, पती-पत्नीने नियमितपणे कामसुखाचा उपभोग घेतला, तर त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जी जोडपी आठवड्यातून किमान तीन वेळा कामसुख घेतात, ते वयाने तरुण दिसतात. शिवाय डोकेदुखी, व्हायरल इंफेक्शन, संधीवात अशा रोगांपासून ते मुक्त राहतात. प्रकृतीच्या कुरबुरी डोकं वर काढत नाहीत. तेव्हा आपली जीवनशैली कितीही व्यस्त असली तरी कामसुखापासून वंचित राहू नये. टेन्शन घेऊ नका एक गोष्ट खरी आहे की, धकाधकीच्या जीवनात पती-पत्नीचा एकमेकांशी संवाद अवघड झाला आहे. संसारातील सुखदुःखे बोलायला वेळ नाही, तिथे सेक्स करायला वेळ कुठून मिळणार? मनावरील दडपण आणि कामाचे ओझे इतके असते की, रात्री बेडरूमध्ये पोहचल्यावर दिसते फक्त अंथरुण. त्या अंथरुणात पाठ टेकताच थकव्याने झोप कधी लागते तेच कळत नाही. यावर पहिला तोडगा असा आहे की, कामाचे इतके टेन्शन घेऊ नका. समजा दिवसभर मान मोडून काम करण्याशिवाय जर तुमच्याकडे पर्याय नसेल तर ऑफिसबाहेर पाय ठेवताच ती कामे विसरून जा. हे सोपं नाही, पण प्रयत्नाने साध्य होईल. ऑफिसमधून बाहेर पडल्यापासून घरी पोहचेपर्यंत कामात लक्ष घालू नका. जे लोक आपल्या मोटारीतून प्रवास करतात, आणि ज्यांच्याकडे ड्रायव्हर गाडी चालवत असतो, त्यांना मागे बसून फायली वाचायची किंवा लॅपटॉपवर काम करण्याची सवय असते. मुंबईतील लोक ह्याच गोष्टी लोकलच्या प्रवासातही करतात. ह्या गोष्टी सोडून द्या. रोमॅन्टिक राहा दुसरा तोडगा म्हणजे आपली वृत्ती सदैव रोमॅन्टिक ठेवा. प्रत्येक रात्र ही मीलनाची रात्र आहे, अशी अटकळ मनाशी बांधा. लग्नानंतरचे पहिले काही दिवस आठवा. पती किंवा पत्नीने घरी आल्यानंतर शुचिर्भूत होऊन स्वच्छ घरगुती कपडे घालण्याची पद्धत ठेवावी. पावडर, सेन्ट अवश्य वापरावे. पत्नी जर गृहिणी असेल, तर तिने घरगुती स्वच्छ कपडे पेहरावे. हसतमुखाने पतीचे स्वागत करावे. सीझनप्रमाणे फुलांचा गजरा पतीने नक्कीच आणावा. काही नवर्यांना विशिष्ट प्रकारची, सुगंधाची फुले आवडतात. विशिष्ट सुवासाचा सेन्ट आवडतो. ती आवड ध्यानात ठेऊन पत्नीने ह्या फुलांचा गजरा माळावा. सुवासिक सेन्ट वापरावा. पत्नीने केलेल्या जेवणाची स्तुती पतीने करावी. बिघडले असेल तर तसेही गोड शब्दात सांगावे. पूर्वीच्या काळी बेडरूममध्ये केशरयुक्त दुधाचे पेले ठेवण्याची पद्धत होती. तिचे पुनरूज्जीवन करावे. अर्थात् शास्त्रीयदृष्ट्या ह्या दुधाचे प्राशन झोपण्याच्या एक तास आधी करावे. चॉकलेट किंवा अन्य गोड पदार्थ खावे नि एकमेकांना खिलवावे. ज्या संगीताची आवड असेल, ते मंद स्वरात अवश्य लावावे. सुट्टीच्या दिवशी आवडीचे नाटक, सिनेमा आवर्जून पाहावा. आवड असेल तर सामाजिक कार्यक्रमांना जावे. संगीताच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा. शिवाय चांगल्या हॉटेलातही जाऊन आवडीचे पदार्थ खावेत. एकमेकांची आवड जपत खाद्यपदार्थ खावे. चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात शरीरसंबंध निकोप राहण्यासाठी मन निरोगी असावे लागते. निरोगी मनासाठी आणखी एक आवश्यक गोष्ट म्हणजे वर्षातून दोनदा किंवा निदान एकदा तरी बाहेरगावी किंवा निसर्गरम्य स्थळी जोडप्याने जावे. ऐपतीनुसार परदेश गमन करावे. वेगळे वातावरण, शुद्ध हवा आणि निसर्गसौंदर्याने मन प्रफुल्लित होते. अंगी उत्साह वाढतो. लग्नानंतर हनीमूनला जाण्यामागे हेच कारण असते. कुटुंबकबिल्यापासून दूर किंवा कुटुंबकबिल्यासह असे पर्यटन केल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. एकमेकांच्या अधिक नजिक जाता येते. मुले मोठी झाली असली तर त्यांच्याशिवाय दोघांनीच जावे. पुनश्च एकवार हनीमून केल्याचा आनंद घ्यावा. वेगळ्या, शुद्ध वातावरणात शरीरसंबंध केल्याने देखील शारीरिक आकर्षण वाढते. हे आकर्षण टिकून राहिल्याने नाते घट्ट होते. आपल्याकडे पूर्वी आंघोळीच्या वेळी पत्नीने पतीची पाठ चोळून देण्याची पद्धत होती. हा मसाजचा एक प्रकार म्हटला पाहिजे. ही पद्धत नवयुगात अवलंबिली पाहिजे. मात्र जमाना बदलला आहे. पत्नीनेच पतीची पाठ रगडून देण्याचा रिवाज बदलला पाहिजे. पतीने देखील पत्नीची पाठ स्वच्छ करून दिली पाहिजे. या मसाजने स्वच्छता राखली जाईल नि वेगळ्या स्पर्शामुळे कामोत्तेजना होईल. कुणी सांगावं, असे मर्दन करताना ‘मूड’ झालाच तर बाथरूमध्येही शरीरसुखाची मजा घेता येईल. आपल्याकडे दुर्दैवाने सेक्ससंबंध म्हणजे एक औपचारिकता समजणारी काही जोडपी आहेत. आपल्याला पाहिजे असेल तर पत्नीने, तिची मर्जी असो वा नसो, शरीरसुखासाठी सज्ज राहिले पाहिजे, अशी मानसिकता असणारे नवरोबा आहेत. त्याचप्रमाणे नवर्याचा मूड असला तरी आज मला नको आहे ना, असे खडसावणार्या बायका देखील आहेत. यामुळे होतं काय की, समागमाचा आनंद एकतर्फीच राहतो. समागमात दोघांचीही कामतृप्ती होणे गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांच्या मनाचा, भावनांचा विचार करून शरीरसुखात रममाण होणं हा नवयुगाचा मंत्र आहे. तो जपा.
Link Copied