अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर प्रथमच मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर भव्य दृश्यांमधून रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन चित्रपट रसिक-भक्तांना घडणार आहे. चांदण्याच्या तेजाने झळाळणारी मूर्ती, भक्तांच्या हृदयात विश्वास जागवणारे रामलल्लाचे मोहक हास्य आणि त्यांचे करुणामय डोळे – हे सगळं प्रेक्षकांना त्यांच्या श्रद्धेच्या गाभाऱ्यात घेऊन जाणार आहे. रामलल्लाचे अनोखे दर्शन घडवणारा ‘मिशन अयोध्या’ हा भारतातला पहिला चित्रपट आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर कोणत्याही चित्रपटाचे अयोध्येत चित्रीकरण झाले नाही. ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. नव्या वर्षात २३ जानेवारी २०२५ रोजी राममंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीचे औचित्य साधून ‘मिशन अयोध्या’ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हे ‘मिशन अयोध्या’च्या अयोध्येतील चित्रीकरणाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले, "अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणे हे केवळ माझ्यासाठी नव्हे, तर संपूर्ण युनिटसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरला. विषम तापमानाच्या आव्हानांवर मात करीत असताना लाखो रामभक्तांच्या गर्दीत, त्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण प्रेरणादायी होता. मंदिराच्या भव्य वास्तुशिल्पाचा प्रत्येक कोपरा, वातावरणातील अलौकिक शांतता, आणि लाखो रामभक्तांद्वारे होणारा रामनामाचा गजर आमच्या हृदयाला स्पर्शून गेला. ‘मिशन अयोध्या’ हा केवळ एक चित्रपट नसून, अयोध्या, श्रीराम मंदिर व श्रीरामांचे आदर्श विचार जगभर पोहचविण्याचे एक मिशन आहे. हा चित्रपट प्रभू श्रीरामांच्या अनंत भक्तीसाठी समर्पित एक अद्भुत प्रवास आहे. मला विश्वास आहे की मिशन अयोध्या’ प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या चरणांशी आत्मीयतेने जोडेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करेल."
निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटातून अत्यंत ज्वलंत विषयावर प्रकाश टाकण्यात आला असून प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच रामभक्ती, श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांचा अनोखा संगम पहायला मिळणार आहे. अयोध्येच्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना तिथल्या सकारात्मक ऊर्जेने आम्हाला प्रेरणा दिली. आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रामभक्तीची ज्योत निरंतर तेवत ठेवून प्रभू श्रीरामांबद्दलची आस्था अधिक दृढ करेल."
अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मांडणाऱ्या ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाचे अयोध्येसह उत्तर प्रदेशातील जौनपूर तसेच महाराष्ट्रात, मुंबई आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर अश्या विविध ठिकाणी चित्रीकरण झाले आहे. या चित्रपटाच्या शीर्षकामुळे या चित्रपटाविषयी रसिकांच्या मनात विशेष कुतूहल निर्माण झाले असून त्यांची चित्रपट पहाण्याची उत्सुकता वाढल्याची पोचपावती मिळत आहे.