लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल नवपरिणीत जोडप्यामध्ये उत्सुकता असते. पण या उत्सुकतेला काही अनाहूत कानमंत्राची जोडही असते. शरीर आणि मनांचे मीलन करणार्या क्षणाबाबतच्या चुकीच्या कल्पना दूर करायला हव्यात.
लग्नविधी पार पडले की, वधूवरांना पहिल्या रात्रीची ओढ लागते. या मधुमीलनाबद्दल दोघांच्याही मनात हुरहुर असते. शरीरसुखाबाबत अधीरता निर्माण झालेली असते. हे स्वाभाविकच आहे. कारण, विवाह हा शरीरसुखाचा परवाना देणारा सोहळा असतो ना!… मीलनाच्या या पहिल्या रात्रीबद्दल मात्र गॉसिप फार झालेले असते. मित्र-मैत्रिणींकडून त्या रात्री काय केले पाहिजे, कसे केले पाहिजे; याबाबत अनाहूत सल्ले दिले गेले असतात. कानमंत्रदेखील बरेच दिले गेलेले असतात. पण कानमंत्र आणि सत्य यात तफावत असते. बरेचसे कानमंत्र अननुभवी लोकांनी दिले असतात. त्यामुळे ती पहिली रात्र रंगण्याऐवजी बेरंग होऊ शकते. सुखसमाधान लाभण्याऐवजी असमाधानाने मने कुरतडू लागतात. तेव्हा सल्ले आणि सत्य यामधील फरक जाणून घेतलात, तर ती पहिलीच नव्हे, तर रंगल्या रात्री अशा, ही अनुभूती घ्याल.
पहिल्या रात्री समागम झालाच पाहिजे. अन्यथा वैवाहिक जीवन अपयशी ठरते…
पहिली रात्र म्हणजे प्रणय आणि समागमाने साजरी करायची असली, तरी ते केलंच पाहिजे असं नव्हे. आपल्याकडे बहुतांश विवाह हे ठरवून केलेले असतात. (अरेंज मॅरेज) त्यामुळे एकमेकांची मने, स्वभाव विशेष आवडनिवड यांची काहीच माहिती दोघांनाही नसते. लग्नानंतर लाभलेला हा पहिलाच निवांतपणा असतो. तेव्हा एकमेकांना जाणून घेण्याची ही सुवर्णसंधी असते. ती साधून घेतली पाहिजे. म्हणजेच पहिल्या रात्री हट्टाने समागम झाला पाहिजे, असं नव्हे. वैवाहिक जीवनाचे यश परस्परांमधील सामंजस्य आणि प्रेम यावर अवलंबून असते.
स्त्रिया पहिल्या रात्री समागमाची वाट पाहत असतात…
लैंगिक संबंधाबाबत निसर्गतः पुरुष हा स्त्रीपेक्षा अधिक आक्रमक असतो. त्यामुळे समागमासाठी स्त्रीपेक्षा पुरुष उत्सुक असतो, असं म्हटलं तरी चालेल. कामक्रिडेपेक्षा मनोमीलन व्हावं, असं स्त्रीला वाटत असतं. आपण त्याला समजून घ्यावं, त्यानं आपल्याला समजून घ्यावं, ही तिची पहिल्या रात्री जास्त करून अपेक्षा असते.
बेडरूममधील सर्व लाईटस् चालू ठेवावेत. जेणेकरून पुढील क्रिया करताना अवघडलेपण जाणवणार नाही.
कामक्रिडा करण्यासाठी दोघांनाही निर्वस्त्र व्हावे लागते. पूर्ण प्रकाशात कपडे उतरविण्यास स्त्रियांना लाज वाटते. अंधारात निर्वस्त्र होण्यास तिला संकोच वाटत नाही. यामुळे तिच्या शरीराचा शोध घेण्याची पुरुषाला गरज राहत नाही. स्त्रीला आपला देह जास्त माहीत असतो. काळोखात किंवा अगदी मंद प्रकाशात शरीरसुख घेण्याची मजा काही औरच असते.
पहिल्या रात्री स्त्रीच्या योनीतून रक्तस्त्राव व्हायलाच पाहिजे. कारण लिंगप्रवेश केल्याने योनीपटल फाटते. असा रक्तस्त्राव झाल्यास ती निष्कलंक आहे, असे समजता येईल…
हा अत्यंत चुकीचा समज आहे. मुलीच्या जीवनातील तो पहिला समागम असला तरी रक्तस्त्राव होईलच असे नाही. योनीपटल इतके पातळ व नाजूक असते की, त्या मुलीने किशोरवयात असताना, खेळात भाग घेतला असल्यास किंवा सायकल चालविणे व इतर व्यायाम केले असल्यास ते फाटू शकते. काही मुलींमध्ये जन्मतःच योनीपटल नसते, असेही वैद्यकीय शास्त्रात दिसून आले आहे. त्यामुळे योनीपटल फाटून रक्तस्त्राव होण्याचा संबंध तिच्या कौमार्याशी जोडणे चुकीचे आहे. काही मुलींना पहिल्या समागमाने रक्तस्त्राव होतो, तर काहींना वरील कारणास्तव तो होत नाही.
पहिल्या मैथुन क्रियेत स्त्रीला खूप वेदना होतात…
पहिला दात, पहिली दाढ येणं किंवा पहिली मासिक पाळी येणं, हे ज्याप्रमाणे वेदनादायक असतं त्याप्रमाणेच पहिली समागम क्रिया वेदना देऊ शकते. कारण योनीचा आकार लहान असतो. त्यामध्ये होणारा लिंगप्रवेश कोमल स्नायूंमुळे अवघड होतो. अन् पहिलावहिला शरीरसुखाचा अनुभव दुखरा होऊ शकतो. पुरुषांनाही ह्या वेदना होतात. ह्या वेदना कमी करण्यासाठी नवरा-बायकोचे शरीर आणि मन पूर्णतः तयार झाले पाहिजे. दोघांनाही आनंददायी वाटतील अशा प्रणयक्रिडा करणे आवश्यक असते. प्रत्यक्ष समागमापूर्वी चुंबन, आलिंगन अशा क्रियांनी शरीरात उत्तेजना निर्माण होते. स्त्री-पुरुष दोघांच्याही संगनमताने प्रणयचेष्टा केल्यास ह्या वेदना जाणवणार नाहीत.
पहिल्या रात्री पुरुषाचे शीघ्रपतन होते. कारण त्याने लग्नापूर्वी हस्तमैथुन केले असते…
लग्नापूर्वी पहिल्या मीलनाचे केलेले स्वप्नरंजन, पत्नीशी प्रणय आणि सेक्स करण्याची अधीरता, मीलन कसे होईल, तिला आवडेल का, दुखेल का, अशा असंख्य विचारांनी पुरुषाच्या मनात थैमान घातलं असतं. (स्त्रीची अवस्थादेखील वेगळी नसते.) यामध्ये उद्दीपन आधीच होऊन शीघ्रपतन होते. हे असं होणं स्वाभाविक असतं. बहुतांशी पुरुषांचे पहिल्या रात्री शीघ्रपतन होते. त्याचा संबंध हस्तमैथुनाशी जोडणं चुकीचं आहे.
पहिल्या रात्रीचा अनुभव कसा होता, ते आपल्या लग्न झालेल्या मित्र-मैत्रिणींना सांगावे. जे घडलं ते व्यवस्थित होतं की नाही, याचा सल्ला घ्यावा.
हे साफ चूक आहे. आपल्या पहिल्या रात्रीचा अनुभव कोणालाही सांगू नये. कारण, ही आपली अत्यंत खासगी बाब आहे. या पहिल्या अनुभवाच्या मधुर आठवणी आपल्या मनाच्या कप्प्यात दडवून ठेवा. फक्त दोघांनाच आपले हे गुपित ठाऊक असले पाहिजे. हां, अगदीच काही चुकलंमाकलं किंवा अडचणी आल्या किंवा दोघांपैकी एकाला काही प्रॉब्लेम झाला, तरच लैंगिक समस्या तज्ज्ञ अथवा काऊन्सिलरला सांगायला हरकत नाही. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांपैकी कुणालाही नाही.