दरवर्षी आषाढ महिन्याचा पहिला दिवस आला की, मेघदूत काढायचं आणि ‘कश्चित कांता विरहगुरुणा…’ या पहिल्या श्लोकापासून ते ‘माभूदेवं क्षणमपिच ते विद्युता विप्रयोगः’ या शेवटच्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीपर्यंत वाचून काढायचं. दरवर्षी त्या मेघासोबत रामगिरी ते अलकानगरी हा प्रवास करायचा… तेच पर्वत… त्याच नद्या… तीच वृक्षराजी पाहायची… पण तरीही दरवर्षी काहीतरी नवीन दिसतंच. मेघदूतातल्या नवीन सौंदर्य स्थळांचा शोध लागतो. ‘प्रतिक्षणं यत् नवतामुपैति’ हीच प्रतिभेची व्याख्या.
इतकी वर्षं होऊनही दर वेळी मेघदूतामधलं सौंदर्य नव्याने प्रतीत होतं, हेच तर प्रतिभावान कवीचं लक्षण. ‘मेघे मेघे वयोगतम्!’ म्हणतात ते म्हणूनच. पण खरंच दरवर्षी नव्याने आस्वाद घ्यावा, असं आहे तरी काय या मेघदूतात? का भावतं हे मनाला?
मुळात मेघदूताची कथा अगदी छोटीशी… पहिल्याच श्लोकात सांगून टाकलेली आहे. ‘स्वाधिकारात प्रमत्त… शापेनास्तंगमितमहिमा’. स्वतःच्या कर्तव्यात कोणी एक यक्ष चुकला. शिक्षा म्हणून कुबेराने त्याला शाप दिला. तो शाप भोगण्यासाठी यक्ष रामगिरीवर येऊन राहिला. विरहाचे आठ महिने संपले होते. उरले होते केवळ चार महिने. पण हे चार महिने काढणं अतिशय अवघड होतं. कारण हे चार महिने आहेत पावसाळ्याचे. यक्षाला आपल्या पत्नीची अत्यंत तीव्रतेने आठवण येतेय. तिने हा विरहाचा आघात कसा झेलला असेल? तिलाही दिलासा द्यायला हवा ना! तिला आपण कुशल असल्याचा निरोप पाठवायला हवा. पण इतक्या लांब जाणार कोण? इतक्यात आषाढ महिन्यातला पहिलावहिला मेघ यक्षाच्या दृष्टीस पडतो. मेघ हे कामरूपधारी आहेत आणि दूरवर जाऊ शकतात, हा विचार करून यक्ष मेघामार्फत निरोप पाठवायचं ठरवतो… आणि मेघ दूताच्या भूमिकेत आहे, असं मानून यक्ष स्वगतातून त्याच्याशी संवाद साधतो.
त्यात भावनेचं शास्त्र… लॉजिक आहेच
एवढी छोटीशी कथा… आणि त्यावर 116 श्लोक! मेघासारख्या अचेतनाला दूत म्हणून नेमणं आणि स्वगतातून संवाद, हे सारंच इतकं कल्पक आहे की, मन प्रथम त्यानेच भारून जातं. बरं मेघाला… एका अचेतनाला आपण दूत म्हणून पाठवतोय, हे समजण्याएवढं यक्षाचं भानावर असणं… आणि त्यालाच अनुसरून ‘कामार्ता हि प्रकृतिकृपण्श्चेतनाचेतनेषु’- विरहाने व्याकूळ झालेलं कोणीही चेतन-अचेतन, सजीव-निर्जीव या बाबतीत विवेकशून्य असतं, असं यक्षाने दिलेलं उत्तर… हे यक्षाचं वागणं किती संयुक्तिक आहे, हे कालिदासाने इथे पटवून दिलं आहे. त्यामुळे एका छोट्याशा ओळीतून चोखंदळ वाचकाच्या मनाला पडणार्या अवास्तवाबद्दलच्या प्रश्नांचं निरसन तर होतंच, पण त्याचबरोबर कालिदास भावनातिरेकाने लिहीत नाही, तर त्यामागेही भावनेचं शास्त्र, लॉजिक आहे… याचं येणारं प्रत्त्यंतरही मनाला सुखावून जातं. आणि ते सगळंही सूचक पद्धतीने सांगितलं जातं… बटबटीतपणा नावालाही नाही.
मेघ आकाशातून अलकानगरीच्या दिशेनं निघाला की, शेतामध्ये काम करणार्या स्त्रिया (पथिकवनिता), आपल्या डोळ्यांवर येणार्या केसांच्या बटा बाजूला सारून मोठ्या उत्कंठेने मेघाकडे पाहतील. ‘केसांच्या बटा बाजूला सारून’ असं लिहिण्याचं कारण? त्या स्त्रिया ‘पथिकवनिता’ आहेत, म्हणजे त्यांचे पती बाहेरगावी गेलेले आहेत. त्या ‘प्रोषितभर्तृका’ आहेत. प्रोषितभर्तृकांनी वेणीफणी करू नये, असा संकेत आहे त्यामुळे त्यांचे केस मोकळे असतील.
तू आलास, म्हणजे बाहेरगावी गेलेले त्यांचे पतीही आता परत येतील… म्हणून त्या बटा बाजूला सारून उत्कंठित होऊन तुझ्याकडे पाहतील… हे एवढं सगळं आपण जे सांगतो ते ‘उद्गृहीतालकान्ताः’ या एका शब्दात कालिदासाने सांगून टाकलं… अशी सूचकतेची अनेक उदाहरणं मेघदूतात सर्वत्र विखुरलेली आहेत.
आपण मनाच्या रथावर आरूढ होतो
हा मेघ जसजसा रामगिरीहून अलकानगरीच्या दिशेने प्रवास सुरू करतो, तसतसं आपणही मनाच्या रथावर आरूढ होऊन त्याच्या वेगाने जायला लागतो. जणू मेघांच्या हातात हात गुंफून. आणि गंमत म्हणजे जे पर्वत, ज्या नद्या आपण एरव्ही भूतलावरून पाहतो, तेच पर्वत, त्याच नद्या आकाशातून पाहिल्यावर कसे दिसतील, ते आपल्या डोळ्यांना दिसायला लागतं. माळेत गुंफलेलं जांभळ्या-निळ्या रंगाचं इंद्रनील मण्याचं पदकच! ही अशी वर्णनं त्या पर्वतांना, नद्यांना एक वेगळंच रूप देऊन जातात. आणि कालिदासाच्या प्रतिभाशक्तीनं आपण क्षणोक्षणी अचंबित होऊन जातो. खरंच कालिदासाने विमान प्रवास केला होता की काय? ही सगळी एरिअल फोटोग्राफी त्याला कशी जमली? असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
कालिदासाच्या भौगोलिक ज्ञानाविषयी तर काय बोलावं? मेघाला रामगिरी ते अलकानगरी हा मार्ग सांगत एकंदर 25 ठिकाणांची वर्णनं केलेली आहेत. फक्त स्थानांचे उल्लेख नाहीत, तर तिथल्या नद्या, पर्वत, शेती, पिकं, वनस्पतीजीवन, प्राणीजीवन, कीटकसृष्टी, पुष्पसृष्टी, पौराणिक कथा, वैशिष्ट्यं हे सगळं वर्णिलेलं आहे… तेही काव्याच्या सुंदर मखमली आवरणात! काव्य म्हणून काव्याचा आस्वाद घ्यावा आणि त्याबरोबर उत्तर भारताचा भूगोलही पक्का करावा. भूगोलासारखा विषय अशा काव्यात्म पद्धतीने रेखाटता येतो.
पूर्व मेघात केलेली वर्णनं जरी काव्यात्म असली तरी भौगोलिक आहेत, त्यामुळे ती वर्णनं सत्याच्या कक्षेतच करायला हवीत. ती तशीच आहेत. आणि उत्तरमेघ सुरू होतो, तो मात्र अलकानगरीच्या वर्णनाने. जी संपूर्णपणे कल्पित नगरी आहे. एकाच काव्यात सत्य आणि कल्पित वर्णनं यांचा तोल किती उत्तम तर्हेने साधता येऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मेघदूत!
मेघ आपल्या नजरेतही सचेतन होतो
मेघाची दूत म्हणून निवड झाल्यापासून ते अलकानगरीत येऊन निरोप सांगेपर्यंत तो मेघ आपल्याही नजरेत सचेतन होतो, ही कवीची किमया. फक्त मेघ सचेतन होतो असं नाही, तर त्याच्या भावभावनांचाही विचार कवीमुळे आपण करायला लागतो. ‘मेघा, रात्र झाली असेल तर थोडा विसावा घे. तुझी पत्नी सौदामिनी चमकून दमली असेल, तिलाही थोडी विश्रांती घेऊ दे. पण सकाळ झाली की मात्र आगे बढो!’, असं जेव्हा यक्ष सांगतो, तेव्हा आपणही ‘हो! हे बरोबरच आहे.’ असंच मानायला लागतो. सगळा निरोप सांगून झाल्यावर मेघ काहीच बोलत नाही, तेव्हा आपल्याही मनात प्रश्न पडतो. मेघाने हे मौन का बरं धारण केलंय? तो इतका सजीव रूपात दिसायला लागतो. शेवटच्या श्लोकात तर मेघाचं सजीवत्त्व द्विगुणित केलंय. कारण यक्ष त्याला आशीर्वाद देतो. - ‘मा भूदेवं क्षणमपि च ते विद्युता वि प्रयोगः’ माझा आणि माझ्या पत्नीचा वियोग झाला तसा तुझ्या पत्नीचा, विद्युलत्तेचा वियोग कधीही होऊ नये. आपणही या आशीर्वादाला दुजोरा देतो. अचेतनाला इतकं सचेतन करण्याचं कवी कुलगुरूचं केवढं हे कसब!
यातले मंदाक्रांता वृत्तातले श्लोक, नाद माधुर्य, यातला विषय, केलेली वर्णनं, वापरलेले अलंकार, भावभावना, रंगांची उधळण, टवटवीतपणा, वेगळेपणा, मांडणी, रंजकता, छोट्याशा बीजावर खुलवलेलं एवढं नाट्य… या सार्यांमुळे पुन्हा पुन्हा मेघदूत वाचावं आणि वाचत राहावसं वाटतं. ‘तैसे नित्य नूतन देखिजे, गीतातत्त्व’ असं माउली म्हणतात, तसं ‘तैसे नित्य नूतन देखिजे, मेघदूत’ हेच खरं. या सगळ्या कारणांनी, शिवाय त्यात संस्कृत भाषेचा असलेला डौल आणि त्यातही कालिदासाची प्रसन्न शैली यामुळे हे काव्य मनाला भावतं. किंबहुना, एखादं भावगीत होऊन ते कायम ओठावर, जिव्हाग्री खेळत राहतं.
- धनश्री लेले