काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने अलिबाग येथे होम-स्टे सुरू केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या पाठोपाठ आणखी एका प्रसिद्ध मराठी कोरिओग्राफरने अलिबाग येथे होम-स्टेची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत या अभिनेत्रीने तिच्या व्यवसायाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
मराठी सिनेविश्वातील अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शिका म्हणून जबाबदारी सांभाळणारी तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारी लोकप्रिय मराठी कोरिओग्राफर फुलवा खामकरने नुकताच स्वत:चा व्यवसाय केला आहे. फुलवाने अलिबागमध्ये सुंदर असा होम-स्टे सुरू केला आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फुलवाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये नारळाची बाग, होमस्टेचा परिसर, स्विमिंग पूल, होमस्टे जवळची प्रशस्त जागा या सगळ्याची झलक पाहायला मिळत आहे. फुलवा लिहिते, “१२ एप्रिल २०२५ रोजी सुरू होत आहे…नागावमध्ये सर्वांसाठी आहे हा सुंदर होम-स्टे! या सुंदर ठिकाणी शांतता, सकारात्मकता अन् नवचैतन्य अनुभवा… आमच्या घराला स्वत:चं घर समजून याठिकाणी राहण्याचा आनंद घ्या. आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतोय. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत येथील वातावरणाची मजा घ्या. आमचा हा होम-स्टे अलिबागपासून फक्त ८ किमी अंतरावर आणि नागाव बीचपासून ५ मिनिटांच्या अंतरावर आहे.”

“७ हजार चौरस फूट पसरलेली नारळाची वाडी, १४०० चौरस फूटांचं स्वतंत्र २ बीएचके घर, स्विमिंग पूल अन् बरंच काही… याठिकाणी आरामात ८ जण राहू शकतात.” अशी पोस्ट शेअर करत फुलवाने आपल्या नव्या व्यवसायाची माहिती सर्वांना दिली आहे.

दरम्यान, फुलवा खामकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आतापर्यंत तिने अनेक बॉलीवूड आणि मराठी चित्रपटातील नृत्यांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘हॅपी न्यू इयर’, ‘जुली २’, ‘नटरंग’, ‘कुणी मुलगी देता का मुलगी’ आणि ‘मितवा’ चित्रपटात तिने नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम पाहिलंय. नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)