Close

काही मराठी कलाकार जे एकेकाळी कर्जात बुडाले होते; कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर (Marathi Celebrity Who Suffer From Financial Losses)

चित्रपटक्षेत्र म्हटलं की कलाकारांच्या आयुष्यातील चढ-उतार आलेच. अभिनेता असो वा निर्माता चित्रपट क्षेत्रात करिअरचा विचार म्हणजे एक प्रकारचा जुगारच असतो. मराठीत अनेक असे कलाकार आहेत ज्यांना पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की एके काळी ते कर्जाच्या डोंगराखाली बुडाले होते. कोण आहेत हे कलाकार चला जाणून घेऊया.

महेश मांजरेकर

तुम्हाला विश्वास बसणार नाही, मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज म्हणून मानले जाणारे महेश मांजरेकर हे देखील करिअरच्या सुरुवातीच्या काळात कर्जाच्या डोंगरात बुडाले होते. महेश मांजरेकर यांनी नाटक निर्मिती पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांच्या नाटकांची प्रशंसा होत होती. मात्र पैसे काही मिळत नव्हते. विशेष म्हणजे या नाटकांचा निर्मितीसाठी महेश यांनी अनेक ठिकाणाहून कर्ज घेतले होते. महेश यांचा हा स्ट्रगल पाहून त्यांच्या सासूबाईंनी त्यांना हे क्षेत्र सोडून नोकरी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी महेश यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून 'ध्यानीमनी' या नाटकाची निर्मिती करणायचे ठरवले. मात्र या नाटकासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी मोठी रिस्क घेत पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. इतकच नाही तर आपल्या मुलीचा भविष्यसाठी ठेवलेली सर्टिफिकेट देखील त्यांनी गहाण ठेवली होती. मात्र त्यांचा हा अखेरचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि ध्यानीमनी नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर डोक्यावरचे कर्जही उतरून गेले.

शरद केळकर

दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता शरद केळकर आज मराठी हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष मेहनत केल्यानंतर आज शरद कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. परंतु, शरदचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. एकेकाळी घरातील परिस्थिती सावरण्यासाठी शरदला जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करावे लागले होते. शरदच्या आयुष्यात एक काळ असादेखील आला जेव्हा तो कर्जामध्ये बुडाला होता. एका मुलाखतीमध्ये शरद आपल्या वाईट काळाबद्दल बोलताना म्हणाला, एक काळ असा होता जेव्हा माझ्या बँकेचे अकाउन्ट रिकामे झाले होते. माझ्यावर घराचे कर्ज होते. इतकच नाही तर क्रेडिट कार्डमध्ये देखील बॅलन्स उरला नव्हता. लोकांना आपले यश दिसते मात्र त्यामागे काय खस्ता खाव्या लागल्या हे दिसत नाही.

केदार शिंदे

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अवघ्या २४ दिवसांत या चित्रपटाने ६५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. मात्र केदार शिंदे यांचा आयुष्यात एक काळ असा होता की त्यांना घरातले दागिने देखील गहाण ठेवायला लागले होते. अगं बाई अरेच्या चित्रपटानंतर केदार यांनी जत्रा या चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात केली. त्यावेळी ते ३० वर्षांचे होते. निर्मितीचा फारसा अनुभव नव्हता, मात्र फायनान्सचे गणित असं काही चुकलं की त्यावेळी त्यांना त्यांचं घर, आईचं घर, बायकोचे दागिने गहाण ठेवावे लागले होते. पण तेव्हा मला क्रेडिट आणि डेबिटचं गणित जमलं नाही. त्यावेळेस केदार शिंदे यांच्यावर ९० लाखांचं कर्ज झालं होतं, मात्र जत्रा सुपरहिट ठरला आणि ते कर्ज हळूहळू उतरत गेलं.

महेश कोठारे

मराठी सिनेसृष्टीतील एक स्टार कुटुंब म्हणून कोठारे कुटुंबाची ओळख आहे. २००५ मध्ये महेश कोठारे यांनी 'खबरदार' चित्रपटाची निर्मिती केली. त्यावेळी या कुटुंबात कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्यांचे कर्ज फेडले जात नव्हते आणि ते वाढतच चाललेले होते. इतकंच नाही तर कोल्हापूरमध्ये शूटिंग करत असताना बँकेने त्यांचं मुंबईतलं राहतं घर देखील जप्त केलं होतं. पण त्या सगळ्या गोष्टींची चिंता असून देखील त्या माणसाने तो चित्रपट बनवला. पूर्ण केला. शूटिंग संपलं. त्यानंतर महेश कोठारे त्यांच्या आई वडिलांना आणि आदिनाथला पुण्याला घेऊन गेले. त्यांना पुण्याच्या घरी ठेवलं आणि स्वतः मुंबईला येऊन इथे भाड्याने राहायला जागा शोधत होते. चित्रपटनिर्मितीत भरपूर कष्ट घेऊनही यश मिळत नसल्याने त्यांनी शेवटी टीव्ही मालिकेची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि इथून त्यांचा ‘बॅड पॅच’ संपण्याचा प्रवास सुरू झाला. २०११ ला त्यांनी मराठी सिनेसृष्टीतली सगळ्यात मोठी डील साइन केली. त्यानंतर त्यांचे कर्ज फिटले आणि स्वतःच घरही झालं

रवींद्र महाजनी

मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक म्हणजे अभिनेते रवींद्र महाजनी, १९८७ चा दरम्यान रवींद्र यांनी फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि कुटुंबासोबत पुण्याला शिफ्ट झाले. पुण्यात त्यांनी स्वतःचा कंस्ट्रक्शन व्यवसाय सुरु केला होता. मात्र त्यांच्या व्यवसायात पार्टनर असलेल्या व्यक्तीने त्यांची फसवणूक केली. ज्यामुळे त्यांना प्रचंड लॉस सहन करावा लागला. ज्यामुळे त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर जप्ती आली. राहते घर बँकेकडे गहाण असल्याने त्या घरावर देखील जप्ती आली. या कुटुंबावर जवळपास ४० ते ४५ लाखांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला. मात्र आपल्या कुटुंबावर आलेले भयानक संकट पाहून त्यांच्या मुलाने म्हणेजच गश्मीरने लहान वयात मिळेल ते काम करून पैसे गोळा करण्याचा निर्णय घेतला. नृत्याची आवड असणाऱ्या गश्मीरने स्वतःची डान्स अकॅडेमी सुरु केली. गश्मीरच्या या अकॅडमीला चांगला प्रतिसाद मिळू लागला. पुढे अजून अनेक व्यवसाय करत गश्मीरने आपल्या वडिलांचे कर्ज फेडले.

गश्मीर महाजनी

वडिलांप्रमाणे गश्मीरच्या आयुष्यात देखील असा प्रसंग फेस करावा लागला होता. डान्स क्लास आणि इतर व्यवसायातून जम बसल्यानंतर वयाच्या २२व्या वर्षी गश्मीरने एक मोठा निर्णय घेतला. आणि तो म्हणजे फिल्म निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा. गश्मीरने दिग्गज सिनेमॅटोग्राफर अशोक मेहता यांना घेऊन एक मराठी चित्रपटाची निर्मिती सुरु केली. मात्र चित्रपटाचे काम चालू असतानाच सहनिर्माते असलेल्या अशोक मेहता यांचे अकस्मात निधन झाले आणि गश्मीरला धक्काच बसला. गश्मीरने हा सिनेमा घर, मालमत्ता गहाण ठेवून बनवला होता. मात्र आता पुन्हा एकदा गश्मीरसमोर कर्जाचा डोंगर उभा राहीला होता. आर्थिक संकटामुळे गश्मीर डिप्रेशनमध्ये गेला. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी त्याने अभिनयात हात अजमावण्याचा निर्णय घेतला. गश्मीरने २०१० मध्ये मुस्कुराके देख जरा मधून पदार्पण केले. त्यानंतर अनेक नाटक चित्रपट अभिनय करत गश्मीरने पुन्हा एकदा गरुड भरारी घेतली.

Share this article