मराठी सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे काल रात्री निधन झाले आहे. त्यांनी अनेक नाटकं, मराठी मालिका, मराठी चित्रपट व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. प्रेमाताई नावाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत ओळखल्या जाणाऱ्या प्रेमा साखरदांडे या मास्टर्स व्हॉइस नावाने ध्वनिमुद्रिका तयार करणाऱ्या वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत. त्यांच्या बहिणी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या.

प्रेमा साखरदांडे या फक्त अभिनेत्रीच नाही तर शिक्षिकाही होत्या. मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यांनी ‘स्पेशल २६’, ‘द इम्पॉसिबल मर्डर’, ‘सावित्री बानो’, ‘मनन’, ‘माझे मान तुझे झाले’, ‘बेट’, ‘फुल ३ धमाल’ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून भूमिका केल्या. ‘प्रपंच’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते. बालरंगभूमीसाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. जाहिरातीतही त्या लोकप्रिय होत्या. त्यांची कन्या क्षमा साखरदांडे यांनी नाटकांत कामे केली आहेत.