Close

आंबा… आरोग्यासाठी चांगला! (Mango… Good For Health!)

आंब्याला थांबा! म्हणणारा कुणी नसेलच बहुधा. सर्वांना एक मताने आवडणार आणि म्हणूनच फळांचा राजा, असे बिरुद मिरवणार्‍या आंब्याचा हा मौसम.

आंब्याच्या स्वादाची तुलना स्वर्गामधील अमृतासोबत केली जाते. अशा या अमृतासम स्वादामुळे आपण इतके प्रभावित होतो की, त्यापुढे आंबा आरोग्यासाठीही चांगला असेल, याचा विचारही आपल्या मनात येत नाही. पण हो, जिव्हा तृप्त करणारा हा आंबा, आरोग्यवर्धकही आहे. कसा ते जाणून घेऊया, म्हणजे पुढच्या वेळी आंब्याचा आस्वाद घेताना, अधिकच आनंद मिळेल.

  1. आंब्यामधील अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्स कर्करोगास प्रतिबंध करतात. स्तनाचा कर्करोग, लुकेमिया, कोलोन आणि प्रोस्टेट अशा कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी हे अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्स मदत करतात. म्हणूनच कर्करोगींसाठी आंबा अतिशय उपयुक्त आहे.
  2. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने आणि क जीवनसत्त्व असते. हे घटक शरीरामधील कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात. आंब्यामुळे निर्माण होणारे हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन शरीरातील कॉलेस्टेरॉलची पातळी समतोल राखण्यास मदत करते.
  3. एक कप आंब्याच्या फोडींमध्ये आपल्या शरीराच्या नियमित आवश्यकतेपैकी 25% अ जीवनसत्त्व मिळू शकते. त्यासोबत आंब्यामध्ये बिटा केरोटिन, अल्फा केरोटिन व बिटा क्रायप्टोक्सॅनथिन असे काही फ्लेव्होनॉइड्सही भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. अर्थात, दृष्टी सुधारण्यासोबतच, रातांधळेपणा व डोळ्यांचा कोरडेपणा अशा समस्यांवरही मात करता येते.
  4. आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात असणारे ब6, क आणि इ हे जीवनसत्त्व संसगर्र्जन्य रोगांविरुद्ध लढण्यासाठी
    मदत करतात. तसेच आरोग्यास अपायकारक ऑक्सिजन फ्री रेडिकल्सविरुद्धही कार्य करतात.
  5. आंब्यामध्ये काही प्रमाणात तांबेही असते. हे शरीरास अत्यंत आवश्यक असणार्‍या एन्झायमिनचा एक सहघटक
    आहेत. ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
  6. त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठीही आंबा उपयुक्त ठरतो. आंब्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते.
    त्वचेवरील छिद्र मोकळी करून, त्वचा स्वच्छ आणि मुलायम करण्याचे कार्य आंबा करतो. त्यामुळे मुरमांचे प्रमाणही कमी होते.
  7. आंब्याच्या पानांचे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे मधुमेहाच्या बाबतीत आहे. ते रक्तामधील इन्सुलिनचे प्रमाण वाढवून, मधुमेह कमी करण्यास मदत करते. त्यासाठी आंब्याची पाने स्वच्छ
    करून पाण्यात उकळवून, काही तासांकरिता तशीच पाण्यात राहू द्या. नंतर हे पाणी गाळून प्या. असे नियमित केल्यास मधुमेहात उपयुक्त ठरते.
  8. आंब्यामधील एन्झायइम्स प्रथिन्यांच्या विघटनात मदत करतात, तर आंब्यामधील फायबर पचनासंबंधी समस्यांमध्ये लाभकारक ठरतात.
  9. आंब्याचा थंड गर तुमच्या शरीरामधील उष्णता कमी करण्यास उपयुक्त ठरतो. म्हणूनच कडक उन्हाळ्यामुळे शरीराला होणारी हानी भरून काढायची असेल, तर एक ग्लास आंब्याचा ज्यूस प्यावा. उष्माघातामुळे मूत्रपिंडात भरपूर टॉक्सिन जमा होतात, आंबा हे टॉक्सिन कमी करण्यास मदत करून शरीराला थंडावा देतो.
  10. आंब्यामधील टार्टरिक अ‍ॅसिड, मॅलिक अ‍ॅसिड आणि सायट्रिक अ‍ॅसिड यांमुळे शरीरामधील अल्कलीचे प्रमाण समतोल राखण्यास मदत होते.
  11. आंब्यामध्ये मुबलक प्रमाणात इ जीवनसत्त्व आहे. एका सर्वेक्षणानुसार, हे जीवनसत्त्व लैंगिक आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. अर्थात, आता आंब्यावर ताव मारण्यासाठी तुम्हाला बरीच निमित्त मिळाली असतील, नाही का? मग विचार कसला करताय?

Share this article