मुलांना बालपणापासूनच चांगल्या सवयी लावल्या तर मोठेपणी त्याचा निश्चितच फायदा होतो. मुलांना जबाबदार बनवण्यासाठी पालकांनीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.
सकाळीच ऑफिसला जाताना ट्रेनमध्ये एक मैत्रिण भेटली. अतिशय त्रस्त झालेली. ङ्गकाय गं काय झालं?फ विचारल्यावर म्हणाली, ङ्गअगं रोज ऑफिसला जायला उशीर होतो. सकाळी कौस्तुभचं दप्तर भरा, त्यातही पुस्तके इथे- तिथे पडलेली. मग सकाळी त्याची शोधाशोध. डबा भरणे, नाश्ता करण्यासाठी मागे लागणे, इतकंच नाही तर सॉक्स आणि बूटही मीच घालून द्यायचे. कौस्तुभचे वडील सकाळी निघून जातात. मग मागे मलाच सगळं करावं लागतं. कधी शिकणार हा कौस्तुभ स्वत:ची कामं स्वत: करायला? ही अशी वाक्यं आपल्याला अनेक जणींकडून वेगवेगळ्या निमित्तानं ऐकायला मिळतात. त्यातला एक मुद्दा मात्र ङ्गकॉमनफ असतो. तो म्हणजे मुलं जबाबदार कधी होणार?
मुळात लहानपणापासूनच मुलांना काही सवयी लावल्या तर असं बोलायची वेळच येत नाही. एका ठराविक वयापर्यंत मुलांनी हट्ट करणे, निष्काळजीपणे वागणे नैसर्गिक आहे. आणि ते क्षम्यही असते. मात्र वाढत्या वयाबरोबर मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी पालकांनीच काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
मुलांना सतत ओरडू नये
शुल्लक कारणांवरून मुलांना ओरडू नये. अशाने मुलं चिडचिडी बनतात. शिवाय सतत ओरडल्याने मुलं पालकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. त्यापेक्षा एखादी गोष्ट प्रेमाने, शांतपणे समजवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावा
सुरुवातीपासून मुलांना चांगल्या सवयी लावाव्यात. चॉकलेट खाल्ल्यावर कागद कचर्याच्या डब्यात टाकावा, खेळून झाल्यावर खेळणी नीट भरून ठेवावीत. जेवण झाल्यावर स्वत:चं ताट स्वत: उचलावं. शाळेतून आल्यावर दप्तर, बूट जागच्याजागी ठेवावेत. या सवयी लहानपणीच मुलांना लावल्या तर भविष्यात अंगवळणी पडतात. तसेच मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना घरातील काही छोटी कामे सांगावीत. असे केल्याने मुलं स्वत:ची कामं स्वत: करायला शिकतात व कोणावर अवलंबून राहात नाही.
दुर्लक्ष करू नये
लहान मुलांच्या निष्काळजी वागण्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अशा वागण्यामुळे भविष्यात नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलं निष्काळजीपणे वागत असतील तर त्यांना असं वागण्यानं काय नुकसान होऊ शकतं, याची न ओरडता, शांत भाषेत कल्पना द्या.
अचानक नकार देऊ नका
मुलं जरा मोठी होऊ लागल्यावर त्यांना असं वाटतं की, आपल्याला सगळं कळतं. त्यामुळे पालक मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून रोखत असतील, तर ते मुलांना आवडत नाही. अशा वेळी मुलांना नकार देण्यापेक्षा त्यांना थोडा वेळ द्या. उदा. तुमचा मुलगा खूप वेळ टॅबवर गेम खेळत असेल तर त्याला ताबडतोब टॅब बंद कर आणि अभ्यासाला बस असं सांगण्यापेक्षा पाच मिनिटांनी टॅब बंद करून अभ्यासाला बस, असं नीट सांगा.
स्वत:मध्ये बदल करा
मुलं मोठ्यांचं अनुकरण करतात. त्यामुळे तुमच्या चांगल्या - वाईट सगळ्याच सवयींचा त्यांच्यावर परिणाम होत असतो.
तेव्हा पालकांनी, दोघांनी मिळून घरातील सगळी कामं करावीत. अशाने मुलांनाही काम करायची सवय लागते.
मुळात मुलांना काही शिकवायच्या आधी स्वत:ला काही गोष्टींची शिस्त लावून घ्या.
हुज्जत घालू नका
वाढत्या वयाबरोबर मुलं पालकांना उलट उत्तरं द्यायला शिकतात. अशा वेळी मुलांबरोबर हुज्जत घालत बसण्यापेक्षा शांत बसणं उत्तम. कारण पालक काही बोलत नाही, हे पाहून मुलंही मग आपोआपच शांत होतात.